सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दंगल… — भाग – १ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆

(एक अखेरचा डाव) 

(महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, कथाकार श्री रवी दलाल यांची नुकतीच दिल्लीतील रॉक्स पुरस्काराकरीता निवड झाली. मराठी साहित्यकाराने दिल्लीतील दंगल जिंकून बहुमोलाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. राॅक्स हा विविध आठ भाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा विशेषांक निघतो… या पुरस्कारासाठी त्यांच्या “आंगधुणी” या कथासंग्रहातील “दंगल“ या पुढील कथेची निवड झाली आहे.) 

संताजी पाटील हा मौद्याचा अस्कारलेला पहेलवान. त्याने अनेक तगडे पहेलवान मैदानी मारून नाव कमावले होते आणि आपल्या तिन्ही मुलांना देखील कुस्तीत तरबेज केले होते.

आणी मारोती गुजर हा निमखेड्याचा डावशील पहेलवान, त्याला डावपेचात जोड नव्हता. मोठमोठे पहेलवान मारुती समोर नांगी टाकून बसले होते. आणि कित्येकाला त्याने आसमान दाखविले होते.

संताजी आणी मारोती हे दोघेही फागुजी वस्तादाचे चेले, दोघेही कुस्तीतील महाबली, एक अफाट ताकतीचा तर दुसरा डावपेच महारथी पण यांचे मैदानी कधी पटलं नाही. संताजीला ताकतीचा घमंड होता तर मारुती साधा – सोज्वळ, दोघेही मर्द मराठा जातीचे आणि वयोमानाने जवळपास सारखेच.. संताजी पाटीलाच्या घरात तर बाप – जाद्यापासून कुस्ती वीरांची परंपरा होती तर मारुती वर पिढीजात कुस्तीचे संस्कार नव्हते. पण त्याने कुस्तीला कलात्मक बनवलं होतं. नव्हे डावपेच जन्माला घालून लाल माती व्यापून टाकली होती. म्हणून संताजी मारोतीच्या डावपेचाला दचकून होता. भर जवानीत यांची तीन वेळा कुस्ती झाली. दोन वेळा कुस्त्या बरोबरीत सुटल्या, तिसरी आणि शेवटची कुस्ती देवबाहुली गावात झाली.

तब्बल वीस वर्षानंतर कुस्ती होणार होती. या महा कुस्तीची चर्चा गावागावात – खेडोपाडी रंगली आणी देवबाहुलीत जनसागर उसळला. रामटेकचे श्रीमंत मालगुजर भैय्याजी देशमुख पेंडॉल मध्ये आले आणि माईक मधून जाहीर करण्यात आलं, *शेवटची कुस्ती मारोती गुजर, संताजी पाटील यांच्यात होणार असून या कुस्तीला रामटेकचे मालगुजर श्रीमंत भैय्याजी देशमुख यांच्याकडून चार एकर शेती बक्षीस मिळणार आहे म्हणून जाहीर करण्यात आलं. वस्ताद फागुजी मानकर कुस्तीचे पंच म्हणून काम पाहणार होते. लाल लंगोट कचून मारोती मैदानात शिरला. पिकलेल्या झुप्पेदार मिश्या, बलदंड शरीर, गठेल बांधा, मजबूत देह, सावळ्या वर्णाच्या मारोतीने कसरत करून मैदानी ताकद भरवली. दंड – बैठका ठोकून चक्कर मारला, लाल माती छातीवर घासून कोल्हांड उडी मारली, वयाच्या पन्नाशीत अशी अद्भुत कलाबाजी पाहून भैय्याजी देशमुख अचंबित झाले आणि मंग बँडबाजाच्या गजरात पहेलवान संताजी मैदानात उतरला, टक्कल पडलेलं, पिढीदार मिशी, वयाच्या पन्नाशीत संताजीचे कसदार शरीर कायम होते. बलाढ्य शरीरातील नस -नस फुगली होती. एका बैलाची ताकद अंगात फणफणत होती. भरीव गोलाकार दंड, रग्गड मांड्या आणि पोलादी छाती, ताकदीचे दंड ठोकून मिशीला पीळ दिला आणि मैदानी आवाज केला. फागोजीच्या दोन चेल्यात वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार होती. मारोतीला मात देणे सोपे नाही हे संताजी ला माहित होतं. ” मारोती ताकतीने कमी असला तरी डावपेचात गुरु द्रोणाचार्य होता. “

आता दोघात शेवटची लढत होणार होती. वयामानाने कुस्ती पण सोडणार होते म्हणून शेवटची भडास काढायची होती. ही कुस्ती चितपट करेपर्यंत रंगणार होती. देवबावडीचं मैदान गच्च भरलं होतं. पहेलवानात दंगल उसळू नये म्हणून हाफ – पॅन्ट वाल्या पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

घड्याळात अकराचा ठोका पडला आणि वस्ताद फागोजीने इशारा केला. मारोती – संताजी दात – ओठ खावून फणफणत पुढे आले. संताजीच्या नजरेत बदला घेण्याची आग ढगढगत होती तर मारोतीच्या नजरेत खेळ भावना होती भैय्याजी देशमुखाने हातात हात देऊन जोड भरला. कुस्ती सुरू झाली. संतांजीने जाध ठोकून मारोतीवर आक्रमण केले, पंजाला पंजा घातला. मारोतीने सावध पवित्र घेऊन पायाची कमान केली आणि दोघांचे डोके जवळ आले. सुरुवातीला ताकदीचा अंदाज घेणे सुरू झाले. ” पहिला घिस्सा डाव संताजीने मारला. मारोतीने दंडाची पकड ढिली करून आतली डाग लावली आणि संताजीचा घिस्सा डाव फेल गेला. पुन्हा दूरवर होऊन मैदानात गोल झाले. संताजीने माती अंगावर उधळली. पुन्हा मारोतीवर चाल केली. प्रचंड ताकदीच्या संताजीने ” ढाक डाव ” मारला पण मारोती डावपेचातला ” महागुरु ” त्याने सहज मानगुटीवर ” छालावं ” घेत संताजीला तोंडघशी पाडले. छातीत नवा दम भरून डाव – प्रतीडाव सुरू झाले. दोघेही घामाने भिजले होते. संताजीने ” कालगज डाव ” टाकून मारोतीला पाडले आणि पाठीवर बसला. मारोतीने पायाच्या ऐडित संताचा पाय दाबून कडीवार केले आणी बाहेरची टांग लावली. आता मारोती – संताजी पाठीवर स्वार झाला होता. डावपेच रंगले, दोघंही उन्नीस-बीस होते. कुस्ती सुरू होऊन बराच वेळ झाला होता. दोघांच्या ताकदीने, डावपेचाने परिसर तपला. बघणाऱ्यांचे डोळे टकणे झाले आणि बघता बघता मारोतीने ” नक्कल बावडी डाव ” मारून संताजीला अलगत उचलून आपटले. संताजी सफाईने पाठ न टेकवता हातात भार तोलून निसटला. आता दोघंही जेरीस पेटले होते. ” गिस्सा डाव, ढोबी डाव, आतली टांग, बाहेरची टांग, नकाल बाळूडी डाव ” मारून झाले. पण हार – जीत ठरत नव्हती. आता शेवटची कुस्ती पण बरोबरीत सुटणारं असा अनेकांचा अंदाज असतांना चतुर मारोतीने अखेरचा ” हुकमी डाव ” खेळला. ” खेमीडाव ” पोझिशन कायम ठेवून संताजीची मान बगलेत दाबली. आणि मोठ्या चतुराईने ” पैठीडाव ” मारला. संताजीला ” पैठी डावाची ” तोड माहीत नव्हती आणी संताजी मातीत आडवा झाला आणि दोन्ही गुडघ्यात मान दाबून ” पैठी डावाने ” संताजीला चीत केले. हा मारोतीचा ” हुकमी डाव ” तोडणे संताजीला जमले नाही आणि संताजी पराभूत झाला. संताजीचे तीनही पोरं मैदानात घुसली, मारोतीवर हमला केला. दंगल उसळली, मैदानात दोन गट भिडले आणि मारामारी सुरू झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला. घमंडी संताजीला पराभव पचवता आला नाही. पोलिसांची बंदूक हिसकावून मारोतीच्या छाताडावर लावली आणी गोळी झाडली. चपळ मारोतीने उंच उडी घेऊन गोळी चुकविली. सुटलेली गोळी संताजीच्याच पोराचा कंठ भेदून गेली आणि संताजीचा मोठा पोरगा पृथ्वीराज रक्ताच्या थारोळ्यात पडला. बापाच्या हातून पोराचा खून झाला. पोराच्या खुनात संताजीला सात वर्षाची शिक्षा झाली. सजा भोगून संताजी पाटील बाहेर आला. पण त्याची खुमखुमी कमी झाली नव्हती.

ही घटना होऊन पंधरा वर्षे लोटली. काळ बदलला होता. संताजी – मारोती वयोमानाने थकले. नव्या पिढीची हुजूरात सुरू झाली.

संताजीचे प्रताप आणि लखन बापासारखेच पहेलवान झाले. तर पोरगी आशा नागपूरला शिक्षण घेत होती. मारोती गुजरचा पोरगा बळवंता मिलमध्ये नोकरीला होता. निमखेड्यातील ग्रामपंचायतने मारोती गुजरला आखाड्याकरिता जागा दिली. खाली वेळेत मारोती तरुणांना कुस्त्याचे डावपेच शिकवत होता पण बळवंताने कुस्तीत रुची दाखविली नाही. बळवंता दिसायला आकर्षक, कसलेल्या शरीरयष्टीचा गबरू जवान ! त्यानंही कसरत करून शरीर कमावलं होतं. पण आखाड्यात कधी उतरला नाही. कुस्तीचा सराव केला पण मैदानी उतरला नाही.

अशा देखण्या राजबिंड्या बळवंताचं प्रेम संताजीच्याच आशा सोबत जुळलं. भेटीगाठी वाढल्या पण लग्न केलं नाही. कारण दोघांच्या बापाचं हाडवैर जगजाहीर होतं. हे प्रकरण समोर माहीत झालं तर खून पडणार होते. म्हणून दोघांनी विसरायचं ठरवलं. आणि दोघं वेगळे झाले.

आशाच लग्न बिहाडीच्या जमीनदार मुलाशी झालं. पण बळवंताने लग्न केले नाही. आशाच्या विरहात बळवंता स्वतःला संपवत होता. नोकरी करून घरी येणे आणि पडून राहणे हा एकमेव ठरलेला कार्यक्रम होता.

एकुलत्या एका पोराची दशा पाहून बळवंताची माय काळजीत होती. शेवटी बापाने बळवंताला विचारलं….

बल्लू, तू लग्नाचं काय ठरवलं…

सांग…

कधी जायचं…

मुलगी पाहायला….

मी मुलगी पाहून ठेवली आहे…

बळवंताने खाली मान टाकून लग्नास नकार दिला आणी बोलला.

बाबा, या घरात कधीच असून येणार नाही. मी लग्न करणार नाही..

मारोतीने वैतागून विचारले,

अरे, पण कां लग्न करणार नाही

कोंडलेला श्वास मोकळा करून बळवंता म्हणाला,

बाबा, इच्छा नाही…

तुम्हाला घरात सून मिळेल पण तिला माझी बायको होता येणार नाही

इतकं बोलून बळवंता बाहेर पडला.

बळवंता, आता लग्न करणार नाही. बापाला कळून चुकलं होतं. आणि शेवटी मारोतीने लग्नाचा विषय बंद केला.

मौदाला कन्हान नदीच्या काठावर पंचमीला यात्रा भरली. बळवंता मित्रासोबत यात्रेला गेला. झुल्या जवळ त्याला अचानक आशा दिसली पण तिची नजर दुसरीकडे होती. गर्दीतून रस्ता काढत बळवंता जवळ पोहोचला. तर आशा गर्दीत गडप झाली होती. पण क्षणात आशा नजरेतून औझल झाली. बळवंताची नजर भरारली, आशाला पाहण्याची तळमळ वाढली…… पाळण्यावर चढून दूर नजर फेकली. आशा पुन्हा नजरेत आली. बळवंताचा जीव भेटीसाठी कासावीस झाला. गर्दी लोटत बळवंता आशा जवळ पोहोचला आणि दोघांची नजरावर नजर झाली. ” जवळपास एक वर्षाच्या अंतराने एकमेकांना पहात होते, डोळे पाणावले, हुंदका दाटला. आशाने घट्ट कवटाळून घेतले. दोघांचेही हृदय दाटून आलं…. अश्रूचा बांध फुटला, अशाने आव गिळत विचारले….

बल्लू, कसा आहेस ? 

बल्लूने फक्त मान हलवली, आशाने बल्लूला हात धरून बाजूला ओढले…

बर्रर्र बरं, मला सांग, कुठली मुलगी केली तू ? आता ती पण आली कां यात्रेत ? न थांबता आशा बोलत होती, तर बळवंता तिला न्याहाळत होता. आशाने बल्लूच्या डोळ्याची लिंक तोडली,

ये माझ्या हिरो, कुठे हरवला…. ? 

आरे, बघतच राहशील, कां काही बोलशील ?

चुटकी वाजवून सावध केले… पण बळवंता चूप होता, , ,

कशी आहे, तुझी बायको ती आली कां ?

बळवंताने आशाला थांबवलं….

आशा, मी लग्न नाही केलं गं… ?

आशा एकदम डोळे फाडून बोलली…

काय ? 

तू अजून लग्न नाही केल ? आशा गहिवरली….

मी तुला विसरू शकलो आशा, तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही…. बोललो होतो ना…. आशा, माझ्या जीवनात तुझ्याशिवाय कुणी येणार नाही म्हणून ? तुला दिलेल्या वचनावर कायम आहो. माझा शब्द पवित्र प्रेमाची कसोटी आहे… मी लग्न करणार नाही… तुझ्या आठवणीत हे जीवन एकटं काढायचं ठरवलं आहे…

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री रवी दलाल

 9960627818

प्रस्तुती –  सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

उत्कंठावर्धक