सुश्री नीता कुलकर्णी

☆ “अंगठे बहाद्दर…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

ती तिथे नुकतीच राहायला आली होती. तीचं अजून घर आवरणं सुरू होतं. नंदा नावाची बाई कामाला मिळाली होती. बाई साधी भोळी प्रेमळ होती. त्यादिवशी नंदा काम करायला आली म्हणाली,

” वहिनी आज काही ज्यादा काम असेल तर ते करून घेऊ. आज मला एका कामावर सुट्टी आहे. “

” अगं बरं झालं पुस्तकांचं खोकं ऊघडायच आहे. पुस्तकं काचेच्या कपाटात लावून घेऊ. “

नंदाने सगळी पुस्तकं काढली. बरेच दिवस पॅक असल्याने जरा धूळ जमा झाली होती. ओल्या कपड्याने पुसायला घेतली. ,

” वहिनी फॅन सुरू करा. वाळली की मग आत ठेवू. “

एक, एक पुस्तक नंदा पुसत होती.

” केवढी पुस्तकं हो. एव्हडी कधी वाचता? “

“अग अभ्यासाची, कथा, कादंबऱ्या प्रवासवर्णन, काही इंग्रजी पुस्तकं आहेत. परत परत वाचायला आवडतात म्हणून घेतली आहेत. “

ती म्हणाली…

तिच्या मनात आलं ह्या अडाणी बाईला आपण सांगतोय… पण तिला ते काय कळणार..

नंदा म्हणाली, ” बैजवार सगळी पुस्तकं नीट लावून ठेवते. तुम्ही तुमचं दुसरं काम असलं तर करा. “

” अगं नको तुलाच मदत करते”

आवरता आवरता ती तिच्याशी गप्पा मारायला लागली.

“तुला वाचायला लिहायला येतं का? ” 

” वहिनी आम्ही गावाकडे राहत होतो. माझा बाप फार गरीब होता. दुसऱ्याच्या शेतात काम करायचा. आई पण रोजंदारीन जायची.. आम्ही चार बहिणी एक भाऊ. जेमतेम हाता तोंडाची गाठ पडायची. कुठली शाळा.. अन् काय हो.. “

” म्हणजे तू काही शिकली नाहीस?

” नाही हो लहानपणापासून कामचं करायला लागले शेतातलं तणं काढायला जायचं, गुरं रानात गेली की गोठा साफ करायचा, लोकांच अंगण झाडायला जायचं, दूध घालायला जायची… “

” अग म्हणजे घरात कोणी शिकलं नाही? “

” बापाने लहान भावाला.. तो मुलगा म्हणून शाळेत घातलं. आमची लग्न सोळा-सतरा वयातच लावून दिली. माझा नवरा इथे बांधकामावर कामाला लागला म्हणून मी इथे शहरात आले. “

तिला वाईट वाटलं.. काय या बाईचं आयुष्य… हीच कशाला अशा अनेक बायका अडाणीच राहिल्या.. आई-वडिलांनी नुसतं त्यांना जन्माला घातलं.. अर्थात यात या बिचाऱ्या बायकांचा तरी काय दोष म्हणा…..

” तुला काहीच लिहिता वाचता येत नाही? “

“अगदी थोडं येतं पण कुठंही गेलं तरी अंगठाच द्यावा लागतोय बघा… वाईट वाटतंय… पण बापाचा पण नाईलाजच होता. तो तरी काय करणार? एकापाठोपाठ चार पोरी घरी होतो… “

“हो.. तेही खर आहे म्हणा”

“शिक्षण नाही झालं पण नवऱ्याने इथं आणलं म्हणून माझं कल्याण झालं बघा”

ती काय म्हणते आहे तिच्या लक्षातच येईना..

” अग कसलं कल्याण?

” अहो वहिनी बघा इथल्या लोकात मिसळले, कामं मिळाली, काम करतीयं.. चार पैसे हातात येतायत”

“अग पण किती कष्ट.. “

” अहो कुठेही काम केलं तर कष्ट करावेच लागणार ना? आम्हाला त्याची सवय असते. त्याचं काही वाटत नाही. दहा ते चार कामं करते साडेचारला घरी जाते. “

” अग पण थोडं तरी लिहिता यायला पाहिजे. मी शिकवीन तुला. साहेब ऑफिसात गेले की मला तसा खूप वेळ असतो. “

“अहो आता शिकून काय करू? घरी गेले की घरचं काम असतं. “

” अग तशी तु हुशार वाटतेस म्हणून तु थोडं तरी शिकावं असं मला वाटतं”

” तसं नाही वहिनी…. मला पण आवडलं असतं पण संध्याकाळचं अजून एक काम असतं बघा”

” संध्याकाळी काय करतेस? “

” त्या पाच नंबरातल्या आगाशे आजींना बागेत नेते. त्या तिथल्या बाकावर मैत्रिणींशी गप्पा मारतात. मी बाजूच्या बाकावर बसते. नंतर त्यांना घरी आणून सोडते. तेवढे चार पैसे मिळतात.. संसाराला उपयोग होतो”

” हो का… बरं बरं… “

रोज नंदा येऊन काम करून जायची. आज कामं करता करता तिच्याशी गप्पा सुरू होत्या. ती पण आनंदात काही काही बोलत होती.

” वहिनी माझी मुलगी रोज वीस मुलांना डबे देते. ती साबुदाणा खिचडी, कटलेट, बटाटेवडे, पावभाजीची ऑर्डर घेते. कधी तुम्हाला काही लागलं तर सांगा “

” अरे हो का…. सांगेन हं”

बोलता बोलता पुस्तकं नीट शिस्तीत लावून झाली.

“वहिनी बघा बरं नीट लागलीत का? “

” हो ग… छान काम केलंस”

“वहिनी हे काय आहे? हे आत ठेवायचं का? “

“हो… त्यात अगदी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं आहेत. त्यात आमची सगळी सर्टिफिकेट्स आहेत. “

तिने स्वतःच ते फोल्डर नीट कपाटात ठेवले.

तेवढ्यात नंदाला एक फोन आला.

बोलून झाल्यावर ती म्हणाली,

” वहिनी तुम्ही म्हणताय ते मलाही पटतंय बघा. मला जमेल तसं मी शिकेन.. मध्येच मला पण वाटतय तुमच्यासारखं शिकावं शहाणं व्हावं…. “

” मी शिकवते तुला आणि चांगलं शहाणं करते “ती म्हणाली.

” बरं आता निघते मी. माझी मुलगी इथेच ऑर्डर द्यायला आली आहे. तिच्याबरोबर गाडीवर जाते घरी. “

” ती गाडीवर येते? “

” अहो जोशी आजोबा आता गाडी चालवत नाहीत. त्यांची जुनी गाडी विकत घेतलेलीय लेकीनी. निघते वहिनी”

” अग थांब तुझा पगार काढून ठेवला आहे. तो देते”

” वहिनी रोख पैसे नको. तुम्हाला माझं पासबुक दाखवते. त्या नंबरावर खात्यावर टाका. सगळे तसेच करतात. “

असं म्हणून नंदाने पासबुक तिच्या हातात दिले.

तिने उघडून बघितलं तर सोळा हजार जमा झाले होते.

“माझं वन बीएचकेच जुनं घर आहे. आता एक नविन टू बीएचके घेतलं आहे.. पगारातनं हप्ता भरते. माझा नवरा, मुलगा पण बँकेत पैसे भरतो. चार महिन्यात आम्हाला घर ताब्यात मिळेल बघा. दोन लाख तेवढे द्यायचे राहिलेत.. ” नंदा सहजपणे हे सांगत होती.

” दुसरं घर घेतलस? “

” मुलाचं लग्न होईल. मग घरात सुनबाई येईल.. मोठं घर हवं… वाढता संसार.. म्हणून घेतलय.. “

” अरे वा… “

” बर वहिनी येते मी. खात्याच्या नंबराचा फोटो काढून तुम्हाला व्हाट्सअप ला पाठवते. त्यावर पैसे पाठवा”

असं म्हणून नंदा गेली. ती विचारातच पडली…

इतका वेळ आपण तिला मी तुला शिकवते….. मी तुला शिकवते…. असं म्हणत होतो याची तिला आता थोडी लाज वाटली…. आज मात्र तिने मनाशी तिने ते कबुल पण केले..

लिहिता वाचता येणं… हातातं डिग्री असेल तर तेच खरं शिक्षण… असचं ईतकी वर्षे आपण समजत होतो….. ही तर दिवसभर कामं करत होती आणि बँकेचा हप्ता भरत होती…. लाखाची गोष्ट करत होती…

रोजच्या जगात वावरताना लागणार व्यावहारिक शिक्षण आपल्यापेक्षा तिच्याकडे जास्त आहे हेही तिच्या लक्षात आलं…

खरंतरं तिच्याकडूनच आपण शिकायला हवे असे तिला मनोमन वाटले..

महिन्याला अठरा हजार रुपये मिळवणारी ही…. आणि हिला मी अडाणी अशिक्षित समजत होते…

ती पुस्तकांच्या बंद कपाटाकडे…. त्यातल्या सर्टिफिकेटच्या फोल्डरकडे बघत राहिली….

या शिक्षणातून मिळालेले ज्ञानही असचं आपण डोक्यात बंद करून ठेवले आहे. कधी त्याचा उपयोग केला नाही.

नुसता डिग्रीचा अभिमान बाळगला. आज प्रथमच तिला त्याचं थोडं का होईना पण मनातून वाईट वाटलं…..

खंत वाटली…

ती उठून गॅलरीत आली. मुलीच्या मागे बसून नंदा निघाली होती. तिच्याकडे पाहून…

ती प्रांजळपणे मनात म्हणाली…

नंदा खरी शहाणी तर तुच आहेस…

अक्षरं ओळख नसल्याने..

अंगठे उठवणारी….

खरी बहाद्दरीण…

आत्मनिर्भर असलेली…

माझा सलाम आहे तुला…..

आणि आम्हाला रोज मदत करणाऱ्या तुझ्यासारख्या असंख्य मैत्रिणींना… सख्यांना पण… मनापासून वंदन.

तुमच्यामुळे आमचं आयुष्य सुखकर झालेलं आहे…

वाचता वाचता…. डोळ्यात का ग पाणी… तुलाही तुझ्या कपाटातलं बंद करून ठेवलेलं सर्टिफिकेट आठवलं का…

तुझीच कथा वाटली का तुला…

असू दे… तुझ्यासारख्या असंख्यजणींची हीच कथा आहे..

पैसे मिळवण्यासाठी नको पण निदान तुझ्या मनाला समाधान मिळेल असं काहीतरी कर..

घराबाहेर पड… अजूनही वेळ गेलेली नाही.. तू मिळवलेल्या ज्ञानाचा.. डिग्रीचा कर काहीतरी ऊपयोग…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments