श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “तक्रार…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
सकाळी दहाच्या सुमारास पोलिस चौकीत आलो तेव्हा वाटलं की अर्ध्या तासात काम संपवून घरी जाता येईल पण कसलं काय!!बारा वाजले तरी चौकीतच होतो. तक्रारीचे स्वरूप समजल्यावर प्रत्येकानं साहेबांची भेट घ्यायला सांगितलं आणि ते कामासाठी बाहेर गेलेले. वाढतं ऊन आणि पोटातली भूक यामुळं चिडचिड वाढली तरीही चडफडत बसून राहिलो. काही वेळातच साहेब आले. तेव्हा अस्वस्थता कमी झाली. दहा मिनिटात बोलावणं आल्यावर केबिनमध्ये साहेबांसमोर उभा राहिलो.
“नमस्कार साहेब”
“बोला. काका. डोक्याला बँडेज??, काय झालं??. ”
“त्यासाठीच आलोय पण माझी तक्रार नोंदवून घेतली जात नाहीये”
“का?”साहेबांनी हवालदारांकडे पाहत विचारलं पण हवालदार काहीच बोलले नाहीत.
“मी सांगतो”
“हं बोला”साहेब.
“कपाळावरची ही पट्टी दिसतेय ना. सकाळीच तीन टाके पडलेत. ”
“अक्सीडेंट, टु व्हीलर की कार”
“फ्लेक्स”
“म्हणजे”साहेबांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि उत्सुकता.
मी पुढे काही बोलणार इतक्यात हवालदार म्हणाले “मोठ्या लोकांविरुद्ध तक्रार करायची म्हणतात म्हणूनच लिहून घेतली नाही. ”
“हे खरंय”माझ्याकडं पाहत साहेबांनी विचारलं.
“शंभर टक्के!!या भागातील माननीय, मान्यवर आणि त्यांचे चार कार्यकर्ते यांच्यामुळे ही दुखापत झाली. असा माझा आरोप आहे. ”
“नक्की काय घडलं ते जरा नीट सांगा?”साहेबांचं बोलणं संपायच्या आत मी मोबाइल पुढे केला. फोटो पाहून साहेब जरासे वैतागले. “आता हे काय?”
“पुरावा”
“फ्लेक्सच्या फोटोत कसला पुरावा?”
“साहेब, यातच सगळं काही आहे. वेगवेगळ्या बाजूने फोटो काढलेत त्यावरूनच तक्रार करतोय.”
“काय बोलताय ते तुमचं तुम्हांला तरी समजतेय का?”साहेब.
“हा फ्लेक्स बेकायदेशीररित्या लावलाय. रस्ता ओलंडताना डिवायडरमध्ये जी दहाएक फुटाची जागा असते तिथे लावलेल्या फ्लेक्सची किनार मला लागली. तीन टाके घालावे लागले. ”
“म्हणून थेट पोलिसात तक्रार!!”
“का करू नये. थोडक्यात निभावलं पण जर काही गंभीर दुखापत झाली असती. डोळा फुटला असता तर.. ”
“काही झालं नाही ना. ”
“मग काही गंभीर व्हायची वाट पहायची का?”
“तक्रार करून काय मिळणार आणि ज्या लोकांची नावं घेत आहेत. त्यांना काही फरक पडणार नाही. ”
“असं कसं. फ्लेक्स माननियांना शुभेच्छा देण्यासाठी लावलाय कार्यकर्त्यांची नावं आणि फोटो आहेत. फ्लेक्स चुकीच्या ठिकाणी आणि धोकादायक स्थितीत लावलाय. त्याचा पुरावा म्हणून शूटिंग सुद्धा केलंय. ”
“फार काही हाती लागणार नाही परंतु मनस्ताप मात्र वाढेल. ”
“तक्रार करायला आलो तेव्हाच मनाची तयारी केलीय.
“जरा शांत डोक्यानं विचार करा”
“साहेब, आम्ही सामान्य माणसं सार्वजनिक ठिकाणी जीव मुठीत घेऊन फिरतो. त्यातही पायी चालणाऱ्यांचे फार हाल. एकतर लोक बेफाम गाड्या चालवतात आणि त्यात भर म्हणजे जागोजागी लावलेले फ्लेक्स. आमचा विचारच कोणी करत नाही उलट ‘घरात बसा कशाला बाहेर पडता’ असं उद्धटपणे बोलतात. ”
“तुमचा त्रास समजू शकतो. याविषयी नक्की मार्ग काढू. नको त्या भानगडीत पडू नका. त्रास होईल. ”
“निदान तुम्ही तरी असं नका बोलू. आम्हांला फक्त कायद्याचा आधार म्हणजे पर्यायाने तुमचाच आधार. वाट्टेल तिथं फ्लेक्स लावतात. इच्छा असूनही विरोध करता येत नाही अन भांडूही शकत नाही. त्रास सगळ्यांना होतो. सहन होत नाही अन सांगता येत नाही अशी अवस्था. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात राहतो. आज वाचलो तेव्हा ठरवलं की या त्रासाविरुद्ध तक्रार करायची. ”
“त्यानं काय साध्य होईल. ”
“माननियांचे नाव असल्यानं तक्रारीची निश्चितपणे दखल घेतली जाईल आणि बाकी सोशल मीडिया आहेच आणि न्यूज चॅनल तर ब्रेकिंग न्यूजसाठी तडफडत असतातच” माझ्या बोलण्यानं साहेब विचारात पडले.
“थोडा वेळ बाहेर बसता का?काहीतरी मार्ग काढतो. ”
बाहेर बाकावर जाऊन बसलो. डोकावून पाहीलं तर आत फोनाफोनी सुरू होती. काही वेळानं आत बोलावलं. बसायला सांगून साहेबांनी चहाची ऑर्डर दिली.
“एक उत्तम उपाय सापडलाय. त्यामुळे तक्रारीची गरज भासणार नाही. ”
“काय?”मी
“आपल्या भागातील सगळे बेकायदेशीर फ्लेक्स उतरवण्याचं काम सुरू झालंय. ”
“अरे वा!!अचानक हा चमत्कार??”
“चमत्कार वैगरे काही नाही. तुमच्या तक्रारीविषयी माननीयांशी बोललो. तुमचं म्हणणं त्यांना शंभर टक्के पटलं आणि या कामी घेतलेल्या पुढाकाराबद्दल माननियांनी तुमचं खास कौतुकसुद्धा केलं. ताबडतोब कार्यकर्त्यांना फ्लेक्स काढायच्या कामाला लावलयं. आता ठीक आहे. ”
“खूप खूप धन्यवाद साहेब!!, फार मोठी मदत झाली. अजून काय पाहिजे. इतरांप्रमाणे मीसुद्धा निमूटपणे सहन करत होतो पण आज थोडक्यात बचावलो तेव्हाच ठरवलं की याविषयी काहीतरी करायला पाहिजे. जखमेचे फोटो काढले. डोक्याला बँडेज बांधलेल्या अवस्थेत घटनाक्रम शूट करून इथे आलो. ”
“आता पुढं काहीही करू नका”साहेब.
“जे हवं होतं ते तुम्ही झटपट केलंत त्यामुळे आता बाकी काही करण्याची गरज नाही. खूप खूप धन्यवाद!!आणि माझी एक विनंती माननीयांपर्यंत पोहचवा. पुन्हा बेकायदेशीर फ्लेक्स लावले जाऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे. त्यांनी मनात आणलं तर हे सहज शक्य आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार!!” साहेबांचा निरोप घेऊन चौकीच्या बाहेर पडलो. घरी येताना चौकातले फ्लेक्स उतरवण्याचे काम सुरू होतं ते पाहून नकळत चेहऱ्यावर हसू उमललं.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈