श्री अरविंद लिमये
☆ जीवनरंग ☆ जगावेगळी…भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये ☆
एका गलितगात्र पण स्वाभिमानी आईची कथा….
(पूर्वसूत्र:- ती संपूर्ण रात्र तिने टकटकीत जागून काढली.दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यासाठी मुलगा घराबाहेर पडला, त्याच्या पाठोपाठ फाटक्या पिशवीत जुनेरं कोंबून हिने बाहेरचा रस्ता धरलान्.. आपल्या सुनेचा निरोपसुद्धा न घेता.)
एकटेपणाचा बाऊ न करता तिने पुन्हा पदर खोचला. पुन्हा पोळपाट-लाटणं हातात घेतलं. पण ते हात आता पूर्वीसारखे खंबीर नव्हते. थरथरत होते. मग गरजेपोटी कधी कुणी तिला कामावर ठेवून घेत राहिलं. ती राहिली. चुकतमाकत स्वैपाक करू लागली. पण पूर्वीची चवीची भट्टी पुन्हा कधी जमलीच नाही. मग कधी बोलणी बसायची. कामं सुटायची किं पुन्हा दुसरं घर. ती फिरत राहिली. फिरत फिरत इथं आली. या समोरच्या घरी. तिने पूर्वी जोडून ठेवलेल्या. पानसे वकिलांच्या या घरची बाळंतपणं, वकिलीण बाईंची आणि त्यांच्या लेकीसुनांची सुद्धा कधीकाळी हिनेच केलेली. हे घर तिला पुन्हा भेटलं आणि एक दिवस तिच्या मुलाला पानसे वकिलांचं पत्र आलं….
‘तुझी आई आता आमच्या घरी आहे. कामाला नव्हे,रहायला. जेवायला. कारण कामं करण्याची शक्ती आता तिच्या जवळ नाहीये. ती असती तरी तिने कामं का आणि किती दिवस करायची हे प्रश्न आहेतच. तू शिकलास. मोठा झालास. बऱ्यापैकी पैसे मिळवतोयस. हे सगळं तुझ्या आईने आपल्या घामाचं आणि कष्टांचं खत घालून पिकवलंय. तिला त्या खताची किंमत हवीय. होय. तुझ्याकडून पोटगी. का? दचकलास? मी वकील म्हणून तिने मला शब्द टाकलाय. मी तिचं वकीलपत्र घेतलंय. एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता. एक आई आपल्या मुलाविरुध्द कोर्टात केस गुदरतेय आणि तेही त्याच्यासाठी आयुष्यभर केलेल्या कष्टांचे पैसे उतारवयात कष्ट न करता पोटगीरूपाने परतफेड म्हणून मिळावेत यासाठी, हेच मला नवीन होतं. आणि एक आव्हानसुद्धा. मी ते आव्हान स्वीकारायचं ठरवलंय. तू तिला न्याय देऊ शकला नाहीयस. न्यायदेवता काय करते पाहू. ती आंधळी जरुर आहे, पण तुझ्यासारखी निगरगट्ट नाहीये. तुझ्या आईच्या चरितार्थासाठी आवश्यक ती रक्कम तू तिला आमरण द्यावीस म्हणून ही नोटीस तुला विचारासाठी योग्य वेळ द्यायचा या सद् भावनेने या खाजगी पत्राद्वारेच पाठवतोय. योग्य निर्णय घे.’
पत्र त्यानं वाचलं.फाडून टाकलं. पुढे रितसर नोटीस आली. केस कोर्टात उभी राहिली. जगावेगळी म्हणून खूप गाजली सुद्धा. पानसेवकिलानी तिचं वकिलपत्र घेतलं तेव्हाच खरं तर निकाल निश्चित होता. तोच लागला. गेलं वर्षभर दरमहा नियमित पैसे पाठवताना आईने आयुष्यभर पै पै साठी केलेले कष्ट आता त्याला स्वच्छ दिसतायत. सूनसुद्धा सायीसारखी मऊ झाली. म्हणाली .. “यापेक्षा त्यांना मूला-सुनेचं प्रेम देणंच जास्त स्वस्त पडेल आपल्याला..”
त्यालाही ते पटलंय. तो तिला न्यायला आलाय. होय. मीच. अचानक आलेला प्रेमाचा उमाळाच फक्त माझ्या मनात आहे असं मी म्हणत नाही. त्याबरोबरच थोडा व्यवहारही आहे.पानसेवकिलानाच मी म्हटलं होतं, तुम्हीच सांगा तिला. म्हणाले…,
“जा असं मी तिला कुठल्या तोंडाने सांगू? मी तिला न्याय मिळवून दिलाय.तिच्यावर अन्याय कसा करू!”
त्यांचंही बरोबर आहे. आता आत डोकवायला पाहिजे मलाच. मन तिथं केव्हाच जाऊन पोचलंय. पावलंच घुटमळतायत.त्यांना वाटतंय, ‘आपल्या चेहऱ्यावरचा व्यवहार तिला पुसटसा जरी दिसला तर! आणि समजा.. नाही दिसला,तरी.. ती.. येईल? तुम्हीच जाताय का?डोकावताय त्या घरी? जा आणि सांगा तिला,..
‘तुझा मुलगा तुला.. न्यायला.. आलाय..!’…..
(समाप्त)
© श्री अरविंद लिमये
सांगली
मो ९८२३७३८२८८
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈