☆ गरज संवादाची… ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆
“काय गं आज इकडची वाट कशी चुकलीस?”
“म्हणजे काय? येते मी आधनं मधनं”
“हो का! आणि मग इथे बाहेर काय करतीयेस? आत नाही यायचं?”
“आतल्याशीच तर झगडा मांडून बसलीये इथे बाहेर. तुम्ही करा त्याची आरती. पण माझी मात्र माती केली आहे त्याने. “
“अगं ए अस काही बाही बोलू नये. तो कोपला की काय होतेय माहितीये ना. “
“आणखी काय कोपायचा बाकी आहे? इतका चांगला अभ्यास केला, इतकी मेहनत केली, एकीकडे संसार, एकीकडे व्यवहार आणि एकीकडे अभ्यास अशा तीन तीन दगडांवर पाय ठेवून, सॉरी पाय रोवून उभी होते मी. पण हाती काय लागले? आज तीनही दगड लाटांबरोबर दूर वाहून गेले आहेत. आणि मी मात्र किनाऱ्यावर वाळूशी खेळत बसली आहे. “
“ए वेडा बाई, काय झालं आमच्या झाशीच्या राणीला? अगं अख्ख्या पंचक्रोशीची आदर्श तू आणि तूच असे अवसान गाळून बसलीस तर कसे चालेल? काय झाले सांग पाहू. “
“तू ऐकशील माझे? बोलशील माझ्याशी”
“हो! का नाही! सांग काय अडचण आहे तुझी?”
“माझ्याशी कोणी बोलायला नाही हीच माझी मोठ्ठी अडचण आहे. “
“परिक्षा जवळ आली म्हणून जरा घराकडे दुर्लक्ष झाले तर ह्यांची चीडचीड. परिक्षेनंतर चार दिवस कुटुंबाबरोबर घालवले तर तिकडे बॉसची चीडचीड. परिक्षेचा निकाल आला, गरजे इतके मार्क नाही मिळाले, पदोन्नतीची संधी हुकली, म्हणून स्वतःशी चीडचीड. आता तूच सांग काय करू? जगणे नकोसे झाले आहे? जीव द्यावासा वाटतो. मी सगळ्यांनाच नकोशी झाली आहे, अगदी स्वतःलासुद्धा. “
“बापरे तुझ्या समस्या तर त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा मोठ्या. बरे आत गेली नाहीस, नाहीतर तोही चक्कर येऊन पडला असता. “
“ए तू चेष्टा करू नकोस माझी. म्हणूनच मी कोणाला काही सांगत नाही आणि माझेही कोणी ऐकत नाही. “
“असे नाही गं, तुझाच जरा ताण हलका व्हावा म्हणून चेष्टा केली. आता हे बघ, आपण म्हणतो ऐकावे जनाचे करावे मनाचे. बरोबर?”
“हो पण त्याचे काय इथे?”
“होते काय, आपण करावे मनाचे लक्षात ठेवतो पण ऐकावे जनाचे हे विसरून जातो. मग आपण कोणाचे ऐकत नाही आणि म्हणून कोणी आपले ऐकत नाही. “
“आता हे काय नवीन?”
“कसं असत ना बघ भले आपण समोरच्याच्या मनाप्रमाणे करो अथवा ना करो पण त्याचे ऐकून घेत आहोत हे दाखवणे व त्याची जाणीव करून देणे गरजेचे असते. आता तुझेच बघ, तू निराश आहेस कारण कोणी तुझे ऐकत नाही, तुझ्याशी कोणी बोलत नाही. “
“बघ नां!”
“हो पण तू सगळ्यांचे ऐकून घेतेस का? संवाद साधतेस का? अगदी आत्ता माझ्याशी मन मोकळे करत आहेस तसे. आपल्या माणसाशी मन मोकळे करणे महत्वाचे बघ. एकदा का मनातले बोलून टाकले की मन कसे हलके होते. आणि हो या हलक्या झालेल्या मनाला समोरच्याच्या सुचना वजा सल्ल्यांनी भरून टाकायचे. कृती करताना त्यांचाही विचार करायचा. “
“पण तेच कसे जमणार. “
“सोपे आहे. आता इथून घरी जा. नवऱ्यासमोर बस. आणि त्याला तुझ्या पुढच्या नियोजनाविषयी सांग. अगदी या आत्ताच्या अपयशापासून. यात त्याची बाजू ऐक. तुझी बाजू सांग. आणि दोघे मिळून पुढचे नियोजन करा. मग उद्या कामावर गेलीस की बॉसशी पण थोड्या वेळ बोल. कामात दिरंगाई कशामुळे झाली ते सांग. त्यांच्या अपेक्षा विचार. तुला त्यांचे हवे असलेले सहकार्य सांग आणि मग नव्या जोमाने कामाला सुरूवात कर. तुझ्या या दोनबाजू पक्क्या झाल्या की मनाला कशी उभारी येईल बघ. या नव्या उभारीतुनच अभ्यासासाठी तयारी कर. पुन्हा प्रयत्न कर. यावेळी नक्की यश मिळेल बघ. “
“ताई तू किती छान शब्दांत समजावलेस. नाहीतर आज मी स्वतःला संंपवून टाकायचे ठरविले होते. अगदी त्याच विचाराने इथे आले होते. किंबहुना म्हणूनच आत जायची हिंमत होत नव्हती. त्या विध्यात्याकडेच पाठ फिरवून बसले होते. पण मी आत आले नाही, म्हणून तोच बाहेर आला तुझ्या रूपाने. “
“तुझे आपले काहीतरीच. “
“नाही ताई. मी आत्ता आत जाते. त्याला नमस्कार करते. आणि बाहेर येऊन नव्याने सुरूवात करते. अगदी तू सांगितलीस तशी.”
लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)
C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७
+९१ ८९७५३ १२०५९ https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈