श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
दहावीचा नवा वर्ग. मी हजेरी घेतली. गैरहजर मुलांची नावं लक्षपूर्वक पाहिली. २० जून उगवला तरी भारती भोसले ही मुलगी शाळेत आली नव्हती. ‘भारतीच्या शेजारी कोण रहाते ग?’ मी मुलींना विचारलं.
‘ह्यी रहाते बाई.’
ह्यी म्हणायची मंगल उभी राहिली.
अग, ह्या भारतीला काही आहे का काळजी? दहावीचं वर्ष आहे, शाळा सुरु होऊन दहा दिवस झाले, पहिल्या दिवसापासूनच शिकवायला सुरुवात झालीय, मागे पडलेला अभ्यास केव्हा भरून काढणार ती?जबाबदारीची जाणीव आहे की नाही तिला?’
मी तडातडा बोलत होते. जशी काही भारतीच माझ्यासमोर उभी होती.
माझं बोलणं संपल्यावर मंगल शांतपणे म्हणाली, ‘बाई, ती येनार न्हाई आता.’
‘का? काय झालंय तिला?’
‘तिची बहीण होती ना अनिता म्हनायची, ती वारली.’
‘वारली? केव्हा?’
‘मे महिन्यात. बाळंतपणात गेली.’
मी हबकून खुर्चीवर बसले. वारलेली अनिता दोन वर्षांपूर्वींची आमची विद्यार्थिनीच होती. कशी बशी दहावी झाली नि तिचं लग्न झालं होतं. ती एव्हढीशी कोवळी पोरगी चक्क वारलीच?
‘अग, अशी कशी वारली? कुठल्या हास्पिटलमध्ये होती?काय झालं तरी काय?’ ‘तिला ताप आला नि डोक्यात गेला.’ एकेक करीत सगळ्याच मुली बोलायला लागल्या. अनिता कशी वारली ते सांगायला लागल्या. मला समजून घ्यायचं होतं पण बाळंतपणाचा विषय म्हटल्यावर वर्गातल्या मुलांनी माना खाली घातल्या होत्या. ‘वर्गात बाई कसला तरीच विषय बोलत्यात ‘असंहोऊ नये म्हणून मी माझी अनिताबद्दलची हुरहुर मनात दाबून ठेवली. ३५ मिनिटांचा वळ अभ्यासाशिवाय फुकट (?) जाऊ नये म्हणून मी एक ठोकळा शिक्षिका झाले. फळा पुसत मी म्हटलं, ‘बरं, भारतीला म्हणावं, वाईट झालं खरं, पण आता काय करणार? गेलेलं माणूस काय परत येणारेय का? आपलं दुःखं बाजूला ठेऊन रोजचे व्यवहार पार पाडायलाच हवेत ना?शाळेत ये म्हणावं म्हणजे विसरायला होईल.’
‘पर बाई अनिताचं मूल जगलंय् नि ते संभाळायला भारतीला घरी रहायला पाहिजे. ‘
बापरे! आता मात्र अनिताचं मरणं, बाळाचं जगणं, नि भारतीचं शाळेत न येणं माझ्या मनात खोलवर शिरलं. माझा थंडपणा मलाच जाणवला. शाळा सुटल्यावर भारतीच्या घरी गेले. घर म्हणजे एक दहा फुटाची खोली. अंगण मात्र सारवलेलं, एका काळयामेळ्या फडक्यात एक तान्हं मूल आ ऊ करीत पडलेलं होतं. शेजारची एक शेंबडी पोरगी बाळाला खुळखुळा वाजवून खेळवत होती.
‘भारती, काय करतेयस ग?’मी हाक मारीत दारातून आत गेले.
भारती परकराचा ओचा सोडीत, त्याला हात पुसतच बाहेर आली.
‘अगबाई! बाई तुम्ही?’ असं म्हणत तिने मला बसायला पाट दिला. चुलीतला धुरकटलेला जाळ पेटवून ती आली. तिने बाळाला मांडीवर घेतलं नि ती त्याला थोपटत बसली. बाळ गाढ झोपलं.
मैदानावर खो खो खेळताना चपळाईने पळणाऱ्या भारतीचं ते मोठं आईपण बघून माझा जीव भरून आला. काय बोलाव कळेचना.
रडवेल्या स्वरात तीच मग म्हणाली.’बाई, कळलं ना तुम्हास्नी सगळं?
माझी शाळा आता बंदच झाली म्हणायची. मला लई म्हंजे लई वाटतय् शाळेत यावं, पर ह्याला कुटं ठ्येवनार?त्याची आई आमच्या पदरात टाकून गेली, बोळ्याने दूध घालावं लागत हुतं, आता चमच्यानी पितय. बाटली आनायचीय. ‘पं
भारती प्रौढ बाईसारखी बोलत होती. तिला खूप सांगायचं होतं, आपल्यासाठी बाई घरी आल्या याची अपूर्वाई वाटत होती. आपल्या शिक्षणाचं काय करायचं याची काळजी ऐकवायची होती. तिने मग माझ्यासाठी चहा ठेवला. ‘बाई चालल न्हव बिनदुधाचा? दूध न्हाई.’
‘चालेल ग. पण कशाला चहा?’ असं म्हणत मी कडू चहाचा घोट गिळला. नि थातूरमातूर काही तरी सांगून मी घरी आले.
क्रमशः…
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈