डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
कालच अगदी उत्साहाने जयाताई अनुराधाच्या दवाखान्यात शिरल्या. बरोबर त्यांची मुलगी निरुपमा होती.
“बाई हे घ्या पेढे. आमची निरु आता एमबीए झाली बरं. तिच्या इच्छेप्रमाणे केलं पूर्ण हो तिने एमबीए. आता मनासारखी नोकरी मिळाली की गंगेत घोडं न्हायलं एकदाचं. ” जयाताई हसून सांगत होत्या.
जयाताई अनुराधाच्या फार पूर्वी पासूनच्या पेशंट. त्या, त्यांच्या मुली, सगळं कुटुंब येत असे डॉ अनुराधाकडे. ती त्यांची फॅमिली डॉक्टरच होती.
“ वावा. निरुपमा, खूप खूप अभिनंदन हं. ” पेढा तोंडात टाकत अनुराधाने निरुपमाचं कौतुक केलं.
“ थँक्स ताई. मला बहुतेक मिळेल नोकरी. आलेत काही ठिकाणाहून इंटरव्ह्यू साठी कॉल. ”
…. निरुपमा जयाताईंची मोठी मुलगी. दिसायला छान, हुशार आणि अगदी साधी मुलगी.
सहाच महिन्यांनी जयाताई पुन्हा दवाखान्यात आल्या.
“ डॉक्टरीणबाई, आमच्या निरुचं भाग्यच उजळलं हो. अहो, तिच्या कंपनीतल्याच केतन मराठेला ही फार आवडली आणि मागणीच घातली बघा त्याने. नाव ठेवायला जागा नाही हो या स्थळात. बघा ना, देवाच्या मनात असलं की किती सरळ होतात ना गोष्टी. ”
जयाताई अगदी आनंदून गेल्या अनुराधालाही खूप आनंद झाला. निरुपमा होतीच गरीब स्वभावाची आणि समंजस शांत. कोणतीही तोशीस न पडता खरोखरच दारात जावई चालत आला आणि निरुपमाचं भाग्यच उजळलं. सोन्याच्या पावलांनी निरुपमाने केतनच्या घरात पाऊल ठेवलं.
मराठ्यांच्या घरी सगळे लोक अगदी सडसडीत. फिटनेस फ्रीक. अगदी निरुच्या सासूबाई सुद्धा रोज योगासनाच्या क्लासला जायच्या. सासरे टेनिस खेळायला जायचे. केतनही उत्तम टेनिसपटू होता. त्या मानाने निरुपमा चांगली भरलेली होती पण सुरेख होती तिची फिगर.
…. निरुपमा अगदी रुळून गेली सासरी. सासरी माहेरी लाड करून घेत आणि वर्षसण, दिवाळसण करत मस्त मजेत होती निरु केतनची जोडी. निरुपमाची नोकरीही चालू होती आणि सासरी नोकरचाकराना काही कमी नव्हतं.
मध्यंतरी डॉ अनुराधा त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला चार महिने गेल्या होत्या. लेकाकडे जाऊन, जमेल तेवढी अमेरिका बघून अनुराधा चार महिन्यांनी दवाखान्यात आल्या.
दवाखाना उघडा दिसताच त्यांचे नेहमीचे पेशंट्स आलेच भेटायला. अनुराधाने आठवणीने आणलेली तिकडची चॉकलेट्स येतील त्यांच्या हातावर ठेवली. तिचा नेहमीचा दवाखाना सुरू झाला. जवळजवळ सहा महिन्यांनी निरुपमा त्यांना भेटायला आली. तिला बघून आश्चर्यचकित झाल्या अनुराधा.
…. चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत निरु केवढी जाड म्हणजे लठ्ठच झालेली दिसत होती. मान रुतली होती जणू खांद्यात.
निरुपमाने खुर्चीत बसकण मारली. , ” डॉक्टरबाई, हादरलात ना मला बघून? अहो गेल्या वर्षभरात माझं अतिशय वजन वाढलंय. काय करू काही समजत नाहीये. ब्लड रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत. मी डाएट केलं, जिम लावला, टेकडी चढायला जाते. थोडं कमी होतं की पुन्हा आहे तिथेच येतो काटा. ” अगदी निराश होऊन निरुपमा सांगत होती. “ आता मात्र मला काळजीच वाटायला लागलीय माझी. या लठ्ठपणामुळे माझा पिरियड वेळेवर येत नाही. अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. काय करू मी? ” निरुपमाच्या डोळ्यात पाणी होतं.
अनुराधाने नीट चौकशी केली. निरुपमा आणि केतनची लाईफ स्टाईल याला कारणीभूत होती.
पण मुळात केतनची शरीर प्रवृत्ती लठ्ठ होण्याकडे नसल्याने त्याचे वजन काहीही खाल्ले तरी अजिबात वाढत नसे. समाजातले तीस टक्के लोक या सुदैवी गटात मोडतात. पण निरुपमाचं वजन मात्र झपाट्याने वाढलं ते वाढतच गेलं.
केतन तिला बजावू लागला. ” निरु, जरा मनावर घे आता डाएट करायचं. तुला बरोबर घेऊन जायची आता लाज वाटायला लागलीय मला. “
…. निरुपमाला हे ऐकून अतिशय राग यायचा आणि मग त्याचं भांडणात रूपांतर व्हायचं. असं झालं की निरुपमा डबे उघडून ते सगळं फ्रस्ट्रेशन खाण्यावर काढायची. परिणामी महिन्याला आणखी दोन किलो वजनाची भर.
…. एक दिवस तिची जिवलग मैत्रीण तारा तिच्या घरी भेटायला आली. तारा तिचं लग्न झाल्यावर अमेरिकेला कायमचीच गेली होती. ताराने निरुला बघितलं आणि म्हणाली, ” अग काय हे. दुप्पट वजन वाढलं आहे तुझं. किती अफाट लठ्ठ आणि बेढब झाली आहेस निरु. कुठे पूर्वीची सुंदरी निरु आणि आत्ताची वारेमाप अस्ताव्यस्त वाढलेली निरु. ”
निरुपमा रडायला लागली. “ तूच शिल्लक होतीस आता हे म्हणायची. काय करू मी? ”
तारा म्हणाली. “ मी करते तसं करशील का? महिन्यातले आठ दिवस फक्त वॉटर डाएट करायचं. नंतर सुद्धा फक्त एकदा दुपारी जेवायचं. रात्री एक फळ खायचं. बघ करून.”
निरुपमाला हे सोपे वाटले. तिने निश्चय केला. त्या पूर्ण आठ दिवसात ती फक्त गरम पाणी पीत राहिली.
वजनाचा काटा चक्क तीन किलोने खाली आलेला दिसला. निरुला आनंदाश्चर्याचा धक्काच बसला.
अरे. आठ दिवस आपण फक्त पाणी पिऊन राहू शकतो? म्हणजे निश्चय केला तर हे सहज शक्य आहे तर.
निरुपमाने आता मनावर कंट्रोल करायचं ठरवलं. त्या दिवसापासून ती फक्त गरम पाणी पिऊन रहायला लागली.
सगळे जेवायला बसले की निरुपमा म्हणायची ‘ मला आत्ता भूक नाहीये. मी नंतर जेवते. ’
निरुपमाने रात्रीही जेवण सोडलं. त्या महिन्यात तिचं एकंदर सात किलो वजन कमी झालं.
केतनने कौतुक केलं. “ निरु, छान दिसायला लागलीस ग. काय करतेस हल्ली? नीट जेवतेस ना? अति डाएट करू नकोस हं. वाईट परिणाम होतात त्याचे. ”
“ नाही रे. मी अगदी नीट जेवते. तू काळजी करू नकोस. ” निरुपमाने केतनला खोटं सांगितलं.
एकदा सासूबाई म्हणाल्या, ”आज तू आमच्या बरोबरच जेवायला बसायचं आहेस. ये. आम्ही तुझी जेवणाच्या टेबलवर वाट बघतोय. ”
निरुपमाचा नाईलाज झाला. ती त्यांच्याबरोबर जेवायला बसली खरी. पण गेले दोन महिने तिच्या पोटात फक्त पाण्याशिवाय काहीही नव्हते. ते अन्न बघून तिला मळमळू लागलं आणि न जेवता ती उठून बाथरूम मध्ये जाऊन भडभडून ओकली. सासूबाई हे बघून अत्यंत घाबरून गेल्या. त्यांनी हा प्रकार केतनच्या कानावर घातला. केतनने निरुपमाला बळजबरीने भात खायला लावला.
“ नको रे, माझं वजन पुन्हा वाढेल “.. असं म्हणत निरुपमा बेसिन वर गेली आणि तिने तो ओकून टाकला.
आठ महिने झाले आणि 75 किलो वजन असलेली निरुपमा 50 किलो वर आली. निरुपमाला आता अन्नच नकोसे झाले. तिचं शरीर अन्न नाकारुच लागलं. केतन निरुपमाला घेऊन डॉ अनुराधांच्या डिस्पेनसरीत आला.
डॉ अनुराधा निरुला बघून हादरल्याच. खोल गेलेले डोळे, भकास चेहरा, अंगात अजिबात ताकद नाही. लटपटत होती ती चालताना. अनुराधाने केतनला बाहेर थांबायला सांगितलं.
“ निरु, आता नीट आणि सगळं खरं खरं सांग. या आठ दहा महिन्यात आरशात बघितलं आहेस का कधी? काय दशा करून घेतली आहेस अग? असा करतात का कोणी वेट लॉस? मूर्ख मुलगी. सांग बघू तू काय खातेस सकाळपासून सगळं सांग. ”
निरुपमा हसायला लागली. “ डॉक्टर, मी फक्त गरम पाणी पिते. गेले आठ महिने हेच अन्न आहे माझं. बघा. कोण म्हणेल आता मला जाड? दिसतेय ना मी पूर्वीची चवळीची शेंग?”
… अनुराधाला इतका संताप आला की या मूर्ख मुलीच्या दोन थोबाडीत ठेवून द्याव्यात. त्यांनी मुश्किलीने आपल्या रागावर ताबा ठेवला.
“ निरु, माझं ऐक. आता तू खरोखर छान दिसते आहेस. आजपासून रात्री थोडं जेवायला सुरवात कर बाळा. अगदी चार घास तुला आवडेल ते खायला लाग. मी तुला मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या देते त्या घ्यायला लाग. म्हणजे तू हेल्दीही रहाशील. एक महिन्याने हिला घेऊन या केतन.”
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈