श्री सुनील शिरवाडकर
जीवनरंग
☆ जयु… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
जयु खुप अस्वस्थ झाला होता.. आज सकाळपासून सगळंच मनाविरुद्ध घडत होतं.. नेहमीप्रमाणे तो उठला नऊ वाजता.. उठल्यावर सगळ्यात पहिले त्याला ऐकावं लागलं होतं बायकोचं बौध्दिक.. आज पियुचा वाढदिवस.. तिला शाळेत सोडवायला दोघांनी जायचं ठरलं होतं.. तरीही नऊपर्यंत झोपुन रहातो म्हणजे काय?सात पासुन उठवते.. पण उठायला तयारच नाही.
कंटाळा आला तिला.. शेवटी कंटाळून तिने पियुला व्हॅननेच शाळेत पाठवले.. नऊ वाजता जयु उठला.. सॉरी सॉरी करत त्याने आवरायला घेतलं.. नऊ पर्यंत झोपतो तो.. पण तेवढी झोप आवश्यक तर असते ना.. तो घरी यायचा मुळात बारा नंतर.. मग जेवण बिवण आटोपून झोपायला एक वाजायचा.. म्हणुन मग सकाळी उशीर.
चार वाजता कामावर जायला निघाला.. जयु झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय होता. संध्याकाळ पासुन त्याची ड्युटी सुरू व्हायची.. आज घरुन निघाला. बाईकवर,. मागच्या सीटवर असलेल्या डिलीव्हरी बॅगवर फडकं मारलं.. किक मारली.. थोड्या पुढे गेलं तर हॅंडल डगमगायला लागलं.. पुढचं चाक पंक्चर..
नशीबाने पंक्चर काढणारा जवळच होता.. तिथपर्यंत गाडी ढकलत नेली.. टायरबियर खोललं.. चेक केलं..
“साहेब.. ट्युब बदलुन टाका आता.. लय पंक्चर झालेत. “
“तु आत्ता तर करुन दे. बघु परत पंक्चर झाली की ट्यूब बदलुन टाकु. “
पंक्चर काढण्यात तास गेला.. उशीर झाला.. त्याबद्दल ऑनलाईन शिव्याही खाल्ल्या.. तोपर्यंत कॉल यायला सुरुवात झाली..
संध्याकाळी कसं.. बहुतेक डिलीव्हरी चाट वगैरेंच्या असतात.. वेगवेगळ्या ठिकाणांहून पार्सल उचलायचे, आणि लोकेशन्स वर पोचवायचे.. फारसा पगार मिळत नाही.. आणि शिक्षण सुध्दा नाही.. त्यामुळे यापेक्षा दुसरा जॉब सध्यातरी नव्हता.. पगारा व्यतिरिक्त थोडाफार इंटेन्सिव मिळायचा.. भागुन जायचं कसंतरी.
चार वर्षांपासून जयु हे काम करतोय. बारावी नंतर त्यानं कॉलेजला रामराम ठोकला.. दोन चार वर्षे अशीच गेली.. मग जॉब शोधण्यात वर्ष गेलं.. बारावी झालेल्या मुलाला काम तरी कुठलं मिळणार?मग हे झोमॅटोचं काम मिळालं.. हातात चार पैसे पडु लागले.. वर्षभरात लग्न पण झालं.. पियुचा जन्म झाला.. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं.. सुरु आहे.
पण अलीकडे त्याचं मन या कामात लागत नाही.. सुरुवातीला.. म्हणजे लग्नापूर्वी पैसे पुरायचे. पण आता चणचण भासू लागली.. पगारवाढ पण फारशी होत नाही.. पेट्रोल.. गाडीचा मेंटेनन्स यातही बरेच पैसे जातात..
खिशातला मोबाईल वाजला.. घरुन फोन होता.
“अहो.. आज लवकर येताय ना? बाकीचं सगळं मी आणलंय.. फक्त आईस्क्रीमचा पॅक तेवढा येताना घेऊन या. “
“हो.. पण मला यायला दहा तरी वाजतील.. तु फोन ठेव. “
“नका हो एवढा उशीर करू.. आजतरी या ना नऊ पर्यंत. “
हो हो करत जुने फोन ठेवला.. का काय माहित.. पण आज तो खुपच चिडचिड करत होता.. मनाशी सारखी तुलना.. आपलं आयुष्यच सालं वणवण करत जाणार.. कडाक्याची थंडी असो.. नाहीतर कोसळणारा पाऊस असो.. मोबाईल मध्ये बीपबीप झालं की वळवा गाडी..
फुड पार्सल घेऊन आपण इथे तिथे जातो.. काय घरं असतात लोकांचे.. काय जिणं असतं काहींचं.. त्यांचं खाणंपिणं.. हॉटेलींग.. अश्या सुस्थितीत असणाऱ्या वर्गाबद्दल त्याच्या मनात नकळतच एक द्वेषाची भावना निर्माण झाली होती.. मनात सारखे निगेटिव्ह विचार.. असं वाटायचं की..
तेवढ्यात मोबाईल मध्ये बीपबीप झालं.. गाडी बाजूला घेऊन त्यानं पाहिलं.. जवळच्या एका गाडीवरून पाच पार्सल उचलायचे होते.. डिलीव्हरी लोकेशन फार दुर नव्हतं.. लगेच त्यानं गाडी वळवली..
त्या पाणीपुरी स्टॉलवर फार गर्दी नव्हती.. अक्षरशः पाचच मिनिटांत त्याच्या हातात पार्सल मिळालं.. त्यानं मागच्या सीटवर असलेल्या बॅगमध्ये ते टाकलं.. ॲड्रेस पाहीला.. बापरे.. आठवा मजला होता तो सोसायटी मधला.. त्याला हे असं मोठ्या सोसायटीत जाणं नको वाटायचं.. एकतर गेट वरच अडवलं जायचं.. ज्याच्या कडे जायचं त्यांनी खाली येणं अपेक्षित असतं.. पण त्यांना अगदी दाराशी डिलीव्हरी हवी असायची.. काही बोलायला गेलं तर शिव्या.. आपल्याला अगदी विकतच घेतात हे लोक.. तसंच बोलणं असतं त्यांचं..
पार्सल घेऊन तो त्या पत्त्यावर पोचला.. फोनबीन केला.. लगेच एक लहान पोरगं खाली आलं.. त्याच्या हातात पार्सल दिलं.. तोवर दुसऱ्या डिलीव्हरीचा मेसेज आलाच होता..
जितक्या जास्त डिलीव्हरी.. तितकं इंटेन्सिव मिळायचं जयुला.. आज तो रात्री उशिरापर्यंत काम करणार नव्हता.. त्यामुळे साहजिकच त्याची कमाई कमी होणार होती.. चिडचिड व्हायला हेही एक कारण..
पण हळूहळू त्याचा मुड बदलत गेला.. माणसाचं कसं असतं ना.. एखाद्या छोट्या गोष्टीमुळे जसा मुड जातो.. तसं एकदोन गोष्टी मनासारख्या झाल्या, तर मुड छानही होऊन जातो.. त्याला जवळचेच डिलीव्हरीचे कामं मिळत गेले.. पार्सल ही पटपट मिळत गेले.. ट्रॅफिक मधुन जाताना ग्रीन सिग्नल पण लगेच मिळत गेले.. कुठल्याही सोसायटीत एकही कुत्रं मागे लागलं नाही.. कुठल्याही सोसायटीत लिफ्ट बंद नव्हती.. कुठेच फारसे जिने चढावे लागले नाही.. का कोण जाणे.. पण मनात एक वेगळीच आनंदाची भावना निर्माण होत गेली.. रात्री उशिरापर्यंत पर्यंत फिरुन जेवढी कमाई व्हायचीच.. तेवढी आत्ता दोन तासात झाली.
मस्तच गेली संध्याकाळ.. जयु स्वतःच्याच मनाशी बोलत होता.. उगाच आपण उदास होतो.. देवानी खुप जरी दिलं नाही.. तरी दिलं ते कमी सुध्दा नाही.. आपल्याला एक गोड पोरगी दिली ना पियु सारखी..
आता हे शेवटचं घर.. हे पार्सल दिलं की आपण आपल्या घरी..
शेवटच्या घरी तो पार्सल घेऊन गेला.. आजोबा आणि आजी असे दोघंच तिथे रहात होते.. तिथं रेडिओ वर गाणं लागलं होतं..
बाळाच्या चिमण्या ओठातुन
हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे
जन्म फुलांनी घेते
जयुचं फारसं शिक्षण नव्हतं.. त्याला गीतामधला गर्भित अर्थ समजला नाही.. पण डोळ्यासमोर आली ती त्याची लहानगी पियु.. पप्पा पप्पा अशी चिमण्या ओठातुन.. बोबड्या बोलात हाक मारणारी आपली लाडकी पियु.. आज तिचा वाढदिवस.. खरंच.. आता लवकर घरी जायला हवं.. वाट पहात असेल ती आपली..
रेडिओ वर गाणं चालुच होतं..
या जन्मावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
गाणं गुणगुणतच.. झकास मुड मध्ये जयु घराकडे निघाला.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈