सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ हसण्याचे वरदान…… – भाग ३ – मूळ कथा लेखक : पर्ल बक ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

(“का?” मिसेस बार्टननी तिचं बोलणं तोडत मधेच विचारलं, “सगळे दिवस सोडून ख्रिसमसच्या दिवशीच का?” त्या थांबल्या आणि त्यांच्या मनातलं बोलून गेल्या, “तसाही ख्रिसमसचा दिवस माझ्यासाठी अवघडच असतो.”) — इथून पुढे —

ती मुलगी पुढे झुकली आणि तिने तिचे लहान मुलीसारखे हात एकमेकात अडकवले. तिचे मोठे तपकिरी डोळे अश्रुंनी भरून आले, एखाद्या लहान बाळासारखे स्वच्छ अश्रू!

“खरंच भयंकर असतो ना?” ती कुजबुजली.

मिसेस बार्टननी त्यावर काही उत्तर दिलं नाही. त्यांच्यासाठी हा दिवस जितका भयंकर होता, तेवढं काहीच या मुलीसाठी भयंकर असणं शक्य नाही. त्या दोघींच्यात समान असं काहीच नव्हतं. ती मुलगी पटकन उठली आणि मिसेस बार्टनच्या खुर्चीजवळ येऊन गुडघ्यांवर बसली.

मिसेस बार्टन एकदम मागे सरकल्या. “नाही, ” त्या म्हणाल्या, “नाही —- मला तुझ्याबद्दल काहीही जाणून घ्यायचं नाही. ”

ती मुलगी सावकाशपणे तिथून उठली. “म्हणजे — तुम्हाला खरंच असं म्हणायचं का — की मी इथून निघून जावं?”

“प्लीज, ” मिसेस बार्टन विनवणीच्या स्वरात म्हणाल्या, “प्लीज — निघून जा इथून. ”

“पण टिगर तर म्हणाला होता—“

“प्लीज, ” मिसेस बार्टन ओरडल्या, “प्लीज, प्लीज!” त्यांनी आपला चेहरा दोन्ही हातांमधे लपवून जोरजोरात रडायला सुरुवात केली, त्यांचं सगळं अंग थरथरत होतं.

ती मुलगी त्यांच्या बाजुला अगदी शांतपणे उभी होती. आणि मग मिसेस बार्टनना त्यांच्या खांद्यावर कसलासा स्पर्श जाणवला.

“रडू नका, ” ती मुलगी म्हणाली. “तुम्ही रडू नका, मी जाते आहे. जर मला त्यानं मी आज इथे यायलाच हवं, असं सांगितलं नसतं, तर मी आलेच नसते. ‘साधारण बारा वाजता तू तिथे जा, ’ त्यानं मला सांगितलं होतं, ‘त्या वेळी मॉम चर्चला जाऊन परत आली असेल, ’ ‘ते मला घरात घेणार नाहीत, ’ मी त्याला सांगितलं होतं. तेंव्हा त्यानं त्याच्या छोट्याशा वहीतलं एक पान फाडलं आणि त्याच्यावर काहीतरी लिहून मला दिलं, आणि म्हणाला, की हे दार उघडणाऱ्या म्हातारबाबांना दे. आणि मग तुमची भेट झाल्यावर, त्यानं तुमच्यासाठी दिलेलं ख्रिसमस प्रेझेंट तुम्हाला दे, असं सांगितलं होतं त्यानं मला. ”

मिसेस बार्टननी आपल्या तोंडावरचे हात बाजुला केले. “माझ्यासाठी ख्रिसमस प्रेझेंट घेतलंय त्यानं?” त्यांनी आश्चर्यानं विचारलं.

“तो इथून गेल्यापासून ते माझ्याजवळच आहे, ” ती मुलगी सांगू लागली. “युद्धावर जाण्याआधीच्या शनिवारी दुपारी त्यानं ते खरेदी केलं होतं. मी त्याच्याबरोबर गेले होते. खूप वेळ लावला त्यानं खरेदी करताना — तुम्हाला देण्यासाठी कुठलीच गोष्ट त्याला चांगली वाटत नव्हती. ‘ती गोष्ट परफेक्ट असायला हवी, टिग्रेस!’ तो म्हणाला होता. हे नाव त्यानं दिलंय मला!”

“तुझं लग्न नाही ना झालेलं त्याच्याशी?” आश्चर्यानं त्यांनी विचारलं.

“नाही, नाही. ” ती मुलगी पटकन म्हणाली.

‘मग, ” मिसेस बार्टन आपला आवाज शांत, समजुतदार येईल, अशी काळजी घेत म्हणाल्या, “तू इथे का बरं आली आहेस, हे सांगशील मला?”

“मी सांगितलं की आधीच. टिगरने मला आज इथे येऊन हे प्रेझेंट तुम्हाला द्यायला सांगितलं होतं, ” ती शांतपणे म्हणाली. तिने तिची छोटी बॅग उघडली आणि त्यातून एक छोटंसं पुडकं बाहेर काढून त्यांना देत म्हणाली, “हे घ्या, आता मी हे तुम्हाला दिलंय, आता मी जाते. ”

“ते उघडताय का? म्हणजे मी त्याला सांगू शकेन, तुम्हाला ते किती आवडलंय ते. ”

मिसेस बार्टन जराशा घुटमळल्या, पण मग ते पुडकं उघडलं त्यांनी. त्याच्या आत एका सॅटीनच्या खोक्यात एक नक्षीदार सोन्याचं लॉकेट होतं, त्याच्यावर मोती जडवले होते आणि त्या लॉकेटच्या आत हस्तीदन्तावर, रॅनीचा, तो अगदी एक वर्षाचा असतानाचा चेहरा रंगवलेला होता.

“तरीच मला त्याचा तो लहानपणीचा फोटो सापडत नव्हता!” मिसेस बार्टन उद्गारल्या. “त्याच्या लहानपणीचा अल्बम बघताना माझ्या लक्षात आलं होतं. ”

त्या मुलीनं तिच्या बॅगमधून एक पाकीट काढलं, आणि त्यांना देत म्हणाली, “हे तुम्हाला नक्की परत दे असं सांगितलंय त्यानं मला. ”

मिसेस बार्टननी न बघतच ते पाकीट घेतलं. त्या लॉकेटमधल्या त्या चेहऱ्याकडेच टक लाऊन बघत होत्या. “किती गोड दिसतोय ना?” त्या कुजबुजल्या. “तो त्याच्या डोक्यावरचा सोनेरी केसांचा मुकुट! या प्रेझेंटनी मला किती आनंदी केलंय, काय सांगू? माझा छोटासा रॅनी परत माझ्याकडे आलाय असं वाटतंय मला!”

“अगदी हेच तो म्हणाला होता, ” ती थंडपणे म्हणाली. त्यांच्याकडे पहाणारे तिचे डोळे खरोखरच एवढे मोठे आणि शांत दिसत होते, की मिसेस बार्टन ना काहीसा रागच आला.

तिच्यासमोर ते चित्र धरत त्या म्हणाल्या, ” किती गोड दिसतोय ना?”

“होय, खरंच गोड दिसतोय, ’” ती मुलगी निर्विकारपणे बोलली.

“कदाचित तुला लहान मुलं आवडत नसावीत, ” मिसेस बार्टन म्हणाल्या.

“मला?” ती स्पष्टपणे म्हणाली, “मी नेहमीच म्हणते, मला दहा मुलं व्हायला हवीत!”

“मला एकच झालं. ” मिसेस बार्टन म्हणाल्या. “रॅनीचे वडील पहिल्या जागतिक महायुद्धात मारले गेले. ”

“टिगरने मला ते सगळं सांगितलंय, ” ती मुलगी म्हणाली. “खरं तर तुम्ही परत लग्न करून रॅनीला आणखी बहीण-भाऊ द्यायला हवे होते. ”

“मी कधीच असा विचार करू शकले नसते, ” मिसेस बार्टन चिडून म्हणाल्या.

“टिगरने त्याबद्दलही सगळं सांगितलंय मला, ” ती मुलगी म्हणाली. “पण तरीही ते त्याच्यासाठी अधिक चांगलं झालं असतं. ” तिच्या सावळ्या गालांवरच्या खळ्या सरळ झाल्या. “खरं तर तेंव्हाच मी त्याच्याशी लग्न करायला हवं होतं, पण तो कुठे मोकळा होता तेंव्हा!”

मिसेस बार्टननी खटकन ते लॉकेट बंद केलं.

“काय म्हणायचंय तुला?” त्यांनी रागाने तिला प्रश्न केला. “रॅनी कायमच मोकळा होता. ”

त्या मुलीने नकारार्थी मान हलवल्यावर तिचे काळेभोर कुरळे केसही हलले. “नाही! तो मोकळा नाहिये, ” ती म्हणाली, दुःखाने नाही, पण काहीशा बालिश सुजाणपणे. “तो तुम्हाला बांधिल आहे, मिसेस बार्टन. कोणतीही गोष्ट करण्याआधी, ती तुम्हाला आवडेल की नाही, हा विचार येतो त्याच्या मनात. आणि मग बहुतेक वेळा तो ती करत नाही. ”

“ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ” मिसेस बार्टन धारदार आवाजात बोलल्या. “का बरं, आत्ताच तर तू म्हणालीस, की त्याने— त्याने तुला लग्नाची मागणी घातली. ”

“ होय, पण—मला हे दिसत होतं, की—–हे त्यानं तुम्हाला न विचारता केलंय— आणि जर तुम्हाला मी आवडले नाही तर—तो दुःखी होईल. ”

“तू त्याच्याशी लग्न न करण्याचं हे कारण आहे?” मिसेस बार्टननी विचारलं.

“जो माणूस दुसऱ्या कोणाचा तरी आहे, अशा माणसाशी मी नाही लग्न करू शकत, ” ती शांतपणे म्हणाली. आत्ताही तिच्या आवाजात दुःख किंवा विनाकारण दोष देणं, हे काहीही नव्हतं.

मिसेस बार्टन खुर्चीत बसल्या जागी ताठ झाल्या. “जर माझ्या मुलावर माझा एवढा प्रभाव असता—“ त्या बोलू लागल्या.

“ओह! प्रभाव असायला माझी काहीच हरकत नसती, ” ती उत्साहाने म्हणाली, “पण तुम्ही—म्हणजे – तुम्ही स्वार्थी आहात. तुम्हाला एकटं वाटू नये, आणखी काही-बाही, या सर्व गोष्टींसाठी तो स्वतःला जबाबदार समजतो. ”

मिसेस बार्टनना आपल्या मानेपासून वर, गालांपर्यंत रक्त चढतंय असं जाणवत होतं. “तो असं बोलला माझ्याबद्दल तुझ्याशी?” त्यांनी रागाने विचारलं.

“नाही, नाही, ” ती म्हणाली, “म्हणजे, फक्त मला सगळं समजून सांगण्याइतपतच. आज इथे येण्यासाठी मी तयार नव्हते, तेंव्हा –तो म्हणाला, तुम्ही — तुम्ही एखादेवेळी आत्महत्या सुद्धा कराल—तुम्ही विचार करत होतात, की तो परत येणार नाही. तुम्ही त्याला सांगितलं होतं, की त्याचे वडील युद्धावरून परत आले नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्याची खूप काळजी वाटते— याची त्याला काळजी वाटते. ”

“माझ्या मुलाने माझ्या सगळ्या खाजगी गोष्टी तुला सांगून टाकलेल्या दिसतायत. ” मिसेस बार्टन म्हणाल्या.

“नाही, त्याचं कारण म्हणजे, तुम्ही त्या गोष्टी त्याच्याच करून टाकलेल्या आहेत!” ती मुलगी म्हणाली. तिने परत तिची बॅग खुर्चीवर ठेवली, ती बसलेली ती खुर्ची निम्मी सुद्धा व्यापलेली नव्हती तिने! आणि परत तिने तिचे छोटेसे दोन्ही हात एकमेकात अडकवले. “अर्थातच, मी त्याला खरं काय ते सांगितलं, ” ती पुढे म्हणाली.

“खरं?” मिसेस बार्टननी प्रश्न केला.

“मी त्याला सांगितलं, की तुझ्यावर त्यांचं फार प्रेम आहे, म्हणून त्या अशा आहेत, असं नाही, तर तुमच्या मनात त्याच्या शिवाय एकटं रहाण्याची जी भीति आहे, त्यामुळे तुम्ही अशा वागता. ”

मिसेस बार्टन उभ्या राहिल्या. अचानकपणे त्यांचे गुडघे थरथरू लागले. “मला वाटतं, तू इथून निघून जावंस, ” त्या म्हणाल्या. “अखेर, तू कोण लागून गेलीस एवढी? एक सामान्य मुलगी जिला माझ्या मुलाने पसंत केली. तुझ्यासारख्या मुली—“

पण ती मुलगी गंभीरपणे पुढे म्हणाली, “तुम्हाला वाटतं तसा काही प्रकार नाहिये. मला एका खुनाच्या केसमधे त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी पाठवलेलं होतं. मी एका वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करते. पण त्याने मला काहीही सांगण्यास नकार दिला, मला ते वागणं आवडलं. तेंव्हा त्याने मला जेवणाचं आमंत्रण दिलं. तिथेही मी त्याला त्याबद्दल प्रश्न विचारले, पण तरीही त्याने मला काहीही सांगितलं नाही. त्यामुळे मला तो अधिकच आवडला. ”

“कुठली केस होती ती?” मिसेस बार्टननी विचारलं.

“ती प्रॅट मर्डर केस!” ती मुलगी म्हणाली.

“पण ही गोष्ट तर तीन वर्षांपूर्वीची आहे, ” मिसेस बार्टन ओरडल्याच! म्हणजे, रॅनीची आणि हिची ओळख तीन वर्षांपासून आहे! आणि तीही माझ्या नकळत! म्हणजे, या मुलीसाठी तो कोणाशी लग्न करायला तयार नव्हता तर —माझ्यासाठी नव्हे!

ती मुलगी पटकन उठली आणि आपले छोटेसे पण स्थिर हात मिसेस बार्टनच्या खांद्यांवर ठेऊन तिने त्यांना परत खुर्चीवर बसवले. “खाली बसा, ” ती म्हणाली, “आणि काहीतरी बोलू नका. ”

मिसेस बार्टननी तिच्याकडे एक जहाल कटाक्ष टाकला. “म्हणजे, बऱ्याच पूर्वीपासून त्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं का?”

“तो सांगतो, जेंव्हा त्यानं मला पहिल्यांदा पाहिलं, तेंव्हापासून—–म्हणजे, तीन वर्षांपासून. ” 

“तीन वर्षांपासून?” मिसेस बार्टन म्हणाल्या, “पण हा शुद्ध मूर्खपणा आहे —-तू किती लहान मुलगी आहेस!”

“बावीस वर्षांची आहे मी. ”

“पहिल्यांदा खरोखर कधी मागणी घातली त्यानं तुला?” मिसेस बार्टननी विचारलं. याच कारणामुळे त्याला ॲलिशिया आवडत नव्हती तर!

त्या मुलीने मान खाली घातली. “ते सांगितलंच पाहिजे का मी तुम्हाला?”

“तुला सांगायचंच नसेल तर नको सांगू, ” मिसेस बार्टन म्हणाल्या. “तरीही मला एवढं सगळं सांगितल्यावर—“

“ती मुलगी हसली आणि अचानक उठून मिसेस बार्टनच्या खुर्चीच्या हातावर जाऊन बसली.

“तुम्हाला काही वाटत नाही का हो? तुम्हीच म्हणाला होतात ना, की मला काहीही ऐकायचं नाहिये म्हणून?”

मिसेस बार्टन जराशा घुटमळल्या. आणि मग अचानक त्याही हसत सुटल्या. हे खरोखरच खुळचटपणाचंच होतं की ! ही तरुण मुलगी त्यांच्याशी बोलत होती हेच ! “मी तसं म्हंटलं तरीही तू मला बरंच काही सांगितलं आहेस, ” त्या म्हणाल्या.

– क्रमशः भाग तिसरा 

मूळ कथा: पर्ल बक

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments