सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ जीवनरंग ☆ प्रमोशन- भाग-2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

दुसऱ्या दिवशी सकाळीही वातावरण तंगच होतं. तसा सकाळी कोणाला हसाबोलायला वेळ नसतो.पण तरी फरक जाणवण्याजोगा होता.

बाईने उपमा करुन ठेवला होता. दोन्ही गॅसवर आमटी आणि भाजी शिजत होती. तिसऱ्यावर बाई चपात्या करत होती.

मग चौथ्या शेगडीवर आरतीने चहाला ठेवलं. स्वतःसाठी आणि समरसाठी उपमा वाढून घेतला. तोपर्यंत भाजी, कोशिंबीर तयार झाली होती. तिने मग समरचे आणि स्वतःचे डबे भरले आणि त्या त्या बॅगमध्ये नेऊन ठेवले. स्वतःसाठी आणि समरसाठी चहा गाळून घेतला आणि ती उपमा खायला बसली.

मधूनमधून समरला हाका मारणं चालूच होतं -“समर, आटप लवकर. आठ पंचवीस झालेत.”

समरचा पत्ता नव्हता. आई नेहमीप्रमाणे समरला घाई करायला गेल्या नाहीत.

आरतीने ब्रेकफास्ट आटोपला आणि समरची वाट बघत न बसता ती ऑफिसला निघाली.

ट्रेनमध्ये चढली, तरी तिचा वैताग कमी झाला नव्हता.

“काय ग? आज सकाळी सकाळी भांडायबिंडायला वेळ बरा मिळाला,” निमाने विचारलं.

“अगं, वेळ कुठचा मिळायला!स्वयंपाकाला बाई ठेवली, तरी इतर कामं असतातच ना. डबे भरणं, बॅगमध्ये ठेवणं, चहा करणं, खायला वाढणं, शिवाय मुलांचं बघणं -सगळी कामं मी करायची. हा आयता येऊन बसणार. म्हणून तर याला रुसायफुगायला वेळ मिळतो ना.”

“अच्छा!आज ‘आप रुठा ना करो’ होतं वाटतं?”निमाने चिडवलं.

“काल रात्रीपासूनच. म्हणजे होतं आधीपासूनच;पण मला कळलं काल रात्री.”

“अगं, झालं तरी काय?”

“तुला सांगते निमा, आठवण झाली, तरी डोकं सणकतं. अगं, मी प्रमोशनसाठी अप्लाय केलंय ना, तर आईंचं आणि समरचंसुद्धा म्हणणं असं की, प्रमोशन फक्त समरनेच घ्यावं. बायकांना काय करायचीत पुढची प्रमोशन्स? आणि म्हणे समरची एकट्याची ट्रान्सफर झाली, तर तो एकटा जाऊ शकेल ; पण माझी एकटीची ट्रान्सफर झाली, तर मी मुलांना घेऊन जायचं. म्हणजे तशी मुलांची काळजी मलाही आहेच. त्यांच्यापासून लांब मी राहूही शकणार नाही. पण हा सगळा विचार मी स्वतः करीन ना. हे कोण माझ्यावर सक्ती करणारे?”

“काही नाही आरती. तू सरळ सांगून टाक -मी प्रमोशन घेणार म्हणजे घेणार. आणि ट्रान्सफरचं म्हणशील, तर मीरा कशी ग गेली?”

“बघ ना. एवढ्या लांब यु.पी.ला जाऊन राहिली. तीसुद्धा एक नाही, दोन्ही नाही, चांगली साडेतीन वर्षं!आणि चार वर्षाच्या मुलाची जबाबदारी सासू आणि नवऱ्याने घेतली.”

“तू काहीही म्हण, आरती. पण घरच्यांचं सहकार्य असल्याशिवाय आपण बायका काहीच करू शकत नाही. आपली हुशारी, टॅलेंट, कर्तबगारी सगळं फुकट जातं, हेच खरं.”

याविषयी दोघींचं एकमत झालं. निमाने पूर्णविराम देऊन हा विषय संपवून टाकला.

पण आरती मात्र दिवसभर त्यावर विचार करत होती. आणि ती जितका जास्त विचार करत होती, तितका प्रमोशन घेण्याचा तिचा निर्णय आणखी दृढ होत होता.मग तिने ठरवलं -घरातल्यांना तोंड कसं द्यायचं, याचा विचार करण्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे.

मग भराभरा तिने सगळं काम हातावेगळं केलं. मग इंटरव्ह्यूच्या दृष्टीने कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी कोणती सर्क्युलर्स, मॅन्युअल्स, पुस्तकं वाचायची, याची यादी केली. महत्त्वाच्या क्रमानुसार त्यांना नंबर दिले. पहिल्या क्रमांकाच्या टॉपिकची सर्क्युलर फाईल घेऊन तिने वाचायला सुरुवात केली. वाचतावाचता नोट्सही काढल्या. काही काही गोष्टी तिला अगदी तोंडपाठ होत्या; पण कदाचित  समरच्या लक्षात नसू शकतील, म्हणून तिने त्याही लिहून काढल्या. साधारण पन्नास एक मिनिटात तिने ती फाईल संपवली. मग पुन्हा एकदा तिने आपण काढलेल्या नोट्सवरून नजर फिरवली. फर्स्टक्लास जमल्या होत्या. समरलाही उपयोग होणार होता. त्याने ती पूर्ण फाईल न वाचता फक्त या नोट्स वाचल्या असत्या, तरी त्याचं कामं झालं असतं.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments