सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ तीन अनुवादित लघुतम कथा… – लेखक :डॉ. रमेश यादव ☆ मराठी भावानुवाद – सौ. गौरी गाडेकर ☆
१. आई कधी रिटायर होते का !
मूळ हिंदी कथा : क्या माँ भी कभी रिटायर होती है!
दहा वाजायला काहीच मिनिटं बाकी होती. सगळ्यांच्या नजरा मुख्य दारावर खिळल्या होत्या. आणि मिसेस अनिता जोशींनी ऑफिसात प्रवेश केला. काचेचा दरवाजा उघडून त्यांनी आत पाय ठेवताच सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यांना कुंकू लावलं, ओवाळलं, हार घातला आणि त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या. सर्वांनी त्यांना सुखी, संपन्न, निरोगी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस विशेष आहे, हे त्यांना जाणवून द्यायचा सगळेच जण प्रयत्न करत होते. अगदी क्षणक्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते.
कितीही प्रयत्न केला, तरी त्या आपल्या भावना अडवू शकल्या नाहीत. डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूंना पदराने पुसत त्या पुढे गेल्या. एका कर्मचाऱ्याने खाली वाकून त्यांच्या पुढ्यात मस्टर ठेवलं. मिसेस जोशी सही करू लागल्या. मस्टरवरची ही त्यांची शेवटची सही होती. सहीच कशाला, ऑफिसचा प्रत्येक क्षणच त्यांच्यासाठी शेवटचा होता. भावुक होऊन प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयाच्या कॅमेऱ्यात कैद करत प्रत्येक क्षण जगायचा त्या प्रयत्न करत होत्या.
मिसेस जोशींना माहीत होतं, की उद्यापासून हे ऑफिस त्यांच्यासाठी परकं होणार आहे. नोकरीचा हा शेवटचा दिवस त्यांना उलटसुलट झटके देत होता. रोजच्या धावपळीच्या आयुष्यापासून मुक्तीचा आनंद की खुर्ची जाण्याचं दुःख.. ! द्विधा मनःस्थिती.. !
” मॅडम, आज तुम्ही काम करू नका. सगळ्यांशी बोला आणि फक्त निरोपसमारंभाची तयारी करा. ” असा नियम नाही. पण मॅनेजरसाहेबांनी सहृदयता दाखवली. टार्गेटच्या या काळात ती दुर्मिळच झालीय!
मिसेस जोशींनी मोबाईल उघडताच त्यांच्या डोक्यात भविष्यातल्या योजनांचा प्रवास वेगात सुरू झाला. त्या विचार करू लागल्या – नोकरी करता करता चाळीस वर्षं कशी निघून गेली, कळलंच नाही. मुंबईचं हे वेगवान आयुष्य, रोजची ट्रेनची धावपळ…. दुसऱ्याच क्षणी त्यांच्या डोळ्यांसमोर घर-संसाराचं दृश्य तरळलं. ते तर त्यांना यापुढेही निभवायचं होतंच. मुलीचं डोहाळजेवण, मुलगे, सुना, नवरा, सासूच्या जबाबदाऱ्या, नंतर नातवंडांशी खेळायचं स्वप्न, त्यांना सांभाळणं, त्यांच्या अभ्यासाची काळजी, वयपरत्वे येणारी दुखणी, स्वयंपाकाची जबाबदारी…. हे सगळं तर निभवायचंच आहे. सेवानिवृत्ती म्हणजे ऑफिसातून मिळणाऱ्या पगारातून निवृत्ती! आई कधी रिटायर होते का?
आणि मोबाईल बंद करून त्या पुन्हा वर्तमानात आल्या.
मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव
मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
२. तुझं तुलाच अर्पण
मूळ हिंदी कथा : ‘तेरा तुझको अर्पण ‘
शहरातल्या सुप्रसिद्ध उद्योगपती अगरवालजींचा 75वा वाढदिवस होता. त्यांच्या हवेलीत होम -हवन, पूजा-पाठ आणि मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबातील सर्व लहान -मोठे सदस्य भटजींबरोबर पूजाविधीत सहभागी झाले होते. यावेळी भटजींनी जीवनाचं मर्म सांगणाऱ्या कथेद्वारा जीवनात आनंद व सुखाचा ताळमेळ कसा साधावा, त्याची युक्ती सांगितली. कथा संपताच भटजी होमाकडे वळले.
अगरवालजी आपल्या स्वभावानुसार हात राखून समिधा समर्पित करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच समिधा उरल्या होत्या. शेवटी भटजींनी होम -हवनाची सांगता झाल्याचं सांगत अंतिम मंत्र म्हटला आणि म्हटलं, ” आता जी काही उरली असेल ती सर्व सामग्री हवनकुंडात एकदमच समर्पित करा आणि मोठ्याने बोला, ” स्वाहा!”
हवनकुंडात समिधांचं प्रमाण जास्त झाल्याने सगळीकडे धूर पसरला. अगरवालजी डोळे चोळू लागले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांपुढे त्यांचा भूतकाळ तरळू लागला. त्यांच्या डोक्यात विचार आला – ‘ अरे ! हात राखून खर्च करत पैसे वाचवण्याच्या नादात मी माझ्या जीवनातही भरपूर समिधा वाचवल्या आहेत. जीवनाचा आनंद घ्यायचं तर राहूनच गेलं. आता तर एकदमच सर्व समर्पण करायची वेळ आली आहे. इथून फक्त डोळ्यांत पाणी आणि समोर धुरळाच धुरळा दिसत आहे. याचा अर्थ, आपल्या जीवनातही समिधासमर्पणाचं संतुलन चुकलं होतं. ‘
‘तुझं तुलाच अर्पण’ म्हणत त्यांनी डोळे उघडले आणि संकल्प केला की यापुढे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने गरीब, असाहाय्य, विकलांग तसंच गरजवंतांच्या सेवेसाठी ते आपल्याजवळील जास्तीच्या पैशांचा उपयोग करतील. लगेचच निराशेचे ढग विरून गेले आणि नव्या जोशाने ते आनंदाचे क्षण उपभोगू लागले.
मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव
मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
३. ऑक्सिजन लेव्हल
मोबाईलची रिंग वाजली. त्याने नाव बघितलं आणि तो चकित झाला. घेऊ की नको, या द्विधेत फोन बंद झाला. ते नाव बघून त्याचं मन विचलित झालं. त्याच्या डोळ्यांसमोर ते दृश्य आलं, ‘ त्या घटनेला मी एकटाच जबाबदार होतो का? आम्हा दोघांमध्ये एवढा चांगला ताळमेळ होता, एवढं चांगलं बॉण्डिंग होतं, तर ऑफिसात सगळ्यांसमोर असा तमाशा करण्याची गरज होती का? ‘
हॉस्पिटलमध्ये बेडवर पडल्यापडल्या, आशा-निराशेच्या गर्तेत गोते खाताखाता तो विचार करत होता. तशी त्याची स्थिती तेवढी गंभीर नव्हती. पण ऑक्सिजन लेव्हल 70-75 मध्येच अडकली होती. सगळीकडून येणाऱ्या बातम्या भीती आणि दहशत निर्माण करत होत्या. महामारीचा काळ होता तो.
संध्याकाळ होताहोता पुन्हा फोनची रिंग वाजली. तेच नाव दिसत होतं. पण यावेळी त्याने फोन घेतला.
“हॅलो प्रकाश, मी नीलिमा बोलतेय. तुझी तब्येत कशी आहे आता?”
” आधीपेक्षा सुधारलीय. पण ऑक्सिजन लेव्हल अजूनही कमी आहे. “
” तुला हॉस्पिटलात ऍडमिट केल्याचं कळलं, तेव्हा मी स्वतःला फोन करण्यापासून थांबवू शकले नाही. दोनदा फोन केला, पण तू उचलला नाहीस. अजूनही नाराज आहेस माझ्यावर? जे घडलं, तो अपघात होता, असं समजून विसरून जा. मीही विसरले आहे. “
सुटकेचा श्वास सोडत तो म्हणाला, ” मॅडमजी, तुमच्याशी बोलायची हिंमतच होत नव्हती. किती मोठं आहे तुमचं मन ! आय ऍम सॉरी, मॅडमजी ! चूक माझीच होती. “
” ए… ! मॅडमजी नाही. नीलू मॅडम म्हण. मला तेच आवडतं. फक्त तुझीच नाही, तर माझीही चूक होतीच की. आपण दोघंही विवाहित आहोत, हे माहीत असूनही आपल्या घरच्या गोष्टीही आरामात एकमेकांना सांगायचो. तुझ्याशी बोलल्यावर माझ्या मनावरचं दडपण कमी व्हायचं. तू ह्याला माझा स्वार्थही म्हणू शकतोस. पण त्या दिवशीच्या घटनेनंतर मला जाणवलं की माझा एका मर्यादेपलीकडचा मोकळेपणा आणि चंचल स्वभाव हेच मुख्य कारण होतं. त्यामुळेच तुझा गैरसमज झाला आणि तू बहकलास. “
” हो, मॅम. खरं आहे हे. मी माझं संतुलन घालवायला नको होतं. “
” प्रकाश, तेव्हा माझ्या मनात हा विचार आला नाही, की पुरुषांच्या मनात स्त्रियांविषयी असणारं आकर्षण जास्त असतं. आणि ही निसर्गदत्त, स्वाभाविक प्रक्रिया आहे. तू माझा फक्त सहकारी नव्हतास, तर माझा जवळचा मित्र झाला होतास. “
“मॅम, माझ्याही नंतर लक्षात आलं की मी माझ्या मर्यादेत राहायला हवं होतं. तुमचा स्वभाव फ्री होता, त्यामुळे मी एकतर्फी… प्रेम… “
“बस, बस… नो मोअर डिस्कशन… ! टॉपिक क्लोज्ड नाऊ. आणि हो, जेव्हा केव्हा तुला गरज पडेल, तेव्हा निःसंकोच मला फोन कर. मी नेहमीच तुझ्याबरोबर असेन. उद्या पुन्हा याच वेळी कॉल करीन. ओके. बाय! टेक केअर. “
फोन बंद होताच त्याला वाटलं, की त्याचे हात स्वर्गाला टेकले आहेत. आता तो पूर्णपणे तणावमुक्त झाला होता. आपल्या आत एका नव्याच ऊर्जेचा संचार झाल्यासारखं त्याला वाटत होतं.
मॉनिटरवरचा ऑक्सिजनचा ग्राफ बघत प्रकाशने सावकाश डोळे मिटले.
मूळ हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव
मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
मूळ तीन हिंदी कथा : लेखक :डॉ. रमेश यादव
मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈