सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ प्रमोशन- भाग-3 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

ऑफिसमधून ती घरी निघाली,तेव्हा पुन्हा एकदा घरातल्या वादळाने तिचा पाठपुरावा केला.

ट्रेनमध्ये तिच्या ग्रुपमधलं कोणीच नव्हतं. त्यामुळे ट्रेन सुरू झाल्याबरोबर तिने डोळे मिटून घेतले आणि तिची नेहमीची आयडिया केली.

ही तिची कॉलेजात असल्यापासूनची सवय. गाडगीळ मॅडमनी सांगितलेली आयडिया. आपल्याला कसलं टेन्शन आलं, काही समस्या आल्या,कोणी त्रास देत असलं, की आपण डोळे मिटून कल्पना करायची. त्या समस्या, ती माणसं जमिनीवर ठेवायची आणि समोरच्या टॉवरमधल्या लिफ्टमध्ये चढून आपण वरवर जायचं. जाताना आपली नजर त्या समस्यांकडे, माणसांकडे ठेवायची.असं कल्पनेत आपण वरवर जात असतो, तेव्हा जमिनीवर असताना मोठमोठ्या वाटणाऱ्या त्या समस्या लहान लहान होत होत शेवटी दिसेनाशा होतात. मग लिफ्ट तिथेच थांबवून पटकन डोळे उघडायचे. आपण रिलॅक्स्ड झालेले असतो. त्यामुळे नीट विचार करू शकतो. समस्याही पूर्वीएवढ्या भीतीदायक वाटत नाहीत. त्यावर मात करण्याचा अचूक मार्ग आपल्याला सुचतो.

आताही आरतीने तेच केलं. जसजशी लिफ्ट वर जाऊ लागली, तसतशी  समर, त्याच्या आई,प्रमोशन वगैरे छोटे छोटे होत दिसेनासे झाले आणि एकदम तिच्या लक्षात आलं -या समस्येचं मूळ आहे समरचा इगो आणि आजूबाजूची पुरुषप्रधान संस्कृती. यासाठी समरच्या मनाची तयारी केली पाहिजे.

आता जरी सैरभैर झाला असला, तरी मुळात समर इगोइस्ट, अहंकारी नव्हता. आरतीच्या हुशारीची त्याला चांगलीच जाणीव होती. एवढंच नव्हे, तर त्याला तिच्याविषयी आदर आणि अभिमानही वाटत असे. म्हणजे त्याची ऐकायची तयारी असेल, तर आरती त्याला व्यवस्थित पटवून देऊ शकेल.

पण घोडं तिथेच पेंड खात होतं. तो सध्या इतका बिथरला होता, की तो आरतीकडून एकही शब्द ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

यासाठी आईंचं प्यादं सरकवावं लागणार होतं. एकदा का त्यांची समजूत पटली असती, तर त्या आरतीच्या बाजूने नक्की उभ्या राहिल्या असत्या. मग समरही या दोघींचं बोलणं ऐकायला तयार झाला असता.

हे उत्तर सापडल्यावर आरती स्वतःवरच खूष झाली.

आता पहिला मोर्चा आईंकडे वळवायचा. आईंना काय काय कसं कसं पटवून द्यायचं, त्याचा तिने पद्धतशीर विचार करायला सुरुवात केली. त्यांच्याशी कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलायचं, त्याची मनातल्या मनात नोंद केली. काही मुद्दे बिनतोड होते, की ज्यांच्याविरुद्ध त्या जाऊच शकणार नाहीत. ते मुद्दे पहिले चर्चेला घ्यायचे. त्यानंतर साधारण मुद्दे आणि सर्वात शेवटी स्फोटक विषयांवर बातचीत.

अर्थात यातलं सर्वात महत्त्वाचं गृहीतक होतं ते, आईंनी शांतपणे सगळं ऐकून घेणं. कारण त्या कालच्यासारख्याच चिडलेल्या असतील, तर काहीही ऐकून न घेता तिसरंच काहीतरी बोलून आरतीला उडवून लावणार.

घरी आल्याआल्या आरतीने आईंना सांगून टाकलं, “आई, मी दिवसभर विचार केला आणि तुमचं म्हणणं मला पटलं.”

आई खूष झाल्या.

“आई, आता बोलण्यात वेळ घालवत नाही. रात्री जेवणं वगैरे आटोपल्यावर बोलूया. फक्त तुम्ही आणि मीच बोलूया हं. कारण बाईला काय वाटतं, ते बाईच समजू शकते. समरला सांगायला गेले, तर म्हणणार -फालतू कायतरी बडबडून माझं डोकं खाऊ नकोस.”

आरतीची मात्रा बरोबर लागू पडली. आईंचा मूड एकदम छान झाला. मग नेहमीसारख्या त्या पिट्टूच्या खोड्या, जुईची बडबड वगैरेविषयी बोलू लागल्या.

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments