सुश्री साधना काळबांडे
अल्प परिचय
शिक्षिका
छंद… वाचन, लेखन
पुस्तके प्रकाशित... पाऊलखुणा (काव्यसंग्रह), कातोळा (काव्यसंग्रह), कोचम (कथासंग्रह)
जीवनरंग
☆ “बाप्पु…” ☆ सुश्री साधना काळबांडे ☆
(वऱ्हाडी भाषेतली कथा)
जनार्दन बाप्पु शाळेत गुरुजी होते. गुरुजी म्हतले की लय धावपय करा लागे. शाळेत लेकराईले खीचळी शिजोया पासून त त्याईले लशीं द्या लोकू. शाळेत गेल्या गेल्या सरकारचा काय कागद इन काई सांगता येना. हे माईती द्या अन् ते माईती द्या. आज राती गुरुजीले काई झोप लागेना. या कळावून त्या कळावर होत. तशी जनी त्याईची बायको जनाबाई संतापली.
“आज जागरन करा लागते वाटते. झपा मुकाट्यानं”.
तशी सकावून झाली. हाती धोतराचा सोगा घेतला अन् निगाले. तसा त्याईच्या बायकोन आवाज देला…
“माय बाई सकावून सकावून कुठी चालले. च्या पानी घ्या लागत नाई काय आज?. तसेत च्या घेतल्या शिवाय कुठी जात ना… आज लय घाई झाली तुमाले. “
गुरुजीन ते आयकल. अन् जरासेक थांबले.
“बिचारे सकावून सकावून टोकू नको मले.. खिचळी शिजोयाले इधन आन्याले चाललो. लय घोर आय माल्या मांग.
गुरूजी बंडीत इधन घिऊन शाळेत गेले. चुल पेटून तांदुई टाके लोकु चुली जोळ बसले. भातान गदगद केल अन् गुरूजी आ पिसात गेले. पायतात त काय सरकारचा एक नवा कागद टेबलावर दिसला. त्याइन तो वाचला अन् डोकंक्ष्याले हात लावला.
“घेंव्व पंधरा दिवसात सरकारले कुटुंब नियोजनाची केस द्या लागते. आता एवळ्या लवकर कुठि भेटीन मले… सारी चिंता जीवाले “
गावात याले त्याले इचारल. जो तो म्हने… “गुरुजी मांगल्या वर्षीच केल राज्या”… अन् कोनी म्हने गुरुजी मले आठ दा दिवसात लेकरु होते पन म्या दुसऱ्याले हो म्हनेल आय… हजार रुपये पयलेच घेतले म्या. दुसरी बाई म्हने हजार रुपयाच्या खाली एक खळकु घेत नाई.
गुरूजी ईचारातच घरी गेले.
तसा त्याईच्या डोक्ष्यात लाईट लागला. त्याईन बायकोले अवाज देला.
“ओ ओम्याची माय इकळे ये व”.
तशी जनाबाई आली.
“तुह्या बयनीले किती लेकर आयत “.
“कोन कमलीले… तीले काय सात पोरी… अन् आठव आता पोटात आय… दा पंधरा दिवसात होईल आता बायतीन ते… आता बाया म्हनत आठवां किस्ना होते तिले पन तुमी काऊन इचारून रायले “.
“मले तिची लय आठोन आली “.
“माय बाई… माल्या बयनीची तूमाले आठोन येते लागे… काई काम अशीन तीच्या संग… “
गुरूजीन जनाबाई जोळ मनातली गोष्ट सांगतली….
“बिचारे सरकारच एक पत्र आलं… पंधरा दिवसात मले एक तरी अपरेशनची सरकारले केस द्या लागते. गावात ईचारल…. कोनी हो म्हनुन नाई रायल.. कमलीले इचार बर अप्रेशन करते काय आठव लेकरु झाल्यावर “.
तसी जनाबाईन बयनीले भेट्याले गेलीं.
“कमले बायतपन जोळ आल तुव…. मी कऱ्याले तयार आव… पन तुले अपरेशन करा लागीन अन् तुया बाप्पूले केस द्या लागीन… सारा खर्च करतात ते. तुले निवून दिऊन आनुन द्या लोकु. “
कमलीन ईचार करुन सांगतो म्हने अन् दोन दिवसात तीन हो म्हतल. गुरूजीले हरिक झाला. त्याईन कमलीच्या हरेक गोष्टीले हो म्हतल. कमली म्हने बाप्पु मले अँटो सईन होत नाई. जीप घिउन या. तसे गुरुजी जीप घीऊन साईले आन्याले गेले. सायीच्या सात पोरी संगच होत्या. त्यातल्या एका पोट्टीन मोठा कल्ला केला… तशी सायी बोलली.
“बाप्पु जीप उभी करा.. हे लायनी पोट्टी वकतो म्हंते. आता तीच पोट रिकाम होईन. हटेलीतून तीले काई खायाले घेजा. एखाद्या किलो चिवळा अन् जिल्ब्बी घिउन या. “
गुरुजीन जीप थांबोली. पोट्टी वकेलोकु हटेलीत गेले अन् खायाले आनल. तेवळ्यात एका पोट्टीन पाय घासन सूरू केल.
“आता ईले काय पायजे बापा कमले”
“बाप्पु तिले पेळे आवळतात.. जिल्ब्बी खात नाई ते. पावंक किलो पेळे आना अन् या शीलीले पापळी आवळते अन् या चौथ्या नंबरच्या पोट्टीले बुंदीचे लाळू आ वळतात. लय दिवस झाले तीन खाल्ले नाईत. “
गुरुजीन डोकश्याले हात मारला. मनात आल… आता पुळे काय काय मांगतात देव जाने. थांबत थांबत जीप घरालोकू पोहोचली. गुरूजी घरात गेले. तशी जनाबाई मांगच आली.
“लय उशीर लावला. पोट्ट्याइन तरास देला वाटते रस्त्यात.. तुमी त लयच सोकले. “
तशी कमली साऱ्या पोट्ट्या घिऊन दनदन घरात आली.
“बाई माल्या साऱ्या पोरीले खायाले दे. सारी भुक लागली. वकु वकू थकल्या माल्या पोरी. बाप्पु बिस्कीट मिस्किटचे पुळे आना डझनभर “.
गुरूजी दुकानात गेले अन् पोरीले खायाले आनल. आता सायीच पोट कदी दुखते याची रोज वाट पायत. पन सायीन त्याईले सांगातल..
“हे पा बाप्पु जर मले आठवी पोरगी झाली त मी अपरेशन करनार नाई. सांगून ठेवतो तुमाले. माल्या नवऱ्याचा निरोप म्या तुमाले सांगतला नाई अजून. ते म्हनत.. जर आपल्याले आता पोरगी झाली त दोन तीन पोरी तुह्या बाप्पुले वागोयाले लावजो. एवळ्या जनाचां खर्च आपल्याकुन होनार नाई. “
हे आयकुन गुरुजींच्या डोयाले डोया लागेना. अन् शाळेत मन लागेना. ते एकच देवाजोळ म्हनत… “देवा सायीले पोरग हु दे “.
दिवस उगयला. गुरूजी सायीले घिऊन दवाखान्यात गेले. तीले पोरग झालं. तिच्या पेक्षात गुरूजीले हरिक झाला. तीच कुटुंब नियोजनाच अपरेशन झालं अन् गुरूजीले केस भेटली. सरकार दरबारी केस सादर केली. त्याईच्या जीवात जीव आला. दवाखान्यातून सायीले घिऊन घरी गेले. पायतात त काय… घरासमोर दोन तीन मोठे अँटो उभे. घर पावन्याईन सट्ट भरेल. सायीच पोरग पाह्याले तिचा नवरा, सासु, जेठानी, जेठ आलत चुलत सारे दा वीस जन हजर अन् जनाबाई त्याईचा सयपाक करुन राह्यली होती. गुरूजीन डोकशाले हात मारला. तेवळ्यात जनाबाई त्याईच्या जोळ आली.
“तुमाले तिकळे कोनाची अपरेशनची केस भेटली नाई… माल्या भवती पा आता कसा घोर झाला. माल्या अजुन तीन चार ब यनी याच्या राह्यल्या कमलीच पोरग पाह्याले. रोज चुमळीभर दयन लागते आता. “
गुरूजी जनाबाईले म्हनत.. “आता उखयात मुंडक घातल त रट्टे सईन करा लागतीन पावू काय होते पूळे “
सारे पावने दोन दिवसांत गेले पन कमलीचा नवरा काई गेला नाई. सट्ट खाये अन् मस्त पसरे. रोज कमलीचा पोरगा पायाले पावने येतं. दोन मयने झाले तरी कमली घरी जायाच नाव घेना. एकदिवस ते जनाबाई जोळ आली.
“मी काय म्हनतो तु माली मोठी बयीन आयस. तुये जवाई म्हंनतात की सातव्या पोरीवर आपल्याले पोरग झालं. तुह्या बाप्पुले पोराचं बारस कऱ्याले लाव. त्या शिवाय काई आमी अठून जात नाई. “.
गुरूजी शाळेतून आले अन् जनाबाइन त्याईले बयनीचा निरोप सांगतला. तसे गुरुजी मटकन खाली बसले.
“अव मले दुसऱ्या बाईची अपरेशची केस हजार रुपयात भेटत होती. म्या घेतली नाई. मले वाटल तुही बयीन फुकटात पळीन. माला मांगल्या मयन्याचा सारा पगार खलास झाला. उसने पासने घेतले. आता बारश्याले कुठून पैसा आनु. “
कमली घरी जायाच नाव घेना. म्हनुन गुरुजीन बारस कऱ्याच ठरोल. तसा जनाबाई दुसरा निरोप घिऊन आली.
“अव कमली काय म्हनते.. तिच्या पोराले सोन्याचा बायतीळा पायजे. गयात सोन्याचा ओम, हातात सोन्याचे मनी, आंगठी, कानात सोन्याचे डुल पायजात. अन् दोन तीन डीरेस पोराले अन् सातई पोरिले फराक पायजात. “
आता त गुरुजीले गस आली. सोनत लय महाग झाल. एवळा पैसा कुठून आनाव. साठ सत्तर हजाराचा गच्चू अन् खिशाले चाट बसते आता. तेवळ्यात जनाबाई आली.
“अजुन एक कमलीचा निरोप आय. ते म्हंते मले सादी साळी पायजे नाई. म्या बाप्पुच मोठ काम केलं. मले पैठनी पायजे अन् माल्या बॉले कपळे पायजात. बा रश्यात माल्या बॉच्या साऱ्या बयनी, जवाई, सगेसोयरे बलावा. नाईत राग भरतीन ते. माल्या सासूच्या इकळले सारे मायेरचे बलावा. ज्यादा नाई शंभरक होती न. पंगतीत साजर सूजर कऱ्याले लाव. शेव, बुंदीचे लाळु, वरन, भात, पातोळीची भाजी, तोंडी लाव्याले लुंजी ठेवा पंगतीत “.
सारं आयकुन गुरुजीले वाटे. हे धरनी फाटाव अन् त्यात आपून गायप व्हावं. पन इलाज न्होता. तशी सायी घरी तिच्या जात नाई म्हने. कमलींन साऱ्या पोरी गुरूजीच्या मागं कपळे घ्याले लावून देल्या. गुरुजीन साऱ्याइले कपळे लत्ते घेतले. सोन नान आ नल. लिस्ट तयार केली त दोनशे जन बारश्यासाठी झाले. दारात मंडप टाकला. वाजंत्र सांगतल. पंगत ठेवली. दोनशे म्हनता म्हन ता येटायातले सारे, ज्याईले बलावल नाई तेई आले. काई म्हनत गुरूजीले आठोन नशीन रायली बलाव्याची चाला जेव्याले नाईत राग इन.. सारं गावं जेव्याले उलटल. सारं सरत सरत आल. डबल सयपाक करा लागला. गुरुजी हन्याशी आले. पंगता उठता उठता संध्याकाय झाली. शेवटी गुरुजी अन् जनाबाई जेव्याले बसले. ताटात फक्त पोई अन् भाजीच उरली. दुसऱ्या दिवशी गुरुजीले वाटल सायी जाईन. त्याईन जनाबाईले बलावल.
“काव आता ई तूही बयीन जात नाई काय?”
“जातो म्हनते पन तीले पाच दा हजार संग पायजात अन् गवाच एखांद पोत, तुरीची, उळदाची, मुगाची दाय अन् स्पेशल जीप करून पायजे. “
आतात गुरुजींच्या डोयाले धारा लाग्याच्या रायल्या.
गुरुजीन सायीले जीप करुन देली. तिच्या सात पोरी, आठवा पोरगा नवरा तिचं सामान, दायदाना सारं देलं अन् मोठा स्वास बाईर टाकला. जीप दुर जाये लोकु गुरुजी पायत रायले. जनाबाई अन् गुरुजी घरात आले.
“ठेव बर जरासाक च्या. मंग मी हिसोब करतो”.
तसा जनाबाईन च्या ठेवला. दोघाईन च्या घेतला. गुरुजीन हिसोबाची वयी हातात घेतली अन् थंडेच पळले. कुटुंब नियोजनाच अपरेशन लाखाच्या घरात पळल होत. गुरुजीले घेरीच आली. याच्या पेक्षा दुसऱ्या बाईले अपरेशनसाठी हजार रुपये द्याले पुरत होते. सायीच अपरेशन फुकटात पळीन असं वाटल. झाल उलटच. तेवळ्यात शेजारच पोट्ट पयत आल.
“गुरूजी तुमचे पावने गेले ना ते जीप आमच्या वावरा जोळ बंद पळली. त्यातल्या पोरी लय लळुन रायल्या. तुमाले अँटो घीउन बलावल. “
गुरुजींच्या कानाचे जसे परदे फाटले. ते जागीच थंडे पळले. आंगात हिव धसल. खलखल हा लले अन. आंगावर वाकय घिऊन झपून रायले.
© सुश्री साधना काळबांडे
अकोट जि. अकोला पिन. 444101 मो. 9767993827
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈