सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ चाकं – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
डॉ. हंसा दीप
एकाच घरात दोन विश्व. एक गतिमान आणि दुसरं स्थिर.
व्हील चेअरवर धसून बसलेल्या कैमिलाच्या जगात चाकं चालायची, पण ती स्थीर असायची. हेनरी स्वत: चालायचा आणि पत्नीलाही ढकलायचा. कित्येक वर्षापूर्वी व्हील चेअर प्रथम घरात आली, तेव्हा जराही कल्पना नव्हती, की एक दिवस कैमिला यातच सामावून जाईल.
एक दिवस गडद काळोखात कैमिला कशाला तरी धडकली आणि पडली. त्यावेळी डॉक्टरांनी कमीत कमी दहा दिवस तरी चालू नका, म्हणून सांगितले होते. हेनरीने तिच्या सोयीसाठी लगेचच व्हील चेअर आणली होती आणि तिच्यावर तिला बसवून तो अगदी मनापासून ती ढकालायचा. म्हणायचा, ‘तुझ्यासाठी इतकं तरी मी करू शकतोच ना कैमी! उद्या चालू लागलीस की माझी गरज नाही पडणार. आता निदान मी तुझ्या अवती-भवती तरी राहू शकतो. ’ त्यावेळी प्रत्येक क्षणी हेनरीच्या प्रेमाचा अनुभव घेत, आस-पास बघत मस्करी करत ती म्हणायची, ‘वाटतय, याच चेअरवर कायमचं राहावं. तुझं प्रेम मिळतं ना! माझ्या खांद्यावरचे तुझे हात मला असहाय्य वाटू देत नाहीत.
हेनरी हसत हसत तिचे गाल थपथपायचा.
‘खरच हेनरी, इतक्या दिवसात आपलं एकदाही भांडण झालं नाही.’
‘भांडण नाही. वाद म्हण. एखाद्या गोष्टीवर वाद घालणं म्हणजे भांडण नाही.’
‘या आधी तू असं कधी म्हणाला नाहीस. तुझे डोळे भांडणासारखेच गरगरायचे’
हेनरीने हे बोलणं अगदी सहज थट्टेवारीत घेतलं आणि म्हणाला, तुला पाहून डोळे चक्रावले जात असतील, एवढंच! पण कैमी, पाय चांगले असले तरी तू बसून राहू शकतेस. व्हील चेअरवर नाही, या शानदार सिंहासनासारख्या खुर्चीवर. तेव्हाही मी तुझ्या मागेच राहीन. ’
कैमिला हे गमतीत बोलली खरी, पण काही वर्षात ते तिचं जीवनच झालं. बर्फावरून ती घसरली होती. केवळ पायच घसरले नव्हते. सगळं शरीरच आखडलं होतं.
महिनाभर बिछान्यावर पडून राहिल्यानंतर, फिजियोच्या अथक प्रयासाने शरीराची बाकी अंगे सक्रिय झाली, पण पायाची स्थिती सुधारली नाही. त्यानंतर ती पुन्हा आपल्या पायावर उभी राहू शकली नाही. विशेषज्ञ चिकित्सकांच्या टीमचं म्हणण की काही वर्षांनंतर पायांची क्षमता आपोआप वाढेल. त्यावेळी सर्जरीनंतर तिला चालता येईल.
पुढच्या पाच वर्षांच्या दरम्यान अनेकदा, एकामागून एक अनेक चेकप झाले. अनेक वर्षं या व्हील चेअरमध्ये कैदेत राहिल्यानंतर अखेर सर्जंरीसाठी हिरवा झेंडा दाखवला गेला. उद्या सर्जरी आहे. त्यानंतर तिला नेहमीसाठी या चेअरमधून मुक्ती मिळेल.
हेनरी खूप आशावादी होता. तो खुश होता. आता कैमि लवकरच चालायला लागेल. तिला असं असहाय्य बघणं, त्याला खूप त्रासदायक वाटायचं. त्याला ते जुने दिवस आठवायचे. त्यावेळी कैमिचे पाय एखाद्या जागी कधीच टिकायचे नाहीत. तिची जबर इच्छाशक्ती हेनरीला हैराण करायची. घरकाम, नोकरी आणि मित्रमंडळी. कधी मॉल, कधी पार्क, प्रत्येक ठिकाणी सगळी कामं निपटत ती धावत राह्यची. एकाच वेळी, धावत-पळत अनेक कामे करायची तिची सवय होती. तिची धाव-पळ आशा तर्हेची असे, की जणू एखादं मिनिट उशीर झाला, तर जशी काही दुनियाच थांबेल. तिच्या हाता-पायात असं सामंजस्य होतं, की मेंदूकडून सूचना येताच ते आपापली ड्यूटी करू लागत. तिचा उत्साह पाहून हेनरी चकित व्हायचा. स्वत: काही करायच्या ऐवजी कैमिवरच अवलंबून राह्यचा. अनेक कामे कैमिसाठी जशी काही रांग लावून उभी असायची. अजून हे करायचय, ते करायचय, या दरम्यान सूर्य आपला प्रकाश घेऊन विश्रांतीसाठी निघून जायचा, तेव्हा कैमिला वाटायचं, आजचा दिवस संपला आणि आता उद्यापर्यंत तिलाही आपले शरीर बिछान्यापर्यंत घेऊन जायचय. तिच्या या गतीचा हेनरीला वैताग यायचा. हेनरीला प्रत्येक काम आरामात, सावकाश करण्याची सवय होती. स्टोअरमधे भाजी, दूध, फळे घ्यायला जायचा तेव्हा काळजीपूर्वक एकेक केळं निवडत बसायचा. जोपर्यंत तो दुसरे फळ निवडू लागायचा, तोपर्यंत कैमि इतर सगळी खरेदी आटपून तिथे हजर व्हायची.
हेनरीला वाटायचं, तो नालायक आहे. कोणत्याच कामाचा नाही. इतका वेग तो कुठून आणणार? तो म्हणायचादेखील, ‘कैमि, देवाने तुझ्या पायाला चाकं लावून पाठवलय आणि माझ्या पायाला हळू हळू चालण्यासाठी साखळदंड. त्याच्या अशा हलक्या-फुलक्या बोलण्याची कैमिला खूप मजा वाटे. ‘हेनरी, आपल्या प्रेमाच्या बेड्यात तू मला चांगलच अडकवलयस. तू जसा आहेस, तसाच मला आवडतोस!’
‘मग आता मला कमी ओरडा खायला लागेल नं? ‘
एक चुंबन घ्यायची कैमिला, कारण हेनरीच्या या धिम्या गतीमुळे ती अनेकदा चिडचिडायचीसुद्धा. यावरून दोघांची अनेकदा भांडणंसुद्धा व्हायची. त्याच्या धिम्या गतीमुळे कैमिलाच्या ख्ंद्यावरील कामाचा बोजा वाढायचा. मग ती अधून-मधून त्याला टोमणेही मारायची. हेनरीच्या हातात गप्प बसून सहन करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. यामुळे कधी कधी घरात इतकी शांतता, स्तब्धता असायची की ती दोघांनाही टोचायची. एक-दोन दिवसात मग सगळं सामान्य होऊन जात असे.
प्रकृती चांगली असल्याने कैमिला अनेकदा पडून उठायची. पण, त्या दिवशी, बर्फात ती जी पडली, ती स्थिती भयावह होती. ती तिला व्हील चेअरमधे कैद करून गेली. हेनरी रिटायर्ड झाला होता आणि कैमिलाला कंपलसरी रिटायरमेंट घ्यावी लागली. तेव्हापासून हेनरी तिचा केवळ पतीच नाही, तर कैमिचा पायही बनला होता. तिला जेव्हा कशाची गरज असेल तेव्हा, हेनरीच असायचा. अनेक वेळा, अनेक गरजेच्या गोष्टी ती आपल्या जवळच्या टेबलावर ठेवून घ्यायची. हेनरीला वारंवार त्रास द्यावा लागू नये, असं तिला वाटायचं. तरीही काही ना काही राहायचच. कदाचित बर्याच वर्षांच्या शीघ्र गतीचा आणि मंद गतीचा हिशेब बरोबर होत चाललाय. आता हेनरीच तिचे पाय होते, जे मंद गतीने का चालोत, निदान चालत तरी होते. कैमिचे जलद धावणारे पाय दुर्भाग्याने आता थांबलेच होते. जेव्हापासून ती खुर्चीशी बांधली गेलीय, तिला अनेक वेळा वाटलं, जसे काही तिचे पाय कधी चाललेच नाहीत. चालणारे लोक तिला जादुगार वाटतात. ती कधी त्यांच्या पायाकडे तर कधी आपल्या पायांकडे बघायची. तिला जाणवायचं आपल्या पायांनी चालणार्या माणसाला कधी वाटतच नाही, की तो गतिमान आहे. गती आहे, तर जीवन आहे.
एका खुर्चीत कैद असलेलं जीवन काय जीवन आहे? खुर्चीत सामावलेलं तिचं जीवन, पायाचं मौन, ती असहाय्यशी झेलत होती. विविध अवयवांचं सामंजस्य निभावताना पायांनी जसा काही असहकार पुकारला होता. या धावत्या जगात पायांची जंगली जिद्द तिला दिवसेंदिवस जशी काही खात होती. हेनरीला दाखवण्यासाठी ती वर-वर हसायची, पण आतल्या आत खूप रडायची. हे रडू तीळ तीळ करत तिच्या जीवनेच्छेला गिळत होतं.
तिच्या या थांबलेपणाची पूर्ण कल्पना हेनरीला होती. कैमिला आशा स्थितीत बघणं, हे त्याच्यासाठी शिक्षेपेक्षा काही कमी नव्हतं. तिला जास्तीत जास्त मदत करून तो, ती शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करायचा. तिच्या अन्य गराजांबरोबरच, तिच्या मनोरंजनाचाही तो विचार करायचा. पण, लाख इच्छा असूनही तो कैमिची विवशता, लाचारी कमी करू शकत नसे. घरात दोनच माणसे, पण दोघेही आपआपल्या परिघात बंदिस्त होती. आता दोघांच्यात कधीही वाद होत नव्हते. भांडणे होत नव्हती. नेहमी नाकावर राग असणारा हेनरी आता अगदी शांत होऊ लागला होता.
दोघेही निवृत्त. दोघांची पेन्शन बेताची. गरजाही बेताच्याच. हलकं-फुलकं खाणं आणि एक ठरीव दिनचर्या. मनाला वाटेल तेव्हा निजावं, मनाला वाटेल तेव्हा उठावं. साठ-बासष्ठचं वय म्हणजे फार काही नाही. पायांनी साथ दिली असती, तर यापुढचा प्रवास हा खुशीचा प्रवास झाला असता. कैमिची एकच इच्छा आता बाकी राहिली होती. ती म्हणजे, जीवनात एकदा तरी चालण्याचा आनंद घेणं. आपल्या पायांवर उभं राहून मनमुराद चालण्याची तिची इच्छा होती. या वेळेची वाट बघता बघता तिचे डोळे दगड होऊन गेले होते.
थंडीमधे वेळ निघून जात असे. पण उन्हाळ्यात जेव्हा सगळं शहर घराबाहेर लोटलेलं दिसे, तेव्हा ती उदासपणे येणार्या – जाणार्या लोकांकडे असासून पाह्यची. रोज संध्याकाळी हेनरी तिची व्हील चेअर व्हरांड्यात आणून त्याच्या टोकाशी नेऊन ठेवत असे, म्हणजे येणार्या – जाणार्या लोकांकडे बघून तिला आपला वेळ घालवता येईल.
कैमी कधी पुस्तक वाचायची. कधी थंड हवेत एखादी डुलकी काढायची. पण वैताग आणणारी गोष्ट ही होती, की अनेकदा संतुलन बिघडल्याने व्हील चेअरचे लॉक उघडायचे. अनेकदा ती पडता पडता वाचली होती. हेनरीने यावर उपाय शोधून काढला होता. त्याने व्हील चेअरच्या चारी बाजुंनी टीनचे दरवाजे बनवून घेतले, त्यामुळे ती कितीही हलली, डुलली तरी संतुलन बिघडून ती खाली पडणार नाही. कोणत्याही तर्हेची दुर्घटना घडू नये, म्हणून सुरक्षिततेसाठी तिथे कुलूपही लावले.
— क्रमशः भाग पहिला
मूळ हिन्दी कथा – “पहिए“
हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
दूरभाष – 001 + 647 213 1817 ईमेल – [email protected]
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈