श्री मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ उदरभरण नोहे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
“आत्मशांती” उपाहारगृह हे खादाडीसाठी एक लोकप्रिय ठिकाण. प्रत्यक्ष उपाहारगृहात बसून खाण्याचा आनंद तर घेता यायचाच, शिवाय कालानुरूप स्विगी, झोमॅटो आदिंवरून घरपोच खाणे मागवण्याची सोयही येथे होतीच. बरेच जण फोनवरून ऑर्डर करून खाणे तयार करून ठेवायला सांगायचे आणि स्वतः येऊन पार्सल घेऊन जायचे.
आजही तशीच एक फोनवर ऑर्डर आली होती. कोण्या संपतशेठचा फोन होता. अर्ध्या तासात येतो म्हणाला. अर्धा तास होऊन गेला, तास होत आला तरी संपतशेठचा पत्ता नाही. मग मॅनेजरने त्याला फोन करून आठवण करण्याचा प्रयत्न केले, दोन चार वेळा पूर्ण रिंग गेली तरी कोणी फोन उचललाच नाही. आणि मग नंतर फोन करायचा प्रयत्न केल्यावर “आत्मशांती”चा फोन ब्लॉक केल्याचं लक्षात आलं. ही ऑर्डर घ्यायला कोणी येणार नाही, संपत नावाने फोन करून कोणीतरी चावटपणा केला आहे हे मॅनेजरच्या लक्षात आलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी मॅनेजरने संपतच्या फोनवर मेसेज पाठवला आणि समाज माध्यमांमध्ये या पूर्वपीठीकेसह तोच मेसेज प्रसिद्ध केला.
“प्रिय संपत (किंवा जे काही आपले खरे नाव असेल ते),
काल संध्याकाळी तुम्ही आमच्या “आत्मशांती”मध्ये फोन करून जेवणाची ऑर्डर दिली होतीत, परंतु तुम्ही ती ऑर्डर स्वीकारायला आला नाहीत. तुम्हाला फोन केले, तुम्ही ते उचलले नाहीत आणि नंतर तर आमचा फोन ब्लॉकच केलात.
तुम्ही न आल्याने आमच्या शेफची मेहनत आणि साधनसामुग्री फुकट जाणार होती, आमचं आर्थिक नुकसान होणार होतं आणि मुख्य म्हणजे ते अन्न फुकट जाणार होतं, याचं आम्हाला जास्त दुःख होतं.
आपल्या “आत्मशांती”चे ब्रीदवाक्य आहे – उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म ! आम्ही “आत्मशांती”कडे निव्वळ तुमचे पोट भरण्याचे आणि आमच्यासाठी नफ्याचे साधन म्हणून पाहत नाही, सात्विक अन्नदान ही आमची भूमिका आहे.
आम्ही देवाची प्रार्थना करतो, की तुम्हाला आमची ही भूमिका लक्षात येवो आणि काल तुम्ही जो चावटपणा केलात, अन्नाचा अपमान केलात, तसं तुम्ही पुन्हा केव्हाही कोणाहीबरोबर न करोत.
पण वाईटातून नेहमी चांगले निघते म्हणतात तसं आमच्याबाबतीत काल घडलं. तुमच्या न येण्यामुळे श्री संतोष जगदाळे या मेहनती माणसाला मदत झाली.
तुम्ही घेऊन न गेलेल्या ऑर्डरचे काय करायचे, ती फुकट कशी जाऊ द्यायची नाही या विचारात आम्ही असतानाच श्री संतोष “आत्मशांती”मध्ये आले. साठएक वर्षांचे संतोष एका गोदामावर रखवालदार म्हणून काम करतात. ते, त्यांची सून आणि त्यांची दोन नातवंडं पंधरा दिवसांपूर्वीच या शहरात आले आहेत. यांना नुकतीच नोकरी लागली आहे, पगार अजून व्हायचा आहे, सून लहानमोठी कामं करून दोन पैसे मिळवायची पण कालपासून ती आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहे.
आज दिवसभर त्यांना आणि घरच्यांना उपवासच घडला होता, म्हणून एक संधी घ्यावी म्हणून ते आमच्याकडे काही काम आहे का, आणि त्या मोबदल्यात काही अन्न मिळेल का हे विचारायला आले होते.
त्यांची हकीकत ऐकल्यावर आम्ही सर्वप्रथम तुमच्या ऑर्डरचे अन्न त्यांना खायला देऊ केले. संतोष ते अन्न तसंच घरी घेऊन चालले होते, पण आम्ही त्यांना आश्वस्त केलं की घरी घेऊन जायला वेगळे अन्न दिले जाईल.
ते इथेच आमच्याकडे भरपेट जेवले, तृप्त झाले. आमच्या व्यवस्थापनाने त्यांना आठवडाभरासाठी रोज काही पोटभरीचे अन्न देण्याचा वायदा केला आहे.
त्यांच्या सूनबाईंची प्रकृती सुधारल्यावर त्यांना आमच्याकडे काही नोकरी देता येईल का हेही आम्ही प्रयत्न करून पाहणार आहोत.
सून नातवंडांसाठी खाणे घरी घेऊन जाताना संतोषच्या चेहऱ्यावरून ओसंडून जाणारे समाधान पाहताना आम्हाला यज्ञपूर्तीचा आनंद लाभला.
तुमची वर्तणूक तुम्हाला लखलाभ असो. आम्हाला संतोषदादांसारख्यांसाठी आमचे यज्ञकर्म अव्याहत सुरूच ठेवायचे आहे.
धन्यवाद !”
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈