सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ जीवनरंग ☆ मिस् जोकर – भाग-4 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
खरंच मला आश्चर्य वाटलं ते वीस वर्षांपूर्वीची टवळी, बेजवाबदार, आई वडिलांच्या डोक्याला ताप देणारी, भावंडाच्या, मित्रमैत्रिणीच्या खोड्या काढून त्यांना हैराण करणारी शैतान मिस जोकर हीच का ती? तिचे आता वेगळंच रूप मी पहात होते. सारं हॉस्पिटल, स्टाफ, पेशंट, त्यांचे नातेवाईक हिला देव मानत होते. कोणाला आर्थिक तर कोणाला मानसिक मदत, कोणा पेशंटसाठी गरज असेल तर रात्री जागरण कर, कोणा पेशंटच्या नातेवाईकांची राहण्याची, जेवणाची तात्पुरती सोय कर. हेच तिचं काम ह्यातच तिला समाधान. हेच तिचं सुख. मग लग्न कार्य हवं कशाला? हे तिचं म्हणणं. कामात चोख, हुशार,चटपटीत, अपार मेहनत घेण्याची तयारी. त्यामुळे डॉक्टरांचा पण उजवा हात. डॉक्टर वेळ प्रसंगी तिच्यावर हॉस्पिटलची जबाबदारी टाकून सेमिनारला, बाहेर फिरायला, बिनधास्त जात होते. डिग्री नव्हती पण कामात डॉक्टराच्या इतकीच अनुभवाने, वाचनाने निष्णात झाली होती. हाताला यश पण चांगले होते. डिलिव्हरीसाठी लांबून लांबून स्त्रिया हिच्या धीरावर हॉस्पिटल मध्ये येत होत्या. कर्णोपकर्णी तिची कीर्ती वाढलेली. त्यामुळे डॉक्टर तिला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पाठवयाला तयार नसायचे.
आता 31 मार्च उजाडला. क्लोझिंगचा बिझी दिवस. मिस जोकर वर काका काकूंना सोपवून आम्ही निर्धास्त. कारण कोणालाही त्या दिवशी दांडी मारणे शक्यच नव्हते. एक एप्रिलला रविवार होता. मीच आमच्या ग्रुप मधल्या नीलाच्या मुलाशी, जो इव्हेंट मॅनेजर होता. त्याला कॉन्टॅक्ट केले. हॉस्पिटलचा स्टाफ, आमचा मित्रमैत्रिणीचा ग्रुप, तो ठणठणीत होऊन गेलेला पेशंट- विनोद धमाले, जोकरला मागणी घातलेले त्याचे आई वडील ह्या सगळ्यांना दुपारी जेवणाचं आमंत्रण दिले. काकांचा बंगलोरला असलेला मुलगा आणि सून पण शनिवार रविवार जोडून सुट्टी घेऊन काकूंना बघायला आणि जमले तर त्यांना घेवून जायला आले होते. सगळंच सरप्राईझ. योगयोगाने जोकरचा तो जन्मदिवस. तिकडे पण आई बाबांना एप्रिलफूल केले होते जोकरने. तिच्या आजारी आईच्या सोबतीला कोणाला तरी बसवून तिच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये आणण्याची व्यवस्था मी केली. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मिस जोकरचा सत्कार समारंभ करण्याचा घाट घातला. तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. आम्ही पण रोजच्या धावपळीतून रिलॅक्स झालो होतो. मिस जोकर ह्या सरप्राईझने चकीत पण खूप आनंदी झाली कारण आजपर्यन्त तिच्यासाठी कोणी असे कधी केलेचं नव्हते. तिचं फायदा घेऊन सगळेचं पसार व्हायचे. तिचे वडिल हा सत्कार समारंभ बघून गहिवरले. स्टाफचा पण उत्साह ओसंडून जात होता. त्यांनी सगळ्यानी आपल्या लाडक्या मिस जोकरबद्दल छान छान बोलून तिच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. आता पाळी आली तिला मागणी घालणाऱ्या विनोदच्या आई वडिलांची. ते तर पुऱ्या तयारीनिशीचं आले होते. डायरेक्ट सगळ्यांच्या समोर त्यांनी तिला मागणी घातली. तिच्या वडिलांशी, आम्हा मित्र-मैत्रिणीशी पण चर्चा केली. त्या वयस्कर मीना नर्सने पण त्याना दुजोरा दिला. आणि जोकरला पण मनापासून विनोद आवडत होता हे तिच्या चेहऱ्या वरून दिसतच होते. चला. विनोदच्या आईवडिलांनी दोघांच्या एंगेजमेंटचा दिवस 15 दिवसांनी येणारा गुढी पाडव्याचा मुहूर्त नक्की केला. आम्हाला तिकडेच आमंत्रण दिले. जोकरला शकुनाची साडी, श्रीफळ दिले. आम्ही तिच्या आईला आणि रेवतीला विडिओ कॉल करून समारंभात सामील केले होते. भावी वधुवरांनी सगळ्यांना वाकून नमस्कार केला. सगळ्यांनी काका काकूंना मनापासून धन्यवाद दिले. काकूंच्या पडण्यामुळेचं तर आज मिस जोकरची मिसेस विनोद धमाले झाली होती.
समाप्त!
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈