☆ जीवनरंग ☆ बोध कथा – विचारपूर्वक निर्णय ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
लघु बोध कथा
कथा १७ . विचारपूर्वक निर्णय
नासिकापुरात चार कापूस विक्रेते होते. त्यांनी एक घर भाड्याने घेऊन तिथे खरेदी केलेला कापूस ठेऊन कापसाचा व्यापार सुरु केला. परंतु त्या घरात उंदरांनी धुमाकूळ घातला व ते कापूस कुरतडू लागले. उंदरांचा त्रास कमी व्हावा म्हणून सर्वांनी मिळून एक मांजर खरेदी केली व त्या घरात ठेवली. हळूहळू त्या मांजरीचा त्यांना लळा लागला. मांजरीवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या प्रत्येकाने मांजरीच्या पायांमध्ये आभूषणे चढवली.
काही काळानंतर त्या अलंकारांच्या घर्षणाने मांजरीच्या एका पायाला जखम झाली. म्हणून त्या पायात अलंकार घालणाऱ्या व्यापाऱ्याने अलंकार काढून प्रेमाने जखमेवर कापडी पट्टी बांधली. एकदा रात्री मांजरीने दिव्याच्या मागे लपून समोर उड्या मारणाऱ्या एका उंदरावर एकदम झेप घेऊन त्याला खाल्ले. या झटापटीत मांजरीच्या पायाला बांधलेली कापडाची चिंधी दिव्याला लागून तिने पेट घेतला. मांजर ती चिंधी फाडू शकत नव्हती. जसजसा अग्निदाह वाढू लागला, मांजर सर्वत्र उड्या मारू लागली. उड्या मारता मारता ओरडत ओरडत ती कापूस ठेवलेल्या ठिकाणी आली. कापसाच्या ढिगाऱ्यावर येताच त्या ज्वालेमुळे कापसाने पेट घेऊन सगळा कापूस भस्मीभूत झाला.
दुसऱ्या दिवशी ते दृश्य बघून बाकीचे तिघेही व्यापारी त्या चिंधी बांधणाऱ्या व्यापाऱ्याला “आमचे नष्ट झालेले धन परत कर” असे म्हणू लागले. त्या व्यापाऱ्याचा चेहरा एकदम कोमेजून गेला. तो स्तब्धच झाला. नंतर त्या तिघा व्यापाऱ्यांनी राजाकडे जाऊन तक्रार केली की, “या व्यापाऱ्याने नष्ट झालेले धन परत दिले पाहिजे. हेच व्यवहारायोग्य ठरेल.”
राजाने सर्व वृत्तांत सविस्तर ऐकला व विचार करून तिघांना म्हणाला, “या व्यापाऱ्याने पट्टी बांधलेला पाय जखमी होता. त्या जखमी पायाने मांजर कशी बरे उड्या मारू शकेल? म्हणून कापसाच्या ढिगावर उड्या मारण्याने निर्माण झालेला आगीचा डोंब मांजरीच्या इतर तीन पायांमुळे निर्माण झाला यात काही संशय नाही. त्यामुळे तुम्ही तिघांनीच ते घर पूर्वीप्रमाणे बांधून मालकाला द्यावे व तुम्हीच तिघांनी मिळून चौथ्या व्यापाऱ्याला त्याचे नष्ट झालेले धन परत करावे.”
तात्पर्य – विचारपूर्वक निर्णयामुळे निर्दोष व्यक्तीचे रक्षण होते.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी