श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “तिचं घर, तिचा संसार” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
सकाळी अकराच्या सुमारास भाऊ आणि मालतीबाई घराबाहेर पडले. कुठं चाललोय हे भाऊंनी सांगितलं नाही अन मालतीबाईंनी सुद्धा विचारलं नाही. नवऱ्याच्या पाठोपाठ रिक्षात बसल्या. एका बिल्डिंगजवळ दोघं उतरले. मालतीबाईंचा हात धरून भाऊ चालायला लागले. लिफ्टनं तिसऱ्या मजल्यावर पोचले. एका फ्लॅटजवळ थांबून भाऊ म्हणाले “मालती, ही किल्ली घे”
“कसली”
“तुझ्या घराची”
“म्हणजे”
“हे तुझ्या हक्काचं, मालकीचं घर!!”
“कशाला म्हातारीची चेष्टा करताय”
“खरंच !!समोरची पाटी वाच ”पिशवीतून चष्मा काढून मालतीबाईंनी पाटी वाचली. स्वतःचे नाव पाहून प्रचंड खुष झाल्या.
“कसं वाटलं सरप्राइज ?”भाऊंनी विचारल्यावर खूप भरून आल्यानं मालतीबाईंच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते मात्र डोळे वहात होते. एकाचवेळी त्या हसतही होत्या अन रडतही होत्या. इतका मोठा आनंद नेमका कसा व्यक्त करावा हे न समजल्यानं बाईंनी भाऊंचा हात घट्ट पकडला. भाऊंकडे पाहताना नजरेत अपार कौतुक, अफाट प्रेम आणि कृतज्ञता होती. बाईंच्या मनातल्या भावना शब्दविना भाऊंपर्यंत पोचल्या. आनंद, समाधान, कौतुक अशा मिश्र भावनांच्या कल्लोळात बाईंनी थरथरत्या हातानं दरवाजा उघडला. घरात उजवं पाऊल ठेवताना खूप भावुक झाल्या. छोटसं दोन रूमचं घर सोफा, खुर्च्या, भांडी, गॅस अशा जीवनावश्यक गोष्टींनी सजलेलं होतं.
“अहो, आता आपण इथंच राहू ” मालतीबाई.
“हो, या क्षणाची पस्तीस वर्षे वाट पाहिलीस ना. माझ्याकडूनच उशीर झाला त्याबद्दल माफ कर”
“अहो, काहीही बोलू नका. माझ्यासाठी खूप काही केलंत. तृप्त, समाधानी आहे आणि आज दिलेली ही भेट. काय बोलू सुचत नाही. तुम्ही खूप चांगले आहात उलट मीच खूप त्रास दिला. त्यात ही आजाराची कटकट, ”
“ए गप. आजच्या आनंदाच्या दिवशी नको ते विषय काढू. आता इस बात पे चाय तो बनता है. मी बनवतो. ”
“तुम्ही बसा. खबरदार, माझ्या किचनमध्ये परवानगी शिवाय जायचं नाही. आधी चहा मग छान जेवण करते. ” नव्या नवरीच्या उत्साहानं मालतीबाई घरात वावरत होत्या. त्यांचा उत्साह पाहून भाऊंचे डोळे पाणावले.
दोन्ही मुलं, सुनांच्या विरोधाला न जुमानता वन रूम किचन विकत घेतल्यावर भाऊ थोरल्याच्या घरी आले. तेव्हा धाकटा तिथेच होता. सगळे हॉलमध्ये बसले पण कोणीच बोलत नव्हतं. सगळेच अवघडलेले.
“तुम्हांला माझ्याविषयी प्रचंड राग आहे. ”अखेर भाऊंनी सुरवात केली.
“आता बोलून उपयोग नाही. तुमचा पैसा तुम्ही उडवला. ” धाकटा
“वर्षा-दोन वर्षासाठी उगीच एवढा खर्च केलात ” थोरल्या सून.
“पोरी, तोंड सांभाळून बोल ” भाऊ.
“जे खरं आहे तेच ती म्हणाली ” थोरल्यानं बायकोची बाजू घेतली.
“भाऊ, तुम्ही स्वीकार करा. आता आईचं आयुष्य तेवढंचय. ” धाकटा
“त्यासाठीच हे सगळं केलंयं ना. ” भाऊंनी कसाबसा हुंदका आवरला.
“भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतलात. ” थोरला
“तुमच्याकडून पैसे घेतले नाही ना. मग कशाला उगीच !!”
“अगदीच वेगळं घर घ्यायचं तर भाड्यानं घ्यायचं ना. विकत कशाला?” धाकटा.
“तुला कळणार नाही”
“मला समजून सुद्धा घ्यायचं नाही. गरज नसताना पैसे अडकवलेत ” थोरला.
“पुन्हा पुन्हा तेच का सांगताय. माझे पैसे मनासारखे खर्च करायचा मला अधिकार आहे. ”
“भाऊ, एक गोष्ट क्लिअर करतो, आम्हांला तुमच्या पैशात काडी इतकाही इंटरेस्ट नाही. ” थोरला
“नाहीतर काय, हे पैसे तुम्हालाच उपयोगी पडले असते. ” धाकटा.
“पोरांकडे मोठाली घरं असतानासुद्धा आईबाप वेगळे राहतायेत. लोकं तर आम्हांलाच शिव्या घालणार. ”.. सून.
“मालतीच्या आनंदासाठी घर घेतलंय. मला लोकांशी देणंघेणं नाही. आयुष्यात काहीप्रसंगी व्यवहारापेक्षा आपल्या माणसाचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. तेच मी केलं. ”
“तुम्हांला नक्की काय म्हणायचयं. ” थोरला.
“आमच्या लग्नाला छत्तीस वर्ष झाली. लग्न झाल्यापासून तुझ्या आईनं फक्त आणि फक्त तडजोड केली. माझी आई दीर्घायुषी !! नातसून पाहूनच तिनं जगाचा निरोप घेतला. आधी सासू अन नंतर सून सोबतीला त्यामुळे मालतीला कायम मन मारावं लागलं. ”
“या सगळ्याचा इथे काय संबंध?”
“आम्ही कधीच तुमच्याशी वाईट वागलो नाही. आता सासू-सुनेचे वाद तर कोणत्याच घराला चुकलेले नाहीत. ” थोरला.
“मला वेगळं सांगायचं आहे”
“म्हणजे”
“आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने फार काही हौस-मौज करता आली नाही आणि जेव्हा पैसा आला तेव्हा वेळ राहिला नाही. मालतीच्या दुखण्यानं भयानक वास्तवाची वस्तुस्थिती समोर आल्यावर मी पुरता खचलो. जोडीदाराची अंताकडे चाललेली वाटचाल पाहणं हे नशिबी आलं. म्हणून तिच्या सगळ्या इच्छा पुऱ्या करण्याचा प्रयत्न करतोय. ”
“आईला घर हवं होतं?”
“ती माऊली एका शब्दानंही बोलली नाही आणि कधीच बोलणारही नाही. ”
“मग हे कशासाठी? का?”
“छोटसं का होईना पण स्वतःचं घर असावं. एकटीचा संसार असावा. अशी इच्छा तिनं लग्न ठरल्यावर एकदा बोलून दाखवली होती परंतु आमचा संसार सुरू झालाच नाही. हे घर घेऊन आत्ता तिची इच्छा पूर्ण करतोय. ” दोन्ही मुलं भाऊंजवळ येऊन बसले.
“हक्काचं घर असावं, मनाप्रमानं ते सजवावं. एवढी माफक अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच घर घेतलं. उशिराने का होईना पण मालतीला तिचं घर, एकटीचा संसार देऊ शकलो. स्वतःच्या घरात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जन्माचं सार्थक झालं. या समाधानाचं मोल होऊच शकत नाही. म्हातारपणात नवीन घर घेणं. वेगळं रहाणं हे सगळं फक्त मालतीच्या आनंदासाठी करतोय. लोकं हसतील, नावं ठेवतील पण फिकीर नाही. आम्हांला सोबत भरभरून जगायचंय. “
“भाऊ, माफ करा. रागाच्या भरात जरा जास्तच बोललो ” थोरला.
“झालं ते झालं. आज इथं यायचं कारण म्हणजे येत्या रविवारी जेवणाचं आमंत्रण द्यायला आलोय. नाही म्हणू नका. प्रचंड आनंदी असलेली मालती अन तिचं घर, तिचा संसार बघायला नक्की या. ” भाऊंनी हात जोडले तेव्हा ‘नक्की येणार’ बाकीचे एकासुरात म्हणाले.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈