श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ शारदारमणांची सेटी- भाग 2 (भावानुवाद)☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
(मागील भागात – जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली. आता इथून पुढे )
जिलेबी आणि वडा खात खात अशी बोलणी होऊ लागली. नंतर त्यावर चहा घेता घेता असं ठरलं की शारंच्या कवितांच्या १० – १५ प्रेस कॉपीज तयार करायच्या आणि आपल्या पुठ्ठयातल्या म्हणजे जवळीक असलेल्या प्रकाशकांना द्यायच्या. इतक्या ठिकाणी खडे मारल्यावर कुठे तरी लागणारच की. प्रत्येकाने खात्रीपूर्वक सांगितले के नवांकूर प्रतिभा मंडळाच्या अध्यक्षांचं काम म्हणजे मंडळातील प्रत्येक सभासदाचं स्वत:चं काम.
पुढच्या १५ दिवसात नवांकूर प्रतिभा मंडळाच्या सभासदांनी शारंकडून माफक प्रवासखर्च घेऊन त्यांच्या कविता आपआपल्या परिचयाच्या प्रकाशकांकडे पोच केल्या. त्यानंतर सहा महीने उलटले. कुणाचं तरी स्वीकृतीचं पत्र आलेलं असेल, या आशेने शारं रोज पोस्टात जाऊ लागले. पण पोस्टमन, त्यांनी कुठे कुठे पाठवलेलं आणि साभार परत आलेलं साहित्यच त्यांच्या हाती ठेवी आणि कधी तरी बदल म्हणजे कुठल्या कुठल्या मासिकाची वर्गणी संपल्याचे पत्र. शारंनी पुरं वर्षभर म्हणजे १२ x ३० x २४ इतके तास दम खाल्ला. मग मात्र त्यांचा धीर खचला. तेव्हा मग नवांककुरांनी ठरवले, दस्तुरखुद्द स्वत:चं प्रकाशकाकडे जाऊन चौकशी करायची. यावेळी त्यांनी शारंकडून प्रवासाचे निम्मेच पैसे घेतले. निम्मे स्वत:चे घालू म्हणाले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकाशकांकडे जाऊन आलेले वेगवेगळे अंकुर एकच गोष्ट सांगू लागले, ‘हल्ली आम्ही आमच्या खर्चाने कुणाचाच कवितासंग्रह काढत नाही. अगदी ज्ञानपीठ विजेत्या कवींचासुद्धा. कवितासंग्रह काढायचाच असेल, तर सर्व खर्च कवीने द्यावा. आम्ही योग्य भावात संग्रह काढून देऊ.’
नअंप्रमचा ( नवअंकुर प्रतिभा मंडळाचा ) उपाध्यक्ष शरद साजणे म्हणाला, ‘खरंच शारंजी तुम्ही स्वत:चं का काढत नाही तुमचा कवितासंग्रह. म्हणजे काय की प्रकाशन संस्थेला तरी पैसे द्यायचेच. त्यापेक्षा आपणच आपल्या देखरेखीखाली अगदी चांगला, उत्कृष्ट, सुबक, सुंदर कवितासंग्रह काढू या कसं?’
‘ते खरं… पण पैसे…’ इति शारं.
‘किती पैसे लागतील असे? आठ नाही तर दहा हजार रूपये फक्त…’ के ज्ञानेश्वरन् याने की ज्ञानेश्वर केडगे, फक्त आठ किंवा दहा रुपये असावेत, अशा थाटात म्हणाला.
शेवटी ठरलं, नअंप्रमंतर्फे शारंजींचा कवितासंग्रह काढायचा. मंडळाचे ५० सभासद आहेत. प्रत्येकाने २०-२० प्रती खपवल्या तरी पुस्तके केव्हाच खपतील. जेवढे पैसे घालू, तेवढेच नव्हे, तर त्यापेक्षा जास्त पैसे मिळतील. एव्हाना शारंनी मनात गणित करायला सुरुवात केली होती. समजा हजार प्रती काढल्या, त्यासाठी दहा हजार खर्च आला, पुस्तकाची किंमत फक्त पंचवीस रुपये ठेवली, तरी पंधरा हजार रुपये फायदा. प्रॉव्हिडंड फंडातून पैशाची जुळणी करायचे त्यांनी मनोमन ठरवून टाकले. गिनीज बुकात ‘बहुप्रसव कवी’ म्हणून आपल्या नावाची नोंद व्हावी, यासाठी ज्या अनेकानेक कविता त्यांनी गिनीज बुकच्या ऑफिसकडे रवाना केल्या होत्या, त्याच्या पोस्टेजमधे त्यांच्या रमणीच्या दागिन्यांना वाट फुटली होती. त्यामुळे शारंना आता फक्त प्रॉव्हिडंड फंडाचाच काय तो आधार होता. त्यातून ते नॉन रिफंडेबल लोन घेण्याचा विचार करू लागले.
‘तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळ्या प्रती गेल्या तर..’
‘गेल्या तर… .म्हणजे जाणारच… म्हणजे गेल्यातच जमा आहेत. ’ नवांकुरांनी शारंना आश्वासन दिले.
नअंप्रमंच्या कार्यकारिणीने शारंचा कवितासंग्रह काढण्याचे काम युद्धापातळीवर हाती घेतले. संस्थेच्या अध्यक्षांचा कवितासंग्रह निघणं म्हणजे संस्थेच्या मानात पिसांचा तुरा… किंवा तुर्याचं पीस… किंवा काय असेल ते… समजून घ्या. योग्य असेल ते वाचतो, तो वाचक. कुणी डी.टी.पी. ची जबाबदारी स्वीकारली. कुणी चित्रकार शोधायला गेले.
चित्रकार कोण असावा, पुस्तक छापायला कुणाकडे द्यावं, याबद्दल सस्थेच्या अंकुरांमध्ये बरीच बाचाबाची व वादंग झाले. शेवटी नव्यानेच या व्यवसायात पडलेल्या पासलकरांकडे पुस्तक छापायला द्यायचे ठरले. तो धंद्यात नवा. पक्का मुरलेला नाही. . पैसे कमी घेईल, सवडी-सवडीने देता येतील अशी मंडळींची अटकळ, पण पुस्तक उघडताना शारंना अगदी कृतार्थ वाटत होतं. आपण लिहीलेल्या शब्दांच्या रूपाकडे पाहताना मात्र, ही कृतार्थता पार लोपून गेली. भात खाताना घासाघासाला खडे लागावेत, तसं त्यांना प्रत्येक कविता वाचताना वाटू लागलं. प्रत्येक कवितेत, छे: छे: कवितेतल्या प्रत्येक ओळीत, शुद्धलेखनाच्या चुका होत्या. प्रुफं तपासण्याची जबाबदारी पत्करलेला नामदेव गळ्याजवळची कातडी चिमटीत ताणून म्हणाला,
‘आईच्यान्… मी ओळ न् ओळ, शब्द न् एसएचबीडी करेक्ट केलेला… नंतर या लोकांनी काही तरी गफलत केलीय.’
त्यावर मधु कांडकेची मल्लीनाथी अशी-
‘आता कवितेच्या दारजाविषयी प्रसन्न उपस्थित झाला, तर प्रिंटिंग मिसतेक्समुळे दर्जा उनावल्यासारखा वाटतोय, असं म्हणून वेळ मारून नेता येईल.’
शारंनी पुस्तक बंद केलं. आता त्यांचं लक्स मुखपृष्ठाकडे गेलं.मुखपृष्ठाच्या उजव्या बाजूला दोन बोटे रुंदीची पांढरी पट्टी उभी होती. राखी रंगाच्या पार्श्वभूमीवर ठळक लाल रंगात लिहिलं होतं, ‘बकुळीची फुले’ बकुळीचे अर्धे झाड मुखपृष्ठावर होते, तर अर्धे झाड मलपृष्ठावर. एवढेच नव्हे, तर फुले वेचणारी तरुणीही, अर्धी मुखपृष्ठावर होती, तर अर्धी मलपृष्ठावर होती. पुस्तके स्टीच करणार्याने चक्क त्या तरुणीच्या काळजातच पीन खुपसली होती. चित्र दोन बोटे डावीकडे सरकल्यामुळे असं झालं होतं. पुढे दोन बोटांची अपांढरी पट्टी आली होती. याची जबाबदारी छपाईवाल्याने, स्कॅनिंगवाल्यावर, स्कॅनिंगवाल्याने चित्रकारावर आणि चित्रकाराने छपाईवाल्यावर टाकत त्यांच्या अकलेचे दिवाळे काढले आणि त्यांनी धंदा बंद करून घरी बसावं असा अनाहूत सल्लाही दिला.
क्रमश: – भाग ३ ….
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈