सुश्री नीता कुलकर्णी

☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन डे …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

” अगं नातवाचं लग्न ठरलं खुश आहेस ना.. मग आता घे तुला एखादी चांगली पैठणी”

” अगोबाई माझ्यासाठी एकदम पैठणी.. आज राजा बराच उदार झालेला दिसतोय”

“तसं नाही ग.. एक जुनी गोष्ट आठवली. कुणाचंही लग्न असलं की बरीच वर्षे तु तो लग्नातला शालूच नेसत होतीस… त्यावरून कोणीतरी तुला बोललं होत…. तर घरी येऊन किती रडली होतीस. माझ्या ते कायम लक्षात आहे.”

“जाऊदे हो.. पूर्वीच ते सगळं विसरले. तेव्हा नव्हती आपली ऐपत.. आहे त्यात भागवत होतो… आपल्याला कुठे नव्या साडीचा खर्च झेपणार होता?”

” हो ग साध्या दोन खुर्च्या घ्यायच्या म्हटलं तरी किती विचार करत होतो आपण..”

” ओव्हरटाईम करून त्या पैशातून अचानक तुम्ही स्टीलच्या एक डझन मोठ्या प्लेट आणल्या होत्या. भिशीला मी त्या काढल्या तेव्हा सगळ्याजणी चकित झाल्या होत्या”

” तुझ्या अजून ते आठवणीत आहे…. त्या प्लेट घेऊन घरी येताना त्या बघून तू किती खुश होशील हेच माझ्या मनात होतं”

“आता ती गरिबी वाटते. पण तेव्हा त्याचं काही वाटायचं नाही. आहे त्यात भागवत आपण आपला संसार हसतंखेळतं सुखाचा केला…”

” पहिल्यांदाच आपण केलेली हाॅटेलात रहायची अशी तीन दिवसांची कोकणातली ट्रीप आठवते का? समुद्र बघून तुला किती आनंद झाला होता….”

” हो तर… माझ्या सगळं लक्षात आहे नंतर परदेशातही जाऊन आलो. पोरं शिकली भरून पावलो….”

त्या सुखद आठवणीनी डोळे डबडबलेच… आजकाल असंच व्हायचं…

जरा काही जुन्या आठवणी आल्या की रडूच यायचं…..

” तू पहिल्यांदा इडली केलीस आणि कुकरला शिट्टी तशीच राहिली त्या कडक इडल्या आठवतात का?”

यावर मात्र रडता रडता ती हसायला लागली…

” तरी म्हटलं बाबा अजून बोलला कसा नाही… अहो नंतर शिकले की सगळं. हॉटेल सारखे डोसे करून घातले. पिझ्झा बर्गर पण शिकले. ते बरं आठवत नाही…..”

नाही म्हटलं तरी आवाज जरा तापलाच तिचा….

” अगं जरा थट्टा केली तुझी… लगेच काय चंडीकेचं रूप धारण करायला नको……”

” मी पण गंमत केली हो तुमची…. अहो उद्या तर काय म्हणे तो प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे”

” अग तू हे एकदम व्हॅलेंटाईन डे वगैरे सांगतेस मला आश्चर्यच वाटते आहे”

” अहो पेपरात त्याचं बातम्या आहेत. गुलाब खूप महाग झाले आहेत असं पण लिहिलं आहे”.

” अग आपल्याला हे असे प्रेमाचे दिवस साजरे करावेच लागले नाही. एकमेकांची काळजी, माया, मनाची जपणूक, समजून घेणं, एकमेकांचा आदर करणे.. हीच आपली प्रेमाची व्याख्या होती.”

“हो… हे मात्र खरं…. कितीतरी वेळा तुम्ही मला सांभाळून घेतलंत.. आधार दिलात… संकटप्रसंगी माझ्यामागे खंबीर उभे राहिलात… आपल्या वेळेस असे गुलाब नव्हते. कधीतरी ऑफिसातून येताना तुम्ही गजरा आणला तरी पण मन मोहरून जायचं… खरं सांगू का म्हणूनच मी आत्ता शांत आहे..”

बोलता बोलता तिचे डोळे भरूनच आले…

तेवढ्यात मुलगा आला म्हणाला,

” अग आई झालं का विष्णू सहस्त्रनाम म्हणून? रात्र झाली आता.. झोप ना..”

” अरे हो का… बराच वेळ झाला कळलंच नाही रे झोपते”

बेडरूममध्ये आल्यानंतर मुलगा बायकोला म्हणाला,

” हल्ली आईचं काय झालंय कळत नाही खूप वेळ रात्री देवाचं म्हणतं बसते”

” हो ना… पूर्वी दिवसा म्हणत असत.. बाबा गेल्यानंतर आता हे रात्री स्तोत्र म्हणणं का सुरू केलं आहे… हे कळत नाही…”

मुलांना कधीच ते कळणारही नव्हते.

ती आज थोडी हळवी झाली होती. पण नवऱ्याशी खूप वेळ गप्पा झाल्याने तृप्त समाधानी होती.

त्यानी बोललेले शब्द हे नुसते हवेत विरलेले नव्हते… ते अंतःकरणापासून म्हटलेले निखळ.. सच्चे होते. त्यात सहज असं प्रेम होतं. त्यामुळेच हृदयाच्या खोल कप्प्यात तिने ते शब्द जपून ठेवले होते. अशीच कधीतरी आठवण काढून ती त्याचा पुनःपुन्हा आनंद घ्यायची…

 त्याच्यावरच तर ती जगत होती…

नाहीतरी भाळणं काही दिवसांचं असतं सांभाळणं मात्र आयुष्यभरासाठी असतं…..

म्हणूनच लांब गेला तरी तीच्या जवळच होता ना तो……. अगदी आत्ताही….

असाही असतो कधीही साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे…..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments