सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दंगल… — भाग – २ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆

(एक अखेरचा डाव)

(माझा शब्द पवित्र प्रेमाची कसोटी आहे… मी लग्न करणार नाही… तुझ्या आठवणीत हे जीवन एकटं काढायचं ठरवलं आहे…) इथून पुढे —- 

आशाच हृदय पिवटळून निघालं, अश्रुधारा बाहेर आल्या….

नाही, नाही बल्लू…

माझ्यासाठी जीवाला वनवास करून घेऊ नको.

माझ्या राज्या… तुम्ही लग्न करा

माझी शपथ आहे तुम्हाला…

माझ्या संसारात मी खूप खूप सुखी आहे. आता तुम्हाला सुखी – संसारात पाहायचा आहे मी तुम्हाला वचनमुक्त करते. तुम्ही लग्न करा ! माझ्या राज्या, मी हात जोडते, तुम्ही लग्न करा, मी तुमची नाही झाले म्हणून तर काय झाले ? तुम्हाला असं झुरतं नाही पाहू शकणार…? 

बळवंताने आशाला सावरले,

अगं, चूप रहा… माझं सोडं

तू कशी आहेस…? तू सुखात आहे. माझं सुख, तुझ्या सुखात दडलेलं आहे असं बोलून…

विषय संपवला, कारण जास्त बोलणे शक्य नव्हतं. मैत्रिणी आल्या आणि आशाला सोबत घेऊन गेल्या…. वर्षानंतर आशाची भेट झाली होती. आशाला पाहून बळवंताचा जीव सुखावला, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होतं. आशा संसारात सुखी आहे याचं समाधान होतं त्याला. “आशाने खरं प्रेम केलं पण भीतीपोटी आहुती दिली होती आणि पुन्हा आशा गर्दीत हरवून गेली. यात्रेत आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं होतं. पण एका क्षणात आशा सुखी असल्याचा भ्रम तुटला. तिच्या मैत्रिणीकडून आशाची सत्यता कळली. आशा लग्नानंतर फक्त सहा महिन्यात विधवा झाली होती. तिचा नवरा शेतात पान लागून मेला आणि आशा कायमची वडीलाकडे आली. इतकं दुःख असूनही आशाने जाणवू दिलं नाही. सतत हसून उत्तर दिलं होतं. बल्लूवर दुःखाचा डोंगर कोसळला, डोळ्यात ओलावा दाटला. आशाच्या हसऱ्या चेहऱ्या मागे वेदना लपल्या होत्या” 

बल्लूला समजलं आणी आशाला पुन्हा एकदा भेटण्याचा निर्णय केला. दुसऱ्या दिवशी निरोप पाठवून आशाला नागपूरला बोलाविलं. आशा खरंच आणि खरंच दिसायला सुंदर होती. लांब केस, टपोरे डोळे वेड लावत होते. पण तिच दुर्दैव फक्त सहा महिन्यात विधवा होऊन बापाच्या घरी आली. ” मराठा समाजात पुन्हा लग्न करण्याचा रिवाज नव्हता. म्हणून आशाचा पुनर्विवाह होणार नव्हता. दोघांचंही आयुष्य जाळ लागलेल्या ताव्यासारखं करपलं होतं. “

बळवंताने आशाला आपला निर्णय सांगितला. आशा मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. आता तुला दुःखात पाहू शकत नाही. आपण एकदा चूक केली आणि दूर झालो. आता तुला सन्मानाने घरी आणणार आहो. उद्याच तुझ्या घरी येऊन मागणी घालतो…. मग समोर काय होईल ते पाहू ? 

प्र-स्फोटक निर्णय बळवंतने घेतला. दोघांचेही बाप हाडवैरी, विनाकारण रक्तपात नको म्हणून आशाने समजाविले.

“बल्लू,… मी आहे तशी जगेल पण तुम्ही घरी येऊ नका. मी हात जोडते. माझा निर्दयी बाप तुम्हाला गोळी घालायला मागे पाहणार नाही. ” माझ्या राज्या, मी हात जोडते. तुम्ही घरी येऊ नका. मी अशीच जगते, आनंदी आहे. तुम्ही लग्न करा, मी विधवा आहे. ” तुम्हाला छान मुलगी मिळते. तुम्ही माझ्या घरी येऊ नका. खूप तमाशा होईल. माझा निर्दयी बाप आणि दोन भाऊ तुमचा जीव घेतील राज्या. ” मी विनंती करते म्हणून हात जोडते, पाय धरते.. “

पण बळवंताने माघार घेतली नाही. दुसऱ्या दिवशी बळवंत आई – बापाच्या समोर बसला. मला लग्न करायचा आहे. मी पोरगी पण पाहून ठेवली. बाबा तयारी करा. ” आजच मुलीच्या घरापर्यंत जायचं आहे. माय – बाप आनंदाने उसळले. अरे चल, तुझ्या मनासारखं होईल. सांग कुठे जायचं ? 

बळवंताने उत्तर टाळले, ” बाबा आधी तयारी करा, बैलबंडी काढा. ” 

मारोती पहेलवानने नवा सदरा आणि फेटा चढवला. तीन माणसं आणखी सोबत घेऊन गाडी जुंपली आणि बंडी मौद्यात आली. ” कुणाकडे जायचं आहे सांग. तुझी पसंद, तीच माझी पसंद, कोणत्याही जाती धर्माची असेल तरी चालेल. ” 

बळवंत हळूच बोलला,

बाबा, तुम्हाला सांगू कां ? मुलगी तयार आहे पण तिचे वडील लग्नाला तयार नाहीत. ” 

मारोतीने बळवंत आला समजावत म्हटलं….

“अरे, तिच्या बापाचे पाय धरतो पण संबंध जोडूनच परत येऊ 

आणी बंडी संताजी पाटलाच्या दारात थांबली.

ये, इथं कशाला थांबवली, चल पुढे घे गाडी. ” मारुती झटकून बोलला. बळवंताने बैल कचून धरले. बाबा, आपल्याला संताजी पाटलाच्या घरी जायचं आहे. “

मारोती उसळला काय ? 

संताजी पाटलाच्या घरी जायचं आहे. ” मारोतीचा चेहरा लालबुंद झाला. ” इथली मुलगी मागणार आहे. ” अरे, संताजी माझा हाड – वैरी – दुश्मन आहे. माझा खून खराबा होईल. तुला माहित आहे ना. “

“इथे संबंध होणे नाही. चल, बंडी परत फिरव. मी त्याच्या घरात पाय टाकणार नाही. चल, बैल फिरव. ” 

बळवंताने बापाचे पाय धरले. ” माझ्यासाठी वैर विसरा, पण मला आशा सोबत लग्न करायचा आहे. नाहीतर मी जिवंत राहणार नाही. ” म्हणून गडगडला.

मारोती नरमला,…

ठीक आहे. पण असा जीव देण्याचं बोलू नको. ” इच्छा नसतांना मारोती तयार झाला. दारावर थाप दिली. नोकराने दार उघडलं. मारोतीने नम्र आवाजात विचारलं…..

संताजी पाटील घरी आहेत कां ? ” 

होय आहे, पाटील घरीच आहेत. पूजा करत आहे. या… बसा, बैठकीत ! म्हणत हात जोडले.

मारोतीने नोकराला बोलाविले,

जा आणी संताजी पाटलाला निरोप दे, मारोती गुजर आला म्हणून सांग त्यासनी,…

हो, हो, सांगतो म्हणून नोकर आत गेला…. बैठकीत खुर्च्या लावून होत्या आणि समोरच्या भिंतीवर फोटो टांगला होता.

स्व. पृथ्वीराज संताजी पाटील.

मृत्यू – दिनांक – 10 / 10 / 1965. असं लिहिलं होतं

मारोतीची आठवण ताजी झाली. संताच्या हातून पोरांचा खून होतानी पाहिलं होतं. संताजीचा संताप भारी आहे, सहन करावा लागेल म्हणून संयमाने घ्यायचं ठरवलं होतं. आणि थोड्याच वेळात संताजी आतून गरजला.

“वाड्यातील शांतता भंग झाली. ” आवाज दुमदुमला.

कोण, मारोती ? वैरी माझ्या घरी आला. रागाने फणफणत भिंतीची बंदूक ओढली, वाड्यात खळबळ माजली. संताजीचे पोरं, लखन, प्रताप, आशा, नोकर घाबरून कोपऱ्यात दडले. संताजीच्या बायकोने हातचे काम फेकून देवघरात आली. हाहाकार उडाला….. नेमकं काय झालं काहीच कळत नव्हतं. लखन आणि प्रतापने संताजीची बंदूक हीसकावली….

आबासाहेब, भानावर या…. काय झाले ? कशासाठी ही बंदूक ठासली ? थकलेल्या शरीरात हत्तीचं बळ आलं होतं. चेहरा रागाने फणफणत होता. प्रतापने संताजीला विचारले,

काय झालं,? आबासाहेब.. ! 

आशाने पाणी दिलं तसंच ग्लास भिंतीला फेकून मारला. आबासाहेब उसळले,

” काय झालं ?

” अरे, माझ्या वैरी मारोती गुजर आपल्या वाड्यात आला, जा, कापा त्याला…

मारोती, नाव ऐकून प्रताप, लखनची जळफळाट झाली, आग मस्तकात गेली. बंदूक घेऊनच माज घरातून बैठकीकडे धावले. आशाला कळून चुकलं होतं. बळवंत घरी आला… आता रक्त सांडणार… म्हणून तिथेच चक्कर येऊन पडली. आईने आशाला सांभाळलं. संताजी, प्रताप, लखन बैठकीकडे धावले. आता बंदूक संताजी कडे होती. आवाजाने बैठकीत खलबल माजली. बळवंता, मारोती आणि सहकारी खळबळून उभे झाले. संताजीने बंदूक ताणली. मारोती पुढे झाला……

“पाटील, तुम्ही खुशाल गोळी चालवा… पण त्याआधी माझं ऐकून घ्या म्हणून हात जोडले” 

संताजीचे ओठ थरथरत होते. शत्रु मारोती, घराच्या बैठकीत उभा होता. ज्याच्यामुळे मोठ्या पोराचा खून झाला होता. तो वैरी घरात आला होता. प्रताप, लखन दोघेही भाऊ बदला घ्यायला टपून होते.

मारोतीने पुन्हा हात जोडले.

“आबासाहेब ! झालं ते वैर विसरा… मी काय म्हणतो ? ते एकदा ऐकून घ्या. नंतर खुशाल छाताडात गोळी झाडा. ” सोबतच्या सहकाऱ्यांनी हातपाय जोडून संताजीला शांत केलं. काही वेळेसाठी सर्व शांत झालं. इकडे आशा शुद्धीवर आली आणि आई सोबत बाहेर आली.

कपाळावर आड्या पडलेला संताजी डकारला…

” मारोत्या, बोल…. कशासाठी आला तू ? ” 

वाड्यावर एकानं सूचना केली..

आबासाहेब ! एकदा शांततेनं बसा, नंतर बोलु…

संताजी फणफणत खुर्चीवर बसला.. प्रतापने बंदूक घेतली आणि आशाच्या हातात दिली. संताजी पुढे मारोती गुडघ्यावर टेकला आणि हात जोडले….

आबासाहेब, मी तुमचे पाय धरतो, माझं शांत चित्ताने ऐकून घ्या. हा माझा एकुलता एक मुलगा बळवंता, कपडा मिल मध्ये नोकरीला आहे….

” अबे, तू पुढे बोल… माझ्या घरी कां आला ते सांग ? ”

बळवंता पण हात जोडून संताजी पुढे बसला. मारोत्याने डोक्यातली पगडी संताजीच्या पायावर ठेवली…

आबासाहेब, लहान तोंडी – मोठा घास, घेतो पण तुम्ही नाही म्हणू नका. मी हात जोडतो. आशाचा हात बळवंतासाठी मागायला आलो. संताजीने मारोतीच्या पगडीला लाथ मारून फेकली आली उभा झाला. ‘ ये, मारोत्या भानावर आहेस कां ? आशाच लग्न झालं ती विधवा आहे. विसरला काय ? या घराण्यात विधवेच लग्न पुन्हा करण्याची रीत नाही. समजलं आणि ऐकून घे, ” आशा घरात सोडून मरेल पण तुझ्या दारात देणार नाही. ” माझ्या पृथ्वीराज तुझ्यामुळे मेला, जिवंत असेपर्यंत मी विसरणार नाही. उचल पगडी आणि चालता हो…. नाहीतर इथेच बाप-लेकाचे मुर्दे पाडील. ” 

बळवंताने संताजीचे पाय धरले. बाबासाहेब राग सोडा, आशा मला द्या ! मी तिला सुखात ठेवील. नाही म्हणू नका पाटील आणि घट्ट पाय धरले तसेच आशाची धिटाई वाढली. तिने पगडी मारोतीच्या डोक्यावर ठेवली. आबासाहेब, ” मी हात जोडते आबा….. मला नव्याने संसार थाटू द्या ! मी तुम्हाला भीक मांगते, नाहीतर मी जीवाचं बरं – वाईट करून मुक्त होते. म्हणून रडत – भुकत घरात गेली. ” पोरीची भावना पाहून दगड पाझरला आणि बळवंतला उभं केलं. पोरीची इच्छा असेल तर विचार करू आम्ही, आम्हाला वेळ द्या ! उद्या नकार – होकाराचा निरोप पाठवतो. म्हणून बैठक सोडून गेला. संताजी आत गेला. ” आशाला नव्याने संसार करू द्या म्हणून आशाच्या मायने संताजीला समजावलं. संताजी तयार झाला पण एक अट घातली

– क्रमशः भाग दुसरा 

लेखक : श्री रवी दलाल

 9960627818

प्रस्तुती –  सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments