श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तीन अनुवादित लघुकथा – रक्षक की भक्षक / आई आणि माता / आज्ञाधारक – मूळ हिन्दी लेखिका : सुश्री मीरा जैन ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
सुश्री मीरा जैन
१. रक्षक की भक्षक
हाय स्टँडर्ड साड्यांचं दुकान. एक बाई दुकानदाराशी साड्यांच्या किमतीबाबत बारगॅनिंग करत होती. त्यांच्या दुकानातील साड्यांच्या किमती फिक्स असतात. बारगॅनिंगचा काहीही उपयोग होत नाही, अशी त्या दुकानाची ख्याती होती. कुणी बारगॅनिंग करू लागलंच तर दुकानदार फटकन म्हणे, ‘आपल्याला जमत असेल, तर घ्या. जबरदस्ती थोडीच आहे?’ त्यामुळे त्या बाईच्या बारगॅनिंगकडे दुकानातले सगळेच जण कुतुहलाने पहात होते.
आताही दुकानदार आपल्या फिक्स रेटबद्दल पुन्हा पुन्हा संगत होता, पण ती बाई काही ऐकायला तयार नव्हती. अखेर तिचा विजय झाला. ५०००ची साडी तिने ४००० ला मिळवलीच.
ती जाताच दुकानातील बाकीच्या बायकांनी दुकानदारावर पक्षपात करत असल्याचा आरोप करत, त्याच्याशी भांडण काढलं. त्यावर हात जोडून दुकानदाराने आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं, ’ आपलं म्हणणं अगदी योग्य आहे. पण आपणच निर्णय करा. मरू घातलेला काय करणार नाही? तुम्ही ती बाई आलेली गाडी पाहिलीत ना! त्यावर पिवळा दिवा होता. पोलिसांची गाडी…. मला याच वस्तीत राहयचा आहे. कामवायचं आहे आणि खायचंही आहे.
मूळ हिन्दी कथा – रक्षक या भक्षक
मूळ लेखिका – मीरा जैन
अनुवाद – उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
२) आई आणि माता –
दहा वर्षाच्या राजूच्या एका हातात मोतीचुराचा लाडू होता आणि दुसर्या हातात तिरंगा झेंडा. राजू पळत पळत घरी येत होता, इतक्यात तो एका दगडाला थडकला आणि चिखलात पडला. त्याचा स्वच्छ गणवेश तर चिखलाने माखलाच, पण त्याच्या हाता-पायालादेखील खरचटलं. चेहरादेखील चिखलाने बरबटला होता. तो तसाच घरी आला. त्याला त्या अवस्थेत पाहिल्यावर उमा, त्याची आई प्रथम घाबरली. मग त्याला रागावत म्हणाली, ‘नीट बघून चालता येत नाही? चालताना असा कसा पडलास? अगदी गांवंढळ आहेस तू! ‘
त्यावर राजू म्हणाला, ‘मम्मी, माझ्या उजव्या हातात तिरंगा झेंडा होता. हा हात मी जमिनीवर टेकवला असता, तर कदाचित मला एवढं लागलं नसतं. पण माझ्या राष्ट्रध्वजाला चिखल लागला असता. मला ते नको होतं. माझ्या राष्ट्रध्वजावर चिखलाचा एक ठिपकाही पडणं, मला सहन झालं नसतं. ’
तिरंग्याबाबत राजूच्या मनात इतकी सन्मानाची भावना आहे, हे बघून, उमाचे डोळे भरून आले. तिला वाटलं आज आपल्या मातृत्वाचं सार्थक झालं. तिने राजूच्या डोक्यावर हात फिरवत म्हंटलं, ‘बाळा, तुझे विचार ऐकून मी अतिशय खूश आहे. माझं म्हणणं नीट ऐकून ठेव. तू तिरंगा नेहमीच स्वच्छ ठेवशील हे हीक आहे, पण जरी कधी दुसर्या कुणी याच्यावर चिखल उडवायचा प्रयत्न केला, तरी तू त्याचा प्रतिकार करायला हवास. आपला तिरंगा नेहमीच स्वच्छ, स्वस्थ आणि वर्चस्ववान राहील, याची तू काळजी घ्यायला हवीस!’
आईचं बोलणं ऐकल्यावर राजू आपलं सगळं दू:ख विसरून प्रफुल्लित आणि भाव-विभोर होऊन आपल्या आईकडे पाहू लागला. त्याला आपल्या आईमध्ये साक्षात् भारतमाता दिसू लागली होती.
मूळ हिन्दी कथा – माँ और माता
मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
३) आज्ञाधारक
दोन गाढवांमध्ये वाद चालू होता. वादाचं कारण होतं, दोघांमधे कोण जास्त सुंदर आणि शहाणा आहे. वादातून जेव्हा काहीच निष्पन्न झालं नाही, तेव्हा ते दोघे निर्णयासाठी कोल्ही काकीकडे गेले. कोल्हीने दोघांचं बोलणं ऐकलं. मग ती म्हणाली, ‘मी याचा निर्णय दोन दिवसांनी देईन पण तोपर्यंत तुम्ही आपआपल्या घरात राह्यचं आणि मी सांगेन ते करायचं. दोघांनी कोल्हीची ही अट मान्य केली.
कोल्हीने दोन दिवस त्यांच्याकडून कठोर परिश्रम करून घेतले. दोघांनीही कुरकुर न करता, कोल्ही म्हणेल, ती ती कामे केली. आता कोल्हीला प्रश्न पडला, ‘कुणाला श्रेष्ठ म्हणून घोषित करायचं? कारण दोघेही रूप-गुण, अंग – बांधा, आज्ञाधारकता, सहनशीलता याबाबतीत सारखेच आहेत. निर्णयाचा क्षण जसजसा जवळ येत चालला, तशी दोन्ही गाढवांप्रमाणे कोल्हीच्या हृदयाची धडधडही वाढली. कुणाच्या बाजूने निर्णय द्यायचा? अचानक कोल्हीला एक उपाय सुचला. तिने दोन्ही गाढवांकडून वचन घेतलं, की ती एका चिठ्ठीवर निर्णय लिहून देईल. दोघांनीही तो कुठलाही वाद न घालता मान्य करायचा आणि या निर्णयाबाबत दोघांनीही जीवनभर आपापसात काही बोलायचं नाही. ’गाढवांनी ते मान्य केलं।
कोल्हीने मग आपला निर्णय तोंडी न सांगता चिठ्ठ्या लिहिल्या आणि दोन्ही गाढवांना एकेक चिठ्ठी दिली. ते दोघेही आपापली चिठ्ठी वाचून अतिशय खूश झाले. या निर्णयाला अनेक वर्षे झाली पण आजही ते, त्या दिवसाइतकेच खूश आहेत. त्या दिवशी त्या दोघाच्याही चिठ्ठीत कोल्हीने एकच वाक्य लिहिलं होतं, ‘तू जास्त सुंदर आणि शहाणा आहेस.’
मूळ हिन्दी कथा – आज्ञाकारिता
मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈