डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ यंदा कर्तव्य आहे… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
“अग सीमा, एखादी चांगली मुलगी असली तर सुचवशील आपल्या रोहितसाठी, यंदा कर्तव्य आहे ग. पण पाहिजे तसं स्थळ काही नजरेसमोर नाही. तुला तर माहित आहेच रोहित किती गुणी व कर्तबगार मुलगा आहे. ” ” मला माहित आहे ग प्रतिमा सगळं. पण आजकाल लग्नाच्या मुलींची वानवा भासतेय सगळीकडे. लग्नाची मुले जास्त व मुली कमी. मग या मुलीवालेही जणू सातव्या आसमानावर असतात. अपेक्षा खूप असतात यांची मुलगी जरी सुमार असली तरी. शिक्षण कमी, दिसायला यथातथा असलेल्या मुलींनाही गोरा, गोमटा, राजबिंडा मुलगा हवा. शहरात राहणारा हवा. खेड्यातला नको, डाॅक्टर, इंजिनियर, सरकारी नोकर हवा. , सासू सासरे, दीर नणंदेचा फापट पसारा नको. हवा फक्त राजाराणीचा संसार, हम दो हमारे दो. बाकी मंडळी जाऊ दे हवेत उडत, यांना काही घेणं देणं नसतं. “
” बरोबर आहे ग तुझं म्हणणं. पण माझा रोहितही एकुलता एकच आहे. चांगला M. Sc. Agri. डाॅ. पंजाबराव कृषी विद्यापीठात नोकरी पण मिळणार होती. पण आमची वडिलोपार्जित भरपूर शेती. ती कसायची सोडून नोकरी कसा करणार तो. सोन्यासारखी जमीन आमची. नोकरीतील उत्पन्नापेक्षा कितीतरी पट उत्पन्न देणारी, मग हातचं सोडून पळत्याच्या मागे काय लागायचं. राबणारी गडी माणसं, आपली देखरेख. शिवाय रोहित कृषी क्षेत्रातील विद्यानिष्णात, शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बियांणाच्या विविध प्रजाती, खतांची जोड, ठिबक सिंचन, शेतीचं आधुनिकीकरण, मार्केटिंग, शेतीसाठी असणार्या विविध योजना, विम्याचं संरक्षण, शेतमाल साठविण्यासाठी आधुनिक सोयींनी सुसज्ज गोदामं, त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली आहे.
” होय ग प्रतिमा, सगळं पटतंय मला. पुढच्या महिन्यात पुण्यात भव्य वधु वर मेळावा आहे. online अर्ज भरायचा आहे. नोंदणी करून ठेव. ” ” होय, मी घरी गेल्यावर आधी ते काम करते “
” अहो, रोहितच्या लग्नाचा काही विचार करता कि नाही. आता रोहितचं शिक्षणही संपलं, त्याने आपला शेती व्यवसायही सांभाळलाय. आता कसली अडचण. ” अडचण कसली ? आता रोहितनं मनावर घ्यावं ” ” रोहित व्यस्त आहे आपल्या कामात. शिवाय तो मूळातच अबोल, आपला आदर करणारा. तो काय मनावर घेणार, आणि आपलंही काही कर्तव्य आहे कि नाही ? ” ” कर्तव्य आहे ग, आपण कोठे नाकारतोय. पण त्याचंही मत घ्यायला हवं. शिवाय त्याच्या मनात कोणी आहे काय ? हे ही जाणून घ्यायला हवं, तू चिंता नको करूस. मी बोलतो रोहितशी. “
मृगाच्या सरी चांगल्याच कोसळल्या होत्या. तप्त धरतीची तृष्णा शमून ती जणू नवकांतीने उभारली होती. चोहीकडे पसरणारा मृदगंध वातावरणात आल्हाद निर्माण करत होता. दुकानांमध्ये बि बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकर्यांची झुंबड उडाली होती. रोहितनेही नवीन संकरीत बियाणे घेतली. ज्वारी बरोबरच, उडीद, मूग, चवळी या भरड धान्याबरोबरच तो कांदा व काही प्रमाणात विविध भाज्यांचीही लागवड करणार होता.
रात्री जेवतांना शांतारामरावांनी रोहितला म्हणाले, ” काय रोहित मृगसरी कोसळल्या. सर्वत्र मृदगंध दरवळतोय. आनंदी, आल्हाददायी वातावरण आहे. काळ्या आईच्या सेवेसाठी आपणही सज्ज आहोत. आणि ही काळी आई एका दाण्याच्या बदल्यात हजार दाणे देईल. पण बेटा तुझ्या ह्या आईची पण काही इच्छा आहे. तुझेही दोनाचे चार, पुढे चाराचे सहा व्हावे. ” ” बाबा, मी काय सांगणार ? ” ” अरे काय सांगणार म्हणजे ? तुलाच तर सांगावं लागेल ? कोणी आहे
काय तुझ्या पसंतीची ? असेल तर आमचं काम सोपं होईल. फक्त अक्षता टाकण्याचं काम आमचं. ” ” नाही बाबा, माझी कोणी पसंती नाही. आईलाच करू देत हे काम “” अहो ऐकलंत का ? तुम्ही लागा आता कामाला “. ‘ मी सुरू केलंय माझं काम. पुढच्या महिन्यात वधु वर मेळावा आहे. रोहितचं नाव नोंदवलंय मी. आपण जाऊ तिथे ‘.
दुपारचे जेवण झाले व सगळी मंडळी हाॅलमध्ये परतली. सकाळपासून सुरु झालेल्या वधु वर मेळाव्यात मान्यवरांची भाषणे, सन्मान, प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचा परिचय यातच सकाळचं सत्र संपलं होतं. आता दुसर्या सत्रात वधु वर परिचय होणार होता. वधुपेक्षा वरांचीच संख्या भरपूर होती. एक एक उमेदवार मंचावर येऊन आपला परिचय देत होता, अपेक्षा सांगत होता. सांगलीची अलका लोणकर व अमरावतीची विद्या बनकर या दोन मुली मला (प्रतिमाला) रोहितसाठी योग्य वाटल्या. त्यांच्या पालकांशी मी तिथेच संपर्क साधला. गोरा, उंच, राजबिंडा दिसणार्या रोहितला कोण नाकारणार ? मी मनोमन खुश होते.
” रोहित चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, सधन स्थितीतील आहे, आम्हांला पसंत आहे, पण मुलाने खेड्यात राहून शेती करण्यापेक्षा शहरात नोकरी करावी एवढी आमची माफक अपेक्षा ” सांगलीच्या अलका लोणकरचे पालक बोलत होते.
‘ आपली गडगंज संपत्ती व शेती सोडून त्याने नोकरी म्हणजे दुसर्यांची चाकरी करायची ? ” ” आमची मुलगी शहरात राहणारी, पुढेही मुलांचे शिक्षण, इंग्रजी शाळा, विविध शैक्षणिक सुविधा शहरातच मिळणार. शिवाय आमची मुलगीही उच्च शिक्षित आहे, ती नोकरी करणारच, तिच्या ज्ञानाचा उपयोग करणार, खेडे गावात हे शक्य तरी होईल काय ?”
आता माझं लक्ष अमरावतीच्या विद्या बनकर वर केंद्रित झालं. ” प्रतिमाताई तुमचा मुलगा चांगला आहे, उच्च शिक्षित आहे, हुशार आहे, होतकरू आहे. आम्हांलाही असाच मुलगा हवा होता. विद्या आमची एकुलती एक कन्या, माझा बिझनेस, उद्योग व्यवसाय सांभाळायला मला रोहितसारखा मुलगा हवा होता. ” रोहितने तुमचा उद्योग व्यवसाय सांभाळायचा आणि त्याचा स्वतःचा कोणी सांभाळायचा ? ” ” ताई शेतीकडे पाहायला तुम्ही दोघं आहात, शिवाय गडी माणसं आहेत. उद्योग व्यवसायात स्वतः लक्ष घालावं लागतं ” ” आम्ही थकलोत आता, पुढील पिढीने ही जवाबदारी सांभाळावी ही आमची अपेक्षा, पण तुम्हांला तर घरजावई हवा “. ते शक्य नाही. विद्याचं स्थळावर मी क्रास मार्क केला.
पुन्हा परिस्थिती जैसे थे वर येऊन ठेपली.
‘ प्रतिमा, नको चिंता करूस. मिळेल आपल्या रोहितलाही साजेशी मुलगी “
” कशी मिळणार, पाहिलंत ना वधुवर मेळाव्यातही किती कमी मुली होत्या. “
” होय, स्त्री भ्रूण हत्येचा मार्ग अनेकांनी चोखाळला व समाजातील स्त्री पुरूष समतोल ढासळला. हे परिणाम तर होणारच होते. तरी बघूया, रोहित आपला हुशार, होतकरू आहे. त्याला मुलगी मिळेल. नव्हे घरबसल्या सांगून येईल. “
लग्नाचा हा सिजन तर निघून गेला. माझे स्वप्न काही पूर्ण झाले नाही.
” अरे रोहित आलास. मी केव्हाची वाट पाहात होते. आणि सोबत ही कोण ? ” आई ह्यांना घरात तर येऊ दे. या आहेत मीनाक्षी मॅडम, कृषी अधिकारी, कृषी मार्केटिंगसाठी मला बरीच मदत होते यांची. शेतीचं पोत, आणि इतर घटक लक्षात घेऊन विविध बियाणांचे वाण, खतांचं मागदर्शन करण्यासाठी या स्थानिक सर्व्हे सुद्धा करतात. आज आपल्या जमिनीचा सर्व्हे करुन, मातीचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणीला देतील व आपल्याला त्यानुसार मार्गदर्शन करतील. ” ” होय काय, ठीक आहे. काय घेणार मॅडम, चहा, काॅफी कि थंड बनवू काही ” ” मला मॅडम नाही मीनाक्षी म्हणा आई, तुम्ही मला आईसारख्या आहात. “
किती चांगली मुलगी, मला आई म्हणाली, आंटी नाही, संस्कारी वाटते. रोहितला शोभेशी आहे.
मीनाक्षी आपले काम आटोपून निघून गेली, पण माझ्या मनात घर करून गेली.
‘ रोहित, मीनाक्षी कशी वाटते रे ? काही विचार केलास काय ? ‘ ‘ आई, काय बोलतेस हे ? तू असा विचार कसा करू शकतेस ? माझ्या मनात तसलं काहीही नाही आणि मीनाक्षी मॅडमच्या मनातही नसावं. तू रात्रंदिवस माझ्या लग्नाचा ध्यास घेतला आहेस. कोणत्याही मुलीमध्ये तू आपली सून शोधतेस. ” ” तसं नाही रे. मला मुलगी चांगली वाटली. गळ्यात सौभाग्य अलंकार नव्हते म्हणून लग्नाची वाटली. यात माझं काय चुकलं. ” ” नाही आई, तसं नव्हतं म्हणायच मला. “
मीनाक्षी कामानिमित्त गावात आली कि मलाहि भेटून जायची. हळूहळू परिचय वाढला. मीनाक्षीला एक धाकटा भाऊ व घरी आई वडील होते. वडील सेवानिवृत्त पोस्टमास्तर तर आई गृहिणी. निम्नमध्यम वर्गीय कुटुंब.
“मीनाक्षी लग्नाचा काही विचार केलास”. तशी मीनाक्षी निरूत्तर. ” अग, असं मौन राहून कसं चालेल. बरं, मीच घालते विषयाला हात. माझा रोहित कसा वाटतो तुला ? ही माझी, मेलीची इच्छा. तुझ्या मनात नसेल तर विसरुन जा हा माझा प्रश्न. ” ” मी नंतर कळवलं तर चालेल आई ” ” होय, तुला पाहिजे तेवढा वेळ घे “
मीनाक्षीने घरी आई बाबांना रोहितविषयी सांगितलं. ” तुला पसंत आहे ना. मग पुढील फाॅर्म्यालिटीज आम्ही करू. रोहितच्या आई बाबांना सांग आम्ही येतो भेटीला म्हणून “
नक्षत्रासारख्या सुनेचं स्वागत करतांना आज मन आनंदानं उचंबळून आलं होतं. ” ये सूनबाई, उंबरठ्यावरचं माप ओलांडून लक्ष्मीच्या रूपानं ये ” ” खूप छान आहे हो मुलगी, अगदी लक्ष्मी नारायणाची जोडी शोभतेय. लग्न घरातील सगळ्यांची हिच प्रतिक्रिया होती. यंदा कर्तव्य आहे म्हणत असतांना चार वर्ष भुरsss कन उडून गेली होती
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]