श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ प्रकाशक – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(दोन महीन्यानंतर मी लंडनहून आलो.मधल्या काळात जयंताने अनघाशी लग्न केले होते आणि त्यांनी खेतवाडीत बिर्हाड केले होते.हा मला मोठा धक्का होता.) – इथून पुढे —
अनघा जयंताशी लग्न करेल असे मला अजिबात वाटत नव्हते किंबहुना अनघा आणि मी एकमेकांसाठी अनुरूप आहोत असाच माझा कयास होता. माझे आई-बाबा सुद्धा अनघाने असा का निर्णय घेतला आणि माझे तिच्याशी वादभांडण झाले होते की काय अशी विचारणा केली.
खरतर या दोघांनी मला कसलीच कल्पना दिली नव्हती .
मी मुंबईत आलो पण या दोघांना भेटायला गेलो नाही.
मला या दोघांचा खूप राग आला होता.मनस्ताप झाला होता.कशातही लक्ष लागत नव्हते .याच काळात माझ्या मनात कली शिरला.
या दोघांचा संसार कसा मोडेल याची मी वाट पाहू लागलो.
अनघाला सांस्कृतिक जगाची भूक होती. त्यामुळे तिला त्या जगात अडकवावे असा विचार मनात आला.
त्याच सुमारास मुंबई दूरदर्शन सुरू होत होते. त्या करीता विविध विभागात निर्माते, सहनिर्माते शोधणे सुरू होते. मी माझ्या कविमित्राकडे अनघाची निर्मात्याच्या पदासाठी शिफारस केली.
अनघा मुळातच हुशार त्यामुळे तिला निर्मात्याच्या पदाची नोकरी मिळाली.
या मायावी दुनियेत तिचा प्रवेश झाला आणि वेगवेगळे कलावंत तिच्या आयुष्यात येऊ लागले.
तिला मुलाखतीसाठी प्रसिद्ध साहित्यीक, नाटककार, संगीतकार हवे असायचे. त्यामुळे ती मला भेटू लागली.
त्यामुळे दोघा नवरा बायकोत खटके उडायला लागले.मला हे लांबून कळत होते आणि मनातून आनंद होत होता.
शेवटी अनघाने जयंताबरोबर काडीमोड घेतला आणि एका मराठी नटाची ती पत्नी झाली.
या सर्व प्रकाराने जयंता सैरभैर झाला आणि वारंवार माझ्याकडे येऊ लागला,त्याची नाटके छापूया आणि प्रकाशीत करूया असे सांगू लागला.पण मी काहीन काही कारणे सांगून ते टाळू लागलो.
मला जयंताचा सूड घ्यायचा होता.त्याचे कवितासंग्रह आणि कथासंग्रह पूर्वी आम्ही छापले होते.त्याचे अधिकार आमच्याकडे होते.
त्याच्या आवृत्या काढूया असे तो सांगत होता. मी त्याच्या कडे दुर्लक्ष केले.
आमच्या प्रकाशनाकडून नाटकांची छपाई होत नाही म्हणून तो मुंबईतील इतर प्रकाशकांकडे खेपा घालू लागला.पण सर्व प्रकाशकांना जयंता हा माझा मित्र असल्याचे माहीत होते,
त्यामुळे मुंबईतील एकही प्रकाशक त्याचे पुस्तक छापण्याचे धाडस करू इच्छीत नव्हता .म्हणून नाईलाजाने त्याने पुण्याचा नवीन प्रकाशक गाठला,पण पुस्तक छपाईची क्वालिटी अगदी खराब होती आणि त्या प्रकाशकाला मार्केटिंग ची माहीती नव्हती,त्यामुळे ती पुस्तके दुकानात उपलब्ध झाली नाहीत.
त्यानंतर च्या काळात मी अत्यंत व्यस्त होत गेलो.आमच्या शाखा दिल्ली,बंगलोर,अहमदाबाद या शहरात निघाल्या आणि आम्ही इंग्रजी पुस्तके प्रकाशीत करू लागलो.
त्यामुळे मी मुंबईत फार कमी असायचो.पण जयंता माझ्या मोठ्या भावाला येऊन भेटत होता हे मला कळत होते.
या नंतरच्या काळात जयंताने कविता लिहील्या. कथा लिहील्या पण त्याच्यातला स्पार्क कमी होत गेला कारण अनघा त्याची स्फुर्ती होती.त्याने त्याच्या कविता,कथा माझ्या मोठ्या भावाला दाखविल्या पण त्याला त्या आवडल्या नाहीत.
जयंताचे त्याच्या नोकरीवर कधीच लक्ष नव्हते. जो पर्यंत त्याचे फडके साहेब होते तो पर्यंत सहन केले,पण फडके साहेब निवृत्त होताच नवीन साहेबा बरोबर याचे पटेना, शेवटी जयंताने नोकरीचा राजिनामा दिला.
एकंदरीत यामुळे त्याची सर्वबाजूने कोंडी झाली असावी.
या काळात जयंताने मला काही पत्रे लिहीली.मुंबईतल्या मुंबईत त्याची पत्रे मला मिळत.त्याचे म्हणणे असे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्याची पुस्तके लागावित म्हणून मी प्रयत्न करावेत,त्यामुळे त्याला अर्थप्राप्ती झाली असती.अर्थातच मी त्याकडे दुर्लक्ष केले.
माझ्या मुलाच्या अॅडमिशन च्या संबधात मी आणि पत्नी अमेरीकेत गेलो असताना जयंताला मृत्यू आला,शेवटची काही वर्षे तो मधुमेहाने त्रस्त झाला होता. मी अंत्ययात्रेत नव्हतो म्हणून साहित्यीक वर्गात खळबळ उडाली,पण माझा मोठा भाऊ अंत्ययात्रेत होता.
त्याच्या मृत्यू नंतर आमच्या प्रकाशनाने त्याची पुस्तके छापली आणि ती हातोहात खपली.
दोन महिन्यांनी मी अमेरीकेतून आलो आणि पुण्याच्या प्रकाशकाकडे जाऊन त्याच्या नाटकाच्या पुस्तकांचे हक्क विकत घेतले आणि जयंताची सर्व नाटके प्रकाशीत केली.आमच्या प्रकाशनाने त्याच्या नाटकाची पुस्तके सर्वत्र उपलब्ध केली. त्यामुळे ती चांगलीच खपली. एवढेच नव्हे तर मुंबईतील प्रतिष्ठीत नाट्य संस्थानी त्याची नाटके रंगभूमीवर आणली.जयंताच्या एका नाटकात अनघाने मुख्य भूमिका केली.
या नाटकाचा प्रयोग पहायला मी पत्नीसह शिवाजी मंदिरात गेलो तेव्हा त्या नाटकात अनघाला पाहताना जयंताची खूप खूप आठवण आली.
त्याच्या नाटकाचे प्रयोग त्याने पहायला हवे होते असे मला वाटले आणि भर नाट्यगृहात मी रडू लागलो.
या नंतर माझ्या आयुष्यात सतत बेचैंनी आली.माझ्या पत्नीला कॅन्सर झाला,मुलीने माझ्या मना विरूद्ध लग्न केले,माझा मुलगा अमेरीकेत स्थायीक झाला.
आमची पुढची पिढी आमच्या व्यवसायत येईना. माझा मोठा भाऊ सतत आजारी पडु लागला.
थोडक्यात आमचे वाईट दिवस आले.माझी फिरती बंद झाली.नवीन पुस्तके प्रकाशीत करण्याची ईच्छा नाहीशी झाली,मी दुकानात बसु लागलो.आता हळू हळू ही प्रकाशन संस्था बंद करण्याचा किंवा विकण्याचा विचार करत आहे.
या आयुष्यातील कातर वेळी जयंता,मला तुझी आठवण येते .तुझ्या सारख्या प्रतिभावान लेखकावर अन्याय झाला. लोकांना वाटते ही साहित्यीक मंडळी म्हणजे हुशार मंडळी, सुसंस्कृत मंडळी यांच्यात कसली राजकारणे असणार .
पण पुण्यातील श्रोते हो! तुम्हाला सांगतो,राजकारण्यांची राजकारणे , वाद,भांडणे तुम्हाला कळतात दिसतात. पण ही पुस्तके लिहीणारे आणि छापणारे ,प्रकाशित करणारे यांच्यातील घाणेरडी राजकारणे तुम्हाला कळत नाहीत.
आणि अशा हेव्यादाव्यामुळे जयंतासारख्या साहित्यकावर अन्याय होतो.त्याला आयुष्यातून उठवले जाते. निरनिराळे पुरस्कार ठराविक लोकांनाच मिळतात आणि साहित्यकातील कंपू इतरांना वर चढू देत नाहीत.
साहित्यिक जीवन या पुण्यातील कार्यकर्ते हो,आम्हा साहित्यीक लोकांचे हात असे बरबटलेेले असतात.
माझा प्रिय मित्र जयंता त्याच्या लेखनाला मी न्याय देऊ शकलो नाही. उलट मी त्याचा व्देश केला .याचे मला वाईट वाटते.खेद वाटतो
कॉलेज मधील आम्ही तीन मित्र जयंता मी आणि अनघा. अनघाने त्याला मधेच सोडले.मी त्याचा तिरस्कार केला.त्याचे लिखाण कुजवलं.मित्रा, जयंता कुठे असशील तेथून या तुझा मित्रास माफ कर , असं म्हणून एवढ्या श्रोत्यांसमोर मी ओक्साबोक्सी रडू लागलो.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈