डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ आपल्या पायावर उभी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(कल्याणीने चांगले मार्क्स मिळवले आणि डीएड ला प्रवेश मिळवला. तिने कुठेही, अनुकंपा असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग न करता प्रवेश मिळवला.) – इथून पुढे-
तिच्या कोणत्याही मैत्रिणींना माहीत नव्हतं कल्याणीचा डावा पाय पूर्ण कृत्रिम आहे. सतत साडी नेसून येत असलेल्या कल्याणीला मुली म्हणत. “ कल्याणी, कधीतरी ड्रेस घाल की आमच्या सारखा. किती छान फिगर आहे तुझी ग. ”.. कल्याणी हसून सोडून देई. कशी घालणार होती ती ड्रेस?
कल्याणी आता दुसऱ्या वर्षात गेली. शाळेच्या वेळा आता बदलल्या.
अचानक शाळा सकाळी साडेसात ते अडीच अशी झाली. कल्याणी धावपळ करत रोज कशीतरी वेळेवर पोचायचा प्रयत्न करी पण तरीही दोन जिने चढून वर यायला तिला रोज उशीर व्हायला लागला. कल्याणी सततच अर्धा तास उशिरा येते हे बघून तिला प्रिन्सिपल बाईंच्या ऑफिस मधून बोलावणे आले. खाली मान घालून कल्याणी उभी राहिली. ”काय ग कल्याणी, रोज कसा उशीर होतो तुला? शिक्षक होणार ना तुम्ही मुली? तुम्हालाच जर शिस्त नसेल तर बाकीची मुलं काय शिकणार तुमच्याकडून? इतकी हुशार मुलगी आहेस तू, रोज असा उशीर मला चालणार नाही. मग बाकीच्या मुलीही असाच उशीर करायला लागतील. ”
…. बाई ताड ताड बोलत होत्या. कल्याणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ”आता आणखी रडून दाखवू नकोस. बस झालं. शिस्त म्हणजे शिस्त. ” कल्याणी उभीच होती.
तेवढ्यात आपला तास संपवून सानेबाई ऑफिस मध्ये डोकावल्या. कल्याणी आणि हेडबाईंचं संभाषण त्यांच्या कानावर पडलं.
“ बाई, काय झालं? का रागावताय एवढ्या?”
“ अहो बघा ना. रोज रोज ही मुलगी उशिरा येतेय. असं कसं चालेल? वर काही बोलत पण नाहीये. उभी आहे नुसती मगापासून. ” बाई आणखीच चिडल्या. ,
साने बाई कल्याणीजवळ गेल्या… “ बाळा, इकडे ये बेटा. जरा साडी वर करून दाखव आपल्या बाईना. ”
“ नको नको बाई. मी उद्यापासून नक्की लवकर येईन बाई. ”
साने बाईनी तिचे डोळे पुसले. शांतपणे हळूच तिची साडी गुडघ्या पर्यंत वर केली. प्रिंसिपल बाईना दिसला तो बेल्टने बांधलेला कल्याणीचा कृत्रिम पाय. त्या हादरून गेल्या आणि कल्याणीला मिठीत घेऊन स्वतःच रडायला लागल्या.
“अग कल्याणी, मला आधीच नाही का ग सांगायचं? किती बोलणी खाल्लीस माझी बाई? मला माफ कर ग बाळा. माझी फार मोठी चूक झाली. मला आणि कोणालाच हे माहीत नाही. आणि मी वचन देते तुला, हे माहीत होणारही नाही. मला शरम वाटतेय माझीच. कशी सहन करत आलीस इतके वर्ष? आणि हे अवघड जिने दिवसातून चार वेळा कसे ग चढतेस उतरतेस बाळ? असं नको करू. माझं खूप चुकलं. साने बाई, तुम्ही तरी कल्पना द्यायची ना मला. काय ग जिद्दीची तू कल्याणी. ”
बाई गहिवरल्या. “ कल्याणी, जा आता हो तू. माफ कर मला. ”
सानेबाई म्हणाल्या, ”हिची आई जिथे काम करते ती माझी मैत्रीण आहे. फार सोसलं हो या कुटुंबानं. या पोरीच्या सहनशक्तीला तर तोड नाही हो बाई. ” साने बाईंच्या डोळ्यात अश्रू आले.
डीएड चे रिझल्ट लागले. फार उत्तम गुणांनी कल्याणी पहिल्या दोन नंबरात येऊन उच्च श्रेणीत पास झाली.
सगळ्यात जास्त आनंद प्रिंसिपल बाईना झाला. त्यांनी तिला घरी बोलावलं. कल्याणी बाईंच्या घरी आपल्या आईला घेऊन गेली. बाईनी दोघींचं छान स्वागत केलं., तिच्या आईचंही फार कौतुक वाटलं त्यांना.
“ कल्याणी, मी खूप रागावले ते मनात ठेवू नकोस हं”. बाई मनापासून म्हणाल्या.
”नाही हो बाई, तुमच्याच घालून दिलेल्या आदर्शाच्या वाटेवर आम्ही भावी शिक्षिका चालणार आहोत. मी कशी रागावू माझ्या लाडक्या बाईंवर?”
बाईंनी कल्याणीला सोन्याची चेन दिली. “ ही सतत घाल म्हणजे माझी आठवण राहील तुला. ”
आणि तिच्या मनगटावर उत्तम घड्याळ बांधले. “ हेही वेळ दाखवील तुला बघ. ” दोघींचे डोळे भरून आले. नमस्कार करून त्या मायलेकी घरी गेल्या.
कल्याणीला पुण्यातल्या अत्यंत नावाजलेल्या शाळेत लगेचच नोकरी मिळाली.
दरम्यान खूप खूप वर्षे गेली. बाई रिटायर झाल्या. त्यांची दोन्ही मुलं परदेशात स्थायिक झाली होती.
बाई एकट्या पडल्या. प्रकृती त्यांना साथ देईना. वृद्धपणाचे आजार त्यांना आणखी विकल करू लागले.
नाईलाजाने मुलांनी बाईना एका अत्यंत उत्तम वृद्धाश्रमात दाखल केले. अतिशय समजूतदारपणाने हेही वास्तव बाईनी स्वीकारले. बाईनी आता वयाची पंच्याऐशी गाठली. अजूनही त्यांची तब्बेत बरी होती आणि बुद्धी खणखणीत.
त्या दिवशी बाईना शिपाई बोलवायला आला. ” बाई, तुम्हाला भेटायला कोणीतरी पाहुणे आलेत पाठवू का त्यांना?” बाई म्हणाल्या “ पाठव ना. ”
कोण आलं असेल? मुलगे तर नुकतेच भेटून गेलेत दोन महिन्यापूर्वी.
दारावर टकटक झाली. ” या ना. आत या “
दारात एक बाई त्यांच्याबरोबर दोन पुरुष होते.
“बाई, ओळखलं का मला?” बाईनी किलकिले डोळे करून बघितलं.
”कल्याणी ना तू? 81 ची बॅच?”
कल्याणी बाईंच्याजवळ बसली. “हो बाई. मीच ती. किती वर्षे गेली मध्ये हो. एक दिवस असा गेला नाही की तुमची आठवण मला आली नाही. हा माझा मुलगा…अमित. डॉक्टर होतोय आता. आणि हे माझे मिस्टर सुरेंद्र. बाई, मीही आता पुण्यातल्या शाळेची प्रिंसिपल झाले. मी पास झाले तेव्हाचे हे घड्याळ. तुम्हीच दिलेलं. मी हेच वापरते अजूनही… माझ्यासारख्या एक पाय नसलेल्या मुलीला स्वीकारणारा आणि माझा कायम आदर करणारा हा माझा नवरा. बाई, स्वप्नात नव्हतं वाटलं की माझं लग्न होईल, मला मूल होईल.
या देव माणसाने प्रेम केलं माझ्यावर. आणि या माझ्या पायासकट मला स्वीकारलं. ”
ते दोघे बाईंच्या जवळ बसले. बाईनी प्रेमाने दोघांचे हात हातात घेतले.
“फार गुणी बायको मिळाली तुम्हाला आणि अमित, अशी आई मिळायला भाग्य लागतं बरं. संभाळ हो नीट तिला. ”
बाई दमून गेल्या. कल्याणीने बाईना पाणी दिलं. हातात त्यांची आवडती अंजीर बर्फी ठेवली. बाई हसल्या.
“अजूनही माझी आवड लक्षात आहे हो तुझ्या? अग आता नको वाटतं सगळं ग. एक तुकडा दे आणि बाकी घरी ने ग बाळा. ” कल्याणीच्या डोळ्यात पाणी आलं….. आपले उंची सँडल्स टकटक वाजवत शाळेत येणाऱ्या, कानात हिऱ्याच्या कुड्या घालणाऱ्या, उंची साड्या नेसणाऱ्या आणि कायम शाळेसाठी झटणाऱ्या करारी बाई तिला आठवल्या.
एवढीशी शरीराची जुडी करून बेड वर कोपऱ्यात बसलेल्या बाई बघून तिला रडू आवरेना.
“ बाई, माझं खूप चुकलं. मी आधी यायला हवं होतं हो. पण माझे व्याप, शाळा संसार यातून सवड मिळेना. मला साने बाईंकडून समजलं, तुम्ही इथे असता… बाई, येता का माझ्या घरी रहायला? कायमच्या? मी नीट संभाळीन तुम्हाला. खात्री आहे ना माझी?”
बाईनी तिला जवळ घेतलं. “नको ग बाळा. इथे चांगलं आहे सगळं ग. छान घेतात काळजी इथले लोक. नको आता माझी हलवाहलव ग. थोडे दिवस उरले. येत जा अशीच भेटायला. ”
.. कल्याणी आणि सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला आणि ते जड पावलांनी तिथून गेले.
त्यानंतर काहीच दिवसात बाई गेल्याची बातमी कल्याणीने वाचली.
एक आदर्श आयुष्य अनंतात विलीन झालं.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈