सौ.शशी नाडकर्णी-नाईक
☆ जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
मन्यादादा सांगू लागला “आपण पंधरा, सोळा वर्षानी भेटलो.त्यात माझ्या आयुष्यात बरेच चांगले, वाईट प्रसंग घडून गेले.दुसरासा माणूस खचला असता पण मी मुळातच हॅपी गो लक्की,हालमें खुशाल रहायची वृत्ती म्हणून ठणठणीत आहे. मीरा, माझी बायको दोन वर्षे अंथरूणावर होती.ती गेली.तिच्या पाठोपाठ अण्णा वयोमानानुसार अल्पशा आजाराने गेले.मग काय मुलांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर. मला तर चहा पण करता येत नव्हता.कधी घरी स्वयंपाकीण ठेवून,कधी बाहेरुन डबा आणून दिवस काढले.हळूहळू मुलगी,मंजिरी काॅलेज करून थोडा स्वयंपाक विचारुन विचारुन, पुस्तकात वाचून करु लागली.तेव्हा तुझ्या आईची इतकी आठवण यायची.कधी त्यानी जाणवू दिलं नाही आपण शेजारी असल्याचं.तुझ्या दादाच्या सारखंच माझं करायच्या सणवारं
गोडधोडं,माझा वाढदिवस.इतकंच काय पण माझ्या आजारपणात पथ्यपाणी पण. अण्णांना ऑफिस मध्ये अचानक काम निघाले आणि रात्री घरी यायला उशीर झाला तर मला तुमच्या बरोबर जेवू घालायच्याच आणि अण्णासाठीं घरी डबा द्यायच्या. अशी देवमाणसं आता मिळणं कठीणच.
आता लग्न करुन मंजिरी गेली नव-याबरोबर यु.के.ला आणि मनोज, माझा मुलगा गेला u.s.ला तिकडेच सेटल झाला.तसे फोन असतात.हा दोघांचे. बोलवतात मला तिकडे.पण योग नाही माझा तिकडे जाण्याचा.वर बोट दाखवून म्हणाला शेवटी त्याची इच्छा. तीन वेळा ह्वीसा रिजेक्ट झाला. ‘एकला चलो रे’. बायकोचंआणि ताईचं पटत नसल्यामुळे ताईशीही संबंध नाही. “ओघ घालवला आणि ओक्साबोक्सी रडला म्हटलं, “तुझ्या वयाला योग्य अशी जोडीदारीण बघ म्हणजे एकटेपणा जाणवणार नाही. मुलं तिकडे तू एकटा इकडे दुखलंखुपलं, अडीअडचणीला हक्काचं माणूस पाहिजेना.का मी शोधू तुझ्यासाठीं?”
तर म्हणाला,”चालेल बघ.चला निघतो भेटू परत “.म्हणून त्यानी आणि माझ्या लेकानी फोन नंबरची देवाणघेवाण करुन निरोप घेतला.आम्ही घरी आलो.
नाटक विसरुनच गेले.आणि अण्णा मन्यादादा, माधुरीताई आणि गिरगावातले बालपणीचे दिवस,त्या आठवणी जाग्या झाल्या.
क्रमशः…
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈