सौ. वंदना अशोक हुळबत्ते
परिचय
शिक्षा – B.Com., A.T.D.A.M.
- राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार (2008 व 2019)
- राज्य पर्यावरण विभाग चा सृष्टी मित्र पुरस्कार (2019)
- शिक्षण मंडळ कराड यांचा साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार (2019)
- कर्मव्रती पुरस्कार (2018) वुईमेन्स एज्युकेशन सोसायटी.सांगली .
साहित्य पुरस्कार –
- आम्ही तुमचे सोबती या पुस्तकास तीन पुरस्कार
- उत्कृष्ट बालसाहित्य निर्मिती पुरस्कार (2012) मराठी बालकुमार साहित्य सभा,कोल्हापूर.
- बालनाट्य लेखन पुरस्कार, सांगली शिक्षण संस्था (शताब्दी महोत्सव)
- आम्ही तुमचे सोबती…एकांकिका
- शाळेला चाललो आम्ही…पथनाट्य
- स्वरा बोलू लागली…कथासंग्रह
- वाघोबाचे दुकान….कविता संग्रह
- कोंडमारा….कविता संग्रह
- अनेक दैनिके,मासिके यातून नियमित लेखन व पुरस्कार प्राप्ती
- प्रकल्पात व सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग,सल्लागार,संचालक
☆ जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 1 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
विभा ठाणे रेल्वेस्टेशनवर उतरली सकाळचे आठ सव्वा आठ वाजले होते. आजवर सिनेमांतून, सिरियल मधून, कथा कादंबरीतून, वाचलेले मुंबई शहर आज प्रत्यक्ष बघत होती. गर्दीचा सागर उसळला होता.या अफाट गर्दीत तिला ओळखणारे कोणी नव्हते. शेजारच्या गीता काकूंची बहिण निर्मला तिला घ्यायला स्टेशनवर येणार होती.त्यांचा फोटो मोबाईल मध्ये बघितला होता. त्यांना फोन केला नाॅटरिचेबल आला. गीता काकूंचा फोन ऐंगेज येत होता.आता काय करावे सुचत नव्हते.आपण नवखे आहोत हे दाखवायचे नाही. असे ठरवून ती वावरत होती. पण चिंता चेहऱ्यावर दिसत होती. दोन-तीन वेळा ट्राय केल्यावर गीता काकूंचा फोन लागला एकदाचा. इथली अडचण तिने सांगितली आणि एका बाकावर बॅग जवळ घेवून बसली. मनात विचार आला…. समजा निर्मला अंटीची भेट झाली नाही तर ?आपले काय होणार? या अनोळखी शहरात कुठे जाणर? परत घरी जाणे शक्य नाही. आजवर या शहरा बद्दल किती तरी वाचले होते. इथं लोक कसे फसवतात, लुबाडतात. काही सूचत नव्हते. तेव्हा दुसरे मन म्हणत होते, काही तरी मार्ग निघेल. थोडा धीर धर.तेवढ्यात फोनची रिंग वाजली. निर्मला अंटीचा फोन होता. त्याची भेट झाली. त्याच्या बरोबर घरी गेली. इथं राहून कोणत्याही परिस्थितीत तिला दोन चार दिवसांत स्वत:च्या राहण्यांची सोय करायची होती. तिच्या घरात आधीच सहा माणसे होती. छोट्या जागेत त्यांनी विभाला आसरा दिला. हिच मोठी गोष्ट होती. शाळकरी मुले,ही दोघे जाॅबला, तिचे सासू सासरे घरी कागदी पिशव्या तयार करत होते.भली माणसे होती. विभाला त्यांनी घरच्या सारखे वागवले. त्यांने ती सुखावली आणि भारावली. विभा घराच्या शोधासाठी निर्मला अंटी बरोबर बाहेर पडे. घर भाड्यांने देणे आहे. या जाहिरातीतील बहुतेक घरे पालथी घातली.
अशीच एक जाहिरात वाचून तिने घर गाठले. बेल वाजली. एका तरुणाने दार उघडले केस विस्कटलेले, डोळे तारवटलेले, डोळ्यात झोप, अंगात बनियान, टाॅवेल गुंडाळलेला बहुदा तो नुकताच झोपेतून उठलेला असावा किंवा झोप मोड झाली असेल……..
आपल्या काय करायचं ते “चौधरी इंथच राहतात ना.”
तो म्हणाला “कोण हव आहे?”
“जागा भाड्याने द्यायची आहे ना?”
“पेंईग गेस्ट हवा आहे.”
“मी बघू शकते जागा.”
“कोणासाठी?”
“अर्थात माझ्यासाठी”
“नाही मिळणार.”
“का?”
“मी पुरुष भाडेकरू ठेवू इच्छितो.”
“तसा जाहिरातीत उल्लेख नव्हता.”
“राहिला असेल, पण मी तुम्हाला पेंईग गेस्ट म्हणून नाही ठेवू शकत.तुम्ही एक स्त्री आहात.”
“स्त्री आहे हा गुन्हा आहे का?”
“नाही. पण मी अविवाहित आणि ही रिस्क मी घेवू इच्छित नाही. तेव्हा मला फोर्स करू नका.”
चार पाच दिवस झाले. तंगडतोड करते आहे. एक घर धड मिळाले नाही.हक्काचा निवारा मिळण्यांची आशा अंधुक होताना दिसत आहे. आता जर माघार घेतली तर मला पुन्हा गाशा गुंडाळून गावाकडे जावे लागेल आणि ते अजिबात परवडणारे नाही. चार दिवसात किती नमुने बघितले. काहीनी तोंडावर दार लावून घेतलं, काहीजण कुलूप लावून पसार झालेले, तर काही ठिकाणी मी जायच्या आत जागा गेलेली. एखाद्या लाॅजवर रहावं म्हणून चौकशी केली तर कळले तिथे साधे फ्रेश होण्यासाठी तासाला सहाशे, सातशे रूपये मोजावे लागतात. आपल्य सारख्याच ते काम नव्हे. एका दिवसात सगळा पगार जायचा.एवढ्या प्रयत्ना नंतर नशिबाने या घराचा पत्ता मिळाला आहे. आता पर्यंत अनुभव लक्षात घेता, ‘आर या पार’ ही जागा हातची घालवायची नाही.
“मी जाते. पण एक मिनिट माझे ऐकाल आणि योग्य वाटले तर निर्णय तुमचा.”
ही पोरगी भलतीच स्मार्ट दिसते. वेगळा स्पार्क आहे हिच्यात ऐकून तर घेवू. तिचे मत मानण्याची थोडीच जबरदस्ती आहे.
“हं बोला. दोनच मिनिटात.माझ्याकडे जास्त वेळ नाही.”
“थॅक्स हं. मला सांगा. दोन पुरूष एकत्र राहू शकतात, दोन स्त्रिया एकत्र राहू शकतात तर एक पुरुष आणि एक स्त्री का एकत्र राहू शकणार नाहीत. त्यांची मने स्वच्छ असतील, काही गोष्टी सुरूवातीस स्पष्ट केल्या तर मित्रा प्रमाणे का नाही राहता येणार. “दिल दोस्ती दुनियादारी” टी.व्ही. वर बघितलं ना तुम्ही.”
“हे बोलायला सोपे वाटते. जीवन म्हणजे टी.व्ही वरील मालिका नव्हे. प्राॅक्टिकली हे शक्य नाही. दोन अनोळखी स्त्री पुरुष दहा मिनिटे जरी जवळून चालत गेले तरी लोकांच्या भुवया टउंचावतात. वेगळा अर्थ काढतात. तुम्ही तर एकत्र राहण्यांच्या गोष्टी करता आहात. हे शक्य नाही.”
“आपली गरज महत्त्वाची. आपल्या गरजेला लोक मदत करतात का? तमाशा बघत वेळ घालवतात पण दोन मिनिटे मदत करणार नाहीत. उलट जाताना फुकटचा सल्ला देतील. ती गोष्ट वेगळीच. आपल्या कृतीने दोघांच्या गरजा भागत असतील तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष का द्यायचे. या मताची मी आहे.”
“पण उद्या आपल्या वर शितोंडे उडतील, आपल्या बद्दल लोक वाईट बोलतील त्याच काय?”
“आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असलो म्हणजे झाले. मी दुनियेची चिंता करत नाही. तुम्हाला आर्थिक गरज आहे म्हणून ही जाहिरात दिली ना? पेंईग गेस्ट स्त्री की पुरुष हा प्रश्न माझ्या दृष्टीने गौण आहे.तुमचा आर्थिक भार हलका होणे महत्त्वाचे.माझी तयारी आहे.तुम्ही ही हो म्हणावे.मी मित्रा सारखी राहीन हे प्राॅमिस आहे माझे.”
या मुलीच्या बोलण्याची तडफ, तिचे विचार वेगळेच आहेत. खर बोलते ती. तसे ही तिच्या अब्रुसाठी मी नाही म्हणत होतो. तिच जर शंभरावर एक टक्का तयार असेल तर, काय हरकत आहे? जमल तर बघू, नाही तर जागा खाली करायला सांगू पण त्यासाठी आपण ही तिला लेखी करारात बांधून घेतले पाहिजे. नंतर कोणते झंगट नको. आपली अजिबात ओळख नाही, कुणाच्या माहितीतील नाही. केवळ विश्वासाच्या भरोश्यावर निर्णय घेतला पाहिजे.
“ठिक आहे. मी विचार करीन,पण एक लेखी करार करु. तो जर मोडला गेला तर मात्र घर सोडावे लागेल.”
“मला मान्य आहे. पण हे पक्के ना?”
तिथून बाहेर पडताना विभा पिसा पेक्षा ही हलकी झाली. मनावरच ओझं कमी झालं. आता ती तिच्या उद्दिष्टा जवळ आली होती. इथं परक्या ठिकणी उपर राहणं किती अवघड असते हे ती अनुभवत होती. निर्मलाचे उपकार न फेडण्या सारखे होते, कोण कुठली ती. ना नात्याची ना गोत्याची. तरी पाच सहा दिवस आसरा दिला. मायेन ठेवून घेतले. इथली माहिती दिली. चार ठिकाणी वेळ काढून माझ्यासाठी आली. चार ठिकाण हौसेने दाखवली. जेव्हा नाव प्रवाहात जाणार तेव्हाच धक्का देणे महत्त्वाचे असते. तो आधार मला दिला.
त्या तरुणाचा काय निर्णय येईल, सांगता येत नाही. मला पेंईग गेस्ट म्हणून ठेवून घेईल का नाही माहित नाही. पण तिथं राहणे म्हणजे…. पदरात निखारे बांधून घेण्या सारखे होते. प्रथमदर्शनी ती व्यक्ती सभ्य वाटली. ती तशीच असावी यासाठी प्रर्थना करू शकते चार दिवसांत मी कंपनी जाॅईन करीन. त्यापूर्वी मला निवारा मिळणे आवश्यक आहे. तसे ही मी बारा तास बाहेर असणार. झोपण्यासाठी घर हवं.तिच वेळ घातक असते. सगळे पुरुष वाईट नसतात. संशय घेऊन लागलो तर जगणे मुश्किल होवून जाईल. माझ्या या धाडसाला कोणी वेडेपणा म्हणू शकेल किंवा आणखी काही पण. माझा माझ्यावर विश्वास आहे. एस.टी., रेल्वे, सिनेमागृह, गर्दीत, तिथे अवतीभवती अनेक पुरूष असतात. आपल्याला सगळ्या पुरुषां बद्दल असे काही वाटते का? आपण तिथे समजूतीने वागतो ना. दुसरीकडे जागा मिळेल ही, पण तेवढा वेळ नाही. किती दिवस निर्मला अंटीकडे रहायचं.’ ऊस गोड लागला म्हणून मूळा पर्यंत खाऊ नये’ त्यानां त्रास देणे मला आवडणार नाही. जसे असेल तसे सामोरे जावे लागणार.
ठरल्या प्रमाणे करारावर सह्या करुन ती रहायला आली. त्यांने तिला खोलीची आणि घराची दोन किल्या दिल्या. ही तुमची खोली. मी रोज संध्याकाळी कामावर जातो. पहाटे घरी येतो. माझ्या किल्लीचा वापर मी करेन. तुम्ही तुमच्या सोईने बाहेर ये जा करु शकता. मला कोणता ही त्रास होता कामा नये. मी पहाटे घरी आलो की दिवसभर झोपतो. मला दंगा आवडत नाही. या गोष्टी मी करारात लिहिलेल्या आहेत, वाचलेल्या असतील. मी बॅंकेचा नंबर देतो तिथे भाडे भरा. त्यासाठी ही माझी वाट बघायची गरज नाही. तुम्ही जेवण तयार करण्यासाठी किचनचा वापर करू शकता. मी घरात जेवण करत नाही. मला हे इथं क ते तिथे का? असे विचारायचं नाही. तुमच्या काही सूचना असतील तर सांगा. तिने बोलणे टाळले, तो रात्रभर घरात नाही हीच मोठी गोष्ट होती. तिने आपले साहित्य लावले. देवाचा फोटो ठेवला.” इथं किराणा मालाचे दुकान कुठे आहे ते सांगा. मी साहित्य घेऊन येते”. त्याने माहिती दिली. तिने घर लावले. तो संध्याकाळी कामावर गेला. रात्री तिला या नवख्या जागेत झोप येत नव्हती. घरची आठवण येत होती.आपल्या घराची ऊब या घरात शोधत होती.
पहाटे पहाटे डोळा लागला.तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. आपला दरवाजा तो ठोठवणार नाही ना? कुलूपाची दुसरी किल्ली त्याकडेआहे. जर तो आत आला तर मी काय करणार? तिने उश्या जवळ चिलीस्प्रे ठेवला होता तो हातात घेतला, तो जवळ आला तर चिलीस्प्रे डोळ्यात उडवायचा आणि बाहेर पडायचे. एक मोठी काठी ही हाताशी ठेवली होती. आपण आपल्या तयारीत असावे. काय भरोसा. कोण? कधी? कसे? वागेल? तिची छाती थडथडायला लागली. डोळे मिटून घेतले. जीवाचा कान करून ती बाहेरील हलचाली टिपू लागली. तो आला पाणी प्याला आणि झोपी गेला. तेव्हा तिला हायसं वाटलं.
क्रमशः
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
मो.९६५७४९०८९२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈