सौ. राधिका भांडारकर
☆ जीवनरंग ☆ दाखला – भाग – 3 ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
….मग तानीबाई वळली.ग्राम पंचायतीच्या आवारातूनन बाहेर पडून सडकेवर आली. ऊन्हं चढली होती.
पायात चप्पल नव्हती. तांबड्याला विचारलं पाहिजे.
मिळेल का मोतीरामच्या मृत्युचा दाखला?आणि समजा तो मिळाला, तर हे लोक मोतीरामच्या जन्माचाही दाखला मागतील, मग तोकुठून आणू?
तिची पाउलं झपझप खोपटाकडे जाण्यासाठी ऊचलु लागली.
मनात झरत होतं… तानीबाईच्या आयुष्यात मोतीराम कसा आला?
रस्त्यावर भटकणारा एक कुत्रा. तानीबाई ताटलीत भाकरी घेउन बसली की, हा शेपुट हलवत यायचा. तानीबाईही त्याला आपल्यातल्या भाकरीचे तुकडे घालायची.. हळुहळु दोघांनाही एकमेकांचा लळा लागला. तानीबाईनेच त्याचं नामकरण केलं.
“मोतीराम” आणि तिच्या एकाकी जीवनात तिला एक सोबती सवंगडी मिळाला. दुरावलेल्या मुलांची जागा त्याने भरुन काढली.
आणि आता सरकार त्याच्या जन्म मृत्युचा दाखला मागतंय्!! ..कुठून आणू?
सरकार बदललं. प्रगती झाली. नोटाबंदी आली.जी. एस.टी. लागू झाला. महसूल वाढला. पेट्रोल महागलं. शेतकर्यांनी आत्महत्या केली. त्यांना कर्जमाफी झाली. या सगळ्यांशी तानीबाईचा काहीच सबंध नव्हता… तिच्या आयुष्यात काहीच बदल घडला नाही.
गावात कलाबाईचा मेळ होता. तिने निरोप धाडला की तानीबाई शेतात जायची. शेतातले तण ऊपटायचे. बोंडं तोडायची. लोंब्या काढायच्या.. शेंगा खणायच्या…
दिवसाकाठी मजुरी मिळाली की, येतांना तेल तिखट, मीठ पीठ आणायचं.. रांधायचं.. अन् खाऊन झोपायचं….
वस्तीतले लोक चांगले होते. तिची विचारपूस करायचे.
सणावारी कुणी गोडधोड केलं तर तिलाही वाटीतनं द्यायचे… तानीबाईला कुठे होता भविष्याचा विचार…….??
……पावलं रेटत रेटत ती स्वत:च्या खोपटापाशी आली. कोपर्यात भलंमोठं निंबाचं झाड होतं…. पारावर तिनं बुड टेकलं… झाडानं गार सावली दिली. तिने नजरेच्या परिसरातली वस्ती न्याहाळली. बागडणारी, ऊड्या मारणारी, अर्ध्यामुर्ध्या कपड्यातली शेंबडी, मळकट पोरं पाह्यली… पुरुष… बायका.. काही कामांत, काही निवांत.. रिकामी… कुणीतरी लांबून हाकारल….
“..अग!! ए आज्जे कुटं गेली हुतीस? सक्काळपासनं दिसली बी नाय्….जेवलीस का?ये न्हाय तर…तुझ्या सुनेनं फक्कड रस्सा बनवलाय्….”
ऊगीचंच तांबड्यानं या सरकारी योजनेचं भूत डोक्यात घातलं…. पायाखालची जमीन, डोक्यावरचं आभाळ अन् खोपटाभवतालचे हे आपुलकीचे आवाज… त्यांची आभाळागत माया… काय हवं आणखी… बाकी काळजी त्या पांडुरंगालाच की.. मग तानीबाई घरात आली.
भिंतीजवळची पत्र्याची पेटी ऊघडली… दाखला पाहिजे म्हणे……हातातलं रेशनकार्ड, पेटीच्या तळाशी, होतं तिथं ठेऊन दिलं… अन् पेटी बंद केली.
तानीबाईपुरता हा विषय संपला होता….बाकी तांबड्याला सांगूच काय घडले ते….
समाप्त.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈