सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ मोठा… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
दुपारी आजीने अधीरला तयार केलं आणि त्याला बसपर्यंत सोडायला निघणार, तेवढ्यात अधीरने रडायला सुरुवात केली, “माझ्या पोटात दुखतंय. मी शाळेत जात नाय. ”
“थांब. तुला औषध देते. पटकन बरं वाटेल. ” आजीने औषधाची बाटली आणली.
“नको. हे कडू आहे खूप. “
“पण लगेच बरं वाटेल तुला. “
“नाय. तेवढं दुखत नाय. कमी दुखतंय. ”
“मग शाळेत जा तर. ”
या सगळ्यात स्कूल बस निघून गेली.
‘अरे बाप रे !आता याला शाळेत पोचवायला जावं लागणार!’आजीला थोडा स्ट्रेस आला.
तेवढ्यात अखिल शाळेतून घरी आला.
“अखिल, याला शाळेत पोचवून येशील बाळा?माझ्याने जाववत नाही आहे. “
“का? आज बस नाही आली?”
“ह्याच्या पोटात थोडंसं दुखतंय म्हणत होता. त्यामुळे बस चुकली. टीचरकडे नेऊन पोचव. आणि बसवाल्या काकांना सांग, संध्याकाळी बसमधून घेऊन यायला. ”
“चल, ” अखिल अधीरला घेऊन शाळेकडे निघाला.
शाळेत गेला, तर बसमधली मुलं आधीच उतरली होती.
“मी तुला टीचरकडे सोडतो आणि परत जातो हं, ” अखिल म्हणाला. अधीर काही बोललाच नाही.
शाळेच्या गेटकडेच चार छोटी मुलं हातात हात धरून रस्ता अडवून उभी होती.
“दाsदाss”भेदरलेल्या अधीरने अखिलचा हात घट्ट पकडला.
“काय झालं?”
त्या मुलांनी अधीरच्या दादाला बघितलं मात्र, ती घाबरून पळत सुटली.
“तू मारामारी केलीस त्यांच्याशी?” अखिलने अधीरला विचारलं.
“नाय. मी फक्त मानसला धक्का मारला. तो विशेषच्या अंगावर पडला. विशेषचा धक्का लागून आरव पडला. आरव अन्मेषला धरायला गेला, तर अन्मेषपण खाली पडला. ”
“तू एवढ्या जोरात धक्का मारलास मानसला?”
“नाही. मी हळूच ढकलला होता. ”
तेवढ्यात शाळेची बेल झाली.
अखिलने घरी आल्यावर ही गोष्ट सांगितली, तशी आजी हसतहसत म्हणाली, ” मला वाटलंच होतं, ह्याने काहीतरी मस्ती केली असणार. म्हणून शाळेत जायला घाबरतोय आणि पोटात दुखायचं नाटक करतोय.
“किती वाजले?”आजोबांनी विचारलं, तेव्हा अखिलने गृहपाठ करताकरताच म्हटलं, “आजोबा, गेल्या पाच मिनिटात चौथ्यांदा विचारताय तुम्ही. “
आजी हसायला लागली, ” काही नाही, अरे. चहा हवा असणार त्यांना. करते, करते. जरा जेवण तरी खाली उतरू द्यायचं. बरं. करते चहा. चहा आणि बिस्किटं घ्या आता. नंतर थोड्या वेळाने तिखट सांजा करते. अधीर यायची वेळ झाली की. गरम असेल तर खातो नीट. नाहीतर चिवडत बसतो. “
“आजी, तू त्याचेच लाड कर, ” अखिल रुसल्या सुरात बोलला.
“अरे, तुझेपण लाड करतेच की मी. आज दुधीभोपळ्याची भाजी तू नीट खाणार नाहीस, म्हणून सांडगे-पापड तळले ना तुझ्यासाठी!”
“ते सगळे पोचले आपल्या गंतव्यस्थानी. आता चहाची हुक्की आलीय. “-आजोबा.
“करते हो, “आजी गुडघ्यावर हात ठेवून जरा पुढे वाकली आणि उठायला गेली. पण उठण्याऐवजी ती धप्पकन पुन्हा सोफाचेअरवर बसली आणि तिची मान लुढकली.
“अगं, काय झालं?” आजोबांनी काळजीने विचारलं. अखिलही धावला. पण आजी जराही हलली नाही.
“अरे, शुद्ध गेली वाटतं तिची. पाणी शिंपड तिच्या तोंडावर. ”
अखिलने आजीच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तिच्या डोळ्यांना पाणी लावलं. पण आजी तशीच.
मग मात्र आजोबा घाबरले. ” अरे, डॉक्टरांना फोन कर. आई-बाबांनाही फोन कर. शेजारच्या काकूंना बोलाव. “
“आजोबा, डॉक्टर म्हणताहेत- तासाभरात दवाखान्यात जायला निघणार. आधी तुमच्याकडे येतो. “
“दे माझ्याकडे फोन. मी बोलतो. ‘डॉक्टरसाहेब, हिची शुद्ध गेलीय. अटॅक आल्यासारखं वाटतंय. तुम्ही लगेचच या. ‘ “
“बरं, बरं. निघतो मी. “
मग आई-बाबांना फोन करून अखिल शेजारच्या काकूंना बोलवायला गेला.
डॉक्टरांनी आजीची नाडी तपासली. पापण्या वर करून डोळे तपासले. बीपी तपासलं.
“माझं सगळं वेळच्या वेळी करायच्या गडबडीत तिच्या स्वतःच्या गोळ्या बरेचदा घ्यायच्या राहून जातात. मलाच आठवण करून द्यावी लागते तिला, “आजोबा म्हणाले, “डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागेल का? तुम्ही हॉस्पिटल ऑथॉरिटीजशी बोलून घ्या. म्हणजे लगेचच अॅडमिट करतील ते. “
डॉक्टरांनी हातानेच त्यांना ‘थांबा’ अशी खूण केली. आणि काकूंच्या मदतीने आजीला बिछान्यावर आणून झोपवलं.
डॉक्टर आजीला सीपीआर द्यायला लागले. ते एवढा जोर लावत होते, की आजीला दुखणार, असं अखिलला वाटलं. पण आजीच्या चेह-यावर ना दुखण्याची खूण दिसत होती, ना तिच्या तोंडून ‘हायहुय’ फुटत होतं. थोडा वेळ प्रयत्न करून डॉक्टर थांबले. अखिलला म्हणाले, ” मला प्यायला पाणी आण थोडं. ”
“काय…. काय झालंय तिला?” आजोबांनी काळजीने विचारलं.
पण डॉक्टर आजोबांकडे फक्त बघत राहिले.
“तुम्ही… हॉस्पिटलला… फोन… करा ना, डॉक्टर. अॅम्ब्युलन्सही बोलवा. माझी सून येईल तोपर्यंत. “
पण डॉक्टर काहीच बोलले नाहीत.
“चहा घेणार का?” काकूंनी विचारलं. पण डॉक्टरांनी हातानेच ‘नको’ अशी खूण केली.
तेवढ्यात उमा आली.
“काय झालं, डॉक्टर, आईंना?”
“शी इज नो मोअर. मॅसिव्ह अटॅक असणार. “
उमाचे डोळे पाण्याने डबडबले. अखिल जाऊन आईला बिलगला.
आता कुठे आजोबांना सत्य परिस्थितीची जाणीव झाली. काकूंनी त्यांना प्यायला पाणी दिलं.
तेवढ्यात महेशचा फोन आला. तो निघाला होता. उमाला त्याच्याशी बोलायला सुधरेना. मग डॉक्टरच बोलले त्याच्याशी.
काकूंनी उमाला विचारून एकेका नातेवाइकाला फोन लावायला सुरुवात केली.
आजीच्या फोनचा टायमर वाजला. अधीर शाळेतून यायची वेळ झाली होती.
उमाने अखिलला जवळ घेतलं आणि म्हटलं, ” आता हळूहळू सगळे जमायला लागतील….. पुढचे विधी बघून अधीर घाबरून जाईल. तू त्याला घेऊन बागेत जा. माझ्या पर्समधले पैसे घे. दोघंही काहीतरी खा पोटभर आणि मग खेळायला जा. ”
आजी पुन्हा दिसणार नाही, या विचाराने अखिल सद्गदित झाला होता. त्याने जाऊन झोपलेल्या आजीला मिठी मारली, तिचा पापा घेतला आणि तो निघाला.
“हॉटेलात खायचं आपण? किती मज्जा ना! पण आजी ओरडणार नाय ना?”
अखिलच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
“तू रडतो कशाला, दादा?”
“नाही रे. रडत नाही मी. डोळ्यात काहीतरी गेलं. “
मोठ्या माणसांशिवाय असा अखिल पहिल्यांदाच हॉटेलमध्ये आला होता. मग त्याने मेन्यूकार्ड बघितलं. त्या पदार्थांच्या किमतीही बघितल्या. आयुष्यात पहिल्यांदाच. मग आपल्याकडचे पैसे आणि बिल यांचाही त्याने हिशेब केला.
अधीर मिटक्या मारत खात होता. अखिलच्या घशाखाली काहीच उतरत नव्हतं. मघासच्या सगळ्या गोष्टी ‘अॅक्शन रिप्ले’प्रमाणे त्याच्या डोळ्यांसमोर येत होत्या.
बागेत जात असताना समोरच्या बिल्डिंगमधल्या मावशी भेटल्या, ” काय रे, काय झालं तुझ्या आजीला? ब-या होत्या ना त्या? पहिल्यांदा मला वाटलं, तुझे आजोबाच गेले की काय? मग कळलं, आजी गेल्या म्हणून. “
अखिलला त्यांच्या बोलण्याचा खूप राग आला. तो काहीच बोलला नाही.
त्या गेल्यावर अधीरने विचारलं, ” दादा, त्या मावशी काय म्हणत होत्या? आजी कुठे गेली?”
“बागेत गेल्यावर सांगतो. “
तेवढ्यात एक झोपाळा रिकामा झाला. प्रतिक्षिप्त क्रिया झाल्याप्रमाणे अधीर धावत जाऊन त्या झोपाळ्यावर बसला आणि झोके घेऊ लागला.
– क्रमशः भाग पहिला
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈