सुश्री सुनीला वैशंपायन
☆ टेक ऑफ… 🛫 लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
मुंबईच्या टर्मिनल २ च्या डिपार्चर जवळ एक गाडी येऊन थांबली. लगबगीने व्हील चेअर आणली गेली. गाडीतून रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकरांना उचलून व्हील चेअर मध्ये बसवण्यात आलं. विमान कंपनीने त्यांना दिलेला त्यांचा अटेंडंट त्यांची व्हील चेअर डीपार्चर गेटच्या दिशेने ढकलू लागला आणि अशोक केतकरांच्या डोळ्या समोरुन त्यांचा भुतकाळ सरकू लागला!
ते सर्व्हिस मध्ये असताना एका विमान अपघातात त्यांचा जीव तर वाचला होता. पण त्यांनी दोन्ही पाय गमावले होते. दोन युद्धात भारत मातेची सेवा केलेला तो भारत मातेचा सुपुत्र आता कायमचा व्हील चेअर वर बसला होता. एकेकाळी आभाळाला गवसणी घालणारा तो शूर वीर आता जमिनीवर देखील उभा राहू शकत नव्हता! दर वर्षी एकदा ते दिल्लीला मात्र जात असत. प्रजासत्ताक दिनी ते आणि त्यांचे काही जुने कलिग्स इंडिया गेट जवळ जमत असत. मग दोन दिवस दिल्लीत त्या फ्रेंड्स बरोबर मुक्काम करून ते परत येत. आजही ते त्यासाठीच निघाले होते. गेल्या अनेक वर्षांचा ते शिरस्ता होता.
पण गेली चार पाच वर्ष मात्र त्यांना दिल्लीला जाण जीवावर येत असे. कारण त्यांच्या सगळ्या कलीग ची मुलं एकतर सैन्यात, एअर फोर्स मध्ये होती किंवा चांगल शिकून चांगल्या पोस्टवर नोकरीला होती. ह्यांची मुलगी भार्गवी मात्र सेकंड इयरला असतानाच एक मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून गेली होती. कारण काय तर त्याची आई दुर्धर आजाराने ग्रस्त होती आणि तिला तिचे डोळे मिटायच्या आत मुलाचं लग्न झालेलं पहायचं होतं. ह्यांनी आणि बायकोने बराच विरोध केला. एकुलत्या एका मुलीचं छान करिअर व्हावं हे त्याचं स्वप्न होतं. पण तिने ऐकलं नाही. मग ह्यांनीही संबंध तोडले. आज त्यालाही पाचेक वर्ष उलटली होती!
त्यांची व्हील चेअर चेक इन सोपस्कार पूर्ण करून बोर्डिंग गेट पर्यंत आणली. अटेंडंट त्यांच्या शेजारी उभा होता. बोर्डिंग ची घोषणा झाली. शिरस्त्या प्रमाणे ह्यांची व्हील चेअर सर्वात आधी आत नेण्यात आली. त्यांना पहिल्या रो मध्ये स्थानापन्न केल्यावर बाकी प्रवासी बोर्ड झाले. विमान टॅक्सी वे वरून रन वे वर येऊन थांबल. अशोक रावांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. त्यांना त्यांच्या फ्लाइंग दिवसांची आठवण आली. त्यांनी नकळत डोळे पुसले. ते अजस्त्र धुड रन वे वर जवळ जवळ ताशी अडीचशे किलोमीटर वेगाने धावू लागल. आणि एका क्षणी आकाशात झेपावलं. खिडकीतून खाली बघत असलेल्या अशोक रावांचे हात आपसून जॉय स्टिक धरल्या सारखे हालचाल करत होते! जुन्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी येत होतं. त्या अपघातानंतर सर्व्हिस सोडल्यावर ते करत असलेल्या प्रत्येक विमान प्रवासात येत असे तसंच!
विमान आता आकाशात स्थिरावलं आणि सीट बेल्ट काढायचे संकेत मिळाले. अशोक रावांनी सीटबेल्ट काढला आणि एअर होस्टेस ला बोलवायला वरच बेल बटण दाबल. एअर होस्टेस आली. अशोक रावांनी पाणी मागितलं आणि ते बरोबर आणलेलं पुस्तक वाचू लागले. काही मिनिटात एक लहानसा मुलगा हातात पाण्याचा ग्लास घेऊन आला आणि त्याने त्यांना पाणी दिलं. त्याला पाहून अशोक रावांना आश्चर्य वाटलं आणि तितक्यात पायलट ने अनाउन्समेंट सुरू केली.
पायलट – प्रिय गेस्ट. फ्लाईट ६इ ६०२८ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर एक अत्यंत महत्वाचे आणि आदरणीय गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे रिटायर्ड विंग कमांडर अशोक केतकर. ते पहिल्या रांगेत a सीटवर आहेत. विंग कमांडर अशोक केतकर ह्यांनी भारतासाठी दोन मोहिमांमध्ये भाग घेऊन आपले शौर्य दाखवून शत्रूचा पराभव करण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे. एका अपघातात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले असले तरी त्याचा लढवय्या स्वभाव मात्र अजूनही जिवंत आहे. एअरफोर्सची शिस्त, सिनियर च्या आदेशांचे पालन ह्या गोष्टी त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातही पाळल्या. इतक्या की त्यांच्या मुलीने करिअर सोडून त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्यावर त्यांनी तिच्याशी संबंध तोडले. पण मुलगी बापाला कशी विसरू शकत होती? ती दुसऱ्या शहरात असली तरी तिचं वडिलांवर लक्ष होतं. तिने लग्न केल्यावर एका महिन्यातच तिच्या नवऱ्याची, राहुलची आई गेली. ती नवऱ्या बरोबर दिल्लीत रहात होती. पण वडिलांची इच्छा तिच्या लक्षात होती. तिने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. उत्तम गुण मिळवून ग्रॅज्युएट झाली. पुढे चांगल्या कॉलेज मध्ये admission मिळवली… तिने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं असलं तरी त्यांनी तिच्यासाठी ठरवलेलं करिअर मात्र तिने पूर्ण केलं.
अशोकराव हे ऐकून स्तिमित झाले. सगळ्या प्रवाश्यांना उत्सुकता लागली होती. पायलटचा आवाज आला.
पायलट – बाबा… तुम्हाला मला पायलट झालेली पहायचं होतं ना? ते तुमचं स्वप्न होतं ना? मग आज तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल. आज हे विमान तुमची लाडकी भार्गवी उडवते आहे. तीच भार्गवी जिच्यावर रागावला आहात… आणि हो तुम्हाला आता ज्या मुलाने पाणी दिलं ना तो माझा मुलगा आहे आदित्य… तुमचा नातू…
प्रचंड शॉक बसलेल्या अशोक रावांनी भरलेल्या डोळ्यांनी त्या गोड मुलाकडे पाहिलं. तो त्यांच्याकडे बघत निरागस हसत होता. त्यांनी आदित्यला उचलून घेतला आणि त्याचे मुके घेतले. एव्हाना भार्गवी बाहेर आली होती. हातात फोन माईक धरून डोळ्यातून धारा तश्याच वाहू देत अशोक रावांकडे बघत बोलू लागली..
भार्गवी – बाबा मला माफ करा… मी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केल… पण त्यावेळी परिस्थितीच तशी होती. आणि बाबा राहुल खुप चांगला मुलगा आहे. एका mnc मध्ये तो मोठ्या पदावर आहे. आम्ही दिल्लीला असतो. आज तुम्ही ह्या फ्लाईट ने दिल्लीला जाणार हे मला आई कडून कळल्यावर मी ही फ्लाईट मागून घेतली आणि आदित्यला घेऊन आले. बाबा प्लीज मला माफ करा… मला तुमचा खूप खूप अभिमान आहे बाबा… म्हणूनच आज मी, एक कमर्शियल पायलट तुम्हाला, एका फायटर पायलट ला salute करते आहे.
हे बोलून भार्गवी ने एक कडक salute केला. विमानातील सगळे प्रवासी आणि क्रू देखील salute करत उभे होते…. भार्गवी हळूच अशोक रावांच्या शेजारी बसली आणि त्यांना मिठी मारून हमसून हमसून रडू लागली. बाप आणि मुलीची अनेक वर्षांनी अशी भेट होत होती. अशोक रावांचा शर्ट तिच्या श्रूंनी भिजला होता…. तितक्यात आदित्य बोबड्या आवाजात म्हणाला –
आदित्य – आजोबा मी ना तुमच्या सारखा फायटर पायलट होऊन देशाची सेवा करणार आहे. मला मम्मी रोज तुमच्या स्टोरी सांगून फायटर पायलट बनायला सांगते.
हे ऐकून अशोकरावांना प्रचंड आनंद झाला. तेवढ्यात आतून को पायलट ने विमानाच्या डीसेंड ची घोषणा करून सिट बेल्ट बांधायची सुचना केली. भार्गवी त्यांचा निरोप घेऊन कॉकपीट मध्ये गेली. विमान आता उतरू लागलं. आत भार्गवी विमान उतरवत होती. इथे शेजारी बसलेल्या आदित्यला अशोकराव विमान उतरवताना काय काय करतात ते अभिनय करून सांगत होते. खिडकीबाहेर अस्ताला जाणारा सूर्य एका माजी, एका आजी आणि भविष्यातील एका पायलटला आपल्या सोनेरी किरणांनी न्हाऊ घालत होता. विमानाचा डिसेंड सुरू झाला असला तरी आता कुठे अशोकरावांच्या आयुष्याच्या विमानाने परत एकदा टेकऑफ करायला धावपट्टीवर वेग घेतला होता!
लेखक : श्री मंदार जोग
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈