जीवनरंग
☆ “कृष्णा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
पहिली नोकरी लागली, ती पुण्यात. सरकारी नोकरी. नवा गाव. रहायची जागा नव्हती.
बाबांचे एक मित्र होते… आप्पा कुळकर्णी. नारायण पेठेत, त्यांचा भलामोठा वाडा होता.
बाबांनी चिठ्ठी दिली. मी बॅग घेवून आप्पांच्या घरी. शब्दाला किंमत असायची तेव्हा.
आप्पांनी चिठ्ठी वाचली. प्रसन्न हसले.
“वेळेवर आलास. कालच डोईफोड्यांची जागा रिकामी झालीय. तीन खोल्या आहेत ऐसपैस.
रहा निवांत. बापुसास सांग तुझ्या, आप्पाने आठवण काढलीय म्हणोन. “
जगी सर्व सुखी.. मीच होतो. सहज जागा मिळाली. सोन्यासारखी जागा. सोन्यासारखी माणसं.
भरपूर जागा. वाड्यात सहज रूळलो. प्रत्येक घराची दारे उघडी. साधी माणसं… आपली माणसं.
मनात घर करून राहणारी…
वाड्यात तीन चार बिऱ्हाडं होती. आणि मालक… मालक, मालकांसारखे वागलेच नाहीत कधी.
सगळं एक कुटुंब. वाड्याला भला मोठ्ठा दरवाजा. डाव्या बाजूला तीन बिऱ्हाडं… उजव्या बाजूला मालक आणि आणखीन एक. दरवाज्यासमोर एक छोटंसं मंदिर. राधाकृष्णाचं. दरवाजातून थेट दिसायचं.
मंदिराशेजारी प्राजक्त आणि सोनचाफा… मध्यभागी भलं मोठ्ठं आंगण.
माझा नोकरीचा पहिला दिवस. आप्पांच्या पाया पडलो.
राधाकृष्णाच्या मंदिरात. ‘ परमेश्वरा, अशीच कृपा राहू देत. ‘
मंद उदबत्तीचा वास. मूर्तीला प्राजक्त आणि सोनचाफ्याचा हार घातलेला… समईची स्थिर ज्योत.
मंद उजेडात देवाकडे बघितलं… मनोभावे हात जोडले.
आणि..
देव हसला. खरंच. मला तरी तसंच वाटलं. वाटलं, देव पाठीशी आहे. सगळं व्यवस्थित होणार.
मी निघालो.
“अहो देवा… प्रसाद तरी घेवून जावा. अंगारा लावा कपाळी. “
कृष्णाशी माझी पहिली भेट.
…. वाड्यातल्या मूळ पुरूषानं स्थापिलेला हा देव. कृष्णा या मंदिराचा पुजारी.
मूळ कोकणातला. मालकांनी येथे आणलेला. साधारण माझ्याच वयाचा. मंदिराशेजारीच दोन खोल्यांची जागा दिलेली त्याला. लहान वयात सरकारी नोकरी लागली, म्हणून वाड्याला माझं फार कौतुक. कृष्णालाही तितकंच..
कृष्णा पळतपळत मंदिराबाहेर आला. प्रसाद दिला. कपाळी अंगारा लावला. मनापासून आशीर्वाद दिला.
खूप छान वाटलं….. पहिला दिवस आनंदात गेला.
हळूहळू नोकरीत रमलो. ऑफीसमधून घरी आलो की, फारसं काम नसायचं. वाड्यातल्या पोरांना गोळा करायचो. मंदिराच्या छोट्या गाभाऱ्यात बसायचो. अभ्यास घ्यायचो. अगदी स्कॉलरशीपचाही. कविता पाठ करून घ्यायचो. इंग्लिश पेपर वाचून घ्यायचो. कृष्णाबरोबर शुभंकरोती… शेजारती… प्रसाद.
खरं तर खाणावळ लावलेली. सकाळी तिथंच जेवून, ऑफीसला जायचो. रात्री तिथं जेवायचा कंटाळा यायचा. तशी वेळही फार यायची नाही. कुठल्या तरी बिऱ्हाडातनं बोलावणं यायचंच.
“आज रात्री, आमच्याकडे जेवायला यायचं बरं का !”.
मला तेच हवं असायचं. वार लावल्यासारखा, वाड्यात प्रत्येक बिऱ्हाडी जेवायचो.
कधी कधी कृष्णाकडेही. कृष्णाकडचा मेनू एकच… मु. डा. खि… लोणचं, पापड आणि ताक.
पण अमृताची चव. जोडीला कृष्णाच्या गप्पा. मन आणि पोट भरून जायचं.
कृष्णाला माझं फार कौतुक वाटायचं. माझं ‘कौस्तुभ’ नाव त्याला जड वाटायचं. तो मला कौतुक म्हणायचा.
सगळ्या पोरांचा मी कौतुकदादा झालेलो. मला आवडायचं.
हळू हळू कृष्णाविषयी समजत गेलं. लहानपणी आई गेलेली. भिक्षुकाचं घराणं… पंधराव्या वर्षी वडिलही गेले… तोवर पोटापुरती पूजा सांगता यायची. पंचांग पहाता यायचं. मूहूर्त काढून देता यायचा. मालकांच्या नात्यातला. मालकांनी येथे आणला. मंदिराला पुजारी मिळाला. रहायला जागा. पुरेसा पगार.
कृष्णा सुखात होता. सुखातच राहिला… पुढे मागे कोणी नाही. तरीही सगळ्या वाड्यासाठी, कृष्णा देवाईतकाच मोठा होता. देवाकडे जायचा रस्ता व्हाया कृष्णा जायचा.
मला बढती मिळाली. कृष्णाकरवी देवाला अभिषेक करविला. कृष्णा मनापासून खूष.
जांभळ्या रंगाचे कद… खांद्यावर उपरणे… गळ्यात जानवं… कानात भिकबाळी. पाठ आणि पोट एकत्र आलेले. तरीही काटक… तोंडी हरिनाम….. कृष्णा देव आणि आमच्यामधला दुवा वाटायचा.
परीक्षेचा सीझन… कृष्णाची विशेष पूजा. सगळ्या पोरांना धो धो मार्क. पोरं अभ्यासू खरी.
पण कृपा, आशीर्वादाचं डिपार्टमेंट, कृष्णा सांभाळायचा.
मालकांचा तन्मय… त्याला झालेला ऍक्सीडेन्ट. तो सिरीयस.. आय. सी. यू. मध्ये.
कृष्णाच्या डोळ्याला डोळा नाही. दोन दिवस मंदिरात कोंडून घेतलं स्वतःला. तो शुद्धीवर आला.
मालक धावत धावत मंदिरात आले. कृष्णाला मिठी मारली. कृष्णा अश्रूंच्या घनडोहात बुडाला.
मला बढत्या मिळत गेल्या. क्वार्टर्स मिळाले. वाडा सोडणार होतो. सगळ्यांना भेटलो. कृष्णाच्या डोळ्यात पाणी. निरोप घेताना गलबललो. तरीही वाड्यात चक्कर व्हायची.
माझ्या लग्नाचा मुहूर्त, कृष्णानेच काढून दिला. पत्रिका त्यानेच बघितल्या… हिची आणि माझीही.
आमचं छान चाललंय. कृष्णाची कृपा.. राधेकृष्णाचीही.
नुकताच रिटायर्ड झालो. मुलगाही नोकरीत आहे. मोठ्ठा बंगला बांधलाय सहकारनगरात.
एकदम कृष्णाची आठवण झाली. तडक वाड्यात गेलो. कृष्णा आता थकत चाललाय. मंदिरात जाताना सुद्धा पाय थरथरतात. मंदिरात गेलो. कृष्णा बाहेर आला. गाभाऱ्यात बसलो.
कृष्णाशी गप्पा झाल्या… निवांत … खूप दिवसांनी.
कृष्णाला म्हणलं. “बास झालं. आता रिटायर्ड हो. कुणीतरी नवीन पोरगा आणू. तुझ्याच्यानं होत नाही आता. “
कृष्णाचा चेहरा एकदम उतरला. काय बोलावं कळेना. डोळे भरून आले त्याचे. मला कसंसंच झालं.
“तू आता तिथं राहू नकोस. नव्या पोराला लागेल ती जागा. तू माझ्याकडे ये. नातू लहान आहे माझा.
त्याला अथर्वशीर्ष शिकवायचंय. तुलाच शिकवावं लागेल. “
कृष्णा गळ्यात पडून रडायलाच लागला. “नक्की शिकवेन. थकलो की नक्की तुझ्याकडेच येईन.
माझी वाट बघणारं कुणीतरी आहे, हे ऐकलं… नवं बळ मिळालं जगायला. आता हातपाय थरथरणार नाहीत माझे. “
कृष्णाने एकदम मिठी मारली
आणि मी…
माझा..
माझा एकदम सुदामा झाला.
© कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈