श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ वाटणी… भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(अर्थात कायद्याच्या भाषेत आणि संपत्तीचे वाटेहिस्से करतांना या वैयक्तिक भावनांना काही स्थान नव्हतं.) – इथून पुढे —
” बरोबर आहे तुझं वहिनी ” मी तिला सहानुभूती दाखवत म्हणालो ” रविवारी मी तिथं जाईन तेव्हा तुझ्या या भावना नक्की लक्षात ठेवेन “
” थँक्यू भाऊजी.माझी तुम्हांला एकच विनंती आहे की सारासार विचार करुनच निवाडा द्या.बापूंवर तुमच्या वडिलांचे आणि तुमचेही खुप उपकार आहेत.त्यामुळे तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत “
” चालेल वहिनी. बघतो काय करायचं ते “
“ओके भाऊजी “
तिने फोन कट केला आणि मी विचारात पडलो.
बापूकाकांचा सगळा इतिहास मी आठवला आणि मला सुरेखा वहिनी जे म्हणत होती ते सगळं पटू लागलं.पण योगेश आणि रमेशच्या आर्थिक परीस्थितीतला जमीन आसमानाचा फरक मला वकील या नात्याने सुरेखा वहिनीच्या बाजूने निवाडा करण्यास थांबवत होता.
शनिवारचा दिवस उजाडला.आज कोर्टात खुप कामं होती.दोनतीन केसेसमध्ये ऑर्ग्यूमेंटस् होती.सगळ्या केसेस मालमत्ता विवादाच्या होत्या.दहादहा पंधरापंधरा वर्ष चालणाऱ्या या खटल्यांमध्ये खरं तर काहीच दम नव्हता.दोन्ही पक्षांनी समजूतीने वाद सोडवला तर एका क्षणात निकाल लागू शकत होते.पण माणसाची दुसऱ्याला ओरबडण्याची स्वार्थी प्रवृत्ती त्याला तसं करु देत नाही. अर्थात या प्रवृत्तीमुळेच आमच्यासारखे वकील पोट भरत होते नव्हे गब्बर होत चालले होते.खेड्यापाड्यातून कामधंदा सोडून आलेली आणि दिवसभर कोर्टाच्या आवारात उदासवाणा चेहरा करुन बसलेली माणसं पाहिली की वाईट वाटायचं.कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये असं जे म्हणतात ते अगदी खरं होतं.कोर्टात फिरतांना मला सहजच रमेश आणि योगेशची आठवण आली.रविवारी जर दोघंही अडून बसले तर कदाचित बापूकाका वारल्यानंतर त्यांचाही खटला कोर्टात उभा राहिल.आणि अशा वेळी आपण कुणाचं वकीलपत्र घ्यायचं हा मला पेच पडणार होता.पण मी मनाशी निश्चय केला की काही झालं तरी दोघांना कोर्टाची पायरी चढू द्यायची नाही.
रात्री नऊ वाजता जेवण झाल्यावर मी बातम्या बघण्यासाठी टिव्ही लावला तोच मोबाईल वाजला.शैला वहिनीचा फोन होता.मला हसू आलं.या दोन्ही जावांनी मला जज्ज बनवून टाकलं होतं आणि दोघीही एखाद्या वकिलासारखी आपापली बाजू मांडत होत्या.
” हं बोल शैला वहिनी”
” भाऊजी उद्या येताय ना?”
” हो.येतोय ना “
” भाऊजी तुम्ही म्हणाल ते आम्ही मान्य करु.तुम्ही इतके मोठे वकील.तुम्ही योग्य तोच निर्णय द्याल.पण भाऊजी तुम्हांला आमची परिस्थिती माहिती आहेच.आम्ही कसं धकवतो आमचं आम्हांला माहित.शेती अशी बेभरवशाची.जेव्हा उभं पिक पावसामुळे किंवा वादळामुळे वाया जातं तेव्हा शेतकऱ्याच्या मनाची काय स्थिती होत असेल हे सुरेखा वहिनींना कसं माहित असणार?मागच्या वर्षी टमाट्याचं बंपर पिक आलं.पण भाव इतका पडला की टमाटे अक्षरशः फेकावे लागले.कर्ज काढून शेती करावी आणि सावकाराचं व्याज भरु शकू इतकंही उत्पन्न मिळत नाही अशी परीस्थिती असते. आता घराचे वाटेहिस्से झाले आणि अर्धी शेती जर रमेश भाऊजींनी घेतली तर आम्हांला उपाशीच मरायची वेळ येणार आहे.तीच गोष्ट घराची.त्यातही भाऊजींना वाटा द्यायचं म्हंटलं तर आम्ही रहायचं कुठे?सुरेखा वहिनी नेहमी सगळ्यांना सांगत असतात की आम्ही घराला इतके पैसे लावले ,शेतीसाठी इतका पैसा दिला पण आमच्या अडचणी त्यांच्या लक्षात येत नाहीत. तुम्हांला तर माहितच आहे की बापू किती तिरसट स्वभावाचे आहेत,त्यातून ते सतत आजारी असतात.पण आम्ही सांभाळतोच आहे ना त्यांना?दर महिन्याला त्यांना तीनचार हजाराची औषधं लागतात.कोण करतं हा खर्च?आम्हीच ना?भाऊजी रमेश भाऊजींकडे कशाचीच कमतरता नाही. दणदणीत पगार आहेच शिवाय सुरेखा वहिनींची कमाईही काही कमी नाही. असं असतांनाही बापूंच्या इस्टेटीवर त्यांनी डोळा ठेवणं कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा.कमीतकमी आमच्या परीस्थितीचा तर त्यांनी विचार करावा”
मी गोंधळात पडलो.तिचंही म्हणणं खरंच होतं.सुरेखा वहिनीचं असा इस्टेटीतला वाटा मागणं म्हणजे स्वतःचं ताट भरलेलं असतांनाही दुसऱ्याच्या ताटातले पदार्थ मागण्यासारखंच होतं.खरं तर सुरेखा वहिनी मोठ्या मनाची आहे हे मी अनेकदा अनुभवलं होतं.कुणालाही मदत करतांना ती सढळ हाताने मदत करायची.पाहुणचारातही ती कसलीच कसर सोडायची नाही. मग बापूंच्या संपत्तीच्या बाबतीतच ती का अडून बसलीये हे काही मला समजत नव्हतं.अर्थात मी आता माझं मत मांडणार नव्हतोच.
” वहिनी उद्या मी येतोच आहे.तर सगळे मिळून ठरवूया ना “
” भाऊजी माझी तुम्हाला एकच विनंती की रमेश भाऊजींना सांगा की सुरेखा वहिनींना उद्या आमच्याकडे आणू नका.तसं बापूंनी सांगितलं आहेच पण तुमचं त्या ऐकतील.त्या आल्या तर रमेश भाऊजी त्यांच्या मताप्रमाणेच चालतील”
” बरं मी सांगून पहातो “
” धन्यवाद भाऊजी.या मग उद्या.बैठक दुपारी चार वाजता आहे.पण तुम्ही जेवायलाच या.सुनंदा वहिनींनाही घेऊन येताय ना सोबत?”
“नाही. उद्या रोटरीक्लबचा एक कार्यक्रम आहे तिथे ती जाणार आहे “
” बरं पण भाऊजी मी जे बोलले ते नक्की लक्षात ठेवा “
” हो नक्की”
तिने फोन बंद केला आणि मी विचारात पडलो.बापूकाका खरं तर माझ्या वडिलांचे चुलत भाऊ.पण माझ्या वडिलांनी सर्वांशी संबंध जपले होते.अगोदर नामांकित सरकारी वकील आणि नंतर जिल्हा न्यायाधीश झाल्यामुळे त्यांना आमच्या सर्वच नातेवाईकांमध्ये मानाचं स्थान होतं.त्यांचा शब्द सहसा कुणी खाली पडू देत नसायचं.तीच परंपरा वारशानुसार माझ्याकडे चालत आली होती.प्रतिष्ठित वकील असल्यामुळे माझ्याही शब्दाला खुप मान होता.त्यातून बापूकाकांच्या कुटुंबावर माझ्या वडिलांचे खुप उपकार होते.त्यांच्या पत्नीच्या म्हणजे लक्ष्मीकाकूंच्या कँन्सरच्या आजारात त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता.विशेष म्हणजे त्यातला एक रुपयासुध्दा त्यांनी बापूकाकांना मागितला नव्हता.मी स्वतः रमेशला सरकारी नोकरीत लावून दिलं होतं शिवाय योगेशला अनेकदा आर्थिक मदत केली होती.या सगळ्या कारणांनी बापूकाकांच्या संपत्तीच्या वाट्याहिश्शाचा मी जो निवाडा करेन तो सर्वांना मान्य होणार होता.अर्थात शैला वहिनी म्हणत होती ते मला पटत होतं शिवाय बापूकाकांची स्वतःचीही इच्छा योगेशला सर्व काही देऊन टाकायची होती.रमेश त्याला हरकत घेईल असंही वाटत नव्हतं.त्यामुळे सुरेखावहिनी कितीही बरोबर असली तरी माझा निर्णय योगेशच्या बाजूनेच झुकला होता.
रविवारी सकाळी घरी आलेल्या काही पक्षकारांशी चर्चा करुन मी दहा वाजता माझ्या असिस्टंटसोबत निघालो.साठ किलोमीटरवर आमचं गांव होतं.अकरा सव्वाअकराशी मी बापूकाकांकडे पोहचणार होतो.जातोच आहे तर जरा शेताकडेही चक्कर मारावी या हिशोबाने मी लवकर निघालो.रमेश मात्र तीन वाजताच तिथे पोहचणार होता.जेवतांना या वाटणी प्रकरणावर चर्चा होणार आणि साध्यासरळ रमेशला बापूकाका गुंडाळतील असं वाटून सुरेखा वहिनीने तर त्याला लवकर जायला मनाई केली नसेल हा विचार माझ्या मनात चमकून गेला.
गावापासून पाचेक किलोमीटर अंतरावर असतांना माझा बालमित्र शरद मला दिसला.बाईकवर कुठेतरी जात होता.त्याला पाहून मी कार थांबवली.
” काय रे शरद कुठे निघालास?”मी गाडीबाहेर येत त्याला विचारलं.
” तालुक्याला काम होतं जरा.आज काय बैठक आहे म्हणे वाट्याहिश्शाची?योगेश काल सांगत होता “
” हो अरे.खरं तर अशी मध्यस्थी करणं मला बरं वाटत नाही. पण बापूकाकांचा आग्रह होता म्हणून आलो “
” बरं झालं तू आलास.गावांतही तुला मान आहे.तुझा शब्द कुणी खाली पडू देणार नाही.आणि तू योग्यच निवाडा करशील यात शंका नाही “
मग आम्ही बराच वेळ बोलत बसलो.तो निघाल्यावर मीही निघालो.बापूकाकांच्या घराकडे न जाता मी नदीकडे गाडी वळवली.नदीच्या काठावर एक शंकराचं पुरातन मंदिर होतं.त्याचं दर्शन मला घ्यायचं होतं.मंदिराजवळच्या वडाच्या पारावर काही मंडळी पत्ते खेळत बसली होती.ती खेळण्यात इतकी मग्न होती की मी गाडी बंद करुन मंदिराजवळ आलो तरी त्यांचं लक्ष नव्हतं.मी शंकराचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मला योगेश त्या मंडळीत पत्ते खेळतांना दिसला.
” योगेशsss” मी हाक मारली तसा तो दचकला. मला पहाताच तो पत्ते टाकून उठला.त्याच्यासोबत खेळणाऱ्यांचा मात्र चांगलाच रसभंग झालेला दिसला.
” दादा तुम्ही इकडे कसे?”ओशाळवाणं हसत त्याने विचारलं.
“काही नाही. मंदिरात दर्शनासाठी आणि नदीत पाणी किती आहे ते पाहण्यासाठी आलो होतो.तू इथे काय करतोहेस?”
“काही नाही दादा.बस काहीतरी टाईमपास करतोय “
“का?आज शेतीची कामं नाहीत?”
” माणसं गेली आहेत दादा.मीही सकाळी एक चक्कर मारुन आलो ” तो घाईघाईत बोलला ” बरं चला घरी जाऊ.बापू वाट बघत असतील तुमची”
” हो चालेल.चल बैस गाडीत “
त्याला गाडीत घेऊन मी त्यांच्या घरी आलो.घर अनेक वर्षांपासून आहे त्याच स्थितीत होतं.मी आत शिरलो.बाहेरच्या खोलीत खुप पसारा पडला होता.योगेशने खुर्च्यांवरचा पसारा उचलला.
“बसा दादा.शैला जयंतदादा आलेत गं.पाणी घेऊन ये “योगेश आत गेला आणि शैला वहिनी लगबगीने बाहेर आली.
” अरे बापरे.भाऊजी लवकर आलात?तुम्ही तर बारा वाजता येणार होतात ना?”
तिने मला वाकून नमस्कार केला आणि ती भरभर पसारा आवरायला लागली.तेवढ्यात बापूकाका बाहेर आले.तब्येत बरीच खराब दिसत होती.मी त्यांना नमस्कार केला.
” लवकर आलास?”
” हो.शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन करायचं होतं आणि म्हंटलं जरा नदीही किती भरलीये ते बघू.जास्त काही पाणी दिसत नाहिये”
” सध्या पाऊसच कुठे व्यवस्थित पडतोय?जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही आणि नको तेव्हा मुसळधार पडून सगळी पिकं खराब करतो “
तेवढ्यात मला पसारा आवरल्याने कोपऱ्यात शिलाई मशीन दिसली
– क्रमशः भाग दुसरा.
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈