श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ जीवनरंग ☆ कथा – ‘पुरस्कार’ – भाग – 4 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
तेव्हढ्यात एक तरूण मुलगा शाळेचं काही काम घेऊन सरांच्या सहीसाठी आला. “हे आमचे क्लार्क. म्हणजे आमच्या मंडळींचा भाऊच आहे.”
महत्त्वाची ठाणी कशी सुरक्षित ठेवलेली होती हे माझ्या लक्षात आलं. कार्यकारी मंडळातही अशी नाती संभाळलेली होती. शिपाई तेव्हढे बाहेरचे. एक मुलगा नि मुलगी शिक्षक होते.
“तुमच्या नंतर पुढची पिढी हे. मा. होतील ना सर? म्हणजे सिनिऑरिटी आहे ना? मी विचारलं. मी त्यांच्यासारखच बोलायला लागले होते.
“यादीत बसवला. प्रयत्न करावे लागले, पण काम झालं.” “वा,वा” असं मी म्हणतेय तोवर सरांच्या सुविद्य पत्नी पोह्यांची डिश घेऊन बाहेर आल्या. “दमला असाल ना? जरा नाश्ता करा” म्हणून माझ्या शेजारी बसल्या. मग घरगुती गप्पा सुरु झाल्या.
“तुमच्या सुना काय शिकल्यात?”
“एक बी.ए. एक बी.काँम झाली. नोकरी नाही करीत त्या. मुंबई पुण्यासारख्या आपल्याकडे नोकऱ्या कुठे मिळतात?”
“दोघीना बी. एड. करून सोडा की”.
“ते कसं? ती अँडमिशन पण अवघड झालीय् म्हणे.”
“मिळते. प्रयत्न करावे लागतील.” –सरच उत्साहाने म्हणाले.
‘प्रयत्ने वाळूचे’ हे सुभाषित मला पूर्वी खोटं वाटायच, पण आता मला ते पटल.
“सुनाना शाळेत चिकटवा. तुमचं नांव राखतील पुढे पर्यंत.”
“पण सर, बीकॉमवालीचा शाळेत काय उपयोग?” आणखी ज्ञान मिळवण्याच्या हेतुने मी विचारलं.
“आता आठवीला अर्थशास्त्र आहेच की. नाहीतर तिला प्रायमरीला घ्या. ”
“पण आमच्या शाळेत प्राथमिकचे वर्ग नाहीत” माझ्या शंका प्राथमिक होत्या, पण सरांकडे प्रत्येक प्रश्नावर तोडगा होता.
“आता तुम्हीच हे. मा. नाही का? पहिली ते चौथी काढून सोडा की.”
“परवानगी?”
” मिळत्येय की. प्रयत्न करावे लागतील.” वाकय मला पाठच झालं होतं.” न्हाई तर असं करा की.” आता सौ. ढेकळे सरसावून म्हणाल्या. त्या काय युक्त्या सांगतात ह्या उत्सुकतेने मी त्यांच्याकडे पाहिलं.
“अव, आमच्या वन्संच्या पोरीला आम्ही क्लार्क केली की. तसं करा बीकॉम वालीला. बी.एड. काय करायला नको” सर आपल्या कार्यवाहू पत्नीकडे कौतुकाने बघायला लागले. आपण आपल्या घरात शिक्षण प्रेमाच्या बिया पेरल्या त्या आता चांगल्या रुजून आल्या की. हा भाव त्यांच्या डोळ्यात होता.
“बाई, तुमचे चिरंजीव? ते काय करतात?”
“एक वकील आहे नि दुसऱ्याचा पंपाचा बिझिनेस आहे. माझे मिस्वटर दोन तीन वर्षात रिटायर्ड होतील.” मी सगळ्याचा प्रश्न मिटवून टाकला.
“चांगलय. तुमचं पहिलं पोरगं शाळेच्या बाबतींत कायदेशीर सल्ला देईल नि धाकट्या कडून शाळेत पंप बसवा. मिटिंगच्या वेळी मुलाची कार्ड वाटायची. म्हणजे त्यालाही तुमची मदत.”
सरांकडून मुख्याध्यापक ह्या विषयावर पी.एच्.डी करता येईल एव्हढा विश्वास मला मिळाला होता.
मग मी पुन्हा फायलींकडे वळले. व्रुक्षारोपन- न चा ण केलेला. आर.आर. आबा, सा.रे. कोरे सगळ्या नेते मंडळींचे झाडं लावतानाचे फोटो होते.
“बापरे. ही थोर माणसं आली होती शाळेत?”
“फोटो मिळतात की. “सरनी अंदरकी बात सांगितली. शै. करिअर -ह्या विषयात मात्र फार फोटो नव्हते. चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेला बसले इथपासून मध्यभारत युनिव्हर्सिटी ची बी,ए., बी.एड., बी.पी.एड्.अशी खूप सर्टीफिकिटांच्या झेरॉक्स फायलीत नीट लावलेल्या होत्या. सरांच्या नांवापुढे लांबलचक पदवी गिचमिड अक्षरात होती. ती वाचायच्या भानगडीत कोण पडणार?
क्रमशः ….
श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈