सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – कठपुतली ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“मम्मी, काल आमच्या शाळेत कठपुतलीचा खेळ दाखवला,” जमिनीवर बसून वहीत ड्रॉइंग काढत असलेली पारंबी म्हणाली.
“अरे वा, काय काय दाखवलं?” गाईला चारा घालून परत घरात येता येता मम्मीने विचारलं.
“अगं ए, गाईला चारा-पाणी देऊन झालं असेल तर जरा इकडे ये, आणि माझे पाय दाबून दे,” कॉटवर आरामात लोळत पडलेल्या नवऱ्याने हुकूम फर्मावल्यासारख सांगितलं.
“सगळं दाखवलं मम्मी— त्या बाहुल्यांनी विहिरीतून पाणी काढून घरात आणून ठेवणं, चुलीवर स्वैंपाक करणं, मुलांना आंघोळी घालणं, कपडे धुणे, इस्त्री करणं — सगळं सगळं दाखवलं—” काढलेलं चित्र रंगवता रंगवता पारंबीने सांगितलं.
“कसा वाटला तुला तो कठपुतलीचा खेळ?”— नवऱ्याच्या पायापाशी बसून आता ती बायको त्याचे पाय चेपायला लागली होती.
“खूपच छान”, पारम्बी उत्साहाने सांगायला लागली.
“दोऱ्यांचे एक एक टोक खेळ दाखवणाऱ्या त्या माणसाच्या बोटांना बांधलेले होते, आणि दुसरी टोके त्या बाहुल्यांच्या अंगावर बांधलेली होती. तो माणूस त्या बाहुल्यान्ना इशारा केल्यासारखा बोटं हलवतो, आणि मग त्या बाहुल्यांचे अंग हलायला लागते. मग तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते त्यांच्याकडून करून घ्या. उड्या मारायच्या, खाली पडायचं, नाचायचं, गाणं- बजावण करायचं, भांडणं करायची—- हे सगळंही करत होत्या त्या. खूप खूप मज्जा आली मम्मी मला.”
” थांब– पुरे झालं पाय चेपन”
” थांब— पुरे झालं आता. एक तरी काम व्यवस्थित करायला कधी शिकणार आहेस कोण जाणे”— नवरा रागावून म्हणाला. बायको कॉटवरून खाली उतरताच तो पुन्हा गुरगुरला— “चाललीस कुठे लगेच? जरा तेल लावून डोक्याला मालीश करून दे– आणि सावकाश कर– मान तोडायची नाहीये माझी,” त्याच्या आवाजात कडवटपणा होता.
“बाळा तू रिमोटवर चालणाऱ्या कठपुतळ्या पाहिल्या आहेस का?”– आता नवऱ्याच्या डोक्यापाशी बसून, त्याच्या डोक्याला तेलाने मालिश करणाऱ्या बायकोने विचारलं.
“रिमोटवर चालणारी म्हणजे?”– खोडरबराने चित्र खोडता खोडता पारंबीने विचारलं.
“म्हणजे– म्हणजे फक्त आवाज ऐकून सगळं काही करते ती — कठपुतली– जसे की– तुम्ही हुकूम द्या– जा, गाईला चारा घालून ये– की ती जाऊन गाईला चारा घालून येईल. मग तुम्ही सांगा, की इकडे येऊन पाय चेपून दे– मग ती पट्कन येऊन पाय चेपत बसेल. — मग तुम्ही तिला दम देत सांगायचं, की आता डोक्याला तेल —“.
एखादे झुरळ झटदिशी उडावे, तसे पारंबीचे लक्ष त्या चित्रावरून उडाले आणि ती मम्मीकडे बघायला लागली. खरं तर तिच्या लक्षात आलं होतं की, तिच्या मम्मीचा आत्ताचा आवाज हा आवाज नाही, तर बरसण्यासाठी व्याकूळ झालेले – गच्च दाटून आलेले काळे ढग होते. हातातलं खोडरबर तिथेच टाकून ती उठली, आणि जाऊन कॉटवर तिच्या मम्मीला चिकटून बसली — आणि तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाली — “मम्मी मी कठपुतली होणार नाही– मुळीच नाही– कधी म्हणजे कधीच होणार नाही मी कठ पुतली — तू मला स्वतःसारखी कठपुतली बनवू नकोस मम्मी—-
मूळ हिंदी कथा : श्री भगवान वैद्य “प्रखर”
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈