सुश्री सुजाता पाटील
जीवनरंग
☆ दोन आणि दोन बावीस… – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆
डॉ हंसा दीप
शेजारी आलेल्या पोलिसांच्या गाडीने मला पुरतं सावध केलं. दोन पोलिस बाहेर आले, इकडे -तिकडे त्यांनी पाहिलं आणि निघून गेले. ते निघून जाताच सहजच ते क्षण डोळ्यासमोर तरळले जेव्हा माझा पोलिसांशी प्रत्यक्ष सामना झाला होता. दोन आणि दोन बावीस ह्या अंकानी पुर्ण एक दिवस माझ्या आयुष्यातील भुतकाळात कायमचा लिहून ठेवला होता. त्या दिवशी माझ्या दोन पुस्तकांचं एक पॅकेज भारतातून टोरंटोला येणार होतं. मी सकाळपासून आॅनलाईन ट्रैक करत होते. आता इथे पोचलं, मग तिथे पोचलं. आॅनलाईनचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसान पण कमी नाही. कुरिअर तिथेच आहे की पुढे निघाले आहे हे पाहण्यासाठी, दर अर्ध्या तासांनी मी चेक करायची. आणि शेवटी वेब सर्च केल्यानंतर माहित पडलं की ते पॅकेज घरामध्ये डिलीवर झालं आहे. कोणत्या घरात ! मी तर इथे आहे, इथे तर कोणीच आलं नाही !
सुशीमचा टोमणा मला जिव्हारी लागला…. ” तुझं आणि कुठे दुसरं घर आहे काय?”
मी आधीच डोळ्यात तेल घालून वाट पहात असताना या टोमण्याने माझं अंतर्मन खूपच दुखावलं गेलं. मी अशा काही नजरेने सुशीमकडे बघितलं की त्याने गप्प बसण्यातच आपलं भलं आहे हे तो समजून गेला. पुन्हा पुन्हा ट्रैकींग नंबर चेक केला. कदाचित मी चुकीचा नंबर दिला असेल आणि नवीन सुधारणा केल्यानंतर रिझल्टचा हा मार्ग नक्की बदलेल. मी सतत क्लिक करत राहिले. ट्रैकींगचा रिझल्ट तोच येत होता. कोणताच बदल नाही. हिरव्या रंगाचा टिकमार्क ओरडून ओरडून सांगत होता की पॅकेज तुमच्या घरी पोहचले आहे.
“नसत्या उपद्रवाला मी स्वतः हून आमंत्रण देते” हा आरोप घरातल्यांनी कित्येक वेळा माझ्यावर. लावलेला आहे, परंतु माझा काही दोष नसताना येणाऱ्या संकटाकडे मी कधी लक्ष दिलं नाही. आज पण हेच झालं. म्हणूनच ह्या समस्येतून निघणे माझीच जबाबदारी होती.
बाहेरचा व्हरांडा तर बर्फाने भरून गेला होता. असं वाटत होतं की कुणीतरी पोती भरभरून बर्फ आमच्या घरासमोर ओतला आहे. ह्या बर्फाच्या ढिगाऱ्यावर जरी पुस्तकांचे पॅकेज ठेवले असते तरी वरच्यावर दिसून आले असते. परंतु सहा नंबरचा चष्मा असूनही डोळ्यावर विश्वास न ठेवता मी त्याचं शोधकार्य चालू ठेवलं. दरवाजातून बाहेर जाईपर्यंतच कित्येक अडचणी आल्या. खोऱ्याने बर्फ काढून काढून आधी रस्ता बनवला. दरवाजा मोर साचलेल्या बर्फात उकरून -उकरून पाहिलं की कुठे ताज्या, बर्फाच्या थरांमध्ये पॅकेज दबून तर गेलं नसेल.
परंतु पॅकेज कुठे नव्हतंच, तर ते मिळणार कसं ! बर्फाचे इवलेसे कण इकडून तिकडे पडत असताना माझ्या हातावर पडून जणू हसत होते. असं ग्लोव्हज न घालता बर्फात हात घालण्याची कधी मी हिम्मतही करू शकत नव्हते. पण आता पॅकेज शोधण्याचं असं काही भूत माझ्या डोक्यात शिरलं होतं की माझे नाजूक हात बर्फाच्या ढिगाऱ्यात वारंवार जाताना जराही कचरत नव्हते. डोक्यातील उष्णता सरळ हातापर्यंत पोहचून थंडीलाही मात देत होती. का कोण जाणे राहून राहून मनात हीच शंका येत होती की कदाचित पॅकेज पाठवलंच नसेल.
तरीही तात्काळ ह्या शंकेचं खंडनही झालं कारण.. जर पॅकेज पाठवलंच नसतं तर आॅनलाईन ट्रैक कसं झालं असतं ! आता, जर ट्रैक होत आहे तर हयाचा अर्थ सरळ आहे की पॅकेज पाठवलं गेलं आहे आणि डिलीवर पण केलं गेलं आहे.
माझ्या रागाने आणि चिंतेने घरात भूक हरताळची वेळ आली होती. किचनमध्ये जाऊन खाना बनवण्याचे तर लांबच.. मी त्याबाबत विचार देखील करत नव्हते. आता एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे, कंपनीच्या १- ८०० नंबर वर फोन करून विचारावं.
गडबडीत फोन डायल केला. साधारणतः अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर माझा फोन उचलला. तो अर्धा तास माझा ब्लडप्रेशर न जाणे कुठुन कुठे घेऊन गेला होता. माझ्या रक्तवाहिन्या फुटण्याच्या मार्गावर होत्या. पायात एवढं बळ आलं होतं की पॅकेजच्या सर्व मार्गावर चालत, भटकत भटकत पुन्हा फोनच्या जवळ आले होते. काही वेळ रेकॉर्डेड मेसेज वाजत राहिला आणि पुन्हा म्युझिक.. नंतर कोणीतरी खूपच सुसभ्य आवाजात बोललं -” माझं नाव स्टीव आहे, मी आपली काय मदत करु शकतो?”
घाईगडबडीत मी त्याला भारतातून टोरंटोला पोहचणाऱ्या पॅकेजबद्दल सविस्तर सांगितले आणि अगदी शब्दांना जोर देऊन सांगितले की, ” सर, माझं पॅकेज माझ्यापर्यंत अजून पोहोचले नाही. मी घरातच होते. आपल्या आँनलाईन साईटवर ट्रैकिंगची पुर्ण माहिती नाही आहे. “
“असं होऊच शकत नाही मॅडम, तुमच्या पत्यावर, २ एवेन्यू रोडवर पॅकेज डिलीवर केलं गेलं आहे. “
“२ एवेन्यू रोड? परंतु सर, मी २२ एवेन्यू रोडवर राहते. ”
“तुम्ही जो पत्ता दिला आम्ही तिथेच डिलीवर केलं आहे मॅडम. फोन करण्यासाठी आपले धन्यवाद. “
म्हणजे, हे चुकीच्या पत्त्यावर गेले आहे! २ एवेन्यू रोड इथेच आहे काॅर्नरवर. मी सुटकेचा निःश्वास टाकला. आता मात्र मला २ एवेन्यू रोडवर लगेचच जायला हवं आणि पॅकेज त्यांच्याकडून परत आणायला हवं. बाहेरच्या सर्दीपासून सुरक्षित राहण्यासाठी जॅकेट, ग्लोव्हज, टोपी, आणि गमबूट घालून मी निघाले. फार दूर नव्हते ते घर, परंतु बर्फाच्या घसरगुंडीवरून चालता चालता खूप वेळ लागला तिथे पोहचायला. गल्लीच्या काॅर्नरवर, २ एवेन्यू रोडवर पोहचल्यावर बघितलं.. घराच्या आजूबाजूला सगळीकडे शांतता होती. कशीबशी बर्फाचे ढिगारे पार करून मी दरवाजा जवळ पोहचले. घंटी वाजवली, दरवाजा थोपटला. चारी बाजूला पांढऱ्याशुभ्र बर्फा व्यतिरिक्त तिथे काहीच दिसल नाही. कोणताज आवाज नाही.. असं वाटत होतं की तिथे कोणीच रहात नाही, कोणी का नसेना मला फक्त पॅकेजशी मतलब आहे.
हे भगवंता, जर इथे कोणी रहातच नाही आहे तर पॅकेज घेतलं कोणी असेल! आता मात्र माझ्या पुस्तकांविरूद्ध कोणतं तरी हे षडयंत्र दिसून येत होतं… असा विचार करणे मुळात मुर्खपणाचे होते. परंतु अशा भयानक परिस्थितीत एखादा मनुष्य आणखीन काय विचार करू शकतो बरं ! डोकं अगदी वाऱ्याच्या वेगाने विचार करत होतं, आतल्या लोकांपर्यंत हा मेसेज कसा पोहचवायचा. कदाचित ह्या घरातील सगळी लोकं कामावर गेली असतील. पण जर असं असतं तर पॅकेज इथे दरवाजाजवळ असतं. आता मी माझ्या घरासारखा कोण्या दुसऱ्याच्या घराबाहेरचा बर्फ उकरून -उकरून पाहू लागले. अचानक मला जाणीव झाली की हे घर कोणा दुसऱ्याचं आहे, अशा अवस्थेत पाहून मला कोणीतरी ठार वेडी समजतील. माझ्या वजनदार कपड्यांना पाहून कोणीतरी मला चोर किंवा डाकू समजलं तर नवल नाही. मी जरा भानावर आले.
– क्रमशः भाग पहिला.
मूळ हिंदी कथा : दो और दो बाईस
मूळ हिंदी लेखिका : डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील
अणुशक्ती नगर मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈