सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

लग्न झालं, पुजा झाली. आधी देवाच्या पाया पडायला गोव्याला, मग केरळ सारख्या  मस्त हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी फिरुन आलो. पण तिकडेच मी त्याच्याकडे कबूल करुन घेतले.”तू एकटा मी पण आईबाबांची एकटी मुलगी पण आपल्याला मात्र दोन किंवा तीन तरी बछडी पाहिजेत हा”तर साहेब म्हणतात, “हे इकडे सांगण्यापेक्षा गोव्याला सांगितले असतेस तर बरं झालं असतं मी देवाकडे तरी जुळं तीळं मागून घेतलं असतं. हाहाहा ” नेहमीच्या स्टाईलमध्ये हसून विषय संपवला.

आम्ही मुंबईला आलो. नेहमीचे रूटीन चालू झालं. नव्या नव्यानवलाईचे दिवस. ‘अहो ‘आईंना मला कुठे ठेवू  आणि कुठे नको असे झाले होते. माझ्यासाठी कपडा, साडी, दागिना, पर्स,  काय काय घेऊन येऊ लागल्या. त्यांचा चॉईस पण छान होता. आम्हाला रविवारी ह्या आत्याकडे पुढच्या रविवारी त्या काकांकडे असे कौतुकानी न्यायच्या. आज हा सण, उद्या दुसरा. नंतर श्रावण आला. मंगळागौर. आमच्याकडे सगळे जमले. रात्रभर जागवली मज्जाच मज्जा. दुस-या दिवशी रक्षाबंधन.ह्याला  सख्खी बहीण नसल्यामुळे मानलेल्या. बहिणी राखी बांधायच्या त्या आल्या. ह्यांच्या चुलत, मामे, मावस बहिणी पण मंगळागौरीला आलेल्या सगळ्या राहिल्या.आमच्याकडे मज्जाच मज्जा. आता त्यांच्या लाडक्या भावाची एकुलती एक लाडकी बायको आली होती ना तिच्याशी गप्पा मारायला धमाल करायला. आज मला कळलं ह्याला सख्खी बहीण नसली तरी अशा  त्याच्यावर प्रेम, माया करणाऱ्या खूप बहिणी आहेत.

मग श्रीकृष्ण जन्म, गणपती उत्सव सगळे आमच्याकडेच. त्यामुळे घर सतत भरलेले गोकुळ मला हवे असलेले.  एकदा ते सणवार झाले कि सगळे आपापल्या घरी गेले कि परत आम्ही एकटेच.

वर्षभराचे सगळे सणवार आईने आणि  ‘अहो ‘ आईने अगदी थाटामाटात केले. दोघीने आपापली हौस पुरवून घेतली. म्हणेपर्यंत चिमुकल्या पाहूण्याची चाहूल  लागली. दोन्ही घरात माझे नको इतके लाड करण्याची परत चढाओढ सुरु झाली. मनांत विचार आला हे पण अजीर्ण होतंय. किमान आणखी एकेक अपत्य दोन्ही घरांत असते तर माझी लाडाकोडात भागीदारी झाली असती आणि ह्या अजीर्णाचा त्रास कमी झाला असता. चोरओटी झाली, डोहाळे जेवण, झाले. झोपाळ्यावरचे, चांदण्यातले वगैरे वगैरे. आणि एकदाच आमचं पहिलवहिलं कन्यारत्न  जन्माला आलं. आजोबा  एकदम खूष. त्याना मुलगी नव्हती ती मिळाली. पहिली बेटी धनाची पेटी वगैरे म्हणून आनंदी झाले. आजीचं मात्र  तोंड एव्हढंस झाले तिला पहिला नातू हवा होता. हे म्हणतात  कसे त्यांना “आई अग आज नात झाली पुढच्या वर्षी  राखी बांधून घेण्यासाठी येईल कि छोटासा भाऊ. आमच्या हिला नाहीतरी घराचं गोकुळ करायचं आहे. आम्ही दोघेही एकुलते एक ना. ना तिला भाऊ बहीण, ना मला हे तिचं दुःख आहे.

क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments