श्री नंदकुमार पंडित वडेर
जीवनरंग
☆ “अजून पहाट उगवायचीय….” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
उगवतीला तांबड नुकतंच फुटू लागलं. कावळ्यांची काव काव, पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. आणि आणि तेव्हढ्यात राजा कोंबडयानं एक खर्जातली धारदार बांग दिली. मग त्या वाडीवरच्या इतर कोंबडयांनी आपला सुरात सूर मिसळला. उषाचं कोवळं उन अंधाराच्या दुलईला गुंडाळून ठेवून लागलं. घराघरांतून चुली फुलू लागल्या. जागी झालेली वाडी हळूहळू आपल्या नेहमीच्या कामाला लागली.
चंद्राक्काला आज श्वास घ्यायलासुद्धा उसंत मिळणार नव्हती. आज तिच्या लेकीची सुंदरीची सुपारी फुटायची होती… सुंदरीनं नशीब काढलं तिला तहसीलदार नवरा मिळाला होता नि चंद्राक्काला स्वर्ग दोन बोटं उरला होता… घरची माणसं, पै पाव्हणं जमू लागली होती. संध्याकाळी चारच्या सुमारास तिकडची मंडळी येणार आहेत असा सांगावा आला होता. सकाळपासून चंद्राक्काचं घड्याळ आज जरा जोरातच पळत होतं… तयारी सुरु झाली आणि बघता बघता अर्धा दिवस संपला; तरी चंद्राक्काची लगबग चालूच होती.. संध्याकाळी पाव्हणं जेवुन जाणार; म्हणजे एक का दोन गोष्टी असणार होत्या.. गोडाधोडाचा स्वयंपाक त्यात जावयाला काय गोड आवडत असेल याचा अंदाज… डाव उजवं.. ताट कसं पंचपक्वानानं भरून गेलं पाहिजे यातच चंद्राक्का बुडून गेली.
दुपारचा सूर्य कलला… घरातल्या गणगोतांचा कलकलाट वाढत गेला. तशात पाव्हण मंडळीं खळयात उतरली. घरातल्या बायांनी जावयासाकट आलेल्या पाव्हण मंडळींचं औक्षण केले. पुरुष मंडळीं जावयासह सोप्याकडे निघाले. तेव्हढ्यात राजा कोंबडयानं आपला लाल तुरा असलेली मान उंचावून एक जोरदार बांग देत त्यांना सामोरा गेला. जणू काही तुमचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे अश्या थाटात तो डौलात चालत गेला.
पाव्हणं ते पाहून अचंबित झाली. जावयाचं लक्ष त्याच्यावर खिळून राहिले… कितीतरी जण वेगवेगळे बोलत होते. पण जावयाच्या मनात तो कोंबडा मात्र घर करून राहिला. शिष्टाचार झाला आणि कार्यक्रम सुरु झाला. काय द्यायचं, काय घ्यायचं. मानपान विषय रंगु लागला. तेव्हा जावई मधेच म्हणाला,
“ फक्त नारळ नि मुलगी एव्हढंच दया! आणि आजच्या जेवणाला तो कोंबडा घाला!” आपल्या बापाकडं बघत जावई पुढं म्हणाला,
“ मी काय म्हणतो आबा हे इतकचं असुद्या. आता ठरलं म्हणजे ठरलं. जास्त वेळ न दवडता सुपारी फोडा नि कधी आणायचा लग्नाचा घोडा ती तारीख ठरवा”.
जावयाचं हे बोलणं पाव्हण्या मंडळींनी उचलून धरले. पण ते ऐकून चंद्राक्काला धक्काच बसला.. देणं घेणं नाही, मानपान नाही, किती किती सालस माणसं म्हणावीत तरी. पण रितीप्रमाणं गोडधोड जेवण असतयं ते सोडून कोंबडं कापायला सांगितलं म्हणून खट्टू झाली. तसं तिनं एकदा आडून सांगून पाहिलं पण जावयाच्या पुढं पाव्हणं मंडळींचं काहीच चाललं नाही.
तशी चंद्राक्का म्हणाली,
“अवो एक का मस घरात धा कोंबड्या आहेत! करूया कि चमचमीत तुमच्या पसंती प्रमाणं मग तर झालं!”
“धा कोंबड्या राहू द्या बाजूला, तो समोर आलेला कोंबड्याचंचं झणझणीत जेवण होऊ द्या” अशी जावयानं पुष्टी दिली.
“करूया कि! त्या कोंबड्या परास आणखी बाजरीचं दुसरं कोंबडं असं करून घालते कि तुम्ही सगळी बोटं चाटत राहशिला!”चंद्राक्का म्हणाली…
“हे बघा मामी आम्हाला तोच कोंबडा हवाय. दुसरं घालणार असाल तर सुपारी फुटायची नाही. तेव्हा काय ते आताच सांगा.. नसलं जमत तर आम्ही माघारी निघतो”जावयानं निकराचं बोलणं केलं.
चंद्राक्काचे सगळे मार्गच बंद झाले.. एक-दोन जणांनी मध्यस्तीचा प्रस्ताव बुजुर्ग मंडळींपुढे ठेवून पाहिला, पण तोड निघण्याऐवजी तुटण्याची पाळी आली. नाईलाज झाला आणि तोच कोंबडा घालण्याशिवाय पर्याय उरला नाही…
मग घरातल्या मंडळींनी लेकीच्या भल्यासाठी राजा कोंबडा कुरबान केला तर बिघडलं कुठे असं चंद्राक्काला समजवून सांगू लागले.
चंद्राक्का बिचारी दुःखी कष्टी झाली. तिच्या उरात कालवाकालव सुरू झाली… एकिकडे मुलीच्या लग्नाची सुपारी आणि ती फुटण्यासाठी घरच्याच जीवापाड प्रेमानं जतन केलेल्या कोंबडयाची कुरबानी. हे दु:ख तिच्या एकटीचंच असल्यामुळे इतरांना तिच्या भावना कळल्या नाहीत.
अखेर हो ना करता करता शेवटी तो निर्णय झाला आणि त्या कोंबड्याला धरून आणलं. आपल्या कशासाठी आणलय गेलंय हे त्या मुक्या प्राण्याला समजलं..
राजा कोंबड्याला धरून सोप्यातून परसात जाताना एकवार सगळ्या मंडळीकडे त्याने पाहताना चंद्राक्काची दयाद्र नजरेला त्याची नजर भिडली आणि शेवटचा सलाम करावा तसा त्याने एकदाच कॉक कॉक केलं…
आणि पुढे मानेवरून सुरी फिरवून घेतली. क्षण दोन क्षणाची तडफड मानेची आणि धडाची झाली. चंद्राक्काला वाटलं ती सूरी आपल्याच मांनेवरून फिरली गेलीय. तिच्या डोळ्यातूनं टचकन अश्रू ओघळले…
रात्री आठच्या सुमारास स्वयंपाक तयार झाला. अष्टमीचा चंद्र वर आकाशात लुकलुकणार्या चांदण्यासाह प्रकाशू लागला. पण आजा त्याचही तेज निष्तेज वाटत होतं. चांदण्यांच्या प्रकाशात खळयात ताटावर ताट फिरतं होते. हसणे खिदळण्याच्या दंग्यात कोंबड ओरपून खाणं चालल होत… त्यानं जेवणाची लज्जत वाढली होती. चंद्राक्का जरा दुरूनच ते पाहात होती. वरवर हासू दाखवत होती आणि आतून आपलंच काळीज शिजवून घातलं आहे या दुखात ती बुडाली होती…
रात्री उशिरापर्यंत जेवणावळ चालली आणि मध्यरात्रीच्या सुमारास जावई आणि पाव्हण मंडळीं निरोप घेऊन गेली. घरातले इतर नातेवाईक जेवून झोपी गेले. एकटी चंद्राक्का त्या रात्री जेवली नाही आणि चांदण्यांच्या प्रकाशात मुक्यान आपले अश्रु वाहू देत राहिली.
तोच तिच्या कानाशी कुणी बोलले,
‘चंद्राक्का नको रडूस! तसं माझं आयुष्य राहिलं होतं किती? अंग कुणी तरी मानेवर कधीतरी सुरी फिरवून मारण्यापेक्षा घरच्या माणसांच्या कामाला आलो यातच माझं सोनं झालयं! किती जिवापाड जपलंस मला आजवर.. मागे दोन-चार वेळा चोरांनी पकडून नेला होता पण माझ्या ओरडण्याने तू मला सोडवून आणलंस. राजाचा दिमाख तूच मला दिलास!’
चंद्राक्काला हुंदका आवरेना ती म्हणाली,
“असं होईल कधी वाटलं नव्हतं बघ!. तू दुपारी दिमाखात त्यांना स्वागतासाठी गेलास काय आणि त्याच रात्री त्यांच्या जेवणासाठी तुझी कुरबानी व्हावी काय? हि विपरीत लिला का दिसावी?”
‘आपल्या सुंदरीच्या लग्नाला माझाही हातभार लागायला हवा होता ना. मग तो असा आला त्यात काय बिघडल’ राजा कोंबड्यान समजूत घातली.
ती रात्र उसासे टाकत विलय पावत गेली. पहाटेचं तांबड फुटू लागलं. आज कितीतरी दिवसात ते नेहमी पेक्षा अधिकच लाल गडद दिसतं होतं. कावळ्यांची काव काव, पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. आणि आणि…
चंद्राक्काचे जागराणाने डोळे जडावले होते तिला वाटतं होतं कि… राजाची बांग झाल्याशिवाय पहाट काही व्हायची नाही….
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈