श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ ओठात उमटले हसू☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
श्याम आणि सरला दोघे पत्नी शहरात एका कारखान्यात कामाला आहेत. गावाकडे त्याचे म्हातारे आई-वडील रहाताहेत. खूप दिवसात त्यांची काही खबर कळलेली नाही. एके दिवशी संध्याकाळी श्याम सरलाला म्हणतो, ‘खूप दिवसात गावाकडची काही खबर नाही. पत्र नाही. निरोप नाही. आई-बाबा कसे आहेत, कुणास ठाऊक?’
‘मला वाटतं, उद्या सुट्टी आहे. आपण प्रत्यक्षच जाऊन बघून येऊ या.’
श्याम आणि सरला गावाकडे आले. थोडी धावपळ झाली, पण चालायचंच, त्यांनी विचार केला. गावाकडे आल्यावर त्यांना जरा वेगळं, विचित्र वाटलं. स्वस्थपणे बसून कुणी बोलत नव्हते. कधी आई बाहेर जात होती, कधी बाबा. श्याम वैतागलाच. दोन घटका जवळ बसणं नाही. ख्याली खुशाली विचारणं नाही. एवढा मुलगा आणि सून किती तरी दिवसांनी आलीत. जवळ बसावं. चार सुख-दु:खाच्या गोष्टी बोलाव्या. काही नाही. सारखे आपले कुणी ना कुणी तरी बाहेर. बरं थांबायला तरी कुठे वेळ आहे. संध्याकाळच्या एस.टी. ला निघायलाच हवं. असे अनेक विचार श्यामच्या मनात येत होते.
एकदा सगळं आईला विचारावं, म्हणून तो स्वैपाकघरात निघाला. तिथे त्याला आई-बाबांचं कुजबुजतं बोलणं ऐकू आलं म्हणून तो उंबर्याशीच थबकला.
रामप्रसादने उधार द्यायला नकार दिला. आता कुणाकडे जाऊ? सारी शंभर रुपयाची तर बाब…..’
‘हं! घरात फक्त मक्याचं पीठ शिल्लक आहे आणि कालची थोडीशी भाजी उरलीय. किती तरी दिवसांनी मुलगा सून आलीत. त्यांना निदान चपाती, भाजी, शेवया, भजी एवढं तरी करून वाढायला नको? सून काय म्हणेल? आपले सासू-सासरे इतके खालच्या थराला पोचले की काय, असं वाटेल तिला. ‘घरात गाय, म्हैससुद्धा नाही की दही, दूध, तूप लोणी असं काही चांगलं- चुंगलं वाढता येईल. फार नको. कुठून तरी साठ- सत्तर रुपये मिळाले, तरी पुरे.’
आई आणि बाबांचं बोलणं ऐकता ऐकता श्यामला वाटलं, आपल्या काळजात जसे काटे टोचताहेत. पैशाची इतकी ओढग्रस्तीची परिस्थिती असतांनाही त्यांनी आपल्याला काहीच कळवलं नाही. आपण तरी शहरात रोज कुठे मेजवानी झोडतो, पण रोजची भाजी-भाकरी तरी मिळते. इथे तर… समजा आईला सांगितलं, ‘आम्हाला भूक नाही, तू त्रास घेऊ नकोस. ‘ पण मग नंतरा आईच्या मनाला सारखं टोचत राहील, मुलगा-सून आले पण उपाशीच गेले. आपण त्यांना नीट जेवायलाही घालू शकलो नाही. तिचं काळीज सारखं कुरतडत राहील.
काय करावं, श्यामला सुचेना. सरलाशी बोलावं म्हणून तो मागे वळला, तर सरला तिथेच उभी होती. तिनेही त्यांचं बोलणं ऐकलं असणार. श्याम काही तरी बोलणार, एवढ्यात सरलाने ओठांवर बोट ठेवून गप्प बसण्याची खूण केली.
नंतर सरला स्वत:च स्वैपाकघरात गेली आणि सासूला म्हणाली, ‘आई, आम्ही आज इकडे का आलो, माहीत आहे? खूप दिवस झाले, तुमच्या हातची मक्याची रोटी खाल्ली नाही. त्याची खूप आठवण झाली, मग आम्हाला राहवेच ना! म्हणून आज इकडे आलो आणि आई, कालची भाजी शिल्लक असेल, तऱ ती आमच्यासाठीच ठेवा बरं का? माझी आई म्हणते, मक्याच्या रोटीबरोबर शिळी भाजीच जास्त स्वादिष्ट लागते. आणखी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हं आई! मुलगा आलाय म्हणून कौतुकाने भाजीवर तेल, तूप, दही, लोणी वगैरे घालाल! तर तसं करू नका बरं का! डॉक्टरांनी आम्हाला तेल, तूप, दही, लोणी वगैरे गोष्टी खायची मनाई केलीय!’
सुनेचा बोलणं ऐकलं आणि सासूच्या कळाहीन, विझू विझू झालेल्या चेहर्यावरील सुरकुत्यातून बघता बघता खुशीच्या, आनंदाच्या लाटा , पाण्यातील तरंगासारख्या पसरू लागल्या आणि त्या लपवाव्या असं तिला मुळीच वाटलं नाही.
**** समाप्त.
***उद्या जागतिक महिला दिन. या दिवशी सातत्याने सजगता आणि सक्षमता हे शब्द उच्चारले जातात. म्हणजे स्वत:वर होणार्या अन्यायाची जाणीव होणं आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी सिद्ध होणं. सजगता आणि सक्षमता हे शब्द तसे व्यापक आहेत. दुसर्यांच्या अडी-अडचणी, भाव – भावना जाणून घेणं आणि आपल्या परीने त्या समजून घेण्याचा, सोडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजेही सजगता आणि सक्षमता नाही का?
डॉ.कमाल चोपडा यांची एक कथा आहे, ‘छिपा हुआ दर्द’. ही अशीच एक कथा. एका समंजस, शहाण्या सुनेची कथा. सासूच्या सन्मानाला धक्का लागू न देता परिस्थितीतून मार्ग काढणारी नायिका, माझ्या चांगलीच लक्षात राहिलीय. महिला दिनाच्या निमित्ताने आठवली. म्हणून आपल्यासाठी तिचा मराठी अनुवाद सादर
—– उज्ज्वला केळकर
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈