डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ किरण… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
(“शोभाताई, तुम्ही स्त्रीरोग तज्ञांची मदत घ्या. तुम्ही सांगितलेली लक्षणे सर्वसाधारण आजाराची ही असू शकतात. पण रक्तस्त्रावासाठी स्त्री रोग तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यातून काही निष्पन्न झाल्यास आपला इलाज अवश्य करून घ्या”.) – इथून पुढे
प्रेमाताई, “स्त्रियांना गर्भाशय आणि स्तन कॅन्सरला फार मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते ? नाही का?”
होय माधुरीताई, स्त्रियांना गर्भाशय! गर्भाशय मुख, स्त्री विजांड कोश, आणि स्तन कॅन्सरचा सामना करावा लागतो तर पुरुषांना तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसांचा कॅन्सर होतो. विशेषतः व्यसनी व्यक्ती ज्या तंबाखू बिडी सिगारेटचे सेवन करतात. दारू आणि तत्सम पदार्थांचे सेवन करतात. त्यांना तोंडाचा, जबड्याचा, घशाचा कॅन्सर हमखास होतो. म्हणून तंबाखूचं सेवन टाळणं, धूम्रपान न करणं, दारू वर्ज्य करणं फार गरजेचं आहे. यासाठी विचार जागृती, समाज जागृती होणं गरजेचं तर आहेच पण प्रत्येक व्यक्तीनं सामाजिक जबाबदारी म्हणून हे कार्य हाती घेतलं तर उद्दिष्ट गाठणं सुकर होईल. सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा लिहून सरकार मोकळे होते आणि दुसरीकडे बराच महसूल या उत्पादनांमुळे मिळत असल्याने त्याला खुली बाजारपेठ ही देते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहून स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे आहे.
कॅन्सरच्या कोणत्या प्रकारांमध्ये मृत्यू ओढवतो हे आमच्या प्रेक्षकांना सांगा प्रेमाताई.
खूप छान प्रश्न विचारलात माधुरीताई. काही कॅन्सर जीव घेणे असतात किंवा त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण असते ते आहेत, प्रथम क्रमांकाच्या कॅन्सर फुफ्फुसांचा असतो. दुसरा क्रमांक लागतो जठराच्या कॅन्सरचा. माधुरीताई तिसरा क्रमांक लागतो यकृताच्या कॅन्सरचा. चौथा क्रमांक लागतो तो आतड्यांच्या कॅन्सरचा. पाचवा क्रमांक लागतो तो अन्ननलिकेच्या कॅन्सरचा. त्यामुळे या प्रकारच्या कॅन्सरचे लवकर निदान होणे आणि त्यानुसार रुग्णांचा इलाज होणे गरजेचे ठरते की जेणेकरून या आजारावर नियंत्रण मिळवता येईल. याव्यतिरिक्त मेंदूतील ट्युमर, शरीरावर होणाऱ्या गाठी, युरीन ब्लॅडर, गुद् मार्गाचे कॅन्सर ही असतात. जवळ जवळ दोनशे प्रकारचे कॅन्सर असतात. काही जलद गतीने वाढणारे असतात तर काही धीम्या गतीने वाढणारे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरचं लवकर निदान होणं फार गरजेचं. जेवढं निदान लवकर तेवढं या रोगांवर नियंत्रण मिळवणं सोपं आणि रुग्णांचे आयुष्य वाढणं सहज शक्य होतं.
“प्रेमाताई आपण स्वतःही या जीवघेण्या आजारावर मात केलीय आणि या स्वानुभवातूनच तुम्ही “कॅन्सरशी लढा विजयाकडे एक पाऊल” या संस्थेची स्थापना केलीत. तुम्ही स्वतः आणि या संस्थेची जोडली गेलेली प्रत्येक व्यक्ती एक किरण बनून हजारो कॅन्सर रुग्णांच्या जीवनात नवप्रकाश फैलावत आहात त्यांची मदत करीत आहात. याविषयी थोडं विस्तारांनं सांगा.
अवश्य माधुरीताई. मला कॅन्सर होणं हा माझ्यासाठी ही जीवघेणा अनुभव होता. आणि मी भूतकाळाच्या उदरात शिरून एक एक अनुभव कथन करू लागले.
आम्हा स्त्रियांचा पिंडच तसा. दुखणे अंगावर काढण्याचा. जवळजवळ एका वर्षापासून मला बरं नव्हतं. तापाची कणकण वाटणं, भूक मंदावणं, अतिशय थकवा जाणवणं, निरूत्साही वाटणं, रात्री शांत झोप न लागणं आणि या सगळ्यात महत्त्वाचं मला रक्तस्राव होत होता. सुरुवातीला हे रक्तस्त्रावाचं प्रमाण कमी होतं. त्यात सातत्यही नव्हतं. काही दिवस कोरडेही असत. पण नंतर माझा त्रास वाढू लागला तसे माझे धैर्यही सुटू लागले. मार्च एंड मुळे माझ्या ऑफिसातील कामातून सवड मिळत नव्हती. माझी रजा ही मंजूर होत नव्हती आणि त्यामुळे जास्तच हतबल झाले होते. मार्च महिना संपला. यावेळी आमच्या बँक शाखेला चांगला घसघशीत नफाही झाला होता.
“सर, माझी तब्येत बरी नाही आणि या एप्रिल महिन्यात मला सुट्टी हवी. मुंबईला जाऊन माझं चेकअप करायचंय. “
“ओके मॅडम, आता काही अडचण नाही. आपण पाहिजे तेवढी रजा घ्या. आपलं चेकअप करून घ्या. इलाजही करून घ्या. आणि महत्त्वाचं काळजी करू नका. चिंता सोडा. सगळं चांगलं होईल. ”
“थँक्यू सर, आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. “
सोनोग्राफीतच माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. गर्भाशयात पाच सेंटीमीटर ची लांब, रुंद अशी मोठी गाठ होती. पण ही गाठ कॅन्सरची आहे की अन्य कशाची यासाठी एमआरआय करणं किंवा बायोप्सी करणं गरजेचं होतं. एम आर आय मध्ये हे चित्र अधिक सुस्पष्ट झालं. ती गाठ कॅन्सरचीच असून दुसऱ्या ग्रेडची होती.
माझा हा मेलीग्नन्स युटेरियन कार्सिनोमा जीव घेणा आहे की नियंत्रणात येण्याजोगा याचे निदान तर शस्त्रक्रिये नंतरच ठरणार होतं. आजार कितपत पसरलाय किंवा नाही यासाठी लिम्फनोड्स अर्थात लसिका ग्रंथींचं परीक्षण होणं गरजेचं होतं.
आजाराचं निदान ऐकताच तर माझ्या पायाखालची जमीन जणू सरकली होती. मृत्यूच्या पूर्वीचं स्टेशन लागलं होतं. आता माझ्या हातात माझ्या आयुष्याचा किती काळ शिल्लक होता हेच पाहणं महत्त्वाचं होतं. माझे कुटुंबीय, माझे हितचिंतक, शुभचिंतक, माझा मित्र परिवार मला धीर देण्यासाठी एकवटला होता.
कामगार कल्याण केंद्र संचालक विलास पाटील म्हणाले – “मॅडम, तुमच्या आजाराविषयी अतुल चित्रे माझे सहकारी यांनी कळविले. मॅडम, तुम्ही तर आम्हाला शॉकच देताय हा. पण मॅडम तुम्ही घाबरून जाऊ नका. लवकर बऱ्या व्हा. आणि पुन्हा आपल्या कामगार कल्याण केंद्राच्या विविध कार्यक्रमात सामील व्हा. आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या बरोबर. ” “धन्यवाद पाटील सर, तुमच्या प्रेम आपुलकीने भरलेल्या शुभेच्छा नक्कीच माझ्या कामी येतील. ठेवते फोन. “
माझे कवी मित्र सदानंद गोरे म्हणाले होते; “मॅडम, घाबरून जाऊ नका. अहो कवी जवळ तर मनाच्या कणखरपणा, आत्म्याची शक्ती असते. या संकटातून तुम्ही नक्कीच सही सलामत बाहेर याल असा विश्वास आहे माझा. ” “सर, तुमच्या विश्वासावर विश्वास आहे माझा. परमेश्वर कृपेने तसेच घडो. ” “घडणारच मॅडम जीवनाकडे पाहण्याचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमची हार, तुमचा पराजय नक्कीच होऊ देणार नाही. “
“माई, रडू नकोस तुझ्यासाठी जगातील प्रत्येक डॉक्टरांना मी इंटरनेटवरून हाक देईन आणि तुझ्या आजारावर कशी मात करता येईल शोधून काढील. भलेही या कामात माझ्या आयुष्याची सगळी जमापुंजी खर्च पडली तरी बेहतर पण माझी बहीण माझ्यासाठी अनमोल आहे. ” माझ्या मोठ्या भावाचे हे धीरोदत्त शब्द माझे बळ वाढवीत गेले आणि ऑपरेशन टेबलवर जाण्यासाठी माझे मनोधैर्य वाढत गेले.
ऑपरेशन नंतर पाच-सहा दिवसांनी माझ्या शरीरापासून विलग केलेल्या अवयवाचा रिपोर्ट मिळाला. लसिका ग्रंथी नॉर्मल होत्या. म्हणजे रक्त प्रवाह पर्यंत कॅन्सर पसरला नव्हता. तो फक्त स्थानिक त्या अवयवापुरताच मर्यादित होता. रिपोर्टचे विश्लेषण वाचल्यानंतर कुटुंबीयांसह मलाही धीर आला. आणि गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून मनावर आलेले दडपण कमी झाले. आजारावर नियंत्रण मिळालेय ही खात्री झाल्याने मलाही धीर वाटला आणि याचा परिणाम म्हणून माझी शारीरिक रिकव्हरी वेगाने होऊ लागली.
– क्रमशः भाग दुसरा
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]