श्री अरविंद लिमये
☆ जीवनरंग ☆ जगावेगळी…भाग-1 ☆ श्री अरविंद लिमये☆
(एकटेपण दु:खदायक असणार हे माहित असूनही ते टाळण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकायला ती तयार नव्हती.अशाच एका जगावेगळ्या गलितगात्र तरीही स्वाभिमानी आईची ही कथा…..)
जा. त्या घरात डोकावून या. आपल्या संसारासाठी, मुलासाठी रक्ताचं पाणी केलेली, थकली भागलेली एक म्हातारी आई आत आहे….! आलात डोकावून..?
मलाही जायचंय. मन तिथं केव्हाच जाऊन पोहोचलंय. पावलंच घुटमळतायत. सारखी आठवतीय, तिच्या मुलाचं लग्न ठरलं होतं तेव्हाची ती.थकल्या शरीरानं पण प्रसन्न मनानं पदर खोचून उभी राहिली होती. तिच्या संसाराचं स्वप्न विरता विरताच पोराच्या सुखी संसाराचं स्वप्न तिच्या म्हातार्या नजरेसमोर तरळलेलं होतं.
तीन मुलींच्या पाठीवरचा वाचलेला असा हा एकुलता एक मुलगा. तिन्ही मुलींनी उघडण्या पूर्वीच आपले डोळे मिटलेले. आल्या,आणि आईच्या काळजाचा एकेक लचका तोडून आल्या पावलीच निघून गेल्या. तेव्हापासून हिचे डोळे पाझरतच राहिलेत. कधी त्या जखमांची आठवण म्हणून, कधी पोराला दुखलं खुपलं म्हणून, पुढे नवरा आजारी पडला म्हणून, नंतर तो गेला म्हणून आणि नंतर नंतर हा सगळा भूतकाळ आठवूनच.
मुलाचं लग्न ठरलं, तेव्हा त्या क्षणापर्यंत अप्राप्य वाटणारी तृप्ततेची एक जाणिव तिच्या मनाला स्पर्शून गेली.. पण.. ओझरतीच..! लक्ष्मी घरी आली, पण समाधानाने डोळे मिटावेत एवढी उसंत कांहीं तिला मिळालीच नाही. लक्ष्मी घरी आली तेव्हा तिला वाटलं होतं.. आता मांडीवर नातवंड खेळेल.. सुख ओसंडून वाहील.. घर हसेल. पण.. तिचं सुखच हिरमुसलं.
माप ओलांडून सून घरी आली तेव्हा तिला एकदा डोळे भरून पहावी म्हणून हिने नजर वर उचलली, तेव्हा सुनेच्या गोऱ्यापान कपाळावर एक सुक्ष्मशी आठी होती. होती सुक्ष्मशीच..पण ती हिच्या म्हाताऱ्या नजरेत सुध्दा आरपार घुसली. मन थकलं, तशी शरीराने कुरकुर सुरु केली. पण अंथरूण धरलं तर सुनेच्या कपाळावरचं आठ्यांचं जाळं वाढेल म्हणून ती उभीच राहिली. थकलीभागली, पण झोपली नाही….
आलात डोकावून? कशी आहे हो ती? आहे एकटीच पण आहे कशी? हे प्रश्न कधी हवे तेव्हा, हवे त्यावेळी डोकावलेच नव्हते त्याच्या मनात.मुलाच्या. लक्ष्मी हसली तो खुलायचा. ती रुसली तो मलुलायचा. घरी आलेली ती नाजूक गोरटेली मोहाचं झाडच बनली होती जणू. ही फक्त पहात होती. आपला मुलगा आणि त्याची सावली यातला फरक तिला नेमका समजला. लग्न झालं तेव्हापासून तो हिच्यापुरता मेलाच होता. जिवंत होती ती त्याची सावली. सावली.. पण आपल्याअस्तित्वाने चटकेच देणारी..!
पहिल्यापासून अबोलच तो. बोलायचा फार कमी. हवं-नको एवढंच. आता तर तेही नव्हतं. आयुष्यभर काबाडकष्ट करून आईच्या अंगावरचं मांस सगळं झडलंच होतं.. पण तिच्या हाडांची कुरकुर त्याला कधी जाणवलीच नाही. बाहेरची काम बंद केली होती पण घटत्या शक्ती न् उतरत्या वयाच्या तुलनेत घरची कामं दुपटीने वाढली होती. मूर्तिमंत सोशिकताच ती. बोलली काहीच नाही. गप्प बसली.
घरात खाणारी तोंडं ही तीनच. पैसा उदंड नव्हता पण कमी नव्हताच. खरेदी, साड्या, सिनेमे सगळंच तर सुरू होतं. सिगारेटचा धूर तर सतत दरवळलेलाच असायचा. काटकसर ओढाताण कुठे दिसत नव्हतीच आणि या कशाचबद्दल तिची तक्रारही नव्हती. पण हिच्या गुडघ्यावर खिसलेलं पातळ खूप दिवस उलटून गेल्यानंतरसुद्धा जेव्हा त्या दोघांच्या नजरपट्टीत आलं नाही तेव्हा हिच्या मनावर पहिला ओरखडा उठला. कुणाची दृष्ट लागावी एवढं खाणं नव्हतंच हिचं. पण भूक मारायचं औषध म्हणून अंगी मूरवलेली चहाची सवय मात्र अद्याप सुटलेली नव्हती.एक दिवस पहाटे पहाटे डोळा लागला तो सकाळी उशिरा उघडला. पाहिलंन् तर दोघांचा चहा झालेला. चूळ भरुन पदराला हात पुसत ती आंत आली तेव्हा हिच्या चहाचं आधण सूनेनं आधीच स्टोव्हवर चढवलेलं होतं. हिने पुढे होऊन दूध कपात घेऊन चहा गाळलान् तर गाळणं पूर्ण भरून वर चोथा उरलाच. इथं दुसरा ओरखडा उठला. आधीच अधू झालेलं मन रक्तबंबाळ झालं. पोराला हाक मारलीन् तीसुद्धा रडवेली.
“एका कपभर चहालासुद्धा महाग झाले कां रे मी?”
“काय झालं?”
“बघितलास हा चहा? उरलेल्या चौथ्यात उकळवून ठेवलाय. एवढं दारिद्र्य आलंय का रे आपल्याला? जड झालेय मी तुम्हाला?”
तो गप्प. एक बारीकशी आठी कपाळावर घेऊन त्याने आपल्या बायकोकडे पाहिलंन्. ती उठली. तरातरा पुढे झाली. सासूनं गाळून ठेवलेला चहा एका घोटात पिऊन टाकलान् आणि तोंड सोडलंन्.
“विष देऊन मारत नव्हते मी तुम्हाला. चहाच होता तो. पटलं ना आता? एक गोष्ट माझी मनाला येईल तर शपथ. आपापलं काही करायचं बळ नाहीय अंगात तर एवढं. ते असतं तर रोज खेटरानंच पूजा केली असतीत माझी. आजवरचं आयुष्य काय अमृत पिऊन काढलं होतंत? या चहाला नाकं मुरडायला? बोलली आणि ढसाढसा रडायला लागली. आता खरं तर रडायचं हिनं पण ही रडणंच विसरली. मुलगा शुंभासारखा उभाच होता. ही जागची उठली. आत जाऊन पडून राहिली. चहा नाही,पाणी नाही, जेवण नाही.. अख्खा दिवस मुलानं बायकोची समजूत काढण्यात घालवला आणि तिन्हीसांजेला तो आईकडे डोकावला.
“आई, तू हे काय चालवलंयस?”
“मी चालवलंय?”
“हे बघ, मला घरी शांतता हवीय. काहीही काबाडकष्ट न करता तुला वेळेवारी दोन घास मिळतायत ना? तरीही तू अशी का वागतेयस? थोडंसं सबुरीनं घेतलंस तर कांही बिघडेल?”
उपाशी पोटी मुलाच्या तोंडून दोन वेळच्या घासांचं अप्रूप तिनं ऐकलं आणि ती चवताळून ताडकन् उठली. पण तेवढ्या श्रमानेही धपापली.
“सबुरीनं घेऊ म्हणजे काय करू रे? तुम्ही जगवाल तशी जगू? मन मारून जिवंत राहू? अरे, ती सून आहे माझी. कुणी वैरीण नव्हेs. आजवर वाकडा शब्द वैऱ्यालासुध्दा कधी ऐकवला नव्हता रे मी. स्वतःच्या संसाराकरता हातात पोळपाट लाटणं घेऊन मी चार घरं फिरले त्याची हिला लाज वाटतेय होय? का माझ्या पिकल्या केसांची न् या वाळक्या शरीराची?”
“आई..पण..”
“हे बघ, मला वेळेवर दोन घास नकोत पण प्रेमाचे दोन शब्द तरी द्यायचेत.मी काबाडकष्ट केले ते मला दोन घास मिळावेत म्हणून नव्हतेच रे. ते तर मिळालेसुध्दा नाहीत कितींदा तरी. कारण मिळालेल्या एका घासातला घास काढून तो मी आधी तुला भरवला होता रे. वाढवला, लहानाचा मोठा केला..”
ऐकलं आणि सून तीरा सारखी आत घुसली.
“हे बघा, पोराला वाढवलं, मोठ्ठ केलं ते तुमच्याच ना? उपकार केलेत? आम्हीसुद्धा आमची पोरं वाढवणारंच आहोत. उकिरड्यावर नेऊन नाही टाकणार..”
“सुनबाई, बोललीस? भरुन पावले. तुला मी डोळ्यांसमोर नकोय हेच वाकड्या वाटेने आज सांगितलंस? पण एक लक्षात ठेव. स्वयंपाकांच्या घरातूनसुद्धा आज पर्यंत फक्त मानच घेतलाय मी. अपमानाचं हे असलं जळजळीत विष तिथंसुद्धा मला कधी कुणी वाढलं नव्हतं आजपर्यंत.मी माझ्या पोराला वाढवलं. मोठं केलं. उपकार नाही केले. कर्तव्यच केलं. खरं आहे तुझं. पण त्या कर्तव्याची दुसरी बाजू तुम्ही टाळताय. तुम्ही माझं देणं नाकारताय. तुमचा संसार तुम्हाला लखलाभ. मला एक खोली घेऊन द्या. कुडीत जीव आहे तोपर्यंत चार पैसे तिथं पाठवा. उपकार म्हणून नकोsत. केलेल्या कर्तव्याची परतफेड म्हणूनच”
“होs पाठवतो नाs. खाण नाहीये कां इथं पैशांची..! हंडा सापडलाय आम्हाला गुप्तधनाचा. तो उपसतो आणि पाठवतो बरंs पाठवतो.”
सून तणतणत राहिली. सिगारेटचा धूर हवेत सोडत मुलगा शून्यात पहात राहिला. ती संपूर्ण रात्र तिने टकटकीत जागून काढली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यासाठी मुलगा घराबाहेर पडला, त्याच्या पाठोपाठ फाटक्या पिशवीत जुनेरं कोंबून हिने बाहेरचा रस्ता धरलान्..आपल्या सुनेचा निरोपसुद्धा न घेता. एकटेपणाचा बाऊ न करता तिने पुन्हा पदर खोचला. पुन्हा पोळपाट-लाटणं हातात घेतलं. पण ते हात आता पूर्वीसारखे खंबीर नव्हते. थरथरत होते. मग गरजेपोटी कधी कुणी तिला कामावर ठेवून घेत राहिलं. ती राहिली. चुकतमाकत स्वैपाक करू लागली. पण पूर्वीची चवीची भट्टी पुन्हा कधी जमलीच नाही. मग कधी बोलणी बसायची. कामं सुटायची किं पुन्हा दुसरं घर. ती फिरत राहिली. फिरत फिरत इथं आली. या समोरच्या घरी. तिने पूर्वी जोडून ठेवलेल्या.
क्रमशः…
© श्री अरविंद लिमये
सांगली
मो ९८२३७३८२८८
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈