श्री सुहास रघुनाथ पंडित
जीवनरंग
☆ “गोष्ट तशी जुनीच…” – भाग – १ – लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. खरं तर राजा होता की डाॅक्टर होता की पुढारी होता की शेतमजूर होता याला महत्व नाही. पण आटपाट नगर म्हटलं की ‘तिथं एक राजा होता’ असं म्हणायची तोंडाला आणि ऐकायची कानाला इतकी सवय झालीय की म्हणून टाकलं आपलं रितीप्रमाणं. , “तिथं एक राजा होता “. या गोष्टीपुरतं नेमकं सांगायच झालं तर तो चार पोरींचा बाप होता हे महत्वाचं. उद्योग त्याचा काही का असेना, मुलींचा बाप हे महत्वाच ! शिवाय प्रत्येक घरातला बाप हा कुटुंब प्रमुख म्हणून आपल्यापुरता राजाच असतो की आपल्या कुटुंबाचा.
सर्वसत्ताधारी ! तसाच हा ही. तर त्याला चार मुली होत्या. एखादी मुलगी असली तर मागच्या जन्मीचं पाप, उरावरची धोंड अस काय काय काय असतं. इथं तर चार मुली ! संस्कृत मध्ये एक वचन आहे ना, ” एकैकमपि अनर्थाय किमुयत्र चतुष्ठयम् ” एक अनर्थकारक असतं तर चार एकत्र आल्यावर किती मोठा अनर्थ होईल!सुभाषित आहे वेगळ्या संदर्भातलं. पण मुलींच्या बापाच्या दृष्टीने ते इथं अगदी फिट्ट बसत. एक मुलगी झाली तेव्हा मनाची समजूत घातली ‘पहिली बेटी मुलगा होईल तिच्या पाठी’, म्हणून तिचे थोडेफार लाडही झाले. पण दुसरीही मुलगी ! तिसरीही मुलगी ! बापाच्या उत्साहाचा पारा खाली खाली आणि रागाचा पारा वरती
वरती. मुलींची अनुभवी आज्जी म्हणाली, ” वाट पहा, आता चौथ्यांदा नक्की बेटा होणार. अनेकदा तिघींच्या पाठीवर मुलगा होतोच. कसलं काय!, चौथीही मुलगीच. मग थकल्या भागल्या मुलींच्या आईनी लवकरच राम म्हटला, कायमचा!. मुली म्हटलं
की कधी ना कधी लग्न ही होणारच. दुपट्यातनं बाहेर पडून आपल्या दोन पायावर मुली चालायला लागल्या की त्यांना सगळं जग उठल्या बसल्या लग्नाचीच आठवण करून देत असतं. तसच या मुलींच्याही मनात लहानपणापासून घट्ट धरुन ठेवलेलं, लग्नाशिवाय आपलं काही खरं नाही. लग्न तर करायलाच हवं. मुलीच्या जातीनं दुसर करायचचं काय म्हणा ? एकदा आज्जीनं सांगितलं.
सगळ्यांनी माना डोलावल्या. सगळ्यांनी म्हणजे थोरल्या तिघींनी. धाकटी जरा अवखळच.
” म्हणजे काय ? मुलींनी लग्नाशिवाय दुसरं काहीच कसं करायचं नाही ? मुलगी लग्न करते तेव्हा एक मुलगाही लग्न करतोच ना ? “
” अगं मग त्याशिवाय का मुलीचं लग्न होतं ?”
सगळ्या तिच्या अडाणी प्रश्नावर फिसफिसल्या.
” तसं नाही, तसं नाही, तसं नाही, मला म्हणायचं होतं की मुलगा लग्न करुन स्वस्थ बसतो का घरात ? त्याचे आधीपासूनचे सगळे उद्योग चालुच असतात की नाही नंतर पण?”
कोण असल्या तिरपांगड्या मुलीबरोबर बोलणार?
तरीही तिचं आपलं चालायचंच.
” काय ग ताई, अभ्यास करायला काय होतय तुला ? यंदाही नापासच झालीस ना ? “
” होऊ दे झाली तर. तिला थोडीच नोकरी चाकरी करायची आहे? कशी गोरीगोमटी नक्षत्रासारखी मुलगी कुणीही हासत उचलून नेईल. “
” शी, कुणी उचलून नेलं तर चालेल तुला ताई ? लाजतेस काय अशी ? तू म्हणजे काय बाजारातली भाजी आहेस ? तुला तुझं काही मतबीत आहे की नाही ?”
भारीच बाई ढालगज ही धाकटी. हा एकूण घरादाराचा अभिप्राय!
दिवस काही बसून रहात नाहीत. आज्जी आता थकली आणि तिची भुणभुण सुरु झाली.
वेळेवारीच आपल्या समया उजवलेल्या ब-या. बापालाही ते एकदम पटलं. आधी आपल्या पोरींची पारख आपणच करावी म्हणून त्यांनी आपल्या चारी पोरींना समोर बसवलं. पहिल्या तिघी, साज-या, गोज-या, लाजाळू, खालमानी, सालसपणानी येऊन ओठंगून उभ्या राहिल्या. धाकटी जरा अवखळ, आईवेगळी. म्हणून जरा आज्जीची लाडावलेली. बापानं दुर्लक्षलेली. शिवाय वय थोडं लहान.
बापाने बापाला शोभेल अशा गंभीरपणाने मुलींना बोलावण्याचा उद्देश सांगितला. ” “आता तुमची लग्न करायचा इरादा आहे. इतके दिवस तुमची जबाबदारी माझी होती. मीच तुमचा कर्ता धर्ता. माझ्या जीवावर तुम्ही लाडाकोडात वाढलात. सगळ्यांनी माना डोलावल्या.
” म्हणजे काय ? बाबा कसले लाड केलेत हो तुम्ही ? दोन वेळेला जेवाय खायला घालून अंगभर कपडे दिले एवढेच ना? ” धिटुकलेपणाने धाकटी बोलली. बाबा सकट चमकून सगळ्यांनी माना वर केल्या.
” काय तरी हा अबूचरपणा ? असं बोलतात का कोणी बापाला?”
थोरलीने तिला चिमटा काढला. तर किंचाळत ती म्हणाली ” काय चुकीचं बोलले ग मी ताई ? तुम्ही सुद्धा? “
दुसरीनं तिला डोळ्यानी दटावलं.
तिसरी घाई गर्दीन म्हणाली, ” नाही, नाही. खरं आहे बाबा. तुम्ही ना तिच्याकडे लक्ष नका देऊ. तुमच्या मुळेच तर आम्ही जगलो. तुमचं नशीब ते आमचं नशीब. “
“असं कसं, असं कसं, असं कसं होईल पण ? ज्याचं त्याचं नशीब वेगळंच असतं. स्वतंत्र असतं. ज्याचं
शरीर जसं स्वतंत्र असत ना, तसं ज्याचं त्याचं नशीब पण स्वतंत्र असतं. ” पुन्हा धाकटी बोलली.
” गप गं, कळतं का काही तुला ? “
” पण परवाचं तर सगळे म्हणतं होते ना धाकट्या आत्याला सासुरवास होतो तर तिचं नशीबच तसलं.
मग आजोबांचं श्रीमंत नशीब का नाही बरं तिचं झालं ?का वाईट झालं तर तिचं नशीब आणि चांगलं झालं की तिच्या बाबांचं नशीब. “
” गप गं बाई. तुझं तुला तरी कळतं का तू काय बोलती आहेस ते ? “
“कळतं. तुम्हालाच कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते. आंधळ्या आहात तुम्ही सगळ्या. “
‘हे बघ तू सध्या गप्प बस. तुझं मत मी विचारलेलं नाही. विचारेन तेव्हा सांग. ” बाबाच असं म्हणाले तेव्हा ती गप्प बसली. पण आपल्याला विचारलं की अगदी मनात असेल ते स्पष्ट सांगायचं असं तिने ठरवून टाकलं. मग अगदी गोष्टीतल्या सारखच घडलं. बाबांनी प्रत्येकीला विचारल, ” तू कोणाच्या नशिबाची बाई ? ”
“तुमच्याच की बाबा. ”
प्रत्येकीन खालमानेनं उत्तर दिलं. बाबांना स्वर्ग दोन बोटे उरला. किती मान देतात पोरी. आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत. “छान, आता तुमच्यासाठी मी नवरे शोधतो.
सगळ्यांनी माना डोलावल्या. मग गोष्टीत सांगितल्याप्रमाणेच त्यांच्या बापाच्या मते चांगली असलेली स्थळे पाहून थाटामाटात लग्ने लावून दिली. मग रितीप्रमाणे सगळ्याजणी एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या आणि नवऱ्या शेजारी गाडीत बसल्यावर नवऱ्याकडे पाहून खुदकन हसल्या. धाकटीला मनातल्या मनात सगळाच खुळचटपणा वाटत होता. तसं ती चुलतीला म्हणाली सुद्धा. तर हीच खुळचट असल्यास्रख चुलतीनं तिच्याकडं बघितलं.
थोरली पहिल्या बाळंतपणासाठी आली आणि महिनाभरात परत जायची घाई करायला लागली. नवऱ्याला एकटं ठेवणं तिला धोक्याचं वाटत होतं. चुलती म्हणाली, ” अगं पण घरात आक्काताई आहेत ना त्यांना रांधून घालायला ?”
अक्काताई म्हणजे तिची विधवा चुलत जाऊ. तर ती पटकन म्हणाली, ” म्हणून तर काळजी वाटते ना ! ” आणि तिने जीभ चावली. धाकटीला थोरलीची फार फार दया आली. ही थोरली दिसायला सगळ्यात उजवी.
म्हणून म्हणे नवऱ्याची लाडकी. आणि तिची ती अक्काताई? ती म्हणजे तो नुसता पठाण. फदक फदक चालायची आणि तिच्या मागच्या पुढचे गोलवे हिंदकळायचे. सगळ्या पुरुषांच्या नजरा आपल्या तिथेच. थोरलीला आपल्या नवऱ्याचा म्हणून तर भरोसा वाटत नव्हता आणि धाकटीला ती कायम काळी ढुस्सं आणि नकटी चिपटी म्हणून चिडवायची. धाकटीला वाटलं या गोऱ्या गोमटीला तरी कुठे सुरक्षित वाटतय ? आता हिचा नवरा बहकला तर दोष कुणाच्या नशिबाचा ? बाबांच्या की हिच्या ?
दुसरीच्याही संसाराची रडकथा वर्षभरातच कानावर आली. आधीपासूनच म्हणे त्याला दारूचं व्यसन.
लग्न झाल्यावर पैसा पुरेना. म्हणून जोडधंद्यासारखा तो जुगार खेळायला लागला होता. आता घरचे म्हणायला लागले
” नशीब तिचं “
“मग तेव्हा कशा सगळ्यांनी माना डोलावल्या होत्या आम्ही बाबांच्या नशिबाच्या म्हणून? अं?” धाकटी बोलली.
आता या चोंबडीनी आत्ता बोलायलाच हवं होतं का ? असं प्रत्येकीच्या मनात येऊन गेलं.
तिस-या बहिणीची तिसरीच त-हा. तिला तर लागोपाठ तिन्ही मुलीच झाल्या. सासरच्यांनी तिला सळो की पळो करुन सोडलं. सासू तर उठबस म्हणायची, ” आई तशी लेक आणि दोहीची खोड एक. ” नवरा तसा शिकला सवरलेला. तो आपला मुखस्तंभ. सासूनं सरळ आपल्या माहेरची एक मुलगी पाहिली आणि आपल्या मुलाचं दुसरं लग्न लावून दिलं. ही बहिणही रडत भेकत माहेरी आली. तर सगळे तिला म्हणाले, ” हे बघ, एकदा नीट पाहून तुझे आम्ही लग्न लावून दिलं होतं. आता तू आणि तुझं नशीब. “
— क्रमशः भाग पहिला
लेखिका : डाॅ. तारा भवाळकर
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈