डॉ. जयंत गुजराती
जीवनरंग
☆ नकोशी… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆
गार वारं अंगावरनं गेलं तसं तिने पांघरूण अधिकच लपेटून घेतलं. वरतून वारं तर खाली दगडी फरशी गार गार. देवळाच्या ओट्यावर निजण्याचा आज सातवा दिवस. डोक्याखाली उशी म्हणून घेतलेलं गाठोडं तिनं तेवढ्यातही चाचपून घेतलं. तिच्याकडे होतं तरी काय? एक राखाडी रंगाची साडी अंगावर तर दुसरी फिकट बदामी रंगाची गाठोड्यात, तीही विरलेली. एक पेला पितळी व अल्युमिनियमची ताटली व हातात नेहेमी असलेली छोटीशी जपमाळ. ऐवज म्हणावा तर असा. गार वाऱ्यानं एक काम केलं. तिचा डोळा लागला पुन्हा तो पहाटे भजन म्हणत जाणारा जथा जवळून गेला तोपर्यंत.
पहाट झाल्याचे जाणवल्यावर ती लगबगीने उठली. तशी कुंभनगरीत रात्रंदिवस लगबग ही कुठे ना कुठे चालूच. माणसांचा अव्याहत राबता. सर्वांची पाऊले संगमाकडे जात असलेली सतत. तिनेही गाठोडं बगलेत धरत संगमाची वाट धरली. पहाटे बाहेर जरी गारवा असलातरी नदीत पाणी तसं कोमटच असतं हे लहानपणापासून ठाऊक असलेलं. गावी असलेली नदी तशी छोटीच होती पण ती नदी असो वा हा संगम पाण्याचा गुणधर्म सारखाच. त्यामुळे पहाटेचं स्नान गेल्या सात दिवसात तिने चुकवलं नव्हतं. एरवी दिवसभरात ही तिने कितीवेळा डुबकी मारली हे तिनं मोजणंच सोडून दिलेलं. साताजन्माचं पाप एका मेळ्यातच नाहिसं करायचं का? या विचाराने तिचं तिलाच हसू आलं.
आंघोळ आटपून तिनं कपाळावर पांढरं गोपीचंदन रेखाटून घेतलं. भाळीचं कुंकू सात वर्षांपूर्वीच पुसलं गेलं होतं. मग गावातल्या रीतिरिवाजानुसार गोपीचंदन जवळ केलं. खेडोपाडी असलेल्या कर्मठ प्रथा पाळल्याविना गत्यंतर नव्हतं. गावाहून आल्याला आठवडा उलटला पण सवयीनुसार कपाळावर गोपीचंदन उमटलंच.
पूर्वेला तांबडा सूर्य वर येत असताना तिनं आपसूक हात जोडून नमस्कार केला. हाताचा टेका घेत ती हलकेच उठली. आंघोळीमुळे टवटवी आलेली पण आताशाने तिच्या हालचाली मंदावत चाललेल्या. चालताना गुडघे एकमेकांवर आपटत असलेले. पाठीला जरी वाक आला नव्हता तरी संधी मिळाली की टेकून बसत असे. थोडं चालणं झालं की थांबणं आलंच. तशी कुंभनगरी डावी उजवी, पुढे मागे अवाढव्य पसरलेली. तंबू रहाट्यांची माळच माळ. त्यात अखंड धुनी लावून बसलेले साधू बैरागी. पहाटेपासूनच रहाट्यांवर लावलेले कर्णे वाजू लागायचे. कुठे अखंड नामसंकीर्तन, तर कुठे भागवत कथा, कुठे शिवमहापुराण तर कुठे उपनिषदांवर चर्चा. हे सर्व पाहण्या ऐकण्यात वेळ कसा निघून जातो ते कळत नसे. तिला केवळ नामसंकीर्तनात गोडी वाटायची. बाकीचे उपदेश डोक्यावरून जायचे.
आपल्या संथ चालीने ती कुंभनगरी न्याहाळत होती. दालबाटी, मालपुवा, मिठायांचे जेवण अखाड्यांमधून मिळून रहायचं. शिवाय यात्रेसाठी आलेले भाविक दानपुण्य कमावण्यासाठी काही ना काही पदरात टाकत असे. ती ते आनंदाने घेई. फळफळावळ, क्वचित सुकामेवा ही मिळायचा. मात्र तिने कधीही हात पसरला नव्हता वा कुणाकडे काही मागितलं नव्हतं. पैशाला तर हातच लावायचा नाही हे तिने ठरवूनच घेतलं होतं. देणारे देत होते तर ही ठामपणे नकार द्यायची. काहीजण आदराने माई म्हणून पायाही पडायचे व पैशे घेण्याचा आग्रह ही करायचे. पैसे गोळा केले असते तर सात दिवसात मालामाल झाली असती, पण नकोच ती माया! तिचं मन सांगत असे!!
‘चलो तुम्हें थानेदारने थानेपे बुलाया है!’ खाकी वर्दीतील हवालदारने हाळी दिली तशी ती चपापली. अगदी चारच दिवसांपूर्वीच तर चौकीत जाणं झालं होतं. थानेदारने तेव्हा तू कोण, कुठली, नाव, गाव सगळं विचारलं होतं. सुरूवातीस आस्थेवाईकपणाने नंतर जरबेने, पण ती बधली नव्हती. तोंडून चकार शब्द ही काढला नव्हती. तरणाबांड थानेदार तसा सालस वाटत होता, पण त्याचे डोळ्यातून आरपार पाहणं अस्वस्थ करणारंच, पण तिनेही दाद दिली नव्हती. आज पुन्हा चौकीत पाऊल टाकलं तशी ती दचकलीच. समोर लच्छीराम, पोटचा गोळा. तिला ब्रह्मांडच आठवलं. गेला महिनाभर तो व त्याची बायको, “चल आई तुला कुंभमेळ्यात स्नानाला नेतो!” म्हणून आग्रह करत कुंभनगरीत आणलं होतं! तेव्हा किती बरं वाटलं होतं. गेली सात वर्षे हे गेल्यापासून जणू वनवासच नशिबी आला होता.. स्वतःच्या राहत्या घरात परक्यांसारखं जिणं. जीव तर तसा आयुष्यभर सर्वांनाच लावला होता. अगदी नातवंडांवर ही जीवापलिकडची माया केली होती. तीही आता मोठी झालेली. सगळ्यांना सांभाळत संसाराचा गाडा हाकला होता. तीच माणसं असं मेळ्यात आणून सोडून निघून जातील असं स्वप्नीही वाटलं नव्हतं. पहिलं स्नान घडलं तसं मुलगा सून गायब. दोन दिवस वाटलं येतील शोधत, घेऊन जातील, पण लक्षात यायला तसा वेळ लागलाच नाही. गावातही जाऊन सांगितलं असेल सर्वांना ‘मैया कुंभमें खो गयी!!’ दिवसभर रडणं झालं होतं. अश्रू नकळत सुकले गेले, डोळे कोरडेठाक. जणू कुंभ रिता होऊन राहिलेला. घरच्यां बरोबरचं नातं संपलेलं. तसं ते कधीचंच संपलं होतं. वेड्या आशेनं चिकटून होतो. आतातर ती आशा संगमात विरघळून गेलेली. आता स्वतःचं असं काहीच उरलेलं नव्हतं. सोडावं लागतं काहीतरी मेळ्यात आल्यावर! रोज समोर नागा साधू, तसेच बैरागी, नावाच्या शेवटी, आनंद, पुरी, गिरी लावून घेणारे संन्यासी हे सर्वसंगपरित्याग करून मोक्षाच्या मार्गाला लागलेले हे ती पहात आलेली.
समोर ठाणेदार, लच्छीरामची खरडपट्टी काढत असलेला. तिला आठवलं, चारच दिवसापूर्वी कुठल्यातरी यंत्रावर अंगठा दाबून घेतला होता थानेदारने व आधारकार्डावर लच्छीरामचा फोन नंबर. थानेदारने तिला खुर्चीत बसवत तिची कुंडलीच उघड केली. “नाम: गेहनाबाई, गांव: ठकराहा, जिला: चंपारण बिहार. देखो माई, कुंभमें आके मांबाप को छोडकर जाना, ये हमारे लिए नया नहीं है। हम आपके उपर सीसीटीव्ही कॅमरेसे नजर रखे हुए थे। अब आपका बेटा आपके सामने है। जाईये उसके साथ। उसे समझाया है।”
तिनं शांतपणे ऐकून घेतलं. हातातील जपमाळ कपाळी लावली. मग निग्रहाने म्हटलं, “हा जरी माझा मुलगा असला तरी मी त्याच्याबरोबर जाणार नाही. त्याने आपली बायको व अपत्यांबरोबर सुखेनैव संसार करावा. कुंभमेळ्यात आल्यावर तर माझे भागच खुल गये. हे विश्वची माझे घर. नकोच मला ती तकलादू माया!!”
ठाणेदार व खजील झालेला लच्छीराम अवाक् होऊन गेहनाबाईकडे पाहत होते. दूर कुठल्यातरी राहुटीतून शंखनाद होत होता.
© डॉ. जयंत गुजराती
नासिक
मो. ९८२२८५८९७५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈