सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ हसण्याचे वरदान…… – भाग २ – मूळ कथा लेखक : पर्ल बक ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

(“बराच दीर्घ काळ, कदाचित, मी तुला पत्र लिहू शकणार नाही, आई!” पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना त्याचं एक कार्ड आलेलं होतं, त्यामुळे आज काही कसली अपेक्षा करण्यात अर्थ नव्हता.) – इथून पुढे —

अर्धवट खाऊन त्यांनी तो ट्रे बाजूला सारला. आणि त्या पलंगावर पडून, रॅनी कसा ख्रिसमसच्या दिवशी मित्रांना बोलवून घर गजबजून टाकायचा, ते आठवू लागल्या. त्यांनी नेहमीकरताच स्वतःला रॅनीला वाहून घेतलेलं होतं. पण त्याने लग्न का बरं केलं नसेल? पण अर्थातच, त्या खूषच होत्या, त्याबद्दल. “तुझ्याइतकं कोणीच चांगलं भेटलं नाही मला अजून, आई!” तो नेहमी म्हणायचा. हे म्हणजे अतीच झालं! पण कदाचित थोडंसं खरंही? त्या दोघांच्यात नेहमीच खूप जवळीक होती. आणि रॅनीला माहित होतं, की त्याचे वडील युद्धात मारले गेल्यानंतर तर तोच तिचं सर्वस्व, तिचं अवघं जग होता. रॅनी तेरा वर्षांचा असताना, रॅनाल्डचा, म्हणजे, रॅनीच्या वडिलांचा व्यवसायातील भागीदार आणि मित्र टोपहॅम स्टोक्स याने मिसेस बार्टनना लग्नासाठी मागणी घातली होती, पण त्यांनी रागाने ती फेटाळून लावली होती. त्यांनी रॅनीला त्याबद्दल सगळे सांगितलेही होते. त्यच्या प्रतिक्रियेने त्या आश्चर्यचकित आणि काहीशा दुःखी पण झाल्या होत्या.

 “मला आवडतात टोप्पी अंकल, ” तो म्हणाला होता.

“मी नाही तो विचार करू शकत, ” त्या कोरडेपणे बोलल्या होत्या, “तुला नाही समजणार, शिवाय, तू आहेस ना माझा, जर मी तुझ्या वडिलांच्या जागी दुसऱ्या कोणाला आणलं, तर मला तो तुझा अपमान केल्यासारखं वाटेल. ”

 “तसंच काही नाही होणार, अंकल टोप्पी हे अंकल टोप्पीच रहातील. ” तो म्हणाला होता.

 “या विषयावर आपण काही न बोललेलंच बरं, ” त्या म्हणाल्या होत्या.

 निश्चितच, रॅनीने लग्न न केल्याबद्दल त्यांनी स्वतःला दोष द्यायची गरज नाही. त्या नेहमी स्वतःला सांगत आल्या होत्या, की तरुण मुलाने लग्न तर केलंच पाहिजे, आणि जेंव्हा ती वेळ येईल तेंव्हा त्या हिंमतीने त्याला पाठिंबा देतील! आणि त्या निःस्वार्थी पण होतील आणि रॅनीचा सगळा वेळ आणि समर्पण आपल्यासाठीच असावं ही अपेक्षाही ठेवणार नाहीत, त्यांनी हळुवारपणे त्याला हे सुचवूनही पाहिलं होतं, विशेषतः तो पंचवीस वर्षांचा झाल्यानंतर, की त्या हे नक्कीच समजून घेतील, की जर—

“खरंच, मी माझ्या सुंदर सुनेचं स्वागतच करीन, ” त्या हसत, हसत त्याला म्हणाल्या होत्या. “कोणीतरी, ॲलिशियासारखी?” एका जुन्या मैत्रिणीची ती मुलगी होती, एक फिकट गोरी, अती सुंदर नाजूक प्राणी!

 त्याने त्याची मान हलवली आणि जोरात हसला, “सॉरी, मी काही त्या ॲलिशियाच्या प्रेमात पडीन असं नाही मला वाटत आई, ” 

 तोपर्यंत रॅनी त्याच्या वडिलांच्या व्यवसायात इतकं चांगलं काम करायला लागला होता, की आता ज्येष्ठ भागीदार असलेल्या टोपहॅम स्टोक्सने मिसेस बार्टनना येऊन सांगितलं होतं, की रॅनी त्याच्या वडिलांसारखाच कायद्याच्या बाबतीत अतिशय बुद्धिमान आहे! तो अत्यंत लोकप्रियही होता. पण तो काही कोणाच्या प्रेमात पडायला तयार नव्हता!

 त्यांनी घड्याळाकडे बघितलं. आता उठून, सावकाशपणे ड्रेस वगैरे घालून तयार झालं तर बरोबर चर्चच्या वेळेत तिथे पोचता येईल, हे त्यांच्या लक्षात आलं. त्या उठल्या आणि त्यांनी ती हॉलीची छोटीशी डहाळी उचलून त्यांच्या ड्रेसिंग टेबलवर असलेल्या रॅनीच्या फोटोसमोर ठेवली. तो त्यांच्याकडेच बघत होता. त्याचा सुस्वभावी आणि आनंदी चेहरा त्याच्या त्या ऑफिसरच्या ऐटबाज टोपीत किती देखणा दिसत होता! त्यांच्या मनात आलं, किती चांगला मुलगा होता तो! जिथे कुठे जाईल, असेल तिथे सर्वांचा विश्वास संपादन करणारा! भरवसा ठेवण्यालायक! रॅनाल्डही तसाच होता, पण तो युद्धभूमीवरून परत आलाच नाही! चांगुलपणा काही कोणाला वाचवत नाही! आणि रॅनी पण असाच युद्धावरून परत आला नाही, तर त्यांच्याकडे कोण बघेल, कोण काळजी घेईल त्यांची? जवळ फक्त पैसा असून काही उपयोग नसतो. ती कायम कोणावर तरी अवलंबून रहाणारी स्त्री होती. आणि रॅनाल्डला आवडायचं तिचं असं त्याच्यावर अवलंबून असणं. आणि रॅनी मोठा झाल्यावर त्याने वडिलांसारखीच तिची जबाबदारी उचलली होती. कसं काय ती सांभाळणार होती सगळं, तो सुद्धा जर परत आलाच नसता तर?

 एक क्षण त्या टेबलावर ओणवल्या, जणू त्यांचा आत्मा त्यांच्या डोळ्यात उतरला आणि त्या आपल्या मुलाच्या चेहऱ्याकडे बघत राहिल्या. मग त्यांनी कसंबसं स्वतःला आवरलं. नाही, त्यांना तो मृत झाल्याचं नाही जाणवत. जेंव्हा –म्हणजे, जर –तो मारला गेलाच, तर त्यांना ते त्याच क्षणी जाणवेल—नक्की ना?

 “पण मला जाणवतंय, रॅनी, की तू जिवंत आहेस!” त्या कुजबुजल्या. त्यांनी कल्पना केली, अर्थात ती केवळ कल्पनाच होती— की त्याचे डोळे जिवंत असल्यासारखे चमकले!

 “मला मदत कर, ” त्या परत कुजबुजल्या, “मी जेंव्हा परत घरी येईन, एकटी, तेंव्हा मला मदत कर. ”

 पण तो फक्त फोटो होता. त्यांनी त्या फोटोकडे पाठ फिरवली.

 

. . . . ज्या क्षणी त्यांनी चर्चमधून परत येऊन घरात पाऊल ठेवलं, त्या क्षणी त्यांना जाणवलं, की काहीतरी वेगळं घडलंय! म्हणजे, त्यांना जाणवलं की कोणीतरी अनोळखी व्यक्ती घरात आलेली आहे. म्हाताऱ्या हेन्रीने त्यांना दार उघडून आत घेतलं, तेंव्हाच तो अस्वस्थ असल्याचं त्यांना दिसलं.

 “काय झालंय हेन्री?” त्यांनी विचारलं.

 “लायब्ररीत एक तरुण व्यक्ती तुमची वाट बघते आहे, मॅडम, ” तो म्हणाला.

 “तरुण व्यक्ती?” त्या बुचकळ्यात पडल्या.

 “तुम्ही भेटताय ना?” तो म्हणाला.

 “पण तू तिला घरातच का घेतलंस?” त्यांनी विचारलं.

त्याने त्याच्या हातातला एक चुरगळलेला कागद त्यांच्या समोर धरला. त्यांना त्याच्यावर रॅनीचं हस्ताक्षर दिसलं.

 ‘हेन्री, टिगरसाठी, हिला घरात येऊ दे!’

“टिगर!” त्या म्हणाल्या. रॅनी लहान असतानाचं त्याचं ते लाडकं नाव होतं. तो जेंव्हा नुकताच वाचायला लागला होता, तेंव्हाचा तो टायगर चा चुकीचा केलेला उच्चार होता. वरच्या कठड्यावरून एकदा त्याने हेन्रीच्या अंगावर झेप घेतली होती.

 “मी टिगर आहे!” असं ओरडून त्याने झेप घेऊन हेन्रीला जमिनीवर पाडलं होतं. त्यानंतर अनेक वर्षं तो एक खेळच झाला होता, हेन्रीने आपण टिगरला प्रचंड घाबरतो असं नाटक करायचा. पण घराबाहेरच्या कोणालाच त्या खेळाबद्दल किंवा त्या नावाबद्दल काहीच माहित नव्हतं.

“होय, मॅडम, ” तो गंभीरपणे म्हणाला. त्याने त्यांच्या स्वच्छ, राखाडी डोळ्यात पाहून पुढे विचारलं, “तुम्ही तिला भेटाल तेंव्हा मी तिथे थांबू का?”

“नको, ” त्या म्हणाल्या. “नको, मी एकटी सहज भेटेन— हेन्री, कशी दिसते ती?”

 “ती—काय सांगू? —अगदी चारचौघीं सारखीच आहे, मला काय म्हणायचं कळतंय ना तुम्हाला मॅडम? तशा अनेक तरुण मुली दिसतात येता जाता. खरं तर विशेष काही सांगताच येत नाही तिच्याबद्दल!”

“ठीक आहे, ” त्या सावकाशपणे म्हणाल्या. त्यांनी आपला कोट काढून त्याच्याकडे दिला पण हॅट तशीच राहू दिली डोक्यावर. फिकट निळ्या रंगाची वाटोळी टोपी होती ती. त्यांच्या पांढऱ्या केसांवर फार शोभून दिसायची, पण ती घातल्यावर त्या कठोर, करारी दिसायच्या.

 त्यांनी लायब्ररीचं दार उघडलं आणि त्यांना एक तरुण मुलगी तिथे उंच पाठीच्या लाकडी खुर्चीत बसलेली दिसली.

 “येस?” त्या त्यांच्या स्वच्छ आवाजात, तुटकपणे बोलल्या, ”तुला माझ्याशी बोलायचं आहे?”

 आवाज ऐकताच, ती मुलगी पटकन खुर्चीवरून उठली आणि उठताना तिने आपली छोटी बॅगही उचलून घेतली. “तुम्ही टिगरच्या आई का?” ती क्षीण आवाजात बोलली.

 “टिगर?” त्यांनी भुवया उंचावून विचारलं.

 “तुम्ही मिसेस बार्टन का?” त्या तरुण मुलीने विचारलं.

 “होय, ” त्यांनी उभ्या उभ्याच उत्तर दिलं. त्या, त्या तरुण मुलीपेक्षा बऱ्याच उंच होत्या. ती मुलगी खूपच लहान होती, वीस वर्षांची सुद्धा नसेल, छोटीशी, नाजुक आणि सावळी होती आणि त्यांना घाबरून थरथरत होती. ती किंचित सुद्धा सुंदर म्हणण्याजोगी नव्हती. तिची चेहरेपट्टी अगदीच बालिश दिसत होती, फक्त तिचे काळेभोर, मोठमोठे डोळे तेवढे लक्ष वेधून घेत होते.

“टिगर—म्हणजे, रॅनाल्डने मला तुम्हाला भेटायला सांगितलं. ” ती अडखळत बोलली.

 “माझ्या मुलानं?” मिसेस बार्टन म्हणाल्या. त्यांना एकाएकी थंड वाटायला लागलं. “ बैस, आणि मला सांग, माझ्या मुलाने तुला पाठवलं असं कसं म्हणतेस तू? तो तर तिकडे लांब, युद्धावर आहे. ”

 त्या तरुण मुलीच्या फिक्या चेहऱ्यावर, नाजूक, गुलाबी रंगाची छटा आली. मग तिने धीर गोळा केला. मिसेस बार्टनने पाहिलं, की तिने खाली घातलेली मान वर केली आणि ओठ चावले. “इथून जाण्यापूर्वीच रॅनीने मला सांगितलं होतं, की मी नक्की काय करायचं आहे. त्याने मला ख्रिसमसच्या दिवशी तुम्हाला येऊन भेटायला सांगितलं होतं. ”

मिसेस बार्टन अगदी ताठ उभ्या राहून तिचं बोलणं ऐकत होत्या. “मी का बरं तुझ्यावर विश्वास ठेवावा?” त्यांनी अगदी थंड आवाजात तिला विचारलं.

 त्यावर त्या मुलीने आपल्या ब्लाउजमधून एक जाड पाकीट काढलं आणि ती म्हणाली, “हे त्याचं मला आलेलं शेवटचं पत्र आहे, ” असं म्हणून तिने ते पत्र काढून, त्याचं पहिलं पान पत्रातून फाडून त्यांना दिलं.

 “छोट्याशा टिग्रेसला, ” अशी त्या पत्राची सुरुवात होती, “आत्ता तुला हे पत्र लिहिताना मी गरम पाण्याच्या बादलीत पाय बुडवून बसलो आहे. तेंव्हा या पत्रावर उडलेले शिंतोडे हे या पाण्याचे आहेत, येडुबाई— अश्रुंचे नाहीत, पण तुझी पत्रं वाचताना ते येऊ शकतात —–“

मिसेस बार्टननी तो कागद परत तिला दिला. त्यांनी आपले डोळे तिच्यावर रोखले होते, आणि त्यातून आपल्या मनात काय चाललंय, ते तिला अजिबात कळणार नाही, अशी पूर्ण काळजी घेतली होती. रॅनी —- काय संबंध होता रॅनीचा या मुलीशी? रॅनीने त्यांना काहीच सांगितले नव्हते. हा सगळा काळ, त्या जेंव्हा समजत होत्या, की रॅनी केवळ त्यांचा आहे, तेंव्हा तो त्यांचा नव्हताच! त्या सगळा काळ एकट्याच होत्या. अगदी एकट्या, पण ते कळायला हा ख्रिसमसचा दिवस उजाडायचा होता! त्यांचा स्वाभिमान डिवचला गेला, आणि त्यांनी आपले ओठ घट्ट मिटून घेतले. आपल्या मुलाला जे आपल्याला सांगावंसं वाटलं नव्हतं, ते काहीही या मुलीला विचारायचं नाही, असं त्यांनी मनात ठरवून टाकलं. ठेवू दे त्यांना जे काही गुप्त ठेवायचं ते. त्यांना आपल्या अन्तःकरणाचा कोणी लचकाच तोडतंय अशी वेदना जाणवत होती. आता त्या खरोखरच एकट्या होत्या.

 त्या मुलीनं ते पत्र परत ठेऊन दिलं.

“मी कोण आहे — हे विचारणार नाही का तुम्ही?”ती म्हणाली.

 “नाही, ” मिसेस बार्टन म्हणाल्या, “मी नाही विचारणार. ”

 “पण — पण त्यानी मला आजच इथे यायला सांगितलं होतं, ख्रिसमसच्या दिवशी, ” ती अडखळत म्हणाली, “त्याने मला —“

“का?” मिसेस बार्टननी तिचं बोलणं तोडत मधेच विचारलं, “सगळे दिवस सोडून ख्रिसमसच्या दिवशीच का?” त्या थांबल्या आणि त्यांच्या मनातलं बोलून गेल्या, “तसाही ख्रिसमसचा दिवस माझ्यासाठी अवघडच असतो. ”

– क्रमशः भाग दुसरा 

मूळ कथा: पर्ल बक

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments