श्री संदीप काळे
जीवनरंग
☆ त्या परदेशी पाहुण्याच्या आठवणीत…! ☆ श्री संदीप काळे ☆
मुंबईला 23 फेब्रुवारी रोजी “व्हाईस ऑफ मीडिया” आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दरवर्षी मी आशितोष कांबळे या चित्रकाराकडून मोमेंटो तयार करून घेतो. यावर्षी देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने मोमेंटो तयार करण्यासाठी मी आशितोषला भेटण्यासाठी वाशीला गेलो.
घराची कडी वाजवल्यावर आशितोषच्या बहीणीने दरवाजा उघडला. ती म्हणाली, “दादा खाडीवर गेला आहे. ”
मी विचारले, “खाडी किती दूर आहे आणि तो तिथे का गेला आहे?”
त्यावर तिने उत्तर दिले, “खाडीवर परदेशी पाहुणा आला आहे. त्याला पाहण्यासाठी दादा तिथे गेला आहे. ”
मी आश्चर्याने विचारले, “परदेशी पाहुणा म्हणजे कोण?”
ती म्हणाली, “एक परदेशी पक्षी आहे, जो आपल्या भारतीय मैत्रिणीला भेटण्यासाठी दरवर्षी वाशीच्या खाडीवर येतो. काही दिवस इथे राहतो आणि मग परत जातो. त्याच पाहुण्याला पाहण्यासाठी दादा गेला आहे. ”
ज्या दिशेने खाडी आहे, तिकडे मी निघालो. थोडं अंतर चालल्यावर, पक्ष्यांच्या थव्याजवळ काही लोक उभे असलेले दिसले. मी थोडं पुढे गेल्यावर आशितोष मला दिसला. तिथे दोन पक्षी होते—एक, जो मी कधीच पाहिला नव्हता आणि दुसरा, जो सातत्याने खाडीच्या कडेला असतो. आशितोष आणि त्याचे दोन-तीन मित्र त्या दोन्ही पक्ष्यांच्या भोवती ये-जा करत होते.
तो कधीही न पाहिलेला पक्षी थोडासा पुढे जायचा, मग मागे यायचा आणि आपले पंख पसरून त्या दुसऱ्या पक्ष्याला सामावून घ्यायचा. मी आशितोषला विचारलं, “घरी ताई ज्या पक्ष्यांच्या प्रेमाविषयी बोलत होती, हेच ते दोन पक्षी आहेत का?”
आशितोष माझ्यावर ओरडला आणि म्हणाला, “चूप बस, बाबा!” माझ्या जवळ येत त्याने हळू आवाजात सांगितलं, “अरे संदीप, हळू बोल! इथल्या लोकांना याबद्दल फार काही माहिती नाही. नाहीतर उद्यापासून हे पक्षी बघायला येथे गर्दी जमेल. ”
मी त्याला विचारलं, “नेमका प्रकार काय आहे, ते सांग. काही अडचण नाही. ”
त्यावर आशितोष म्हणाला, “मागच्या सात वर्षांपासून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा नर परदेशी पक्षी दुसऱ्या देशातून या मादी पक्ष्याला भेटायला इथे येतो. परवा तो इथून परत जाणार आहे. माझे काही मित्र आले होते, त्यांना हे दाखवण्यासाठी मी आलो होतो. ”
मी विचारलं, “हा पक्षी दरवर्षी याच वेळी इथे येतो आणि किमान दहा दिवस थांबतो हे तुम्हाला कसं समजलं?”
आशितोष म्हणाला, “सतीश राजन नावाचे माझे एक पक्षी निरीक्षक मित्र आहेत. त्यांनी मला पक्ष्यांच्या हालचाली, त्यांचे वर्तन, आणि पक्ष्यांमधील प्रामाणिक नात्यांविषयी महत्त्वाची माहिती दिली होती. त्यामुळे मीही पक्ष्यांचे निरीक्षण करायला सुरुवात केली. एकदा मी आणि सतीश खाडीच्या कडेला बसलो होतो, तेव्हा आम्हाला हे दोन पक्षी वेगळेच वाटले.”
आशितोष पुढे म्हणाला, “खाडीमधल्या बाकीच्या पक्ष्यांमध्ये असलेला एक पक्षी एका वेगळ्या परदेशी पक्ष्याबरोबर काय करतोय, हे आम्हाला आश्चर्य वाटलं. सतीशने अनुमान काढलं आणि मला सांगितलं की, हा नर परदेशी पक्षी दरवर्षी याच मादीला भेटायला इथे येतो. पुढच्या वर्षीही लक्ष ठेवून राहा, तो नक्कीच परत येईल.”
मी त्याला विचारलं, “हेच ते दोन पक्षी आहेत, हे आपण नेमकं ओळखायचं कसं?”
त्यावर सतीश म्हणाला, “यासाठी आपल्याला दोन-तीन दिवस त्यांचं निरीक्षण करावं लागेल. त्यांच्या हालचाली, एकमेकांशी असलेलं प्रेम, आणि त्यांचे वेगळेपण ओळखलं की आपल्याला खात्री पटते.
सतीशने ज्या पद्धतीने मला सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही दोघांनीही त्या दोन्ही पक्ष्यांची ओळख पटवण्यासाठी एक युक्ती लढवली. आम्ही दिवसभर त्या पक्ष्यांना दोन-तीन वेळा अन्न देत असू. दोन-तीन दिवस हे सलग सुरू राहिल्यावर त्या पक्ष्यांना आमच्यावर विश्वास वाटायला लागला. ते पक्षी हळूहळू आमच्याकडे येऊ लागले आणि आम्हाला स्पर्शही करू लागले.
ते दोघं एकमेकांच्या समवेत राहायचे, एकमेकांकडे सतत पाहायचे आणि एकमेकांना सातत्याने स्पर्श करत राहायचे. नित्यनेमाने बागडणं, उड्या मारणं, आणि एकमेकांच्या अंगावरून फिरणं हे सारं त्या दोघांमध्ये होत होतं. आम्ही अनेक वेळा त्यांना हातात घेऊन पुन्हा खाली सोडायचो.
त्या दोन्ही पक्ष्यांची ओळख पक्की करण्यासाठी आम्ही त्यांच्या शरीरावर, पंखाच्या वरच्या आणि खालच्या भागात गडद रंग लावला. चौथ्या दिवशी आम्ही खाडीवर गेलो, तेव्हा त्या दोघांपैकी एकच पक्षी तिथे बसलेला होता. तो परदेशी पक्षी त्या दिवशी आलाच नव्हता. दुसऱ्या दिवशीही तो दिसला नाही.
सतीशने यावर अनुमान काढलं की, दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा परदेशी पक्षी त्याच्या प्रिय पक्षी मादीला भेटण्यासाठी येतो. मला तेव्हा यावर फारसा विश्वास बसला नाही. पण दुसऱ्या वर्षीही, अगदी याच वेळेत आम्ही त्या परदेशी पक्ष्याला त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आलेलं पाहिलं. आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं.
त्या पक्ष्यांचा पाहुणचार करण्यासाठी आम्ही त्यांना रोज धान्य खायला घालत असू. ठरलेल्या वेळेत तो परदेशी पक्षी पुन्हा उडून जात असे. अनेक वर्षांपासून आम्ही त्या दोघांमधलं प्रेम पाहात आलो आहोत. मी एकदा सतीशला विचारलं, “जर तो पक्षी तिला इतकं प्रचंड प्रेम करतो, तर तिला सोबत घेऊन परदेशी का जात नाही?”
यावर सतीश म्हणाला, “प्रत्येक पक्ष्याची उड्डाण क्षमता वेगळी असते. काही पक्ष्यांना त्यांच्या मर्यादा माहीत असतात. माणसांप्रमाणे अतिविश्वासाने त्यांचं आयुष्य चालत नाही. पक्ष्यांची जगण्याची पद्धत जरा वेगळी असते. ” सतीशने त्या एकट्या मादी पक्ष्याला “देशी मैना” असं नाव दिलं होतं. “
आता आज ना उद्या, यावर्षीसुद्धा तो प्रियकर परदेशी पक्षी आपल्या मायदेशी, त्याच्या प्रेयसीला इथेच सोडून जाणार होता. आशितोष त्या दोन्ही पक्ष्यांना दाणे भरवत होता. त्याचे पाय आणि हात चिखलाने माखले होते. एका परदेशी पाहुण्याचा आपण पाहुणचार करतोय, याचा आनंद त्याच्या मनामध्ये होता. उद्या खाडीवर पाहिलं तर, तो परदेशी पाहुणा उद्याही इथे राहील का नाही, याची खात्री नव्हती. मात्र, तो परदेशी प्रियकर कधी जाणार आहे, याची माहिती मात्र देशी मैनाला नक्की असावी.
त्या दिवशी आम्ही घरी परतलो. कामाविषयी चर्चा सुरू होती, पण माझं लक्ष मात्र त्या परदेशी पक्षी आणि देशी मैनेकडेच होतं. घरी जेवायला बसल्यावर मी आशितोषला विचारलं, “वहिनी कुठे आहेत? दिसत नाहीत. ”
पण आशितोष काहीच बोलला नाही. मला काहीतरी खटकलं.
मी पुन्हा वहिनीचा विषय काढला. यावर त्याची बहीण म्हणाली, “काय सांगावं दादा, सध्या सगळं नवलाईचं आहे. कॉलेजमध्ये असताना दादाच्या मैत्रिणीने दादाला दिलेलं एक ग्रीटिंग पाहिलं. त्यावरून वहिनी रागारागाने माहेरी निघून गेली. ”
तिच्या जाण्याला आता एक वर्ष झालं. कसं असतं बघा माणसाचं प्रेम—थोडासा गैरसमज झाला की सगळं संपतं.
बोलता बोलता आशितोषने त्यांच्या बहिणीविषयीही सांगितलं. ताईचा नवरा, जो उच्च शिक्षण घेतलेला होता, नोकरीनिमित्त परदेशात गेला आणि तिथेच त्याने ऑफिसमधील एका प्रचंड श्रीमंत सहकाऱ्याशी दुसरं लग्न केलं. याला आता दहा वर्षे झाली.
मला त्या दोघांना काय बोलावं हेच सुचत नव्हतं. माझ्या डोक्यात तीन वेगवेगळ्या कथा एकाच वेळी सुरू होत्या—दोन्ही पक्ष्यांची प्रेमकहाणी, आशितोष आणि त्याची बहीण यांची कथा. त्या दिवशी मी घरी निघालो. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी पुन्हा आशितोषकडे गेलो. घरी गेल्यावर समजलं की आशितोष वाशीच्या खाडीवर गेला आहे.
मी खाडीवर गेलो तर मला दिसलं की आशितोष त्या एकट्या देशी मैनेला जवळ घेऊन तिचे अश्रू पुसत होता. मला पाहताच आशितोषला डोळ्यांतले अश्रू आवरले नाहीत. तो म्हणाला, “परदेशी पाहुणा बिचारीला सोडून गेला रे, संदीप. आता वर्षभर ती वाट पाहणार. पुन्हा तो वर्षभरानेच येईल. ”
आशितोषने मुठीत असलेले उर्वरित दाणे देशी मैनाच्या समोर टाकले आणि आम्ही जड पावलांनी घरी निघालो. काम करताना आशितोषचा मूड अजिबात नव्हता. तो जे चित्र काढत होता, त्यात नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते.
मी आल्या पावलानेच परत घरी निघालो. वाटेने जाताना माझ्या मनात प्रश्न उभा राहिला—खरं प्रेम कोणतं? घर सोडून जाणारी पत्नी, पैशासाठी दुसरं लग्न करणारा ताईचा नवरा, की दरवर्षी न चुकता त्याच वेळेला आपल्या प्रेयसीला भेटायला परदेशातून येणारा प्रियकर पक्षी? हल्ली माणसांना पक्ष्यांसारखं वागा असं म्हणायची वेळ आली आहे—ते पक्षी पहा कसं नि:स्वार्थीपणे एकमेकांवर प्रेम करतात, असे म्हणायची वेळ आली आहे. बरोबर ना?
© श्री संदीप काळे
चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.
मो. 9890098868
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈