सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ हिरवा चुडा… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

आंब्याची पान तोडून त्याची सुंदर तोरणं दारावर छान शोभत होती,… दारं जरी जुनाट असली तरी त्याला रंगवून त्यावर नक्षी काढून रेवाने ती छान सजवली होती,… स्वतःच नवरी असली, तरी हौसेने आणि उत्साहाने कामं पेलत होती ती,… अगदी सडा रांगोळी, दारातली प्राजक्ताची फुलं जमवून देवघरातल्या देवीसाठी सुंदर हार बनवून ठेवला,.. सगळी लगबग सुरूच. ते बघून जमलेल्या मावश्या, आत्या म्हणत होत्या… “पोरगी जाईल तर अवघड होईल ग बाई ह्या घराचं,…. झालं आज देव ब्राह्मण परवा सुनं होईल अंगण,… ” 

आईची साधारण साडी घालूनच रेवा देवब्राह्मणाच्या पुजेला बसली,… आपल्या आईबाबांच्या परिस्थितीला ओळखुन कधीही हट्ट न करणारी हि रेवा,… एका शाळेत नोकरी पण करत होती,…. मिळेल तो पगारही घरी देत होती,.. हाताशी आलेला पोरगा आजारानं गमावला होता त्यात होतं नव्हतं ते सगळं गेलं होतं,… ह्या दोन खोल्याच घर आणि हे अंगणातलं किराणा दुकान ह्यावर सगळं सुरू होतं,…

दूरच्या नात्यात एका लग्नात रेवाला सासरच्यांनी बघितल्यापासून हा योग जुळून आला होता,… दाराशीच लग्न करायचं ठरलं होतं,… पण बैठकीत तीन तोळ्याच्या पोहे हारावरून मोडायला आलं होतं,… पण कोणीतरी मध्यस्थी करून दोन तोळ्यावर जमवलं होतं,… तेव्हा मात्र रेवा म्हणाली होती,… ” मला पोहे हार नको. त्या ऐवजी दोन सोन्याच्या बांगडया करू,… ” हिरव्यागार चुडयासोबत पिवळ्याधमक सोन्याच्या बांगड्या तिनी आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या हातात पहिल्या होत्या.. तिला फार इच्छा होती तश्या घालण्याची,… ही अशी बैठक ठरून दोन महिने झाले आणि आज लग्न येऊन ठेपलं होतं,…

बारीक सनई सुरू होती, जातं, माठ, दारातला मांडव सगळं सजलं होतं,… चला नवरीने चुडा भरून या आधी,… गुरुजींनी सांगितलं,… सगळ्या बायकांच्या घोळक्यात ती येऊन बसली,… आत्या म्हणाली, “अग तुझ्या बापाने सोन्याच्या बांगडया केल्या ना तुला… त्या मागे घाल मग चुडा काढता येणार नाही,….

तसं तिला धस्स झालं,… ती म्हणाली हो आलेच घालून,… ती स्वयंपाक घरात गेली, “ आई माझ्या बांगडया दे ना,… ” आईने अवंढा गिळत तिच्याकडे बघितलं,..

त्याक्षणी तिला आई अधिकच केविलवाणी वाटली,… आईने डबी लपवत हळूच फक्त बांगड्या दिल्या,… ती घाबरतच बसली चुडा भरायला,… आजूबाजूचे हात तिच्या सोन्याच्या बांगड्या बघत होते,… “जास्तच पिवळं दिसतंय सोनं,.. ” कोणी म्हणे दोन तोळ्याच्या नसतील ग… जास्त लागलं असेल सोनं,.. कोणत्या सोनाराकडे केल्या,… ?

ती अगदी कावरीबावरी झाली सगळ्या प्रश्नांनी,… तेवढ्यात गुरुजींनी हाक मारली, आणि ती सुटका झाल्यासारखी पळाली,… नाजुक गोऱ्या हातावर चुडा अगदी सुंदर दिसत होता,… स्वतःच काढलेली मेंदी,… त्या मेंदीचा सुंदर सुगंध,… पण ह्या पिवळ्या बांगड्या ती अस्वस्थ होत होती,… कसं होईल लग्नानंतर?…… आपल्याला कोणी बांगड्यांच विचारलं तर, ?… तिला मध्येच घाम फुटायचा,… आई बाबा दोघेही अपराधी असल्यासारखे बघायचे एकमेकांना,…

आज ती खुप सुंदर दिसत होती,… स्वतः बनवलेलं रुखवत. सगळी बारीक सारीक तयारी,…

“सोन्यासारखं आहे ग बाई लेकरू,… पुण्यवान आहेत लोकं,… त्यांना म्हणा काय करता खऱ्या सोन्याला??? “ आजीचं असं वाक्य ऐकताच माय लेकींनी एकमेकांना बघितलं,… फक्त आपल्या तिघात असलेलं गुपित आजीला कळलं की काय,… असं जर तिकडे काही कळलं, तर वरात परत जाईल,… बापाला पण धस्स झालं,..

… पण आजी पुढे म्हणाली, “आजकाल असे समजुतदार लेकरं राहिले नाही,.. म्हणून म्हणते सोनं काय करायचं?अशी सुन मिळाली त्यांना,.. “

आजीचं वाक्य पूर्ण होताच सुटकेचा श्वास सोडला तिघांनी,.. , मुहूर्त घटिका आली आणि रेवाच्या डोक्यावर अक्षता पडल्या,.. दिवसभर सगळी लगबग सुरू होती,… नंदा, जावा जवळ येऊन बघु नवरीचा चुडा म्हणत त्या पिवळ्या बांगडया बघुन जात होत्या,… त्या प्रत्येक क्षणी हिच्या काळजाचा ठेका चुकत होता,… निघण्याची वेळ आली,… आई बाबांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून झालं,… देवघरातल्या देवीला नमस्कार करून निघताना देवीला ठेवलेला चुडा पाहून ती म्हणाली,… “आता ह्या चुड्याची लाज तुलाच,… सांभाळ आई जगदंबे, “.. ती वळून बघत होती,… आपलं गरीब माहेर,… सुंदर प्राजक्ताखाली सजलेला मंडप,… नक्षीदार लाकडी दरवाज्यात केविलवाणे, अपराध्यासारखे उभे हतबल असलेले आपले आई वडील,… ती परत माघारी पळत आली दोघांना घट्ट धरलं,… ” माझी चिंता करू नका मी बघेल सगळं,… निश्चिंत रहा…” 

सगळे विधी झाले. त्याने रात्री तिला जवळ ओढलं,… “ मला तुझे हे मेंदी भरले हिरव्यागार चुड्याचे हात बघू दे जर मनसोक्त,… जादू आहे तुझ्या हातात,… ” त्याने ते हात निरखले आणि ओठावर ठेवले तशी ती शहारली आणि मनातून घाबरलीही,… “ चुड्याचे हात बघताय कि सोन्याच्या बांगडीचे हात बघताय,… ?”

तो म्हणाला, “ चुड्याचेच गं,… किती छान दिसतो हिरवा रंग तुझ्या हातावर आणि मुळात तुझं सगळं कष्टमय आयुष्य मला माहित आहे,.. आईबाबांना सावरून धरणारे हे हात फार सुंदर आहेत ते माझं आयुष्य सावरायला आलेत हे भाग्यच ना माझं,… ” 

तिला जाणवलं हे बांगडयाच दडपण आता नाही पेलू शकणार आपण,… तिला एकदम रडूच आलं,… त्याला कळेना काय झालं एकाएकी,…

तीच बोलायला लागली,… “ तुम्ही रागावणार नसाल तर सांगते,… आम्ही सोन्याच्या बांगडया घेऊन घरी आलो,… पण दुसऱ्या दिवशी बँकेवाले हजर. दादाच्या आजारात काही कर्ज उचललं होत आम्ही,… घरावर जप्ती आणतो म्हणाले,… मला बांगडया मोडाव्या लागल्या,… आई बाबाला माझं लग्न करणं मुश्किल होतं,.. पण ते पेललं कसंबसं पण हे बांगड्याचं ओझं नव्हतं पेलण्यासारखं,… ”

त्याने पिवळ्या बांगडयाला हात लावला,… “ मग ह्या बांगड्या?? “ 

ती म्हणाली “ खोट्या आहेत,… आणि हे खोटं मला मनात त्रास देतंय,… खरं ते तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही ठरवा मला नांदवायचं की नाही,… तशी शाळेशिवाय शिकवण्या घेऊन पैसे कमावून लवकर करेल मी बांगडया पण तुम्हाला असं फसवलं आहे आम्ही,…. ” 

तो म्हणाला, ” मग तर पोलिसच बोलवायला हवे मला पकडायला. कारण एवढ्या हुशार हातांना मी सोन्याच्या बांगड्यांची लाच मागितली – हे तर हातच सोन्याचे आहेत…“

तिने एकदम चमकून त्याच्याकडे बघितलं,… त्याने तिचे डोळे पुसले,.. “ अग वेडाबाई… असं म्हणतात पहिल्या रात्री काहीतरी भेट द्यावी एकमेकांना. चल उद्या जाऊन अश्याच डिझाईनच्या बांगडया करून घेऊ अगदी गुपचूप आणि तू मला काय गिफ्ट दे सांगू,… “

ती म्हणाली “ काय,.. ?”

तो म्हणाला.. “असाच हिरव्यागार चुडयासारख्या बांगडया भरलेले हात नेहमीसाठी,… माझ्या गळ्यात जे किणकिण वाजत प्रेमाच्या गोष्टी बोलत जातील माझ्याशी,… चालेल ना,.. “

ती लाजून गोरीमोरी झाली.. आता सारख्या त्या हिरव्या बांगडया तिला प्रेमाची आठवण तर देतात, पण त्या मागच्या सोन्याच्या बांगड्या मात्र सोन्यासारखं माणूस आयुष्यात आलं ह्याची सतत जाणीव देतात,… आणि मग तिचे हात आणखीनच खुलुन दिसतात…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments