सुश्री गायत्री हेर्लेकर
☆ जीवनरंग ☆ सांजवात…भाग 2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆
अनुराधा जोशी… तिची आई… हो, सावत्र असली तरी तिची आईच, तिची अनुआई. अन् नंदन… अनुआई चा सख्खा मुलगा, तिचा सावत्र भाऊ. तिला आणि अनुआई कधीही एकत्र न येऊ देणारा.
त्याला आईच्या प्रेमात आणि बाबांच्या इस्टेटीत वाटणी नको होती म्हणुन. अन् आता त्याने हा निर्णय का घेतला असेल?
खरं तर गेल्या २०,२२ वर्षांत… तिचे लग्न झाल्यापासून त्या कोणाशी च तिचा काहीच संपर्क नव्हता. स्वातीताईकडच्या लग्नात कदाचित भेट होईल असे वाटले होते, तिने स्वातीताईला तसे विचारलेही, ती म्हणाली तिने रितसर आमंत्रण दिले, फोन करुन पण सांगितले. नंदुदादाने मात्र बघतो, जमेल असे वाटत नाही, आईला पाठवणे पण अवघड आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली, म्हणुन येणे अपेक्षित नव्हते.
ज्योती फोटोकडे परतपरत बघत राहिली. आणि तिला ३५, ३६ वर्षांपुर्वीची अनुआई….. त्यांच्या घरी लग्न होऊन आलेली आठवली, बरोबर नंदुदादा होता. ज्योती तेंव्हा असेल ५, ७ वर्षांची. आणि तिच्यापेक्षा ७, ८ वर्षांनी स्वातीताई मोठी.
तिच्या जन्मानंतर सारखी आजारी असलेली त्यांची आई लवकरच गेली, बाबा मोठे व्यावसायिक, कामाचा व्याप खुप. नातेवाईकांचे फारसे संबंध नव्हते, म्हणुन तिचे सगळे स्वातीताईने नोकरमाणसांच्या मदतीने केले.
बाबांचे जवळचे मित्र, दुर्धर व्यक्तीने अचानकच गेले, त्यांची बायको आणि मुलगा अगदी निराधार. त्यांची जबाबदारी स्वीकारली, अन् लोकापवाद नको, म्हणुन हे लग्न केले, नंदनलाही कायदेशीर दत्तक घेतले.
वयाने लहान…. फारशी समज नाही म्हणुन ज्योतीलाच त्यात वावगे काहीच वाटले नाही. उलट आई दादा मिळाले म्हणुन आनंदच झाला. स्वातीताईला मात्र हे फारसे रुचले नव्हते, तिने ज्योतीलाच निक्षून सांगितले, “हे बघ ज्यो, ही आपली सख्खी आई नाही, अन् मुद्दाही नाही, तिला अनुआई च म्हणायचे, त्याच्याही फार जवळ जायचे नाही”.
तिने जवळ जायचा प्रश्णच ऊद्भवला नाही. कारण तोच त्या दोघींपासुन लांब.. अंतर ठेवुन.. अगदी तुसडेपणे वागे. तसा तो स्वातीताईपेक्षा २, ४ वर्षांनी मोठाच. त्यालाही हे लग्न मान्य नव्हतेच. पण अत्यंत चालाख आणि धूर्त. बाबांच्या इस्टेटीचे आकर्षण म्हणुन रीतसर तडजोड स्विकारली. त्याने हुषारीने, बाबांची मर्जी संपादन केली, अगदी त्यांचा उजवा हात झाला. पण त्या दोघींवर मात्र राग, अनुआईला मात्र त्या दोघींचे कौतूक, लाड करायला आवडे. पण ती जेंव्हा तसे करी तेंव्हा त्याची चिडचिड, धुसफुस सुरु होई, अन् अनुआईला त्याच्यासाठी माघार घ्यावी लागते.
स्वातीताईचे लग्न लवकरच झाले. नंदुदादाचेही. पण वहिनी तुसडेपणाच्या बाबत नंदुदादाच्या पुढे एक पाऊल. सावत्र नणंद हीच अंडी कायम मनात ठेवुन वागत असे.
बाबा होते तोपर्यंत जरा तरी ठीक. पण नंतर सर्वच कारभार त्या दोघांच्या हातात. आणि अनुआईचे दबावाखाली, सतत माघार घेऊन, घाबरुन वागणे. खरं तर ज्योतीलाच ते पटत नसे. निदान मनाप्रमाणे लग्न करायला तरी तिने पाठिंबा द्यावा असे तिला वाटत होते.
सत्येन तिच्या आयुष्यात आला तो ती MBA करत होती तेंव्हा. हुशार, दिलदार, तडफदार. मुख्य म्हणजे त्याचे कौटुंबिक वातावरण अत्यंत हसतखेळते. म्हणुन साधारण परिस्थिती आणि काहीशी कनिष्ठ जात हे तिला अगदी गौण मुद्दे वाटले.
पण नंदुदादाने मात्र हलक्या जातीचा, पैशावर डोळा ठेवूनच लग्न करतो म्हणुन त्याचा अपमान आणि अपमानाच केला. कारण ज्योतीचे लग्न वहिनीच्या भावाशी लावुन देण्याचा बेत होता त्याचा.
त्याच दरम्यान अनुआईशी बोलावे म्हणुन ज्योती एकदा तिच्या खोलीत गेली. ती नव्हती खोलीत. पण तिची डायरी दिसली, डायरी वैयक्तिक असते, ईतरां नी वाचुन नये, हे खर तर ज्योतीलाच माहित होते, तिचा तो स्वभावाही नव्हता, पण त्या दिवशी ज्योती जरा चिडलेलीच होती, बघुया तरी म्हणुन सहज वाचायला घेतली. तर त्यातील शब्दांशब्दांमधुन अनुआईची अगतिकता, परावलंबित्व, याचीच दु:खद कहाणी तिने सांगितली होती. माहेरी वडिल, भाऊ,नंतर पहिला नवरा, दुसरा नवरा आता मुलगा सर्वांच्याच सतत दबावाखाली, त्यांचीच मर्जी राखत होत जगणे, सुरुवातीची गरिबी, आता पैसा असुनही स्वातंत्र्य नाहीच त्यामुळे सतत कुतरओढ.
ज्योतीचे डोळे पाणावले, पण अनुआईकडुन पाठिंब्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे तिला अडचणीत टाकणे हे जाणवून आपला मार्ग आपणच निवडला. कारण तिला तिचा जीवाभावाचा जोडीदार सत्येन गमवायचं नव्हता.
नंदुदादा विरुध्द जाऊन ती अनुआईसाठी काहीही करु शकणार नव्हती.
स्वातीताईच्या पुढाकाराने त्यांचे लग्न झाले, पण नंदुदादा आणि अनुआईशी ही संबंध संपले, ते कायमचे च दुरावले.
© सुश्री गायत्री हेर्लेकर
201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.
दुरध्वनी – 9403862565
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈