श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ अहल्या – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

अहल्येची नि माझी ओळख माझ्या नकळत्या वयात झाली. आमचं बालपण, तिन्हिसांजेला घरी आल्यावर हात-पाय धुऊन, वडीलधार्‍यांना नमस्कार करून, ’शुभं करोती’ आणि नंतर पाढे-परवचे म्हणण्यात सरलं. ते झालं की आजी वेगवेगळे श्लोक शिकवायची. म्हणून घ्यायची. त्यानंतर गोष्टीचा खुराक असे. या विविध प्रकारच्या श्लोकांमुळे, मनावर आणि वाणीवर उत्तम संस्कार होतात, असं तेव्हा मानलं जायचं. तिने शिकवलेल्या श्लोकांमध्ये एक श्लोक असा होता-

‘अहल्या, द्रौपदी, सीता, तारा मांदोदरी तथा। पंचकन्या स्मरे नित्यं महापटक नाशनम्।।‘    अर्थ न समजता, त्यावेळी पाठांतर म्हणून पाठ केलेला हा श्लोक.

प्राथमिक शाळेत गेल्यावर देव-देवतांच्या, रामायण-महाभारतातल्या कथा वाचायला-ऐकायला मिळाल्या. त्यातच रामाच्या पदस्पर्शाने शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार झाला, ही कथाही ऐकली-वाचली. त्याच काळात रामदासांचे मनाचे श्लोक पाठ केलेले आठवतात. त्यातच एक श्लोक असा होता, ‘अहल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होओनी गेली. ‘

अर्थात असा अहिल्येला उद्धारणारा श्रीराम, ज्याचे गुणवर्णन करताना वेदवाणीही शिणून गेली, त्या रामाच्या गैरवासाठीच या श्लोकाची रचना रामदासांनी केली होती.

हायस्कूलमध्ये गेले आणि हे असं का? ते तसं का, हे जाणून घेण्याचं कुतुहल वाढलं. त्यावेळी एकदा आजीला म्हंटलं, ‘ तू तो पंचकन्या स्मरे नित्यं ’ श्लोक शिकवलास ना, म्हणजे बघ…. आधी कितीही पापं केली, तरी चालतील…  या पंचकन्यांचं स्मरण केलं की झालं! मिळाली सगळ्या पापांपासून मुक्ती…’

‘फाजीलपणा करू नकोस! तुम्हाला पापं करायला परवानगी दिलीय, असा नाही याचा अर्थ होत!’ आजी रागारागानं म्हणाली.

‘पण काय ग आजी, या पंचकन्यांचं स्मरण का करायचं?

‘अग, त्या महान पतिव्रता होत्या.’

‘ मग मला सांग आजी, अहल्या पतिव्रता होती ना? मग गौतम ऋषींनी तिला शिळा होण्याचा शाप का दिला?’

‘भ्रष्ट झाली होती ना ती?’

‘पण ती भ्रष्ट झाली यात तिची काय चूक होती? मग तिला का शाप?’

‘तुम्हा हल्लीच्या मुलींना काही सांगायची सोय नाही. सांगायला गेलं की टांगायला नेता तुम्ही!’ आजीचं हे उत्तर म्हणजे स्वत: माघार घेताना दुसर्‍यावर ठेवलेलं ठेपर असे. पण अहल्येचं पातिव्रत्य आणि तिचं शिळा होणं याची तर्कशुद्ध सांगड काही आजीला घालता यायची नाही.

अभ्यास वाढला आणि विज्ञानाचा पगडा मनावर बसला, तेव्हा माणसाचं शिळा होणं, बुद्धीनं नाकारलं. या कथेवरची चमत्काराची पुटं खरवडून, त्यावेळी नक्की काय घडलं असेल, याचा शोध, मन नकळत घेऊ लागलं.

अहल्येकडे गौतमाच्या वेशात इन्द्र आला आणि अहल्या फसली, असं पुराणकथा सांगते. पण मला वाटतं, तसं नसणार. कारण ती गौतमांच्या स्ंनन्संध्येची ती वेळ. आपला पाती कोणत्या वेळी कोणती मागणी करेल आणि कोणती अपेक्षा बाळगेल, हे पत्नी या नात्याने अहल्येला निशितच माहीत असणार. ’गणेश पुराण’सारख्या काही पुराणातून अहल्येने इंद्राला ओळखलं होतं, असंही म्हंटलं आहे पण अहल्येने स्वखुशीने इंद्राला जवळ केलं, असं मानलं, तर परंपरेने एक पतिव्रता  स्त्री म्हणून अहल्येचं नाव आपल्यापर्यंत पोचवलं नसतं. काळाच्या विस्मृतीत ते केव्हाच लोप पावलं असतं.

इंद्र, इंद्र म्हणूनच अहल्येकडे गेला असेल. त्याला वाटलं असेल, आपल्या वैभवाने, नाव-कीर्तीने आपल्या सौंदर्याने-शौर्याने-सत्तेने अहल्या दिपून जाईल पण प्रत्यक्षात तसे घडले नसेल. अहल्येच्या सौंदर्याने मोहित झालेल्या इंद्राने तिच्यावर बलात्कार केला असेल. या आकस्मित आघाताने ती इतकी बधीर, चेतनाशून्य झाली असेल, की आपल्याबाबतीत काय घडलं, याची जाणीवच ती हरवून बसली असेल. एखाद्या दगडाप्रमाणे, ती आपल्या जाणीवा, वास्तवाचं-परिसराचं भान हरवून बसली असेल. अहल्या शिळा झाली असेल, ती या अर्थाने. एखादा कटू प्रसंग विसरण्यासाठी, तो घडल्याचच मन-बुद्धी नाकारते, असं मानसशास्त्र सांगतं. अहल्येच्या काळातील समाजाची मानसिकता लक्षात घेतली, तर तेव्हा पातिव्रत्य या मूल्याला सगळ्यात जास्त महत्व होतं. त्यामुळे व्यक्तीगत पातळीवर अहल्येने स्वत:चं अस्तित्व नाकारलं असेल. तत्कालीन समजधारणेचा विचार केला तर, चूक आसो की नसो, अहल्या भ्रष्ट झाली, ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे अहल्या एक प्रकारे वाळीत टाकली गेली असेल. तिच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला गेला असेल. तिचे अस्तित्व नगण्य, अर्थशून्य मानले गेले असेल. अपराध इंद्राचा असेल, हे मनोमनी पटूनही इंद्रासारख्या देवराजाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण दाखवणार? त्यापेक्षा अहल्येला दोषी ठरवणं, अपराधी ठरवणं जास्त सोपं होतं. जास्त सोयीचं होतं. त्यामुळे त्यांनी तिच्याशी बोलणं टाकलं असेल. नातं तोडलं असेल. तिच्याबरोबर कुठलाही व्यवहार करणं टाळलं असेल. ती अगदी एकटी, एकाकी पडली असेल, रस्त्यावरच्या शीळेसारखी.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments