श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ गानसमाधी ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
हिन्दी भावानुवाद >> हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ गानसमाधि ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर
व्यासपीठावरून गाणार्या त्या तरुण गायकाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत होता. आत्ताच्या मैफलीत तो बागेश्रीला आवाहन करत होता. ती हळू हळू डोळे उघडू लागली होती. विलंब गतीतील आलापीत आळसावलेली ती, आळोखे पिळोखे देऊ लागली होती. हळू हळू ती उठू लागली. क्षाणाक्षणाला कणाकणाने उमलू लागली. प्रत्येक आलापाबरोबर पदन्यास करू लागली. तानांची बरसात होऊ लागली. ती त्यावर थिरकू लागली. नर्तन करू लागली. समेवरचा तो विलक्षण सुंदर ठहराव. … गायक रंगून गात होता. श्रोते तल्लीन होऊन ऐकत होते.
पाहिल्याच ओळीत बरोबर मध्यावर, गायकाच्याच समोर बसलेले वयस्क गृहस्थ डोळे मिटून बसले होते. गायकाचे लक्ष अधून मधून त्यांच्याकडे जात होते आणि तो थोडा थोडा विचलित होत होता. सरावाने तो गात होता, पण त्याच्या मनात सारखं येत होतं, ’हे असं झोपायचं असेल, तर इथं यायचं तरी कशाला?’ क्वचित त्याला वाटे, ‘आपण गाण्यात कुठे कमी तर पडत नाही ना! कानावर पडत असलेला पेटी-तबल्याचा ध्वनी आणि डोक्यात वळवळणारा हा किडा यांची जशी जुगलबंदीच चालू झाली होती.
अखेर बागेश्रीचं नर्तन थांबलं. त्या वयस्क गृहस्थांनी आता डोळे उघडले होते. गायकाने संयोजकांना त्या गृहस्थांना बोलावून आणायला सांगितले. ते जवळ आल्यावर गायकाने त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. मग म्हणाला, ‘आजोबा मी गाण्यात कुठे कमी पडतोय का?
‘छे: छे:! आजीबात नाही. असा विचारही तू मनात आणू नकोस….’
‘मग तुमची झोप अपूरी झालीय का?’
‘नाही… नाही.. आजिबात नाही. ‘
‘गाण्याच्या वेळी आपले डोळे मिटलेले होते. असं का?’
‘त्याचं काय आहे, डोळे मिटले की पंचेद्रियांच्या सर्व शक्ती श्रवणेंद्रियात एकवटतात. विशेषत: सैरभैर फिरणारी नजर आपल्या मनाच्या ठायी स्थिरावते आणि स्वर कसे आत… आत… मनात… काळजात उतरतात. डोळे उघडे असले की ते फितूर होतात. आस-पासचं हवं – नको ते पहात रहातात. नाही म्हंटलं, तरी गाण्यावरून लक्ष थोडं तरी विचलित होतं. बंद डोळे स्वर पूर्णपणे आत सामावून घेतात.’ असं बोलता बोलता अभावितपणे थोड्या वेळापूर्वी गायलेली एक आलापी त्यातल्या सुरेख मिंडसह त्यांनी गुणगुणली. तो तरुण थक्क झाला.
ते गृहस्थ पुढे म्हणाले, ‘तू चांगलंच गातोस. पण गायक गायनाशी इतका एकरूप झाला पाहिजे, की समोरचे श्रोते काय करताहेत, दाद देताहेत की झोपताहेत, ऐकताहेत की एकमेकांच्यात बोलताहेत , याचंही भान गायकाला राहाता कामा नये. याला गानसमाधी म्हणायचं, तुझं गायन या अवस्थेला पोहोचो!’ असं म्हणत त्या गृहस्थांनी त्या तरुण गायकाच्या डोक्यावर हात ठेवला.’
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
उज्वलाताई सुंदर लघुत्तम कथा, व्याकरण ही अचूक.