डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ कूपमंडूक… — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
आज किती वर्षांनी साधना भारतात आली होती. तिची नोकरी, अभयचा बिझनेस मुलांची करिअर्स यात तिला भारतात यायला वेळच व्हायचा नाही. आली तरी तीन आठवड्याची सुट्टी घेऊन धावतपळत येणं व्हायचं त्यांचं. आजसुद्धा एका मीटिंग साठी ती आठवडाभर आली होती.
साधना मुंबईच्या लहान चाळीत राहिलेली मुलगी. अतिशय सामान्य परिस्थिति आणि वडिलांची साधीशी नोकरी. सुधीर आणि साधना ही दोन भावंडं. ती मात्र उपजतच हुशारी घेऊन आली होती. वडील म्हणायचे, ‘ माझी ही मुलं म्हणजेच माझी संपत्ती. ती बघा आपलं घर कसं वर आणतील ते. ’ भाऊंनी मुलांना काही कमी केलं नाही. होत्या त्या परिस्थितीत सगळं शक्य ते त्यांना मिळेल असं बघितलं. मुलं मोठी गुणी होती भाऊंची.
चाळीत साधनाच्या खूप मैत्रिणी होत्या. सगळ्याच बेताच्या परिस्थितीतल्या. अंजू माधुरी कला सगळ्या मराठी शाळेत साधनाच्याच वर्गातल्या. त्यातल्या त्यात वेगळी होती ती अय्यर मावशीची रेणुका. साधनाच्या बरोबरीने पहिल्या दोन नंबरात असायची रेणुका. तिच्याशी फार पटायचं साधनाचं. अशीच बेताबाताची परिस्थिति पण जिद्द विलक्षण. साधनाला म्हणायची, “आपण दोघी खूप शिकू, मोठ्या होऊ हं साधना. इथेच असं चाळीत आयुष्य नाही काढायचं आपण. ”
बघता बघता वर्षे उलटली. चाळ पडायला आली म्हणून बहुतेक लोकांनी दुसरीकडे उपनगरात घरे घेतली. साधना कॉलेजनंतर चाळीतल्या मैत्रिणींच्या फारशी संपर्कात राहिली नाही. तिने आपले जर्मन भाषेचे पीएचडी पूर्ण केले आणि तिला जर्मनीला युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली होती ती पोटापुरती तुटपुंजीच.. पण साधनाने ती घेऊन पुढे शिकायचे ठरवले.
…. सोपी नव्हती ही वाट. पण साधनाने आपलं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं. ती जर्मनीला गेली. तिला तिकडचे पीएचडी करावे लागणार होते, त्याशिवाय जॉब मिळणार नव्हता. मिळणाऱ्या तुटपुंज्या स्कॉलरशिपवर भागवायचे होते आता.
तिकडे गेल्यावर मात्र गोष्टी थोड्या सोप्या झाल्या तिला. एजंटने तिला युनिव्हर्सिटी जवळ छानसा फ्लॅट भाड्याने बघून दिला. बघता बघता साधना तिकडे रुळून गेली.
एक दिवस मार्केटमध्ये खरेदी करत असताना अचानक मागून शब्द आले. ”तुम्ही भारतातून आलात का?”
अस्खलित जर्मन भाषेतून आलेले शब्द ऐकून ती मागे वळली. मागे एक भारतीय तरुण हसतमुखाने उभा होता. “हॅलो, मी अभय चितळे. इथे जर्मन कौंसुलेट मध्ये काम करतो. तुम्ही?”
“ मी साधना. युनिव्हर्सिटीत शिकवते. ”
कॉफी पिताना त्यांच्या बऱ्याच गप्पा झाल्या आणि ती भेट संपली ते पुन्हा भेटायचं ठरवूनच.
साधनाला आपल्या शहरातला मुलगा भेटल्याचा फार आनंद झाला. अतिशय एकाकी असलेल्या आणि आपलं कोणी नसलेल्या देशात साधनाला किती जड जात होतं आयुष्य जगणं.
अचानक अभय तिला भेटला आणि जणू सुखाचं दारच उघडलं गेलं तिच्या जीवनात. भेटी गाठी होत राहिल्या आणि मुंबईला येऊन दोघांनी आईवडिलांच्या संमतीने लग्न केलं. दोन्ही घरी आनंदच झाला हा निर्णय ऐकून. लग्न होऊन दोघंही परत जर्मनीला गेले.
बरीच वर्षे झाली आणि त्यांच्या भारताच्या भेटी कमीच होऊ लागल्या. मुलं तर पूर्ण जर्मन. घरी मराठी बोलत पण केवळ नावाला ती भारतीय होती. बाकी पूर्ण जर्मनच. तिथेच जन्मलेली आणि वाढलेली..
…. नेहमीचीच कहाणी.
साधनाचे आईभाऊ, अभयचे आईवडील अनेकवेळा जर्मनीला येऊन लेकीचा मुलाचा सुखी संसार, गोड नातवंडांना भेटून गेले. आता खूप मोठं छान घर घेतलं अभय साधनाने. त्यांनी जर्मन नागरिकत्व स्वीकारलं.
एका महत्त्वाच्या कॉन्फरन्ससाठी अचानकच साधनाला मुंबईला यावं लागलं. चार दिवस कॉन्फरन्स होती. शेवटचा दिवस झाला की साधना आपल्या आईकडे जाणार होती.
खूप थकली होती आई. भाऊ तर जाऊन बरीच वर्षे झाली. पण सुधीर आणि त्याची बायको आईला अगदी छान संभाळत. कधी कधी साधनाला वाईट वाटायचं, मुलगी म्हणून आपला आईभाऊंना काही उपयोग झाला नाही. लांबलांबच राहिलो आपण. पण त्यांना जमेल तितक्या वेळा तिने अपूर्वाईने जर्मनीला नेऊन आणले होते.
आज मध्ये बराच वेळ होता म्हणून ती मॉलमध्ये गेली. सहज चक्कर मारायला. विंडो शॉपिंग करत असताना आवाज आला ”, तुम्ही पूर्वीच्या साधना आगाशे का?”
चमकून मागे बघितलं साधनाने. बराच वेळ निरखून बघितल्यावर तिला ओळख पटली. “अग, माधुरी ना तू?” माधुरी हसत म्हणाली “ हो. नशीब ओळखलंस मला. चल, तिकडे कॉफी पिऊया. ”
साधनाला अतिशय आनंद झाला या भेटीचा. माधुरी म्हणाली “, किती दिवस आहेस ग तू? आम्ही भेटतो जुन्या मैत्रिणी. आठवतात का अंजू कला रेणुका? “
आनंदाने साधना म्हणाली “ हो तर. न आठवायला काय झालं? मग आपण भेटूया ना. मी तीन दिवस आहे इथे अजून. या समोरच्या हॉटेलमध्ये उतरलेय. ”
माधुरीने ते हॉटेल बघितलं. , “ वावा. फाईव्ह स्टार हॉटेल?मजा आहे बाई तुझी. आमच्या कुठलं नशिबात इथे रहाणं?”
साधनाने निरखून माधुरीकडे बघितलं. अंगावर अगदी साधी साडी, केस पिकलेले, गळ्यात साधं मंगळसूत्र. हातात साधी जुनाट पर्स. परिस्थिती बेताची दिसत होती तिची. ते हॉटेल बघून डोळे लकाकलेले दिसले तिचे साधनाला.
“ काय करतेस तू माधुरी?”
“ अग, मी एका शाळेत नोकरी करते. एसेसीनंतर केलं डीएड. काय करणार?पटकन पायावर उभं रहायला हवं होतं मला. मग लग्न झालं. हेही कॉर्पोरेशन मध्ये जॉब करतात. कला खाजगी नोकरी करते आणि अंजू मात्र कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. तुला भेटायचं आहे का सगळ्याना?”
“ हो तर.. माधुरी अगं कित्ती वर्षांनी भेटणार आहोत आपण. तुमच्या एखादीच्या घरीच भेटूया ना, म्हणजे मस्त गप्पा होतील आणि निवांत भेटता येईल”.
माधुरीचा चेहरा पडला.
“ नको ग. आम्ही या तुझ्या हॉटेलपासून खूप लांब रहातो. आम्हीच येतो उद्या इकडे अकरा वाजता. इथेच मस्त जेवूया भेटूया. रेणुका अय्यर आठवते ना? ती मात्र खूप शिकली आणि मंत्रालयात मोठ्या पोस्टवर आहे म्हणे. ती नसते फारशी आमच्या संपर्कात. पण बघते. बोलावते तिलाही येत असली तर. ”
साधनाकडून तिचा मोबाईल नंबर घेऊन माधुरी उठलीच. साधनाने बघितलं तर बसच्या क्यू मध्ये उभी राहिलेली दिसली तिला माधुरी.
साधना हॉटेलवर आली. रात्री अभय, मुलं यांच्याशी गप्पा मारल्या आणि फक्त ज्यूस घेऊन साधना झोपलीच. अकरा वाजता तिला रिसेप्शनवरून कॉल आला, “ मॅडम, तुमच्याकडे गेस्टस आल्या आहेत. खाली येता का?”
“ आलेच. त्यांना बसवून ठेवा. “ साधना आवरून पटकन खाली आली.
रिसेप्शनमध्ये तिला दिसल्या अंजू कला, माधुरी. जरा त्यांच्यापासून लांब बसलेली बाई होती रेणुका अय्यर. किती वेगळी आणि छान दिसत होती रेणुका. बगळ्यात राजहंस जसा. सुरेख प्युअर सिल्कची साडी, लेदरची भारी पर्स आणि महागडे घड्याळ. मंद हसत रेणुका पुढे झाली आणि म्हणाली,
“ साधना, कित्ती वर्षांनी ग. ” तिने प्रेमाने मिठी मारली साधनाला. माधुरी कला अंजू हे बघत होत्या.
रेणुकाने साधनाच्या हातात सुंदर स्लिंग बॅग दिली.
” घे ग. बघ आवडते का. राजस्थानला गेले होते ना तिकडची खास आहे बघ कशिदाकारी. ”
अंजू कला म्हणाल्या ”, आम्हाला वेळच नाही झाला काही आणायला. चला आता जेवूया ना? एरवी कोण येणार इतक्या महागड्या हॉटेलात?”
साधना त्यांना डायनिंग हॉलमध्ये घेऊन गेली. तो अतिशय सुंदर भव्य आणि उच्च अभिरुचीने सजवलेला एरिया बघून डोळे विस्फारले या तिघींचे.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈