श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “रिकामेपण…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
आभाळ भरून आलेलं, संध्याकाळी चार वाजताच प्रचंड अंधार झाला होता. पांघरून घेऊन झोपलेले अप्पा जागे झाले.
रोजच्या सवयीने त्यांनी आवराआवर सुरु केली. तोंड धुतल्यानंतर दुधाचा चहा पिला.
गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर पूजा केली आणि पेपरची वाट पाहत बसले.
दुपारची झोप काढून रमेश हॉलमध्ये आला.
“अप्पा, कसली वाट पाहताय”
“पेपरची, ”
“पेपर, आत्ता???”रमेश अप्पांकडे पाहत विचारले.
“असं का विचारतो आहेस??”
“अप्पा, संध्याकाळचे पाच वाजले आहेत”
“काय!!” अप्पांच्या चेहऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह??त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. रडवेला चेहरा करून म्हणाले “मला वाटलं सकाळ झाली म्हणून नेहमीप्रमाणे…… सॉरी सॉरी”
“अप्पा, आज दोनदा आंघोळ आणि पूजा, भारी” राहीने अप्पांना चिडवले.
“अजून चिडव, चूक माझीच आहे, तुला काय बोलायचे??डोकं काम करत नाही, आता तर वेळ काळ सुद्धा कळत नाही. ”अप्पा
रमेश काही बोलला नाही पण रंजना, राही मोठमोठ्याने हसायला लागल्या. वाद नको म्हणून रमेशने त्यांना गप्प राहण्यास सांगितले.
चिडलेले अप्पा नेहमीप्रमाणे भिंतीकडे तोंड करून पडून राहिले. मनात विचारांचे काहूर उठले. सिगरेट पिण्याची अतिशय इच्छा झाली पण घरात सगळे होते आणि पावसामुळे बाहेर जाता येत नव्हते. तळमळत अप्पा पडून राहिले. टीव्ही चालू होता पण अप्पांना त्यात इंटरेस्ट नव्हता.
रात्री रंजनाने वाढून दिल्यावर जेवण करून, औषधे घेऊन पुन्हा अप्पा पांघरून घेऊन झोपले पण मनातील अस्वस्थता वाढली, झोपही येत नव्हती, काय करावे तेच सुचत नव्हते. सारखी सारखी कूस बदलून सुद्धा कंटाळा आला होता. घरातले सगळे झोपले तरी अप्पा मात्र टक्क जागे होते, मनातील खदखद बाहेर काढायची होती पण सोबत कोणी नव्हते. अचानक त्यांना कल्पना सुचली, अप्पा उठले. कपाटातून कागद काढला आणि लिहायला सुरवात केली…..
“ प्रिय अगं,
पत्रास कारण की,
तुला कधी नावाने हाक मारली नाही, कायम “अगं” म्हणायचा अवकाश की लगेच तू उत्तर द्यायची. म्हणून त्याच नावाने सुरवात केली. चाळीस वर्ष संसार केला आणि आज पहिल्यांदा तुला पत्र लिहितो आहे. सात वर्षापूर्वी तू गेलीस आणि संसार संपला. आधी स्वतःचाच विचार करताना तुला कायम गृहीत धरले आणि तुझ्यानंतर परावलंबी झालो. तडजोडी करताना खूप त्रास झाला पण आता सवय झाली. हे सगळं आजच लिहिण्याचे कारण, आज तुझी खूप खूप आठवण येते आहे. रिटायर होऊन आता पंधरा वर्षे झाली. परमेश्वराचा आशीर्वाद, उत्तम तब्येत, घरच्यांचे प्रेम आहे, सांभाळून घेतात, कसलच टेन्शन नाही, पेन्शनमुळे पैशाचीही काळजी नाही. स्वतःला जपण्याची सवय त्यामुळे वयानुसार झालेले आजार सोडले तर तब्येत उत्तम आहे. लौकिक अर्थाने सगळे व्यवस्थित आहे तरीसुद्धा काही दिवसांपासून फार एकटं एकटं वाटतयं, कसलीतरी हुरहूर वाटते, सारखी भीती वाटते. मन मोकळे करावे असे कोणीच नाही त्याला कारण सुद्धा मीच.
….. रिटायरमेंट नंतर आरामाच्या नावाखाली फक्त झोपाच काढल्या, बाकी काहीच केले नाही. आत्मकेंद्री स्वभाव, मुखदुर्बळ, कसलीच महत्वाकांक्षा नाही, स्वप्ने नाहीत वडिलांच्या ओळखीने मिळालेली सरकारी नोकरी आयुष्यभर केली. भरपूर कष्ट केले, तडजोडी केल्या त्यामुळे रिटायर झाल्यानंतर फक्त आराम करायचा हे मनाशी पक्के केले होते आणि तसेच केले. स्वतःला पाहिजे तसे वागलो, कधी दुसऱ्यांचा विचार केला नाही, प्रसंगी हेकेखोरपणाही केला. सकाळी लवकर उठायचे, आवराआवर करायची, तासभर पेपरवाचन, मग दोन तास बसस्टॉपच्या कट्ट्यावर गप्पा, एक वाजता जेवण, दुपारी झोप, संध्याकाळी चार वाजता दूध मग पुन्हा कट्ट्यावर गप्पा, सात वाजता घरात मग नऊ वाजेपर्यंत सिरियल्स मग पुन्हा झोप. गेली अनेक वर्षे हाच दिनक्रम ठरलेला.
पण………
वर्षानुवर्षे त्याच त्या रुटीनचा आता कंटाळलो आहे. दिवसेंदिवस बेचैनी वाढत आहे. सतत पडून राहणे आता नको वाटते आणि दुसरे काही करण्याची इच्छा नाही तसे कधी प्रयत्न केले नाहीत. खास आवड, छंद वैगरे नाही. दहा मिनिटांची देवपूजा आणि तासभर पेपरवाचन सोडले तर दिवसभरात फक्त आरामच केला. तू नेहमी सांगायचीस कशाततरी मन गुंतवून घ्या, फिरायला जा, मित्र जोडा पण ऐकले नाही. रिटायर झाल्यानंतर काय करायचे याचे नियोजन करायला पाहिजे होते असे आता वाटते पण खूप उशीर झाला आहे. नोकरी असताना घडयाळाकडे बघायला वेळ मिळत नव्हता आणि आता घड्याळाकडे पहायचीच इच्छा होत नाही कारण वेळ पुढे सरकतच नाही. आख्खा दिवस मोठठा आ करून समोर असतो, जसा शुक्रवार, शनिवार तसाच सोमवार, काहीच काम नाही त्यामुळे रविवारच्या सुट्टीचे कौतुक नाही. रोजचा दिवस एकसारखा, नवीन घडत नाही. सणांच्या बाबतीत तेच. घरातले आपापल्या व्यापात, एकमेकांशी संवाद होतो तो कामापुरता. कोणी जाणीवपूर्वक वागत नाही पण मीच कमी बोलतो त्यामुळे आपसूकच संवाद कमी आहे. कट्ट्यावर जावे तर जे सोबत आहेत त्यांची परिस्थितीसुद्धा फार वेगळी नाही. सगळ्यांचीच नजर शून्यात असते. वेळ खायला उठतो. मला खरंच आता नक्की काय करावे हे समजत नाही. सिगरेटचे प्रमाण वाढले आहे. घरातले सारखे सांगतात सिगरेट कमी करा पण माझाच स्वतःवर ताबा नाही. खूप अपराध्यासारखे वाटते पण मी हतबल आहे. खूप सारे प्रश्न पडले आहेत. आलेला दिवस ढकलणे एवढेच करतो आहे. ” डोळ्यातले थेंब कागदावर पडले. अप्पा लिहिण्याचे थांबले नंतर बराच वेळ छताकडे पाहत पडून राहिले. विचारांचे चक्र चालू असताना त्यांना झोप लागली.
पक्षांच्या किलबिलाटाने जाग आल्यावर अप्पांनी खिडकीबाहेर पाहिले तर उजाडायाला सुरवात झाली होती. घड्याळात वेळ पाहून सकाळ झाली आहे याची खात्री अप्पांनी करून घेतली आणि स्वतःवरच हसले. रेडिओ सुरु करून किचनमधून भांडे घेऊन दुधवाल्याची वाट बघत दारात उभे राहिले त्याचवेळी एफ एमवर भूपिंदर गात होते “दिन खाली खाली बर्तन है और रात अंधेरा कुवां, एक अकेला इस शहर में रात में और दोपहर में….. ” गाणे ऐकून अप्पांचे लक्ष सहज हातातल्या रिकाम्या भांड्याकडे पाहत भकासपणे हसले.
..
रोजच्या वेळेत दुधवाला येऊन गेला. अप्पांच्या हातातले रिकामे भांडे दुधाने भरून गेले. सहज लक्ष दारातल्या कुंडीकडे गेले. तिथल्या सुकलेल्या एका रोपट्याला नवीन पालवी फुटत होती. निराश अप्पांना दुधाने भरलेले भांडे आणि फुटत असलेली पालवी पाहून पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. स्वतःला बदलायला हवे, पुन्हा नवीन सुरवात करायची. आता रिटायरमेंट मधूनच रिटायर व्हायचे असे म्हणत अप्पा दिलखुलास हसले. भांड्यामधील थोडे दुध रोपट्यावर ओतले आणि नवीन उमेद घेऊन प्रसन्न, टवटवीत मनाने घरात गेले आणि पहिल्यांदाच सगळ्यांसाठी चहाचे आधण ठेवले त्याचवेळी एफएम वर किशोरदा गात होते..
“थोडा है.. थोडे की जरुरत है.. , जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है…”
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈